(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही कार्यासाठी जोपर्यंत त्या ‘शक्ती’चा उपयोग केलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या शक्तीचे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब प्रथमतः तितकीशी महत्त्वाची नसते, ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन आंतरात्मिक (psychic) नसून प्राणिक (vital) असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. आणि तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, व्यक्तीचा आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 271)

सर्वसाधारण एक तत्त्व म्हणून आणि नित्य विशिष्ट उपयोगामध्येदेखील, आपल्याकडून ज्या श्रद्धेची अपेक्षा आहे ती श्रद्धा सरते शेवटी समग्र अस्तित्वाने स्वतःच्या सर्व घटकांनिशी, ‘देवा’च्या उपस्थितीस आणि देवाच्या मार्गदर्शनास व त्याच्या ‘शक्ती’स दिलेल्या एका विशाल, उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या व नित्य शुद्धतर, पूर्णतर आणि अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या सहमतीमध्ये परिणत होते. मनुष्याला स्वतःबद्दल, त्याच्या स्वतःच्या कल्पनांबद्दल, त्याच्या शक्तींबद्दल एक श्रद्धा प्रदान करण्यात आली आहे; जेणेकरून तो स्वतः कार्य करेल, निर्मिती करेल, आणि उच्चतर गोष्टींप्रत उन्नत होईल आणि अंततः त्याचे सारे सामर्थ्य हे जणू आत्मवेदीमधील सुयोग्य समिधा बनेल. आपल्यामध्ये असलेल्या स्वतःच्या आध्यात्मिक इच्छेवर आणि ऊर्जेवर तसेच ऐक्य, स्वातंत्र्य आणि पूर्णत्वाच्या दिशेने आपण ज्या शक्तीच्या आधारे यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकतो त्या आपल्या शक्तीवर आपली दृढ व बळकट श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ‘दिव्य शक्ती’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही आणि आपण तिच्या उपस्थितीने भारले जात नाही तोपर्यंत म्हणजे, दिव्य शक्तीवरील श्रद्धेच्या उदयापूर्वी तरी अनिवार्यपणे आपण आपल्यामध्ये असलेल्या आध्यात्मिक इच्छेवर, ऊर्जेवर व शक्तीवर दृढ व बळकट श्रद्धा बाळगली पाहिजे किंवा किमान तिची जोड तरी त्या दिव्य शक्तीला दिली पाहिजे.

‘शास्त्र’ असे सांगते की, निर्बल व्यक्तींना आत्मविजय संपादन करता येत नाही. ”नायमात्मा बलहीनेन लभ्यः।” पांगळा करणारा स्वतःमधील सर्व अविश्वास, सिद्धीच्या सामर्थ्याविषयीच्या सर्व शंका म्हणजे षंढत्वाला दिलेली संमतीच असते, ती दौर्बल्याची कल्पना असते आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमत्तेला दिलेला तो नकार असतो, अशा अविश्वासाला हतोत्साहित (discouraged) केलेच पाहिजे. आत्ताची सद्यकालीन अक्षमता, अगदी तिचा दबाव कितीही जास्त भासला तरी, ती श्रद्धेची केवळ एक कसोटी आहे; एखादी तात्पुरती अडचण आणि त्यावर मात करण्यासाठी असलेली अक्षमतेची भावना या गोष्टी पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने निरर्थक असतात; कारण आपल्या अस्तित्वामध्ये आधीपासूनच सुप्त रूपाने असलेल्या पूर्णत्वाचे विकसन हे त्याचे उद्दिष्ट असते; कारण मनुष्य स्वतःमध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये, दिव्य जीवनाचे बीज बाळगून असतो; त्याच्या प्रयत्नामध्येच यशाची शक्यता अंतर्भूत असते, गृहीत असते आणि त्याचा विजयही एक प्रकारे निश्चित असतो कारण त्या पाठीमागे सर्वसामर्थ्यशाली शक्तीची हाक आणि तिचे मार्गदर्शन असते. परंतु त्याचवेळी स्वतःवर असलेल्या या श्रद्धेला राजसिक अहंकाराच्या सर्व स्पर्धांपासून आणि आध्यात्मिक गर्वापासून विशुद्ध केलेच पाहिजे.

साधकाने ही संकल्पना शक्य तेवढी मनात बाळगली पाहिजे की, व्यक्तीचे सामर्थ्य हे तिचे स्वतःचे (अहंभावात्मक) सामर्थ्य नसते तर, ते वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य असते आणि त्या शक्तीचा कोणताही अहंभावात्मक वापर हा मर्यादेचे कारण ठरतो आणि अंततः तो अडथळा बनतो. आपल्या अभीप्सेच्या पाठीमागे असणाऱ्या वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य अमर्याद असते आणि जेव्हा तिला योग्य रितीने आवाहन केले जाते तेव्हा तिचे ते सामर्थ्य आपल्यामध्ये ओतण्यात आणि आपल्यामध्ये सद्यस्थितीत असलेले किंवा भविष्यात येऊ शकतील असे अडथळे आणि अक्षमता दूर करण्यामध्ये, ती अपयशी ठरू शकत नाही. कारण आपल्या संघर्षाचा कालावधी आणि वेळा या प्रथमतः साधनरूपाने आणि अंशतः आपल्या श्रद्धासामर्थ्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असल्या तरीसुद्धा अंततः ‘ईश्वरा’च्या, एकमेवाद्वितीय अशा त्या ‘योगस्वामी’च्या, म्हणजे सारे काही चातुर्याने निर्धारित करणाऱ्या गुप्त ‘आत्म्या’च्या हाती असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 779-780)

कर्म आराधना – ५३

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत अधिक प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 247], [CWSA 32 : 256-257]

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

साधनेची मुळाक्षरे – ३८

तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरकूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला ‘श्रीमाताजीं’च्या व त्यांच्या ‘शक्तीं’च्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (Plasticity) आणि नि:शेष समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. ‘श्रीमाताजी’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, ‘श्रीमाताजी’ तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अजागृत भागांमध्ये, अजागृत क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच ‘श्रीमाताजीं’च्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.

माणसातील प्राण ज्याप्रमाणे स्वत:च्याच उर्मींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच उर्मींवर भर देणारी असता कामा नये.

माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक चेतना आक्रंदन करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली असता कामा नये.

नि:शेष समर्पण, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकता (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या ‘प्रज्ञा’ आणि ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘सुसंवाद’ आणि ‘सौंदर्य’, ‘परिपूर्णता’ ह्या साऱ्या गोष्टींसाठी सातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही अर्धचेतन चेतनेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन ‘शक्ती’शी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम ‘प्रेमा’ने व ‘आनंदा’ने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-25)

साधनेची मुळाक्षरे – ३७

आपले पूर्वीचे सर्व संबंध आणि परिस्थिती यांचा सातत्याने परित्याग करत; येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणी, आपण जणू काही जीवनाला नव्यानेच सुरुवात करत आहोत असे समजून जीवन जगण्याकडे वाटचाल करणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय.

आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, ‘प्रकृती’च्या कार्यकारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा आपल्यातील सर्व चुका, सर्व गुन्हे, सर्व दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात; रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला अजूनही चिकटून बसलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात.

हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात टाकू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो.

आपल्याला आपल्या भूतकाळाचा प्रतिकार करायचा असेल, तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याच्यातून बाहेर पडायचे असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही; तर अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या, चेतनेच्या प्रबुद्ध अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे.

आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेले असतो आणि ‘कर्मा’च्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य चेतनेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु आत्मा जो सदासर्वदा ‘ईश्वरा’प्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन कायमसाठी पुन्हा एकदा नव्याने सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, ‘अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते,’ असा सदासर्वकाळ अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 176-177)

साधनेची मुळाक्षरे – ३६

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते; प्रत्येक लहानमोठ्या ऊर्मीची गुलामगिरी करून ते हिणकस झालेले असते. भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाप्रिय प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये खोटा वासनात्मा (A false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही, हे योग्यच आहे आणि त्यामुळे या अंगावर आपले नियंत्रण असावे असे बुद्धीला वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी जे नियंत्रण आणू शकते, किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीपण ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (The true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी ‘प्रकाशा’त आपला आत्मा निवास करत असतो; या अगदी खोल असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फार थोड्यांनाच असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात आहे पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्यांना त्याच्याकडून थेट प्रेरणा आल्याचे जाणवते. तेथे, म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ‘ईश्वरा’च्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला अंतरात्मा, आपले चैत्य अस्तित्व, साकार आत्मा, आपल्यातील खरा ‘पुरुष’ वृद्धिंगत होतो. मानवातील हे चैत्य अस्तित्व वृद्धिंगत होऊ लागले आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याची भविष्यवाणी व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मानवाला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व जाणिवांकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 150)

साधनेची मुळाक्षरे – ३५

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार पुढीलप्रमाणे –

१) ज्यामुळे संपूर्ण भक्ती हीच हृदयाची मुख्य प्रेरणा आणि विचारांची स्वामिनी बनेल अशा प्रकारचे चैत्य परिवर्तन (psychic change) घडणे आणि जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहणे.

२) ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण घडणे, ज्यामुळे शरीराच्या अगदी पेशी न् पेशी भारल्या जातील.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ‘ईश्वरा’ची व ‘श्रीमाताजीं’ची अनुभूती येणे आणि त्या अनंत अशा चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 319)

साधनेची मुळाक्षरे – ३४

प्रश्न : पूर्णयोग म्हणजे काय?

श्रीअरविंद : संपूर्ण ‘ईश्वरी’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’-साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा हा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे तर, येथील जीवनाचे संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे, आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा तीच परिपूर्णता आहे, कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याखेरीज उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाचे, प्रकृतीचे तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित आत्मदान, उन्मुखता असणे, आणि त्या ईश्वराकडे पूर्णत्वाने वळणे अंतर्भूत आहे. आपले मन, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि अंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन आणि अवचेतन घटकदेखील अशा प्रकारे देऊ केले पाहिजेत; हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्ये सहभागी झालेच पाहिजे. हे ‘पूर्णयोगा’चे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 358)

साधनेची मुळाक्षरे – ३३

(श्रीअरविंदलिखित पत्रामधून…)

हा ‘योग’ म्हणजे केवळ ‘भक्तियोग’ नाही; हा ‘पूर्णयोग’ आहे किंवा किमान तसा त्याचा दावा तरी आहे, म्हणजे असे की, यामध्ये, संपूर्ण जीवच त्याच्या सर्व अंगांनिशी ‘ईश्वरा’कडे वळणे अभिप्रेत आहे.

याचा अर्थ असा की, तेथे ज्ञान, कर्म तसेच ‘भक्ती’देखील असली पाहिजे. त्यात अधिकची भर म्हणजे, त्यामध्ये प्रकृतीच्या पूर्ण परिवर्तनाचा, परिपूर्णत्वाच्या ध्यासाचा समावेश होतो, ज्यामुळे प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकात्म होईल. केवळ हृदयच ईश्वराकडे वळले आणि त्याचे परिवर्तन झाले, असे होऊन चालणार नाही, तर मनसुद्धा ईश्वराकडे वळले पाहिजे आणि म्हणून ज्ञानसुद्धा गरजेचे आहे; त्याचबरोबर इच्छाशक्ती, कर्मशक्ती आणि सृजनशक्तीसुद्धा ईश्वराकडे वळली पाहिजे म्हणून कर्मसुद्धा आवश्यक आहे.

या ‘योगा’मध्ये इतर ‘योगमार्गां’च्या पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे – उदा. ‘पुरुष-प्रकृती’ची पद्धत, परंतु अंतिम उद्दिष्टाबाबत मात्र फरक आहे. ‘पुरुषा’चे ‘प्रकृती’पासून विलगीकरण येथेही आहे, पण ते तिचा त्याग करण्यासाठी नाही तर, पुरुषाने स्वतःला आणि प्रकृतीला जाणावे या हेतूने आहे. पुरुष हा प्रकृतीचे खेळणे म्हणून नव्हे तर प्रकृतीचा ज्ञाता म्हणून, स्वामी म्हणून आणि पालनकर्ता म्हणून असावा, या हेतुने हे विलगीकरण आहे; आणि हे असे घडत असताना किंवा झाल्यानंतर, व्यक्ती स्वतःचे सर्वस्व ईश्वरार्पण करते.

व्यक्ती ज्ञानापासून किंवा कर्मापासून किंवा ‘भक्ती’पासून वा परिपूर्णत्वासाठी (प्रकृतीचे परिवर्तन) आत्म-शुद्धिकरणाच्या ‘तपस्ये’पासून प्रारंभ करू शकते आणि उर्वरित गोष्टी या त्या पाठोपाठ येणाऱ्या प्रक्रिया म्हणून विकसित करू शकते किंवा व्यक्ती या साऱ्या गोष्टी एकाच प्रक्रियेमध्येदेखील समाविष्ट करू शकते. सर्वांसाठी एकच एक असा नियम नाही, ते व्यक्ती आणि तिच्या प्रकृतीवर अवलंबून असते.

समर्पण ही या ‘योगा’ची मुख्य ताकद आहे, परंतु समर्पण हे प्रगमनशील (Progressive) असले पाहिजे, प्रारंभीच संपूर्ण समर्पण शक्य नसते, तर प्रारंभी, त्या संपूर्णतेची जिवामध्ये असलेली ती एक इच्छाच असते – वस्तुतः या साऱ्याला वेळ लागतो. आणि जेव्हा समर्पण परिपूर्ण होते तेव्हाच साधनेचा पूर्ण बहर शक्य असतो. तोपर्यंत, समर्पणाच्या चढत्यावाढत्या वास्तवानिशी वैयक्तिक प्रयत्न असणे देखील आवश्यक असते. व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’च्या सामर्थ्याला आवाहन करते आणि एकदा का ती शक्ती त्या जिवामध्ये अवतरित व्हायला सुरुवात झाली की, मग ती सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांना आधार पुरविते, नंतर ती हळूहळू व्यक्तीची समग्र कृतीच हाती घेते, अर्थात यासाठी साधकाची संमती असणे ही बाब नेहमीच गरजेची असते.

एकदा ‘शक्ती’ने कार्य हाती घेतले की, साधकाच्या दृष्टीने ज्या ज्या विभिन्न प्रक्रिया आवश्यक असतात, त्या साऱ्या प्रक्रिया ती घडवून आणते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्ञानाच्या, ‘भक्ती’च्या, आध्यात्मिक कर्माच्या प्रक्रिया, प्रकृतीच्या रूपांतरणाच्या प्रक्रिया ती घडवून आणते. या साऱ्या प्रक्रिया एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत, ही कल्पना दोषपूर्ण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 207-208)