साधना, योग आणि रूपांतरण – २६२

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये जर निष्काळजीपणा असेल तर येथून पुढे तुम्ही तुमच्या सर्व कृतींमध्ये सचेत (conscious) होण्यास शिकलेच पाहिजे. तसे केलेत तर मग प्राणिक वृत्तीप्रवृत्ती तुम्हाला फसवू शकणार नाहीत किंवा कोणते फसवे रूप घेऊन तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. या प्राणिक वृत्तीप्रवृत्तींचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्या जशा आहेत तशा त्या तुम्हाला पाहता याव्यात यासाठी, तुम्ही अगदी पूर्णपणे प्रामाणिक असले पाहिजे.

तुम्ही एकदा जर चैत्य पुरुष (psychic being) खुला करू शकलात आणि तो तसाच खुला ठेवू शकलात तर, तुमच्या अंतरंगामधूनच तुम्हाला प्रत्येक पावलागणिक वास्तविक सत्य काय आहे हे दाखविणारा बोध सातत्याने मिळत राहील आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून तो तुमचे रक्षण करत राहील. तुम्ही जर सतत आस बाळगलीत आणि शांती वृद्धिंगत होण्यास आणि ‘दिव्य शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव दिलात तर अशी उन्मुखता, असे खुलेपण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 105)

साधना, योग आणि रूपांतरण – २६१

प्राणाचे रूपांतरण

प्राणाचे शुद्धीकरण ही सहसा यशस्वी साधनेसाठी आवश्यक असणारी अट आहे असे मानले जाते. प्राणाचे शुद्धीकरण झालेले नसतानाही व्यक्तीला काही अनुभव येऊ शकतात पण चिरस्थायी साक्षात्कारासाठी, प्राणिक गतिविधींपासून पूर्णपणे अलिप्तता असणे हे तरी किमान आवश्यक असते.

*

‘क्ष’ ने जे जाळे पसरले होते त्या जाळ्यात तुम्ही अडकलात ही गोष्ट खरोखरच आश्चर्यकारक वाटावी अशी आहे. ती मिथ्या, नाटकी आणि स्वप्नाळू प्राणाची वृत्ती असते, ती तर्कबुद्धीला झाकोळून टाकते आणि साध्यासरळ सत्यावरही पडदा पडल्यासारखे होते व सामान्य व्यवहारबुद्धीही (common sense) चालेनाशी होते.

तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, मिथ्यत्वाबरोबर प्राण जी तडजोड करत आहे (मग भलेही तो त्याच्या समर्थनासाठी कोणतीही कारणे का देईनात) ती त्यामधून काढून टाकली पाहिजे. आणि साधे सरळ प्रामाणिक आंतरात्मिक सत्य कोरून ठेवण्याची सवय त्या प्राणाला लावली पाहिजे म्हणजे मग त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास कोणालाच वाव मिळणार नाही. तुमच्या प्राणामधील जो भाग अशा प्रकारच्या तडजोडी करत आहे त्या भागावर हा धडा पक्का कोरून ठेवता आला तर, (तुमच्या हातून घडलेल्या) या चुकीच्या गोष्टीमधूनही निश्चितपणे काहीतरी चांगले निष्पन्न होईल. “येथून पुढे मिथ्यत्वाला आतमध्ये प्रवेश नाही,” ही श्रीमाताजींची सूचना तुमच्या प्राणिक अस्तित्वाच्या दरवाजावर चिकटवून ठेवा. आणि ती सूचना काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे ना, हे पाहण्यासाठी दरवाजावर एक पहारेकरी नेमा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 107), (CWSA 31 : 104-105)

साधना, योग आणि रूपांतरण – २६०

प्राणाचे रूपांतरण

साधनेसाठी लागणारा अविचल आणि समतोल पाया म्हणजे अशी एक अवस्था असते की जिच्यामध्ये अनुभवाच्या अपेक्षेने उंचबळून येणेही नसते किंवा निष्क्रिय किंवा अर्ध-निष्क्रिय अशी निराश स्थिती देखील नसते. या दोन्हीमध्ये साधक हेलकावे खात नसतो. तर तो प्रगती करत असला किंवा तो अडचणीमध्ये असला तरीही, या कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीशी नेहमीच एक अविचल चेतना असते आणि ती विश्वासाने व श्रद्धेने ‘ईश्वरा’कडे वळलेली असते.
*
अविचलता म्हणजे तामसिकता नव्हे. अविचलतेमध्ये (इच्छावासना, शोक, आसक्ती आणि तत्सम इतर प्रतिक्रिया) या प्रकृतीच्या सामान्य राजसिक वृत्तीप्रवृत्ती निश्चल झालेल्या असतात. शांती अवतरित होण्यासाठी ही गोष्ट अत्यावश्यक असते. यालाच आपण ‘अविचल प्राण’ (quiet vital) असे म्हणू शकतो. अविचल मन आणि अविचल प्राणामध्ये खरी आध्यात्मिक चेतना अगदी सहजतेने येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 114-115), (CWSA 31 : 115)

साधना, योग आणि रूपांतरण – २५९

प्राणाचे रूपांतरण

पृथ्वी-चेतनेला परिवर्तन नको असते आणि त्यामुळे वरून जे काही अवतरित होते त्यास ती नकार देते. आत्तापर्यंत ती नेहमीच हे असे करत आली आहे. ज्यांनी योगाचे आचरण करण्यास सुरुवात केली आहे ते जर स्वतःस उन्मुख करतील आणि त्यांच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यास राजी होतील तरच पृथ्वी-चेतनेमधील ही अनिच्छा नाहीशा होऊ शकेल.

या परिवर्तनामध्ये कोणती गोष्ट आड येते? तर, प्राणिक अहंकार आणि त्याचे अज्ञान आणि त्याच्या अज्ञानाचा त्याला असणारा अभिमान ही गोष्ट आड येते. परिवर्तनाच्या कोणत्याही आवाहनास विरोध व प्रतिकार करणारी शारीरिक चेतना आणि तिचे जडत्व, आणि तिचा आळशीपणा, की ज्याची कोणतेही कष्ट घेण्याची तयारी नसते या गोष्टीसुद्धा परिवर्तनाच्या आड येतात. शारीर-चेतनेला त्याच त्याच जुन्या गतिविधी पुन्हा पुन्हा करत राहणे सोयीस्कर वाटते. ती जास्तीत जास्त काय करते तर, तिच्यासाठी कधीतरी कोणीतरी, कोणत्यातरी प्रकारे सर्वकाही करेल अशी ती अपेक्षा करत असते.

आणि म्हणूनच पहिली आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे तुमच्यापाशी योग्य असा आंतरिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि नंतर, स्वतःचे रूपांतरण करण्याची इच्छा असणे, आणि कनिष्ठ प्रकृतीचा तामसिक चिवटपणा व अहंकार यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन आणि त्याला नकार देण्यामधील सतर्कता या गोष्टी आवश्यक असतात. अंतिमतः, तुमचे व्यक्तित्व, त्याचा प्रत्येक भाग हा सदोदित श्रीमाताजींप्रत खुला असला पाहिजे; जेणेकरून रूपांतरणाच्या प्रकियेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 222)

साधना, योग आणि रूपांतरण – २५८

प्राणाचे रूपांतरण

साधकांना ज्या शंका येतात त्या खऱ्या मनाकडून येण्याऐवजी बरेचदा प्राणामधून उदय पावतात. जेव्हा प्राण चुकीच्या मार्गाने जातो किंवा तो संकटग्रस्त किंवा निराशाग्रस्त असतो, अशा वेळी शंकाकुशंका यायला लागतात आणि त्या त्याच रूपात, त्याच शब्दांमध्ये पुन्हापुन्हा व्यक्त होत राहतात. मनाला ती गोष्ट स्पष्ट पुराव्याच्या आधारे किंवा बौद्धिक उत्तराने कितीही पटलेली असली तरीदेखील या शंका येत राहतात. मला तसे नेहमीच आढळून आले आहे. (प्राण जरी स्वतःचे समर्थन करण्यासाठी तर्कबुद्धीचा वापर करत असला तरीसुद्धा) प्राण हा अतार्किक, अविवेकी असतो. आणि तो तर्कबुद्धीनुसार नव्हे तर, स्वतःच्या भावभावनांनुसार एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो किंवा ठेवत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 103)

साधना, योग आणि रूपांतरण – २५७

प्राणाचे रूपांतरण

एक रणनीती म्हणून प्राणाची उत्क्रांतीमधील सुरुवातच मुळी तर्कबुद्धीच्या आज्ञापालनाने नव्हे तर, भावावेगांना बळी पडण्यातून होते. प्राणाला, ज्या रणनीतीच्या परिघामध्ये त्याच्या इच्छावासना समाविष्ट होतील अशा युक्त्याप्रयुक्त्या असतील फक्त ती रणनीतीच त्याला समजते. त्याला ज्ञानाची आणि प्रज्ञेची वाणी आवडत नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, मनुष्याची स्वतःच्या कृतींचे तर्कबुद्धीच्या साहाय्याने समर्थन करण्याची आवश्यकता वाढीस लागली आहे आणि त्यामुळे प्राणिक मनाने खास स्वतःची अशी एक रणनीती तयार केली आहे. स्वतःच्या भावभावना आणि आवेगांचे ज्याद्वारे समर्थन होईल अशा कारणांचा शोध घेण्यासाठी प्राणिक मन (vital mind) त्याची बुद्धी कामास लावते; हीच असते त्याची ती रणनीती.

या खेळामध्ये तर्कबुद्धी विजयी होणार हे जिथे अगदी स्पष्ट असते तेव्हा, प्राण कानच बंद करून घेण्याच्या त्याच्या मूळ सवयीकडे वळतो आणि तो त्याच्या स्वतःच्या मार्गाने जाऊ लागतो. या हल्ल्यामध्ये, तो आपण अपात्र असल्याची सबब पुढे करतो. तो म्हणतो, “तुम्ही माझ्या भावावेगांबाबत संतुष्ट नाही आणि मी तर काही ते बदलू शकत नाही, त्यामुळे मी अपात्र आहे हे दिसून येत आहे तर मी आता निघून जावे हे बरे,” त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्याने अंगीकारलेली ही रणनीती असते.

परंतु या रणनीतीलाही कोणी जर बिनतोड उत्तर दिले तर, प्राणाचा आवेग स्वयमेवच त्या उत्तराला तोंड देण्यास पुरेसा (सक्षम) असतो, कारण तो वैश्विक ‘प्रकृती’कडून आलेला असल्यामुळे सशक्त असतो. त्याच्यावर जो हल्ला झालेला असतो, तो परतवून लावण्यासाठी जुन्या अंध अतार्किक सहजप्रवृत्तीचे तो थोड्या काळासाठी का होईना पण पालन करतो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 103)

साधना, योग आणि रूपांतरण – २५६

प्राणाचे रूपांतरण

आंतरात्मिक प्राणशक्ती म्हणजे अशी प्राणशक्ती की जी अंतरंगामधून उदित झालेली असते आणि जी चैत्य पुरुषाशी (psychic being) सुसंवादी असते. ती शुद्ध प्राणमय पुरुषाची (vital being) ऊर्जा असते, परंतु सर्वसामान्य अज्ञानी प्राणामध्ये ती इच्छावासनांच्या रूपात विकारित झालेली असते.

तुम्ही तुमचा प्राण अविचल आणि शुद्ध केला पाहिजे, आणि खरा, शुद्ध प्राण उदयास येऊ दिला पाहिजे. किंवा तुमच्यामधील चैत्य पुरुष अग्रभागी आणला पाहिजे, म्हणजे तो चैत्य पुरुष तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करेल आणि त्याचे आंतरात्मिकीकरण (psychicise) करेल आणि मग तुम्हाला शुद्ध प्राणिक ऊर्जा मिळेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २५५

प्राणाचे रूपांतरण

मानवी प्राणाचे स्वरूपच नेहमी असे असते की, तो इच्छावासना आणि स्वैर-कल्पना यांनी भरलेला असतो. मात्र त्यामुळे ती जणू काही एखादी अपरिवर्तनीय गोष्ट आहे असे समजण्याचे काहीच कारण नाही. किंवा त्यामुळे या अस्वस्थ प्राणाला, त्याला वाटेल तसे एखाद्या व्यक्तीला चालविण्याची मुभा देण्याची देखील आवश्यकता नाही.

योगमार्गाव्यतिरिक्तही, अगदी सामान्य जीवनामध्येही, जे या अस्वस्थ प्राणाला हाताशी घेतात, त्याच्यावर एकाग्रता करून, त्याला नियंत्रित करतात आणि त्याला शिस्तीनुसार वागायला लावतात अशा व्यक्तीच त्यांनी हाती घेतलेल्या कार्यामध्ये, त्यांच्या आदर्शांमध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याची शक्यता असते किंवा अशा व्यक्तींकडेच पूर्ण पुरुषार्थ आहे असे समजले जाते. अशा व्यक्ती मानसिक इच्छेद्वारे प्राणाला वळण लावतात. प्राणाला काय वाटते त्यानुसार नव्हे तर, त्यांच्या बुद्धीला किंवा इच्छाशक्तीला काय योग्य वा इष्ट वाटते त्यानुसार वागण्यासाठी ते प्राणाला प्रवृत्त करतात.

योगमार्गामध्ये व्यक्ती आंतरिक इच्छाशक्तीचा उपयोग करते आणि तपस्या करण्यासाठी प्राण राजी व्हावा म्हणून त्या प्राणास प्रवृत्त करते; जेणेकरून तो प्राण शांत, सशक्त आणि आज्ञाधारक होईल. किंवा, प्राणाने इच्छावासनांचा त्याग करावा आणि अविचल व ग्रहणशील व्हावे म्हणून त्याला प्रवृत्त करण्यासाठी व्यक्ती ऊर्ध्वस्थित स्थिरशांतीला अवतरित होण्याचे आवाहन करते.

प्राण हा चांगले साधन असतो, पण तो चांगला स्वामी मात्र होऊ शकत नाही. तुम्ही त्याला जर त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या स्वैरकल्पना, त्याच्या इच्छावासना, त्याच्या वाईट सवयी यांनुसार वागण्यास मुभा दिलीत तर, प्राण तुमच्यावर सत्ता गाजवू लागतो आणि शांती व आनंद या गोष्टी अशक्य होऊन जातात. (अशा वेळी) तो तुमचे किंवा ‘दिव्य शक्ती’चे साधन होत नाही, तर तो अज्ञानाच्या कोणत्याही शक्तीचे किंवा अगदी कोणत्याही विरोधी शक्तीचे साधन होतो आणि मग ती शक्ती त्या प्राणाचा ताबा घेऊन, त्याचा वापर करू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 105-106)

साधना, योग आणि रूपांतरण – २५४

प्राणाचे रूपांतरण

प्राण हे एक अत्यावश्यक साधन आहे. कोणतीच निर्मिती किंवा सामर्थ्यशाली कृती प्राणाशिवाय शक्य नसते. एवढेच की, त्याच्यावर स्वामित्व मिळविण्याची आणि त्याचे शुद्ध प्राणामध्ये परिवर्तन घडविण्याची आवश्यकता असते. हा शुद्ध प्राण सशक्त व स्थिरशांत असतो आणि त्याच वेळी, तो अतिशय तीव्रतेबाबतही सक्षम असतो आणि अहंकारापासून मुक्त असतो.
*
अंध प्राणिक शक्तीपासून सुटका ही प्राणाच्या परिवर्तनाच्या माध्यमातूनच घडून आली पाहिजे. सशक्त, विस्तृत, शांतीयुक्त असणाऱ्या, आणि ‘ईश्वरा’चे व केवळ ‘ईश्वरा’चेच साधन होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शुद्ध प्राणाच्या उदयाद्वारेच ही सुटका झाली पाहिजे.
*
(असमाधान व्यक्त करणे, परिवर्तनाला प्रतिकार करणे) हे पुनरुज्जीवित न झालेल्या, पृष्ठभागी असणाऱ्या प्राणिक भागाचे स्वरूप असते. शुद्ध प्राणाचे स्वरूप भिन्न असते. तो स्थिरशांत आणि सशक्त असतो. आणि तो ‘ईश्वरा’र्पित झालेला असतो, तो ‘ईश्वरा’चे एक शक्तिशाली साधन असतो. परंतु तो अग्रभागी येण्यासाठी, प्रथम मनामध्ये वरच्या स्तरावर असणारी स्थिर अवस्था प्राप्त करून घेणे आवश्यक असते. जेव्हा तेथे चेतना असते आणि मन स्थिरशांत, मुक्त आणि विशाल असते तेव्हा शुद्ध प्राण अग्रभागी येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112, 111, 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २५३

प्राणाचे रूपांतरण

प्राणशक्ती (Vitality) म्हणजे जीवन-शक्ती. जेथे कोठे जीवन असते, मग ते वनस्पतींमध्ये असू दे, प्राण्यांमध्ये असू दे किंवा माणसामध्ये असू दे, तेथे जीवन-शक्ती असते. प्राणाशिवाय जडभौतिकामध्ये जीवन असू शकत नाही, प्राणाशिवाय कोणतीही जिवंत कृती घडू शकत नाही. प्राण ही एक आवश्यक अशी शक्ती असते आणि जर प्राण हा साधनभूत म्हणून तेथे नसेल तर, शारीरिक अस्तित्वामध्ये कोणतीच गोष्ट निर्माण होऊ शकत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. इतकेच काय पण साधनेसाठीसुद्धा प्राणशक्तीची आवश्यकता असते.

हा प्राण जितका उपयुक्त ठरू शकतो तेवढाच तो घातकदेखील ठरू शकतो. प्राण पुनर्जीवित न होता जर तसाच राहिलेला असेल, आणि तो जर इच्छावासना आणि अहंकाराचा गुलाम झालेला असेल तर, तो घातक ठरू शकतो. अगदी आपल्या सामान्य जीवनातसुद्धा मनाद्वारे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे या प्राणाचे नियंत्रण करावे लागते, अन्यथा तो अव्यवस्था निर्माण करू शकतो किंवा अनर्थ घडवू शकतो. लोकं जेव्हा प्राणप्रधान मनुष्यासंबंधी बोलतात तेव्हा ती, मन किंवा आत्म्याद्वारे नियंत्रित न झालेल्या प्राणशक्तीचे वर्चस्व असलेल्या व्यक्तीविषयी बोलत असतात.

प्राण हा एक चांगले साधन बनू शकतो पण तो अगदी वाईट मालक असतो. या प्राणाला मारायची किंवा त्याला नष्ट करायची आवश्यकता नसते पण त्याला आंतरात्मिक आणि आध्यात्मिक नियमनाने शुद्ध करण्याची आणि त्याचे रूपांतर करण्याची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 106)