साधना, योग आणि रूपांतरण – २९२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये अश्लील दृष्य दिसत असत, तसेच त्याला साधनेमध्ये कामवासनेच्या विकाराचादेखील बराच अडथळा जाणवत असे. त्याच्या या समस्येवर श्रीअरविंदांनी पत्राद्वारे दिलेले उत्तर…)

अश्लील दृष्य वगैरेच्या बाबतीत सांगायचे तर, ज्यामध्ये अशा प्रकारच्या अनेकानेक विचित्र गोष्टी असतात अशा अवचेतन (subconscient) प्रांतामधूनच या गोष्टी तुमच्या पृष्ठभागावर येत असल्या पाहिजेत. किंवा मग तुमच्या कनिष्ठ प्राणिक चेतनेवर त्या चेतनेशी संबंधित असणाऱ्या वैश्विक प्रकृतीमधील प्रतलावरून अशा प्रकारच्या रचनांचा भडिमार होत असेल. या प्रतलावर घाणेरड्या, अश्लील व कुरुप गोष्टींमध्ये आणि सर्व प्रकारच्या विकृतीमध्ये मजा घेणाऱ्या शक्ती असतात. मात्र कारण कोणतेही असले तरी अशा वेळी साधकाने स्थिर, निर्लिप्त नकार हीच प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे.

*

एखादा साधक जेव्हा लैंगिक वासनात्मक कृतींचे शमन करू लागतो आणि सचेत मनामधून व प्राणामधून त्या कृतीस नकार देऊ लागतो तेव्हा त्या साधकाला कामवासना छळू लागतात. आणि ही एक अगदी सर्वसाधारणपणे आढळून येणारी गोष्ट आहे. (अशा परिस्थितीत) कामवासना ही जेथे मनाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसते अशा अवचेतनामध्ये आश्रय घेते आणि ती स्वप्न-रूपाने पृष्ठभागी येऊन, स्वप्नदोष (वीर्यपतन) घडवून आणते. जोपर्यंत अवचेतन स्वतः शुद्ध होत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडतच राहते.

ही गोष्ट घडू नये यासाठी झोपण्यापूर्वी काम-चक्रावर, जे नाभीच्या खाली असते (sex-centre) त्यावर प्रबळ इच्छाशक्तीचा वापर केल्याने किंवा शक्य झाल्यास, त्यावर सघन असा ‘शक्ती’प्रवाह केंद्रित केल्यामुळे कधीकधी उपयोग होऊ शकतो. यामध्ये लगेचच यश येईल असे नाही, परंतु प्रभावीपणे असे करत राहिल्यास, सुरुवातीला त्या गोष्टीच्या पुनरावृत्तीचे प्रमाण कमी होते आणि सरतेशेवटी ती शमते.

अतिमसालेदार, चमचमीत पदार्थांचे सेवन किंवा लघवी रोखून धरणे यासारख्या गोष्टी स्वप्नदोषांसारख्या गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत ठरतात. अवचेतनाच्या या प्रेरणेमध्ये बरेचदा एक कालबद्धता असते. म्हणजे ही गोष्ट महिन्यातील एका विशिष्ट वेळी किंवा आठवड्याने, पंधरवड्याने, महिन्याने किंवा सहा महिन्याने एकदा अशा ठरावीक कालावधीनंतर घडताना दिसते.

– श्रीअरविंद (SABCL 24 : 1604)

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व प्राण मुक्त होण्यासदेखील साहाय्य होऊ शकते.
*
जेव्हा मन, प्राण व शरीर हे संपूर्णपणे दिव्य होतील आणि त्यांचे अतिमानसिकीकरण (supramentalised) घडून येईल तेव्हा ते ‘परिपूर्ण रूपांतरण’ असेल आणि त्या दिशेने घेऊन जाणारी प्रक्रिया हीच रूपांतरणाची खरी प्रक्रिया होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 598) (CWSA 28 : 297)

*

केवळ मन आणि प्राणानेच नव्हे तर, शरीराने सुद्धा त्याच्या सर्व पेशींसहित दिव्य रूपांतरणाची आस बाळगली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 15 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – २९०

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते.

जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा ज्याला ‘परिसरीय चेतना’ (environmental consciousness) असे म्हणता येईल, त्यामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथून त्या काही काळपर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा तेथून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत, चेतनेवर दबाव टाकतात.

त्या (इच्छावासना) परिसरीय चेतनेमधून येत असतील तर त्या विचार-सूचनांचे किंवा आवेगांचे रूप घेतात किंवा मग त्यांचा अस्वस्थ करणारा एक अंधुकसा दबाव व्यक्तीला जाणवतो. त्या जर अवचेतनामध्ये गेल्या असतील तर तेथून त्या बरेचदा स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात, परंतु त्या जागृतावस्थेत सुद्धा पृष्ठभागावर येऊ शकतात.

जेव्हा शरीर नव-चेतनामय झालेले असते आणि त्याच वेळी त्याच्या ठायी ‘दिव्य शांती’ आणि ‘दिव्य शक्ती’ असते तेव्हा, व्यक्तीला बाह्यवर्ती दबावाची जाणीव होते परंतु त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होत नाही आणि मग (शारीर-मनावर किंवा शरीरावर तत्काळ दबाव न टाकता) तो दबाव सरतेशेवटी (व्यक्तीपासून) दूर निघून जातो किंवा मग तो हळूहळू किंवा त्वरेने नाहीसा होतो.

मी ज्याला ‘परिसरीय चेतना’ असे संबोधतो ती चेतना प्रत्येक मनुष्य, त्याच्या नकळत, स्वतःच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस, सभोवार वागवत असतो आणि या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून तो इतरांच्या आणि वैश्विक शक्तींच्या संपर्कात असतो. या चेतनेद्वारेच इतरांच्या भावना, विचार इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. याच चेतनेद्वारे वैश्विक शक्तींच्या लहरी म्हणजे इच्छावासना, लैंगिकता इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्तीच्या मन, प्राण व शरीराचा ताबा घेतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 601)

साधना, योग आणि रूपांतरण – २८९

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते म्हणजे खरंतर, तुमच्या (subconscient) अवचेतनामधून वर आलेल्या गतकालीन रचना होत्या किंवा त्यांचे ठसे होते. आपण जीवनामध्ये जे जे काही करतो, आपल्याला जे जाणवते किंवा ज्याचा आपण अनुभव घेतो, त्या सगळ्यांचा काही एक ठसा, एक प्रकारची मूलभूत स्मृती अवचेतनामध्ये जाऊन बसते आणि आपल्या सचेत अस्तित्वामधून त्या (जुन्या) भावना, वृत्तीप्रवृत्ती किंवा ते अनुभव पुसले गेले तरी त्यानंतरही दीर्घ काळपर्यंत ते स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात. अनुभव जेव्हा नुकतेच घडून गेलेले असतात किंवा मन वा प्राणामधून ते अगदी नुकतेच फेकले गेलेले असतात, त्यांच्यापेक्षाही या जुन्या गोष्टी आधिक्याने पृष्ठभागावर येतात.

आपण आपल्या जुन्या परिचितांविषयी किंवा नातेवाईकांविषयी विचार करणे थांबविल्यानंतरसुद्धा दीर्घ काळ त्यांच्याबद्दलची स्वप्नं ही अवचेतनामधून पृष्ठभागावर येत राहतात. त्याचप्रमाणे, सचेत प्राणाला जरी आता, लैंगिकतेचा किंवा रागाचा त्रास होत नसला तरीसुद्धा लैंगिकतेबद्दलची किंवा राग आणि भांडणतंट्यांची स्वप्नं पडू शकतात.

अवचेतन शुद्ध झाल्यानंतरच ती स्वप्नं पडायची थांबतात. परंतु तोपर्यंत म्हणजे व्यक्ती त्या जुन्या गतिप्रवृत्ती जागृतावस्थेमध्ये टिकून राहण्यास किंवा जागृतावस्थेमध्ये पुन्हापुन्हा घडण्यास संमती देत नसेल (त्या स्वप्नांचे स्वरूप काय हे व्यक्तीला समजत असेल आणि त्यामुळे तिच्यावर त्यांचा परिणाम होत नसेल तर) ती स्वप्नं तितकीशी महत्त्वाची ठरत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 606)

साधना, योग आणि रूपांतरण – २८८

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी अवचेतनावर कार्य करत होते. त्याचा संदर्भ येथे आहे.)

अवचेतनामधील (subconscient) साधनेचे हे कार्य व्यक्तिगत स्वरूपाचे नसून, ते सार्वत्रिक स्वरूपाचे असते. पण निश्चितच त्याचा येथील (श्रीअरविंद-आश्रमातील) प्रत्येकावर काही ना काही प्रमाणात परिणाम होत आहे. अवचेतनामध्ये चेतना व प्रकाश उतरविला नाही तर त्यामध्ये काहीही परिवर्तन होऊ शकणार नाही. कारण या अवचेतनामध्येच सर्व जुन्या कनिष्ठ प्राणिक उपजत प्रेरणांची आणि वृत्तीप्रवृत्तींची बीजे दडलेली असतात. आणि कनिष्ठ प्राणामधून या उपजत प्रेरणा व वृत्तीप्रवृत्ती काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या प्रवृत्ती खालून (अवचेतनामधून) पुन्हा डोकं वर काढतात.

तसेच अवचेतना हीच शारीर-चेतनेचा गुप्त आधार देखील असतो. अवचेतनाने स्वतःमध्ये उच्चतर चेतनेला आणि सत्य-प्रकाशाला प्रवेश करू देणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 611-612)

साधना, योग आणि रूपांतरण – २८७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आंतरिक अस्तित्व हे अवचेतनावर (subconscient) अवलंबून नसते. परंतु बाह्यवर्ती अस्तित्व मात्र जन्मानुजन्मं अवचेतनावर अवलंबून राहत आले आहे. आणि त्यामुळे बाह्यवर्ती अस्तित्व आणि शारीर-चेतनेची अवचेतनाला प्रतिसाद देण्याची सवय, या गोष्टी साधनेच्या प्रगतीमध्ये एक भयंकर मोठा अडथळा ठरू शकतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत तो तसा अडथळा ठरतो देखील.

अवचेतन हे जुन्या गतिप्रवृत्तींची पुनरावृत्ती साठवून ठेवत असते. ते चेतनेला नेहमी खाली खेचत असते. ते (चेतनेच्या) आरोहण-सातत्याला विरोध करत असते. ते जुन्या प्रकृतीस किंवा मग तामसिकतेस (अ-प्रकाश आणि अ-क्रियता) अवरोहणाच्या (descent) आड आणत असते.

तुम्ही जर समग्रतया आणि गतिशीलपणे, सक्रियपणे आंतरिक अस्तित्वामध्येच जीवन जगत असाल आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे केवळ एक वरवरची गोष्ट आहे असे तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही (अवचेतनाच्या) या अडथळ्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता किंवा बाह्यवर्ती चेतनेचे रूपांतरण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा अडथळा निदान कमी तरी करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 597)

साधना, योग आणि रूपांतरण – २८६

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनाचा प्रांत (subconscient) हा अंधकारमय आणि अज्ञानमय प्रांत असतो आणि त्यामुळे तेथे प्रकृतीच्या अंधकारमय गतिप्रवृत्तींची ताकद अधिक प्रबळ असणे, हे स्वाभाविक आहे. कनिष्ठ प्राणापासून (lower vital) खाली असणाऱ्या प्रकृतीच्या इतर सर्व कनिष्ठ भागांच्या बाबतीतही हे तितकेच खरं आहे. परंतु अगदी क्वचितच, या भागाकडून चांगल्या गोष्टीसुद्धा पृष्ठभागावर पाठविल्या जातात.

अवचेतनाचा प्रांत हा (सद्यस्थितीत) कनिष्ठ उपजत गतिप्रवृत्तींचा पाया आहे, मात्र साधनेच्या वाटचालीमध्ये (साधकाने) त्यास प्रकाशित करणे आणि शारीर- प्रकृतीमध्ये त्यास उच्चतर चेतनेचा आधार बनविणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 611)

साधना, योग आणि रूपांतरण – २८५

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आपल्या शरीरामध्ये उच्चतर चेतना जेथून उतरते, तो अतिचेतनाचा (superconscient) प्रांत आपल्या डोक्याच्या वर (आपल्या वर्तमान चेतनेच्या वर) असतो, त्याचप्रमाणे (आपल्या वर्तमान चेतनेच्या खाली) आपल्या पावलांच्या खाली अवचेतनाचा (subconscient) प्रांत असतो.

जडभौतिकाची (Matter) निर्मिती ही अवचेतनामधून झालेली असल्यामुळे, जडभौतिक हे या शक्तीच्या नियंत्रणाखाली असते. आणि असे असल्यामुळे आपल्याला जडभौतिक हे काहीसे अचेतन, चेतनाविहीन (unconscious) असल्यासारखे वाटते. याच कारणामुळे जडभौतिक शरीर (material body) हे अवचेतनाच्या शक्तीच्या प्रभावाखाली असते. आणि म्हणूनच, आपल्या शरीरामध्ये काय चाललेले असते याविषयी आपण बहुतांशी प्रमाणात सचेत (conscious) नसतो.

आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपली बाह्यवर्ती चेतना या अवचेतनामध्ये उतरते आणि म्हणून आपण झोपलेलो असताना आपल्यामध्ये काय चाललेले असते याची आपल्याला, काही थोड्या स्वप्नांचा अपवाद वगळता, जाणीव नसते. त्यापैकी बरीचशी स्वप्नं या अवचेतनामधून पृष्ठभागी येतात. जुन्या स्मृती, आपल्या मनावर उमटलेले ठसे इत्यादी गोष्टी असंबद्ध रीतीने एकत्र येऊन ही स्वप्नं तयार होतात. आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही करतो किंवा जे काही अनुभवतो त्याचे प्रभाव अवचेतनाकडून ग्रहण केले जातात आणि त्यामध्ये ते साठवून ठेवले जातात. झोपेमध्ये त्यातील काही अंशभाग बरेचदा पृष्ठभागावर पाठविले जातात.

अवचेतन हा व्यक्तित्वाचा एक अगदी महत्त्वाचा भाग असतो परंतु आपल्या सचेत संकल्पशक्तीद्वारे आपण त्यामध्ये फार काही करू शकत नाही. आपल्यामध्ये कार्यकारी असणारी उच्चतर ‘शक्ती’ ही तिच्या स्वाभाविक क्रमानुसार अवचेतनास स्वतःप्रति खुले करेल आणि त्यामध्ये स्वतःचा प्रकाश पोहोचवेल आणि नियंत्रण प्रस्थापित करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 599-600)

साधना, योग आणि रूपांतरण – २८४

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

नमस्कार वाचकहो,

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आपण आजवर साधना या विभागांतर्गत ध्यान, कर्म व भक्ती यांचा विचार केला. योग या विभागांतर्गत प्रामुख्याने ‘पूर्णयोग’ व त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतली.

रूपांतरण (transformation) या विभागामध्ये आपण आंतरात्मिक (psychic), आध्यात्मिक (spiritual) व अतिमानसिक (supramental) रूपांतरण याचा अभ्यास केला. त्यानंतर मनाचे, प्राणाचे व शरीराचे रूपांतरण म्हणजे काय, ते कसे करायचे असते, त्यातील अडथळे कोणते असतात याचा सविस्तर विचार केला.

मनाचे, प्राणाचे व शरीराचे रूपांतरण करूनही श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना अभिप्रेत असणारे रूपांतरण पूर्णपणे साध्य होत नाही. कारण अजून अवचेतन (subconscient) व अचेतन (inconscient) यांचे रूपांतरण शिल्लक असते. आपल्या कनिष्ठ प्रकृतीची पाळेमुळे अवचेतन व अचेतन प्रांतामध्ये रुजलेली असतात. तेथूनच मुख्यत: साधनेमध्ये अडथळे उद्भवत असतात.

प्रकृतीचे पूर्णत: रूपांतरण होण्यासाठी अवचेतन व अचेतन या दोन्हीमध्येदेखील रूपांतरण होणे आवश्यक असते. आणि एकंदर, मानवाच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये या रूपांतरणाचा विचार आणि त्यासाठीचा प्रयत्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनीच प्रथमत: केला आहे. त्यामुळे हा विचार समजावून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. हे असे काही आपल्या वाचनात प्रथमच येत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित हा भाग समजण्यास काहीसा अवघड वाटेल. परंतु तो नीट समजावून घेतला तर ‘पूर्णयोगा’चे वेगळेपण लक्षात येण्याची अधिक शक्यता आहे.

म्हणून उद्यापासून आपण ‘अवचेतन व अचेतन प्रांताचे रूपांतरण’ हा भाग नेटाने समजावून घेण्याचा प्रयत्न करू या.

संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – २८३

शरीराचे रूपांतरण

आपण जेव्हा (शरीराच्या) रूपांतरणाबद्दल (transformation) बोलत असतो तेव्हा अजूनही त्याचा काहीसा धूसर अर्थच आपल्या मनामध्ये असतो. आपल्याला असे वाटत असते की, आता काहीतरी घडणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सारे काही सुरळीत, चांगले होणार आहे. म्हणजे आपल्याला काही अडचणी भेडसावत असतील तर त्या अडचणी नाहीशा होऊन जातील, जे आजारी असतील ते बरे होतील, शरीर अशक्त आणि अक्षम असेल तर शरीराच्या त्या साऱ्या दुर्बलता आणि अक्षमता नाहीशा होऊन जातील, अशा काहीतरी गोष्टी आपल्या कल्पनेमध्ये असतात. पण मी म्हटले त्याप्रमाणे, हे सारे अगदी धूसर असे आहे, केवळ एक कल्पना आहे.

शारीर-चेतनेच्या (body consciousness) बाबतीत एक उल्लेखनीय बाब अशी असते की, जोपर्यंत तिच्याबाबत एखादी गोष्ट अगदी पूर्ण होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचत नाही तोपर्यंत तिला (शारीर-चेतनेला) ती गोष्ट अगदी नेमकेपणाने आणि पूर्ण तपशिलवारपणे कळू शकत नाही.

म्हणून, जेव्हा रूपांतरणाची प्रक्रिया अगदी सुस्पष्ट होईल, म्हणजे ती प्रक्रिया कोणत्या टप्प्यांमधून जाणार आहे, त्या संपूर्ण रूपांतरणाच्या दरम्यान कोणकोणते बदल घडून येणार आहेत, म्हणजे त्यांचा क्रम कसा असेल, त्यांचा मार्ग कोणता असेल, त्यातील कोणत्या गोष्टी आधी होतील, त्यानंतर कोणत्या गोष्टी घडतील, इत्यादी सारा तपशील जेव्हा अगदी पूर्णपणे ज्ञात होईल, तेव्हा ते प्रत्यक्षात येण्याची घटिका आता जवळ आली आहे, याची ती निश्चित खूण असेल. कारण ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा इतक्या अचूकपणाने तपशिलवार बोध होतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, आता तुम्ही ती गोष्ट साध्य करण्यासाठी सक्षम झाला आहात. त्या क्षणी तुम्हाला (त्या गोष्टीबाबत) समग्रतेची दृष्टी प्राप्त होऊ शकते.

उदाहरणार्थ, आता हे पूर्ण निश्चितपणे सांगता येऊ शकते की, अतिमानसिक प्रकाशाच्या (supramental light) प्रभावाखाली सर्वप्रथम शारीर-चेतनेचे रूपांतरण होईल; त्याच्या पाठोपाठ, शरीराच्या विविध अवयवांच्या कार्यावर, त्यांच्या सर्व गतिविधींवर नियंत्रण आणि प्रभुत्व निर्माण होईल; त्यांनतर, हे प्रभुत्व क्रमाक्रमाने गतिविधींमध्ये एक प्रकारचे मूलगामी परिवर्तन घडवून आणेल आणि त्यानंतर मग स्वयमेव अवयवांच्या घडणीमध्येच परिवर्तन घडून येईल. जरी या साऱ्याचा बोध अजूनही पुरेसा नेमकेपणाने झालेला नसला तरीही, हे सारे आता निश्चितपणे घडून येणार आहे.

परंतु अंतिमतः हे सारे कसे घडून येईल? तर, जेव्हा विविध अवयवांची जागा विविध शक्तींच्या, विविध गुणधर्मांच्या आणि प्रकृतीच्या एकीकृत केंद्रांद्वारे घेतली जाईल, तेव्हा त्यातील प्रत्येक केंद्र त्याच्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने कार्य करेल. अजूनही या साऱ्या गोष्टी संकल्पनात्मक पातळीवरच आहेत आणि (त्यामुळे) शरीराला या साऱ्याचे चांगल्या रीतीने आकलन होऊ शकत नाही कारण या साऱ्या गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून पुष्कळ अवकाश आहे. आणि (मी सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे) शरीर जेव्हा स्वतः एखादी गोष्ट करू शकते तेव्हाच म्हणजे, त्या टप्प्यावर आल्यावरच शरीराला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचे आकलन होऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 280-281)