साधना, योग आणि रूपांतरण – २०४
आत्मा, चैत्य पुरुष हा ईश्वरी ‘सत्या’च्या थेट संपर्कात असतो परंतु मनुष्यामध्ये मात्र तो मन, प्राण आणि शारीर प्रकृती यांच्यामुळे झाकलेला असतो. मनुष्य योगसाधना करून मन व तर्कबुद्धीच्या द्वारे ज्ञानप्रकाश मिळवू शकतो; प्राणामध्ये तो शक्तीवर विजय प्राप्त करून घेऊ शकतो, सर्व प्रकारच्या अनुभवांचा आनंद उपभोगू शकतो. तो अगदी आश्चर्यकारक अशा भौतिक सिद्धीसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो परंतु या सर्वांमागे असणारी जर खरी आत्मशक्ती अभिव्यक्त झाली नाही, जर चैत्य प्रकृती पृष्ठभागी आली नाही तर, कोणतीही मूलभूत गोष्ट घडणार नाही.
पूर्णयोगामध्ये, चैत्य पुरुषच ऊर्वरित सर्व प्रकृतीचे दरवाजे खऱ्या अतिमानस प्रकाशाप्रत आणि अंतत: परम ‘आनंदा’प्रत खुले करतो. मन हे स्वत:हून स्वत:च्या उच्चतर प्रांतांप्रत खुले होऊ शकते; ते स्वत:च स्वत:ला स्थिर करू शकते आणि निर्गुणामध्ये (Impersonal) स्वत:ला व्यापक बनवू शकते; स्थिर मुक्ती किंवा निर्वाणामध्ये ते स्वत:चे आध्यात्मिकीकरणदेखील करून घेऊ शकते. परंतु, फक्त अशा आध्यात्मिक मनामध्ये अतिमानसाला पुरेसा आधार सापडत नाही.
जर अंतरात्मा जागृत करण्यात आला; केवळ मन, प्राण आणि शरीर यांच्यातून बाहेर पडून, व्यक्तीचा आंतरात्मिक चेतनेमध्ये (psychic consciousness) नवजन्म झाला तरच हा पूर्णयोग करता येणे शक्य असते. अन्यथा (केवळ मनाच्या किंवा इतर कोणत्या भागाच्या शक्तीनिशी) हा योग करता येणे शक्य नाही. कोणत्याही प्राणिक वासनांमुळे किंवा कोणत्याही मानसिक संकल्पनांमुळे किंवा बौद्धिक ज्ञानाला चिकटून राहिल्यामुळे, ‘दिव्य माते’चे नवजात बालक होण्यासाठी जर (साधकाकडून) नकार दिला गेला, चैत्य अस्तित्वाच्या नवजन्मासाठी जर नकार देण्यात आला तर साधनेमध्ये अपयश येईल.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 337-338)
- मानसिक प्रशिक्षण - February 13, 2025
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025