(०१ जानेवारी १९६९ रोजी अतिमानस चेतनेचे पृथ्वीवर आविष्करण झाले; त्याचा प्रारंभच एक प्रकारे १९५६ साली घडलेल्या खालील प्रसंगामध्ये झाला होता. त्या दिवशी अतिमानस चेतनेने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.)

ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ मधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे घडले त्याविषयी श्रीमाताजींनी सांगितले की, “या संध्याकाळी दिव्य अस्तित्व, अगदी सघन, मूर्त स्वरूपात तुमच्यामध्ये उपस्थित होते. मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता; या विश्वापेक्षा मी विशाल झाले होते. मी एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्णदरवाज्यासमोर उभी होते, ह्या दरवाजाने विश्वाला ईश्वरापासून अलग केले होते. मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले, ‘वेळ आली आहे’.माझ्या दोन्ही हातांनी मी एक भली मोठी सुवर्ण हातोडी उचलली आणि जोरात त्या दरवाजावर मारली आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडेतुकडे झाले. तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश, त्याची शक्ती, त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला.”

ध्यान संपल्यानंतर परत जेव्हा दिवे लागले तेव्हा बसलेले सगळे उठले आणि उठून रोजच्याप्रमाणे जाऊ लागले, जणू काही घडलेच नव्हते… श्रीमाताजी म्हणतात.”या शक्तीच्या अवतरणाची जाणीव फक्त पाच जणांनाच झाली होती, त्यावेळी त्यातील दोघं जण आश्रमात होते आणि तिघे जण बाहेर होते.”

यानंतर दोन महिन्यांनी श्रीमाताजींनी एक संदेश दिला : “हे ईश्वरा, तू संकल्प केलास आणि मी तो कृतीत उतरविला. ह्या पृथ्वीवर एक नूतन प्रकाश फाकला आहे; एक नूतन विश्व जन्माला आले आहे. ज्या गोष्टींचे वचन देण्यात आले होते त्यांची परिपूर्ती झाली आहे.”

– आधार :

(Beyond Man by Georges Van Vrekhem:317-318)

*

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशामध्ये एक दिव्य जीव जन्माला आला.या पृथ्वीतलावर लोकांमध्ये ईश्वरी प्रेमभावना जागृत करावी, ह्या हेतूने त्याने जन्म घेतला होता. पण लोकांना त्याच्या पाठीमागची उदात्त भावना समजू शकली नाही, लोकांचा गैरसमज झाला, त्यांनी त्याच्यावर संशय घेतला, ते हात धुऊन त्याच्या पाठीमागे लागले. लोकांनी त्याच्यावर अनैतिकतेचे आरोप केले. सरतेशेवटी, यासर्वांपासून दूर जाऊन, शांतपणे दुसरीकडे कोठेतरी आपले इच्छित कार्य करीत, मृत्यू स्वीकारावा असे त्याच्या मनाने घेतले. तरीही लोकांनी त्याचा पिच्छा पुरविला, शेवटी त्याला तेथून पळ काढावा लागला…

अचानकपणे, त्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये त्याला एक छोटेसे डाळिंबाचे झाड दिसले. त्या झाडाच्या फांद्यांच्या छायेमध्ये अखेरचा विसावा घ्यावा म्हणून तो तेथे विसावला… थेंबाथेंबाने त्याचे रक्त त्या मातीमध्ये मिसळत गेले. ती भूमी सुपीक होत गेली. काही दिवसांतच ते झाड आश्चर्यकारकरित्या मोठे झाले. ते उंच, मोठे, दाट झाले. ते इतके विशाल झाले की येणारेजाणारे प्रवासी त्याच्या छायेत सुखाने विसावू लागले. ते झाड लालकेशरी, भरगच्च पाकळ्या असणाऱ्या सुंदर फुलांनी बहरून गेले. लोकांना समजले देखील नाही की, ज्याच्या मागे ते हात धुऊन लागले होते तोच येथे कायमचा विसावला आहे. या नाहीतर त्या रूपात, त्या दिव्य जीवाने आपले ईश्वरीय प्रेम लोकांमध्ये प्रसृत करण्याचे कार्य चालूच ठेवले…

कालांतराने डाळिंबाची फुले “दिव्य प्रेम’ या नावाने ओळखली जाऊ लागली. (महाशक्तीच्या सर्व रूपांपैकी कालीमाता हे तिचे सर्वात प्रेमळ रूप आहे असे श्रीमाताजी सांगतात. कालीपूजेच्या दिवशी हीच डाळिंबाची फुले श्रीमाताजी दर्शनार्थीना वितरित करीत असत.)

-श्रीमाताजी

(CWM 153 192)

‘ल्हासा’ या गावामध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती अलेक्झांड्रा डेव्हिड नील ह्या पहिल्या युरोपियन बुद्धमार्गी महिला होत्या. त्यांचा तिबेटचा प्रवास खूप कष्टप्रद होता. नील जेव्हा एका जथ्याबरोबर तिबेटकडे जायला निघाल्या होत्या. तेव्हाची ही गोष्ट आहे. त्याकाळात इंडो-चायना मार्गे तिबेटमध्ये जाणे तुलनेने सोपे असल्याने नील त्या मार्गाने निघाल्या होत्या. नरभक्षक वाघांची वस्ती असलेल्या जंगलातून त्यांची वाट जात होती. नील रोजच्या रोज ठरावीक वेळी ध्यानास बसत असत. एक दिवसाचाही कधी खंड पडू देत नसत. जेव्हा त्या घनदाट अरण्यातून चालल्या होत्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांची रोजची ध्यानाची वेळ झाली आहे.

म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत्यांना सांगितले,”तुम्ही पुढे व्हा, माझे ध्यान आटोपले की मी येतेच.”

त्यांच्या काळजीने त्यांचे सहप्रवासी घाबरून गेले. त्यांनी नीलला खूप समजावून पाहिले, “येथे थांबणे धोकादायक आहे. तुम्ही आमच्याबरोबर चला.”

त्यांनी असे वारंवार सांगून पाहिले पण व्यर्थ ! त्या आपल्या निर्णयावर अडिग होत्या.

शेवटी नाईलाजाने सहप्रवासी पुढे निघून गेले. त्या ध्यानाला बसल्या. थोड्या वेळाने त्यांना एका अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांनी डोळे उघडून पाहिले तो त्यांना काय दिसले? एक नरभक्षक वाघ त्यांना गिळंकृत करण्याच्या तयारीत अगदी तीनचार टप्प्यांच्या अंतरावर उभा होता.

तेव्हा एखाद्या सिद्ध अशा बुद्धवाद्याप्रमाणे त्यांनी विचार केला,”मला जर अशाच मार्गाने निर्वाण मिळणार असेल, तर ठीक आहे. मी तयार आहे. मला आता माझा देह फक्त योग्य प्रकारे, योग्य वृत्तीने सोडावयाचा आहे इतकेच.” असे मनाशी म्हणत त्या ध्यानाला बसल्या. पाच मिनिटे, दहा मिनिटे, अर्धा तास निघून गेला. त्यांनी ध्यानातून बाहेर आल्यावर डोळे उघडून पाहिले… वाघ निघून गेला होता. नील मग शांतपणे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या आणि सहप्रवाशांना म्हणाल्या,”ही मी आले आहे.”

-श्रीमाताजी

(CWM 9:53-54)

श्रीमाताजींना त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याने विचारले, “माताजी, तुमचा चैत्य पुरुष तुमच्या जीवनाचे संपूर्णतया नियमन करत आहे, असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा कधी आला?”

श्रीमाताजी म्हणाल्या, “ही खूप जुनी गोष्ट आहे. मला वाटते ते बहुधा १९०४ साल असावे. एके दिवशी माझ्या भावाच्या मित्रामुळे माझी मार्क थिऑन यांच्याशी भेट झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा, मी जरी थिऑन ह्यांना ओळखत नव्हते तरीही, त्यांनी मात्र मला ओळखले. थिऑन हे गूढवादाचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी मला त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले.

पुढे मग मी गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गावी अल्जेरियामध्ये थ्लेमसेन येथे गेले. तेव्हा मी २७-२८ वर्षांची होते आणि आयुष्यात प्रथमच एकटीने एवढ्या लांबचा प्रवास करत होते. मी तेथे पोहोचले तेव्हा मार्क थिऑन मला न्यायला आले होते.

अॅटलास पर्वतराजींच्या उतरंडीवर त्यांचे घर होते. त्यांची मोठी इस्टेट होती. त्यामध्ये शेकडो वर्षांपूर्वीची ऑलिव्हची, अंजीरांची झाडे होती. त्या सगळ्या वृक्षराजीमधून आम्ही वर वर चाललो होतो. त्यांचे घर खूप दूरवर, उंचावर होते. एका टप्प्यावर आल्यावर दूरवर निर्देश करत त्यांनी मला लाल रंगाचे एक घर दाखविले आणि म्हणाले ते माझे घर ! त्या घराच्या लाल रंगावरून काही गमतीदार किस्सा पण त्यांनी मला ऐकविला.

मी शांतपणेच चालत होते. आणि मध्येच ते एकदम थांबले आणि माझ्याकडे गर्रकन वळून म्हणाले, “आता तू माझ्या ताब्यात आहेस, तुला भीती नाही वाटत?”

आपली तर्जनी उंचावून दाखवीत, मी त्यांना सांगितले की, “माझा चैत्य पुरुष माझे नियमन करतो, मी कोणालाच घाबरत नाही.”

माताजी पुढे सांगू लागल्या, “हे उत्तर ऐकल्यावर, ते थक्कच झाले. खरोखर, थ्लेमसेनला जाण्यापूर्वी मला चैत्य जाणिवेची (Psychic Consciousness) प्राप्ती झालेली होती.” त्यामधूनच ती निर्भयता आलेली होती.

 

आधारित : (Mother’s Agenda vol 13 : April 15,1972 & Mother or The Divine Materialism : Pg 159-160)

चैत्य अस्तित्वाचा श्रीमाताजींना आलेला पहिला अनुभव त्या त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याला सांगत आहेत. तो अनुभव असा – मला तो अनुभव इ.स. १९१२ साली आला. पुढील सर्व वाटचालीसाठी आधारभूत असणारा हा पहिला अनुभव आहे. परंतु ह्या अनुभवापर्यंत पोहोचायला मला संपूर्ण एक वर्ष लागले. मी खाता-पिता, उठता-बसता ‘आंतरिक अस्तित्वाशी एकत्व’ हा एकच ध्यास घेतला होता. मला दुसरे तिसरे काही नको होते. मी सतत त्याचाच विचार करत असे, आणि तेव्हाच एक मजेशीर गोष्ट घडली.

ती नववर्षाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. मी संकल्प केला होता, “येत्या वर्षात हे नक्की घडलेच पाहिजे.” मी आमच्या स्टुडिओमध्ये होते. त्या स्टुडिओतून बाहेर पडल्यावर समोर अंगण होते. मी सहज म्हणून दार उघडून बाहेर आले, समोर पाहते तो मला उल्कापात होताना दिसला. असे म्हणतात की, तारा निखळून पडत असताना, तुम्ही जर मनात कोणतीही इच्छा बाळगलीत तर ती वर्षाच्या आत खरी होते, आणि मी तसेच केले. तो तारा दिसेनासा व्हायच्या आत मी म्हटले, “आंतरिक अस्तित्वाशी एकत्व..”

आणि खरोखरच, डिसेंबर महिन्याच्या आत मी आंतरिक अस्तित्वाशी एकत्व पावू शकले होते. त्या काळी, आंतरिक अस्तित्वाशी एकरूप व्हायचा मी खूप प्रयत्न करत असे. अगदी रस्त्याने चालत असतानासुद्धा तोच ध्यास असे. मी सतत एकाग्र राहण्याचा प्रयत्न करत असे..ते खूप दुःखदायक असे.. खूप त्रास होत असे. जणू काही मी बंद दरवाजापुढे बसलेली असावे असे ते भासायचे…

पण एके दिवशी मात्र, अचानक, दरवाजा उघडला गेला. आणि नंतर, ती अनुभूती काही तासच नव्हे, तर काही दिवस टिकून राहिली होती.. तो चैत्य पुरुष सर्व काही जाणतो, तोच संकल्प करतो, तोच जीवनाचे नियमन करतो…ही जाणीव झाली आणि नंतर ती जाणीव मला कधीच सोडून गेली नाही..

– श्रीमाताजी (Mothers agenda Vo13 : 0ctober 30, 1962)

एक जण मानवी एकतेचा प्रचार करण्यासाठी जगप्रवास करीत होता. मीरा जपानमध्ये असताना, तिची त्या व्यक्तीशी टोकियो येथे भेट झाली. “अमुक अमुक झाले तर किती बरे होईल? प्रत्येकजण सुखी होईल, प्रत्येक जण दुसऱ्याला समजून घेऊ शकेल, कोणीही कोणाशी भांडणार नाही.” अशा कल्पनेचा प्रचार करीत तो जगभर हिंडत असे. लोक त्याला त्याचे नाव विचारत, तेव्हा तो सांगत असे, “मी टॉलस्टॉय.”

लोक अचंबित होऊन विचारत, “ओ, तुम्हीच का ते टॉलस्टॉय?” बिचाऱ्या लोकांना माहीत नव्हते की ‘लिओ टॉलस्टॉय’ आता हयात नाहीत. लोकांना वाटत असे, व्वा ! आपण किती भाग्यवान ! आपल्याला खुद्द टॉलस्टॉय भेटले.

मीरेने त्यास विचारले, “पण ही मानवी एकता कशी साध्य करावयाची?”

तो म्हणाला, “ते तर अगदीच सोपे आहे. प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण एकाच प्रकारचा पोषाख परिधान करेल, प्रत्येक जण सारखेच जीवन जगेल, प्रत्येक जण सारख्याच प्रकारचे जेवण करेल, अगदी सोपे आहे.”

मीरा म्हणाली, “तर मग ही अशी एकता फारच भयंकर असेल.” पण तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. मीरा मग पुढे काही बोललीच नाही. कारण मीराला काय म्हणायचे होते ते त्याला समजण्याच्या पलीकडचे होते.

वरील तथाकथित मानवी एकतेचे प्रचारक सुविख्यात रशियन साहित्यिक ‘लिओ टॉलस्टॉय’ नव्हते तर तो होता त्यांचा एक मुलगा! आणि मीरा म्हणजे ‘मीरा अल्फासा’ अर्थात श्रीमाताजी.

श्रीमाताजी तेव्हा त्याला जे सांगू इच्छित होत्या ते ‘मानवी एकते’चे श्रीमाताजींच्या मनातील चित्र आज साकारू पाहत आहे ‘ऑरोविल’च्या रूपात!

श्रीअरविंद एकांतवासात असताना, श्रीअरविंदांचे १९२६ ते १९५० या कालावधीमध्ये एकही छायाचित्र काढण्यात आले नाही. आणि नियतीची योजना कशी असते पाहा; १९५० साली म्हणजे ज्यावर्षी श्रीअरविंदांनी देह ठेवला त्यावर्षी श्री. कार्टिअन ब्रेसन हे सुप्रसिद्ध छायाचित्रकार आश्रमात आले होते. आश्रमात आल्यानंतर त्यांनी श्रीमाताजींना श्रीअरविंदांचे छायाचित्र घेण्याविषयी परवानगी मागितली. श्रीमाताजींनी मला बोलावून सांगितले, “मी श्री. ब्रेसन यांना छायाचित्र काढण्याची परवानगी दिली आहे. त्यांना काय लागेल ती मदत कर. त्यांना काय हवंनको ते बघ.”

श्री. ब्रेसन यांनी ‘दर्शना’चे छायाचित्र घेतले. श्रीमाताजींनी त्यांना सांगितले होते की, छायाचित्र घेताना फ्लॅशलाईटचा वापर करावयाचा नाही. बिचारे ब्रेसन! फ्लॅशलाईटशिवाय त्यांना छायाचित्र घेणे भाग पडले. त्या काळात कॅमेऱ्याच्या तितक्या प्रगत लेन्सेस नव्हत्या. ब्रेसन श्रीमाताजींना म्हणाले, “या इतक्या मंद प्रकाशात छायाचित्र घेण्याएवढे आपले तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही ह्याचे मला खरंच खूप वाईट वाटतेय. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो.”

‘दर्शना’चे छायाचित्र काढून झाल्यानंतर ‘श्रीअरविंद त्यांच्या खोलीतील नेहमीच्या खुर्चीत बसलेले आहेत’ हे छायाचित्र काढण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. श्रीअरविंद बसलेले आहेत, श्री.ब्रेसन छायाचित्र काढत आहेत, ते श्रीअरविंदांना सांगत आहेत, तुमची मान थोडी अशी करा, थोडे इकडे पाहा, थोडे तिकडे पाहा, इ. इ. आणि ह्या सर्व घटनेचा मी एकटाच साक्षीदार होतो, खूप छान अनुभव होता तो!

छायाचित्र काढून झाल्यानंतर श्री. ब्रेसन मला असे म्हणाले कि, “अजिबात हालचाल न करता किंवा दहा मिनिटांत एकदासुद्धा पापणी न हलवता छायाचित्रासाठी बसून राहिलेले असे मॉडेल मी उभ्या आयुष्यात कधी पाहिले नाही.”

लेखक – श्री. उदार
(One of Mother’s Children : pg.22 – लेखक श्री. उदार)

श्रीअरविंद त्यांच्या आजीआजोबांविषयीची एक गोष्ट सांगत असत.

त्यांची आजी एकदा म्हणाली, “देवाने हे इतके वाईट जग का बनविले आहे? मी जर त्याला भेटू शकले तर तो भेटल्यावर त्याच्याविषयी मला काय वाटते ते मी त्याला सांगणार आहे.”

त्यावर आजोबा म्हणाले, “हो बरोबर आहे. पण देवाने अशी नामी व्यवस्था करून ठेवली आहे की, जोवर तुमच्यामध्ये अशा व इतर प्रकारच्या कोणत्याही इच्छा शिल्लक आहेत तोवर तुम्ही त्याच्याजवळ जाऊच शकत नाही.”

– श्रीअरविंद
(Evening talks with Sri Aurobindo)

श्रीमाताजी एक आठवण सांगत आहेत : जेव्हा मी पॅरिसमध्ये राहत असे तेव्हा मी सर्व प्रकारच्या स्नेहमेळाव्यांना जात असे; लोक वेगवेगळी संशोधने करत असत; आध्यात्मिक (तथाकथित आध्यात्मिक), गूढवादी संशोधनं इ. जिथे चालत असत तिथे मी जात असे.

एका तरुण स्त्रीला भेटण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. मला वाटते ती स्वीडिश तरुणी होती; तिला ज्ञानप्राप्तीची, नेमके सांगावयाचे तर शिकण्याची एक पद्धत सापडली होती. ती तिने आम्हाला समजावून सांगितली. आम्ही तिघीचौघी जणी होतो. तिचे फ्रेंच काही तितकेसे बरे नव्हते; पण ती जे काही सांगत होती त्याविषयी तिला बऱ्यापैकी खात्री होती.

ती म्हणाली, “हे बघा, तुम्ही कोणतीही एक वस्तु घ्या; किंवा फळ्यावर कोणतेही एक चिन्ह काढा किंवा एखादे चित्र काढा. – ते काही तितकेसे महत्त्वाचे नाही – तुम्हाला जे काही सोयीचे आहे ते घ्या. समजा, उदाहरणादाखल मी तुमच्यासाठी हे चित्र काढते.. (तिच्यापाशी फळा होता.) हं तर मी चित्र काढले आहे.”

तिने एक अर्धभौमितिक असे चित्र काढले. ”आता, तुम्ही या चित्रासमोर बसा आणि तुमचे सर्व लक्ष या चित्रावर एकवटा – हे जे चित्र तुमच्यासमोर आहे त्यावर तुमचे लक्ष एकवटा. तुमच्या जाणिवेमध्ये त्या चित्राशिवाय दुसरे काहीही येऊ देऊ नका – केवळ तेच तुमच्या जाणिवेमध्ये असू दे.”

तुमचे डोळे त्या चित्रावरच खिळलेले असतात आणि तुम्ही तुमची नजर अजिबात हटवत नाही. तुम्ही जणू काही त्या चित्राने संमोहित झाल्यासारखे असता. तुम्ही पाहता, तुम्ही पाहता, पाहता, पाहता… काहींना कमी अधिक वेळ लागतो, पण ज्याला त्याची सवय आहे त्याच्याबाबतीत हे काहीसे लगेच घडून येते. तुम्ही पाहत राहता, पाहता, पाहता आणि एकाएकी तुम्ही ज्या चित्राकडे पाहत असता ते चित्रच तुम्ही बनून जाता. त्या चित्राविना या जगामध्ये दुसरे काही जणू शिल्लकच राहात नाही आणि तेव्हा एकाएकी तुम्ही दुसऱ्या बाजूला जाता; आणि जेव्हा तुम्ही त्या दुसऱ्या बाजूला जाता तेव्हा तुमचा एका नवीनच चेतनेमध्ये प्रवेश झालेला असतो आणि तुम्हाला ज्ञान होते. हे सारे अद्भुत होते, त्यामुळे आम्ही खूप हसलो. पण हे काहीसे खरे आहे. सराव करण्याजोगी ही एक चांगली पद्धत आहे.

अर्थात, एखादे चित्र किंवा एखादी वस्तु घेण्याऐवजी तुम्ही एखादी कल्पना, काही शब्द घेऊ शकता. तुम्हाला भेडसावणारी एखादी समस्या असते, आणि तुम्हाला त्या समस्येचे उत्तर माहीत नसते. तुम्ही ती समस्या वस्तुनिष्ठपणे मांडा, ती अगदी नेमकी, अचूक मांडा. शक्य असेल तितक्या संक्षिप्त शब्दांमध्ये मांडा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा. तुम्ही केवळ शब्दांवर लक्ष केंद्रित करता पण शक्य असेल तर ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात त्या कल्पनेवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्या समस्येवर लक्ष केंद्रित करा. जोवर दुसरे काही शिल्लकच उरणार नाही तोवर त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि हे खरे आहे, एकाएकी, तुमच्यामध्ये काहीतरी खुलेपणाची भावना निर्माण होईल आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला असाल. दुसरी बाजू पण कशाची?

ह्याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जाणिवेचे एक द्वार उघडलेले असते. आणि तुम्हाला ताबडतोब तुमच्या समस्येची उकल होते.

‘व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावावे’ हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)

मी जेव्हा प्रथमच भारतात जपानच्या बोटीतून आले, त्या बोटीवर दोन पाद्री होते. ते दोघेही भिन्न पंथांचे होते. रविवारचा धार्मिक कार्यक्रम कोणी करावयाचा ह्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. बऱ्याच वेळाने त्यापैकी एकाने माघार घेतली, दुसऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. बोटीवर हा कार्यक्रम जिथे होणार होता तिथे जाण्यासाठी खाली उतरून जावयाचे होते. मला वाटते, तेव्हा आम्ही लाल समुद्रातून प्रवास करीत होतो. त्या दिवशी खूप उकाडा होता, पण सर्वांनी जाकीटे घातली होती, टाय लावले होते, चामडी बूट घातले होते, डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, हातामध्ये बायबल ग्रंथ धरलेला होता. सगळे जण तयार होऊन रांगेने जणू काही मिरवणूकच निघाली असावी अशा रीतीने त्या ठिकाणी गोळा झाले. बोटीवरचे जवळपास सर्व लोक त्यामध्ये मोठ्या धार्मिकतेने सहभागी झाले. प्रार्थना संपली आणि लगेचच कोणी बारमध्ये, कोणी पत्ते खेळण्यामध्ये, कोणी काही तर कोणी काही करण्यामध्ये गुंगून गेले.

नंतर ते पाद्री माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्ही प्रार्थनेला आला नाहीत?”

मी म्हटले, “माझा धर्मावर विश्वास नाही.”

ते म्हणाले,”अच्छा! म्हणजे तुम्ही जडवादी आहात तर!”

मी म्हटले,”नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही नाराज व्हाल, त्यापेक्षा न बोलणेच बरे.”

त्यांनी खूप आग्रह केल्यावर मी त्यांना सांगितले,”तुम्ही आणि इतर लोकही प्रामाणिक आहेत असे मला वाटत नाही. तुम्ही केवळ एक सामाजिक कर्तव्य व सामाजिक प्रथा म्हणून प्रार्थना केलीत, त्यामध्ये ईश्वराशी संपर्क साधण्याचा कोणताही भाव नव्हता.”

ते म्हणाले, “पण ते तर आम्हाला जमत नाही.”

मी म्हणाले, “म्हणूनच तर मी तेथे आले नाही. कारण मला त्यात स्वारस्य वाटत नाही.”

– श्रीमाताजी

(CWM 08:149)