(एका आश्रमवासी साधकाने सांगितलेली ही आठवण.)

मी तेव्हा आश्रमात नुकताच राहिला आलो होतो. दुपारी एका आश्रमवासी साधकाने संभाषणाच्या ओघात मला सांगितले की, “काही लोकांना वाटते की मोठमोठे ग्रंथ वाचणे, प्रवचने ऐकणे, तासनतास ध्यानधारणा करणे म्हणजे साधना. परंतु मी म्हणतो की, जर तुम्हाला श्रीमाताजी काय आहेत हे खरोखरी जाणून घ्यावयाचे असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काम केले पाहिजे, तरच तुम्हाला त्यांच्या शक्तिस्रोताचा प्रत्यय येईल.” त्याच्या या शब्दांचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला आणि श्रीमाताजींसाठी काम करावयाचे असे मी मनोमन ठरवून टाकले.

नंतर सुमारे एका वर्षानंतरची गोष्ट. माझ्या सोबत एक पगारी कामगार आणि एक मुलगा होता. कामगार होता, तो होता तंत्रज्ञ. आणि मी होतो अगदीच नवीन, मदतनीस मुलाचे काम असावयाचे ते शिडी इकडून तिकडे हलविण्याचे, तो मुलगा बरेच दिवस गैरहजर असायचा. त्याच्या गैरहजेरीत ‘शिडी हलविण्यासारखे क्षुल्लक काम मी का करावे’ या भावनेने तंत्रज्ञ त्याला हातदेखील लावत नसे. अशाने कामाचा खोळंबा होऊ लागला, तेव्हा मी श्रीमाताजींना सुचविले, “आम्हाला दुसरा एक मदतनीस मुलगा देता का?”

त्या म्हणाल्या, “शिडी उचलायला अजून कोणाची मदत कशास पाहिजे? तुम्ही दोघे मिळून एक शिडी उचलू शकत नाही?” नाही म्हटले तरी ‘मी त्यांचा वरिष्ठ आहे’ असा एक भाव माझ्याही मनात होताच. पण श्रीमाताजींचे म्हणणे मान्य करावयाचे मी ठरविले.

दुसऱ्या दिवशी मदतनीसाची वाट न पाहता मी एकटाच शिडी हलवू लागलो. हे पाहून नाईलाजाने का होईना, पण त्या कामगारानेही शिडी उचलण्यास हातभार लावला. अशाप्रकारे, आपल्या सहकाऱ्यांकडून काम कसे करवून घ्यावयाचे ह्याचा धडाच श्रीमाताजींनी मला दिला होता.

श्रीअरविंदांच्या राजकीय कार्याने प्रभावित होऊन, क्रांतिकारक कार्य करण्याची परवानगी घेण्याच्या हेतूने, त्यांना पाँँडिचेरी येथे प्रथमच भेटावयास गेलेल्या श्री.अंबालाल पुराणी यांनी सांगितलेली ही हकिकत :

श्रीअरविंदांनी मला माझ्या साधनेविषयी विचारले.

मी म्हणालो, “साधना वगैरे ठीक आहे पण जोवर भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोवर मला इतर कशावरही लक्ष केंद्रित करणे अवघड आहे.”

तेव्हा श्रीअरविंद म्हणाले, “कदाचित भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही. जर भारत त्याशिवायच स्वतंत्र होणार असेल तर तुम्ही साधनेवर, योगावर लक्ष का केंद्रित करत नाही? भारताचा स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार पक्का झाला आहे आणि त्यामुळे त्या उद्दिष्टपूर्तीसाठी झटणारे पुष्कळ जण मिळतील पण योगाची हाक सर्वांनाच येत नाही. आणि जर तुम्हाला ती हाक आली आहे तर तुम्ही योगसाधनेवर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही का?”

तेव्हा मी म्हणालो, “पण गेली दोन वर्षे माझे सारे लक्ष स्वातंत्र्यप्राप्तीकडे लागलेले आहे. ते मिळाल्याशिवाय मला सुखाची झोपदेखील लागणार नाही.”

माझ्या मन:चक्षूसमोर होते, एकेकाळी ज्यांनी भारतामध्ये प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होते ते श्री. अरविंद घोष. आणि तेच श्रीअरविंद आता पाँडिचेरीला योगसाधनेमध्ये निमग्न होते. श्रीअरविंद दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते, मग त्यांनी विचारले, ”भारत स्वतंत्र होणार आहे अशी खात्री तुम्हाला देऊ केली तर?”

तेव्हा मी म्हणालो, “पण मला अशी खात्री कोण देऊ शकेल?”

श्रीअरविंद माझ्याकडे पहात म्हणाले, “समजा मी दिली तर?”

मी म्हणालो, “जर तुम्ही मला खात्री दिलीत तर मी मान्य करेन.”

तेव्हा ते गंभीरपणे म्हणाले, “मग मी तुम्हाला खात्री देतो की, भारत स्वतंत्र झालेला असेल.”

दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा मी त्यांना विचारले, “खरंच तुम्हाला खात्री आहे?”

तेव्हा श्रीअरविंद गंभीर झाले आणि खिडकीतून पलीकडच्या अवकाशात पहात राहिले. नंतर माझ्याकडे पाहून समोरील टेबलावर आपली मूठ आपटत ते म्हणाले, “उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याइतकेच हे निश्चित आहे. निर्णय केव्हाच झाला आहे, तो प्रत्यक्षात उतरायला आता फार काळ लागणार नाही.”

आमची ही भेट झाली ते साल होते इ.स. १९१८. मी त्यांना वंदन करून शांतपणे बाहेर पडलो. दोन वर्षांनंतर प्रथमच मला सुखाची झोप लागली होती. *

श्रीअरविंदांनी जेव्हा बडोद्यामधील प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दिली तेव्हा साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले. पण एक आनंदही होता की, त्यांचे आवडते शिक्षक हे आता देश पातळीवरील नेते बनलेले होते. श्री. कन्हैयालाल मुन्शी हे या विद्यार्थ्यांमधील एक होते. भारतीय संस्कृतीची पुनस्थापना करण्याच्या हेतूने त्यांनी पुढील काळात भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक श्रीअरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले यासाऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा.”

……ह्याच मुन्शीजींनी आपल्या साहित्यातून, वेदकाळातील सरस्वती नदीच्या किनारी वसणाऱ्या आर्यांचे जीवन चित्रित केले आहे. चाळीस वर्षांनंतर मुन्शीर्जीची श्रीअरविंदांशी पुन्हा भेट झाली. तेव्हा मुन्शीर्जीना श्रीअरविंदांचे पूर्णत: वेगळे रूप दिसून आले. ते रूप कसे होते ह्याचे वर्णन त्यांनी केले आहे, ” मी ज्यांचा मनोमन दूरून आदर करत असे ते माझे शिक्षक आता माझ्या समोर नव्हते, किंवा ज्यांच्या शिकवणुकीचा जीवनामध्ये मला वेळोवेळी उपयोग झाला होता ते मुनीवर्यही माझ्या दृष्टीसमोर नव्हते तर समोर एक एकसंध, परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. आसक्ती, प्रकोप, आणि भीती यांचे परिवर्तन शक्ती, सौंदर्य आणि शांतीमध्ये झाले होते. आर्य संस्कृतीची सारभूत कल्पनाच जणू मानवी रूपात मूर्त झाली होती.”

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

(आश्रमातील एक साधक श्री.पूजालाल यांच्या आठवणींमधून…)

पहाटेचे पाच वाजले होते. नेहमीप्रमाणे, मी त्या पवित्र वास्तुत गेलो, जेथे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी रहात. मला त्या घराच्या काही भागाच्या साफसफाईचे काम करण्याची मुभा देण्यात आली होती. मी जेव्हा तेथे कामाला जात असे तेव्हा श्रीमाताजी स्वत: दार उघडायला येत असत आणि माझ्या आनंददायी कामाची सुरुवात होत असे. पण एके दिवशी दार उघडल्यावर, श्रीमाताजी तेथेच उभ्या राहिल्या आणि श्रीअरविंदांचा संदर्भ देत, मला त्यांनी दिवसभर अतिशय काळजीपूर्वक आणि शांतपणे काम करण्यास सांगितले; जेणेकरून मधल्या मोठ्या दरवाजाच्या वरच्या बाजूला विसावलेल्या चिमणीला त्रास होऊ नये.

हा जणु परमेश्वरी आदेशच आहे असे समजून, मी सावधगिरीने वागेन अशी त्यांना हमी दिली. मी आत प्रवेश केला आणि मग श्रीमाताजी निघून गेल्या. कोणताही आवाज न करता, अगदी हलक्या पावलाने मी त्या दरवाजासमोरून गेलो आणि आश्चर्याची व आनंदाची बाब म्हणजे ती चिमणी सर्वात वरच्या बाजूला अगदी शांतपणे, निस्तब्ध बसलेली होती. मी थक्क झालो.

आमचे दिव्य गुरु किती करुणामय आहेत ! ते रात्री त्या हॉलमध्ये फेऱ्या मारीत असत. तेव्हा त्यांनी त्या छोट्या पाखराला नेहमीच शांततामय असणाऱ्या त्या वातावरणात, रात्रीची विश्रांती घेत असलेले पाहिले.
त्यांच्या करुणार्द्र दृष्टीचा लाभ केवळ आम्हा मनुष्यप्राण्यांनाच होत होता असे नव्हे, तर त्यांच्या वैश्विक हृदयामध्ये लहान आणि मोठे अशा साऱ्यांनाच प्रेमाचे स्थान होते. खरोखरीच, आपण सारे भाग्यवान आणि ही पृथ्वीही भाग्यवान की, जिच्यामध्ये दिव्य गुरु, विश्वाचा स्वामी मूर्त रूपात वास करीत आहे; आपल्या उच्च स्थानावरून त्याने आमच्यासाठी कायमस्वरूपी कृपाछत्र धरले आहे आणि आपल्या प्रेममयी हृदयाच्या खोलीमध्ये त्यांनी आम्हाला आसरा दिला आहे.

– श्री.पूजालाल
(Reminiscences of Pujalal : Pg 80)

कोणीतरी मला एका आठ वर्षाच्या मुलीने फ्रेंचमध्ये लिहिलेले पुस्तक आणून दिले.(त्या मुलीचे नाव मिनू डुओट) आठ वर्षाच्या मुलीच्या मानाने ते पुस्तक खरंच खूप विलक्षण आहे. त्या पुस्तकात खूप चांगली चांगली वाक्यं तिने लिहिली आहेत. उदा. चेहऱ्यावर वांग (गोऱ्या रंगावर दिसणारे तपकिरी ठिपके) असलेल्या एका मुलाविषयी ती लिहिते, “तू खूप सुंदर आहेस, तुझ्या चेहऱ्यावरील वांगसुद्धा छान आहेत, जणू काही कोणी देवदूताने तुझ्या चेहऱ्यावर गव्हाचे दाणे पेरले आहेत, ज्यामुळे आकाशातील पक्षी आकर्षित व्हावेत.” खरंच, हे खूप काव्यमय आहे. (श्रीमाताजींनी अशीच उदाहरणे पुढेही दिली.)

ही सारी उदाहरणे पाहून मला मेटरलिंकची (नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक) आठवण येते. ज्या प्रतिभावान साहित्यिकांनी त्यांचे सारे आयुष्यच या साहित्यिक कामासाठी वाहिलेले असते, त्यांच्यामध्ये एक सुव्यवस्थित मानसिक अस्तित्व तयार होते, या अस्तित्वाला स्वत:चे असे जीवन असते; असे साहित्यिक जेव्हा निधन पावतात तेव्हाही हे मानसिक अस्तित्व स्वतंत्रपणे, स्वायत्तपणे शिल्लक राहते; त्याला अभिव्यक्त होण्याची सवय असल्याने ते आविष्कारासाठी इतरत्र माध्यम शोधते.

आणि त्याचवेळी जर असे एखादे मूल असेल की, जे अनुकूल अशा परिस्थितीत जन्माला आले असेल, जसे की येथे त्या मुलीची आई कवयित्री आहे; कदाचित तिची अशी इच्छा असेल की, तिचे मूल असे असामान्य असावे; अशावेळी ते मानसिक अस्तित्व या बाळाच्या जन्माच्यावेळी त्यामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वत:ला अभिव्यक्त करावयाचा प्रयत्न करते. आणि मग अशा वेळी, त्या बालकामध्ये अशी मानसिक परिपक्वता, अशा असामान्य गोष्टी करण्याच्या क्षमता येतात. या मुलीमध्ये मेटरलिंकच्या मानसिक अस्तित्वाचा पुनर्जन्म झाला आहे आणि त्याद्वारे तो अभिव्यक्त होत आहे असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 08:316-318)

बडोद्यामध्ये आल्यानंतरही श्रीअरविंदांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेटाऱ्यातील पुस्तके ते वाचत असत. श्रीअरविंदांना बंगाली शिकविणारे जे शिक्षक होते ते सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तासन्तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले जरी गेले असते तरी त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”

इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करीत असत.

श्रीअरविंदांच्या एका मित्राने ही हकिकत सांगितली आहे : “श्रीअरविंद कॉलेजमधून परतले आणि आल्या आल्या लगेच तेथे पडलेले एक पुस्तक उघडून त्यांनी वाचायला सुरुवात केली. तेव्हा तेथे आम्ही सर्व मित्र बुद्धिबळाचा डाव मांडून जोरजोराने हसतखिदळत बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने श्रीअरविंदांनी पुस्तक वाचून संपविले. आम्ही त्यांना असे करताना बरेचदा बघितले होते. ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात की, केवळ वरवर चाळतात हे आम्हाला बरेच दिवसांपासून जाणून घ्यायचे होते. आत्ता ती कसोटी घेण्याची वेळ आली. आमच्यातील एकाने पुस्तकातील एक ओळ वाचून दाखविली आणि नंतर त्यापुढची ओळ कोणती असे श्रीअरविंदांना विचारले. श्रीअरविंदांनी क्षणभर मन एकाग्र केले आणि नंतर ती ओळ ज्या पानावर होती त्या पानावरील संपूर्ण मजकूर, एकही चूक न करता जसाच्या तसा सांगितला. जर ते अशा प्रकारे अर्ध्या तासात शंभरेक पाने वाचू शकत असतील तर त्यांनी अल्पावधीतच त्या पेटाऱ्यातील सगळी पुस्तके वाचून संपवली ह्यात नवल ते काय?”

(Sri Aurobindo or The Adventure of Consciousness)

१९१४ मध्ये जेव्हा श्रीअरविंदांनी ‘आर्य’ मासिकासाठी लिखाण करावयास सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट. ते जे लिखाण करीत असत त्याला मानसिक ज्ञान किंवा मनोनिर्मिती असे म्हणता येणार नाही.

श्रीअरविंद मन निश्चल करून, टंकलेखनयंत्रासमोर बसत असत. आणि उच्च स्तरावरून जे त्यांच्यामध्ये प्रवाहित होत असे ते त्यांच्या टंकलेखन करणाऱ्या बोटांच्या माध्यमातून थेट कागदावर उमटत असे. अशा मानसिक निश्चल स्थितीमध्ये ‘आर्य’साठी ते पानेच्या पाने एकटाकी पद्धतीने टंकलिखित करीत असत.

अशा रीतीने १९१४ ते १९२१ या कालावधीत श्रीअरविंदांनी टंकलिखित केलेले सर्व प्रमुख लिखाण ‘आर्य’ या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. The Life Divine, The Human Cycle, The Ideal of Human Unity, Essays on the Gita, The Secret of the Veda, The foundation of Indian Culture ग्रंथसंपदा त्यांनी ह्याच काळात लिहिलेली आहे. ‘Synthesis of Yoga’ हा ग्रंथही ‘आर्य’ मधूनच प्रथम क्रमश: प्रकाशित झाला.

(Stories told by the Mother 11: Page 31)

*

[या काळात मीरा रिचर्ड्स (श्रीमाताजी) व त्यांचे पती पॉल रिचर्ड्स असे दोघे मिळून आर्य मासिकाच्या फ्रेंच आवृत्तीचा कार्यभार सांभाळत असत. मीरा रिचर्ड्स या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारीदेखील सांभाळत असत.]

योगाचा अर्थ

 

श्रीमाताजींनी एका लहान मुलाला योगाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एका चित्राचे रेखाटन केले आहे.

खालील बाजूस माणूस दर्शविला आहे आणि वरील बाजूस ईश्वर आहे.

नागमोडी वळणे असलेली रेषा ही सामान्य जीवनमार्गाचे प्रतीक आहे तर, मधोमध असलेली सरळ रेषा हे योगमार्गाचे प्रतीक आहे.

(Stories told by the Mother : Part II)

(श्रीअरविंद यांना त्यांच्या शिष्याने एक प्रश्न विचारला, त्याला श्रीअरविंद यांनी जे उत्तर दिले आहे ते उद्बोधक आहे.)

चंपकलाल : काही दिवसांपूर्वी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला असे दिसले की, मी ज्या मार्गाने चाललो होतो तो मार्ग खूप लांबचा आणि खडतर होता. त्या मार्गाला अनेक फाटे फुटले होते आणि त्यामुळे मी गोंधळून गेलो होतो. खूप प्रयत्न करूनदेखील मला माझा मार्ग सापडत नव्हता. शेवटी मी वर पाहिले. मला तेथे खूप उंचावर श्रीमाताजी दिसल्या. त्यांनी तेथून माझ्याकडे एक दोरी पाठविली. कालांतराने माझ्या असे लक्षात आले की, ती दोरी नाही तर ऊर्ध्व दिशेने थेट जाणारा एक धवलशुभ्र, तेजोमय प्रकाश आहे. तेव्हा मला जाणीव झाली की, इकडे तिकडे धडपड करत बसण्यापेक्षा मी सरळ वरच पाहायला हवे होते कारण तेथून तो रस्ता सरळ वरच जात होता. या स्वप्नाचा अर्थ काय?

श्रीअरविंद : व्यक्ती उच्चतर चेतनेकडे वळण्यापूर्वी आणि तिने श्रीमाताजींचा धवलशुभ्र प्रकाशाचा मार्ग अनुसरण्यापूर्वी तिची मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्यादवारे जी अवघड अशी धडपड चालू असते त्याचे ते प्रतीक आहे – नंतर मात्र (श्रीमाताजींच्या धवलशुभ्र प्रकाशाकडे वळल्यानंतर) मार्ग सरळ आणि तेजोमय बनतो.

(Champaklal Speaks: 361-362)

श्री अरविंद घोष यांना क्रांतिकार्यासाठी अटक करण्यात आली. तेव्हा ते काहीसे विचलित झाले. पुढील तीन दिवस तसेच निघून गेले; तेव्हा त्यांच्या अंतरंगातून आवाज आला, “थांब आणि काय होते ते पाहा.” मग ते काहीसे शांत, स्थिरचित्त झाले.

त्यांना तेथून अलीपूरच्या तुरुंंगात नेण्यात आले. त्यांना आठवले की, सुमारे महिन्याभरापूर्वीच त्यांना हातातील सर्व कामे बाजूला ठेवून एकांतवासात जाण्याचा आदेश मिळाला होता. पण प्राणप्रिय असलेल्या देशकार्यापासून ते स्वत:ला दूर करू शकले नव्हते. तेव्हा देवाने त्यांना सांगितले, “जी बंधने तोडण्याचे तुझ्यामध्ये सामर्थ्य नव्हते, ती बंधने मी तुझ्यासाठी तोडली आहेत. मला तू काही अन्य कार्य करणे अपेक्षित आहे.” श्रीअरविंदांच्या हाती भगवद्गीता देण्यात आली.

पुढे तुरुंगात फिरण्यासाठी म्हणून त्यांना सकाळी व संध्याकाळी अर्धा तास कोठडीबाहेर सोडण्यात येऊ लागले. ते जेव्हा त्या तुरुंगाच्या उंच भिंतीकडे पाहू लागले तेव्हा, तिच्या जागी त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले, कोठडीच्या बाहेर ते ज्या झाडाखाली फिरत असत तेथेही त्यांना जाणीव झाली की, ते झाड नसून वासुदेवच आहे. ते झोपत असत त्या कांबळ्यामध्ये तसेच तुरुंगाच्या गजांमध्येदेखील त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले. तुरुंग, त्यातील चोर, दरोडेखोर, खुनी या साऱ्यासाऱ्यांंमध्येही त्यांना त्याच एकमेवाद्वितीय वासुदेवाचे दर्शन घडले. त्यांच्या खटल्याची सुनावणी करण्यासाठी त्यांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले तेव्हा, तेथेही त्यांची तीच जाणीव टिकून होती. त्या मॅजिस्ट्रेटमध्येही त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले.

भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणत होते, “सर्व माणसांमध्ये माझा निवास असतो आणि त्यांच्या कृतीचे नियमन मी करतो. माझे संरक्षण अजूनही तुझ्यासोबत आहे, या खटल्याची सारी जबाबदारी माझ्यावर सोपव.”

…… श्री.अरविंद घोष यांना आलेला ‘वासुदेवः सर्वम् इति’ हा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.

आधार : (CWSA-08:05)