साधना, योग आणि रूपांतरण – ०६

योग म्हणजे ‘ईश्वरा’शी ऐक्य, आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी तुम्ही जे काही करता ती म्हणजे ‘साधना’.

तुम्ही सामान्य चेतनेपासून दूर झाले पाहिजे आणि ईश्वरी ‘चेतने’च्या संपर्कात आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नेहमी श्रीमाताजींना आवाहन करा, त्यांच्याप्रति खुले, उन्मुख व्हा; त्यांच्या ‘शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करून, तुम्हाला सुपात्र बनवावे यासाठी त्यांच्याजवळ प्रार्थना करा, तशी आस बाळगा; इच्छा-वासना, अस्वस्थता, मन आणि प्राणाचे अडथळे यांना नकार द्या.

मन व प्राण स्वस्थ, शांत करणे आणि श्रीमाताजींची ‘शांती’, श्रीमाताजींची ‘उपस्थिती’, त्यांचा ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांसाठी अभीप्सापूर्वक एकाग्रता करणे म्हणजे ‘ध्यान’.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 135)

साधना, योग आणि रूपांतरण – ०५

तुम्हाला जर खरोखरच या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणाकडून कौतुक किंवा मानसन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर योगसाधना ही तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असल्यामुळे केली पाहिजे, कारण त्याशिवाय अन्य कोणत्याच मार्गाने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही अगोदरच स्वत:ला समजावले पाहिजे की, जसजसे तुम्ही सामान्य माणसाहून अधिक प्रगत होत जाल, त्यांच्या सामान्य जीवनपद्धतीहून अधिकाधिक दूर जाल, तसतशी लोकं तुमची प्रशंसा कमी प्रमाणात करू लागतील. आणि हे स्वाभाविकच आहे कारण की, ती लोकं तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. मी पुन्हा एकवार सांगते की, या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही.

तुम्ही प्रगती केल्याविना राहूच शकत नाही म्हणून (योग) मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला वाहून घेता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही. (हे सारे तुम्ही करता) कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282-283)

साधना, योग आणि रूपांतरण – ०४

सन्मार्गाचे अनुसरण करण्याची ज्यांना इच्छा असते त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुरिच्छांचे हल्ले होण्याची शक्यता असते; (कारण) त्यांना ते समजत नाही आणि एवढेच नाही तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते बहुधा तिरस्कारच करतात.

लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. आणि अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही, तर उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य ‘चेतने’कडून व दिव्य ‘कृपे’कडून वापर केला जात आहे, हे त्यामागचे कारण असते.

म्हणून कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे; आणि तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. उलट तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य ‘कृपे’चे कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी व्हायला पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घालण्यात आला होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

साधना, योग आणि रूपांतरण – ०३

व्यक्तीने (साधनेसाठी) तिच्या दैनंदिन जीवनाच्या परिस्थितीतून बाहेर पडलेच पाहिजे असे काही बंधनकारक नाही; मात्र व्यक्तीने तिचा आंतरिक दृष्टिकोन पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. व्यक्तीने तिच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी करायला हरकत नाहीत पण त्या करताना तिचा दृष्टिकोन मात्र निराळा असावा. योगसाधना करण्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा परित्याग करून एकांतवासात निघून जाणे, एखाद्या आश्रमात जाऊन राहणे गरजेचे आहे, असे माझे म्हणणे नाही.

एक मात्र खरे आहे की, एखादी व्यक्ती जर प्रपंचात व प्रापंचिक परिस्थितीमध्ये राहून योगाचरण करीत असेल तर ते अधिक अवघड असते; अर्थात ते अधिक परिपूर्णसुद्धा असते. कारण प्रत्येक क्षणी प्रापंचिक व्यक्तीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्यांना, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात गेलेल्या व्यक्तीला तोंड द्यावे लागत नाही; कारण अशा व्यक्तीच्या बाबतीत समस्यांचे प्रमाण अगदीच कमी झालेले असते. पण प्रापंचिक व्यक्तीला मात्र अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते; व्यक्तीच्या भोवती असणाऱ्या, आणि ज्यांच्याशी तिचा सतत संबंध येतो त्या त्या व्यक्तींना तुमच्या वागण्याचे आकलन न होण्यापासूनच याची सुरुवात होते; व्यक्तीने त्यासाठी तयार असले पाहिजे, सहनशीलता आणि अतीव अलिप्तता यांसह सुसज्ज असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात व काय बोलतात याची, योगमार्गाची वाटचाल करणाऱ्या व्यक्तीने पर्वा करता कामा नये; हा अगदी अपरिहार्य असा आरंभबिंदू असतो.

जग तुमच्याबद्दल काय बोलते अथवा विचार करते, ते तुम्हाला कशी वागणूक देते याबाबत तुम्ही पूर्णपणे निर्लिप्त असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय समजूत करून घेतात याचे तुम्हाला फारसे महत्त्व वाटता कामा नये आणि त्याचा तुम्हाला यत्किंचितही स्पर्श होता कामा नये. यामुळेच (हे साध्य करणे अवघड असल्यामुळेच) सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात जाऊन योगसाधना करण्यापेक्षा, व्यक्तीला तिच्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये राहून योगसाधना करणे हे सहसा अधिक अवघड असते. हे खरोखरच जास्त कठीण असते, पण आपण येथे सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलो नाही. रुपांतरणाचा विचारच ज्यांच्या मनाला शिवत नाही त्यांच्यासाठी आपण त्या गोष्टी सोडून देऊ.

– श्रीमाताजी (CWM 04 : 377-378)

साधना, योग आणि रूपांतरण – ०२

‘साधना’ म्हणजे योगाचा सराव करणे, योगाभ्यास करणे.

साधनेचे परिणाम साध्य करण्यासाठीच्या आणि कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवण्यासाठीच्या संकल्पावर एकाग्रता करणे म्हणजे ‘तपस्या’.

‘ईश्वरा’ची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे, त्याच्याप्रति आत्मसमर्पण करणे, त्याच्याप्रति अभीप्सा बाळगणे, त्याची प्रार्थना आणि नामस्मरण करणे या सर्व गोष्टींचा समवेश ‘आराधने’मध्ये होतो.

चेतना अंतरंगात एकाग्र करणे, चिंतन-मनन करणे, समाधी अवस्थेत शिरणे म्हणजे ‘ध्यान’.

“ध्यान, तपस्या आणि आराधना’’ ही सर्व साधनेची विविध अंग आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 215)

साधना, योग आणि रूपांतरण – ०१

अध्यात्ममार्गात नव्यानेच प्रविष्ट झालेल्या साधकांमध्ये योग म्हणजे काय, साधना म्हणजे काय, ध्यान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ इत्यादी गोष्टींबाबत ऐकीव माहितीवर आधारित काही कल्पना असतात, त्यामध्ये प्रत्येकवेळी तथ्य असतेच असे नाही. तेव्हा या संकल्पना जितक्या लवकर आणि जितक्या अधिक स्पष्ट होतील तेवढी अध्यात्ममार्गावरील वाटचाल निर्धोक होण्याची शक्यता अधिक असते. या भूमिकेतून श्रीअरविंद आणि श्रीमाताजींचे याबाबतीतले विचार जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या नव्या मालिकेत करणार आहोत.

पारंपरिक योगाशी चिरपरिचित असल्यामुळे त्याबाबतचा एक अनाठायी अभिनिवेशही बरेचदा काही जणांच्या मनात असतो. तेव्हा ‘पारंपरिक योग आणि पूर्णयोग’ यांतील साम्य-भेद श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या लिखाणाच्या आधारे समजावून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

‘पूर्णयोग’ हा बहुआयामी आहे आणि प्रत्यक्ष उपयोजनाच्या दृष्टीने तो खूपच व्यापक आहे. त्यालाच ‘समर्पण योग’, ‘रूपांतरण योग’ असेही म्हटले जाते. त्या साऱ्याचा उलगडाही ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेत होईल असा विश्वास वाटतो. वाचक नेहमीप्रमाणेच या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.

– संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक