प्रश्न : स्वत:च्या जाणिवेमध्ये बदल कसा करायचा?
श्रीमाताजी : अर्थातच ह्याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब करावयास हवा. आपल्या मार्गाचा संकेत हा बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत त्यात काही ना काही फरकही आढळून येतो.
उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य जाणिवेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. त्या व्यक्तीचा वरवरच्या बाह्यवर्ती गोष्टी, माणसे, परिस्थिती यांच्याशी संपर्क असतो आणि कधीतरी, जसे मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत ही गोष्ट भिन्न भिन्न असते – अचानक, या ना त्या कारणाने वस्तुमात्राकडे समपातळीवरून क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी व्यक्ती वर उचलली जाते; तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या असंख्य गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्या त्यांच्या समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत बसण्यापेक्षा, तुम्ही त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून पाहता, तुम्ही या सर्व गोष्टींकडे एकात्मतेने आणि फार फार उंचावरून पाहता.
हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येऊन जातो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर, खोलवर बुडी मारते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक शांततेमध्ये, आंतरिक शांतीमध्ये, वस्तुमात्रांविषयीच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्राविषयी व आजूबाजूच्या परिस्थितीविषयी अगदी अंतरंगातून आकलन होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. विविध अशा बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव मग त्या व्यक्तीला होते. किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि व्यक्तीचा आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये प्रवेश होतो.
तुमच्या आयुष्यात, हे अनुभव अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतही नाही ते का आणि कसे आले… ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार भिन्न भिन्न असतात, पण ह्या एका निमिषार्धातील अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता.
व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता ते सुचविणारा जो धागा, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.
ज्यांच्याबाबतीत त्यांच्या आंतरिक अस्तित्वाचा, त्यांच्या अस्तित्वाच्या सत्याचा त्यांना शोध लागणार हे निर्धारित झालेले असते त्यांच्या जीवनात एखादी तरी अशी वेळा असते की, जेव्हा ते त्यांचे उरत नाहीत, वीज चमकून जावी त्याप्रमाणे एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश करावयास हवा. आणि अधिक खरेखुरे, अधिक समग्र अशा कशाकडे तरी घेऊन जाणारी एक नवीनच स्थिती प्राप्त व्हावी म्हणून अथक चिकाटीने, सातत्याने प्रयत्नशील राहावयास हवे.
नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत पण तुम्हाला आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; एका क्षणासाठी तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असा मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करावयाचे असते – हा एक क्षण असतो जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करावयाची हे दाखवून देतो.
काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच जाणीव उदयास येते. काहीतरी ऐकण्यात येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द, किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेले प्रयास, त्याची तीव्रता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.
पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी सत्य-चेतना काय ह्याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो.
व्यक्तीने त्याचा स्वत:च्या अंत:करणात शोध घ्यावा, किंवा तो ध्यानात ठेवावा, वा त्याचे निरीक्षण करावे, व्यक्तीने काय चालू आहे त्याची नोंद घ्यावी, त्याकडे लक्ष पुरवावे, बस्, इतकेच पुरेसे असते.
कधीकधी, व्यक्ती एखादी अगदी उदारतेने केलेली कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी कानावर पडते, उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता अचानकपणे दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील तो संकेताचा धागा पकडण्याचा एक प्रकार आहे. हजारो मार्ग आहेत, व्यक्तीने फक्त सावधचित्त असले पाहिजे आणि निरीक्षण केले पाहिजे.
ह्यासाठी सर्वप्रथम स्वत:ला या जाणिवेतील परिवर्तनाची निकड भासली पाहिजे; मला माझ्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा हाच तो मार्ग आहे हे तुम्ही स्वीकारले पाहिजे आणि एकदा का तुम्ही ते तत्त्व स्वीकारले की, मग तुम्ही जागरुक राहिले पाहिजे. तेव्हा तुम्हाला आढळेल की, खरोखरच तुम्हाला ते गवसते. आणि एकदा का ते गवसले की, कोणतीही चलबिचल न होऊ देता, तुम्ही वाटचालीला सुरुवात केली पाहिजे.
व्यक्तीने आत्मनिरीक्षण करावयास हवे, कायम सावध असावयास हवे, हा प्रारंभबिंदू आहे; तिने सदानकदा उदासीन, अनुत्सुक असू नये; सदोदित अनास्था बाळगू नये.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 101)