साधना, योग आणि रूपांतरण – १२६
अहंभावामध्ये राहू नये तर ‘ईश्वरा’मध्ये राहून जीवन जगावे; लहानशा, अहंभावयुक्त चेतनेमध्ये राहून नव्हे, तर ‘सर्वात्मक’ आणि ‘सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेमध्ये राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे. सर्व प्रसंगांमध्ये व सर्व जिवांशी पूर्णपणे समत्वाने वागावे; आपले स्वतःबरोबर आणि आपले ‘ईश्वरा’बरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वतःमध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ‘ईश्वरा’ मध्ये पाहावे; आणि ईश्वर सर्वांमध्ये आहे, आपण स्वतःदेखील इतर सर्वांमध्ये आहोत, ही जाणीव बाळगावी. अहंभावात राहून नव्हे, तर ‘ईश्वरा’मध्ये निमग्न राहून कर्म करावे.
आणि येथे पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक प्रमाण डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही कृतीची निवड करायची नाही; तर आपल्या ऊर्ध्वस्थित असणारे असे जे जिवंत सर्वोच्च ‘सत्य’ आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करायची.
दुसरी गोष्ट, आपण आध्यात्मिक चेतनेच्या पायावर पुरेसे सुस्थिर झालो तरीही आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करायची नाही; तर आपल्या अतीत असणाऱ्या ‘ईश्वरी इच्छे’च्या मार्गदर्शनानुसार आणि तिच्या प्रेरणेच्या प्रभावाने आपल्या कृतीला घडू देण्यास आणि विकसित होण्यास मुभा द्यायची.
आणि शेवटी या साधनेचा सर्वश्रेष्ठ परिणाम म्हणजे, आपण स्वतःला उन्नत करून, ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; ज्ञान, शक्ती, चेतना, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; आपली क्रियाशीलता मर्त्य अशा वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नसून, ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकसित होत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करायची. (आपल्यातील) प्रकृतीजन्य मनुष्याला दिव्य ‘आत्म्या’च्या आणि शाश्वत ‘चैतन्या’च्या जाणीवपूर्वक आधीन केल्याने आणि विलीन केल्यानेच ही गोष्ट घडून येते…
– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 101)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)