जर का कशाची आवश्यकता आहे, तर ती आहे प्रयत्न-सातत्याची! प्रकृतीची प्रक्रिया आणि श्रीमाताजींच्या शक्तीचे कार्य संकटकाळामध्ये देखील चालू आहे आणि जे जे आवश्यक आहे ते ते त्या करत राहतील, हे ओळखून नाऊमेद न होता, आपण मार्गक्रमण करत राहणे आवश्यक आहे. आपल्या क्षमताअक्षमतेस येथे महत्त्व नाही. येथे कोणीच मनुष्य असा नाही की, जो प्रकृतिशः सक्षम आहे. परंतु दिव्य शक्तीचे सुद्धा तेथे अस्तित्व असते. यावर जर व्यक्ती विश्वास ठेवेल तर, अक्षमतादेखील क्षमतेमध्ये परिवर्तित होईल. आणि मग अशावेळी, संकट आणि संघर्ष ह्या गोष्टीच स्वयमेव सिद्धीप्रत घेऊन जाणारे मध्यस्थ बनतील.

-श्रीअरविंद
(CWSA 31 : 727)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

वैयक्तिक प्रयत्नांवर भर :
योगसाधना करण्याच्या नेहमीच दोन पद्धती असतात – पैकी एक पद्धत म्हणजे जागरुक मनाने व प्राणाने कृती करणे. पाहणे, निरीक्षण करणे, विचार करणे आणि अमुक एक गोष्ट करावयाची किंवा नाही ते ठरविणे, ह्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. अर्थात, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या साहाय्यानेच त्या कृती केल्या जातात, त्या शक्तीला आवाहन केले जाते किंवा ती शक्ती ग्रहण केली जाते – अन्यथा फारसे काही घडू शकत नाही. परंतु तरीसुद्धा येथे वैयक्तिक प्रयत्नांवरच भर असतो आणि त्याद्वारेच ओझ्याचा बराचसा भाग उचलला जातो.

चैत्य पुरुषाचा मार्ग :
दुसरा मार्ग हा ‘चैत्य पुरुषाचा मार्ग’ आहे. यामध्ये चेतना ही ईश्वराप्रत उन्मुख होते आणि केवळ चेतना वा चैत्य पुरुषच उन्मुख होतो व तो पुढे आणण्यात येतो असे नाही तर, मन, प्राण आणि शरीर देखील ईश्वराप्रत खुले होतात आणि ते प्रकाश ग्रहण करू लागतात, त्याचा परिणाम म्हणून, काय केले पाहिजे ह्याचे आकलन होऊ लागते. जे काही करणे आवश्यक आहे, ते स्वत: ईश्वरी शक्तीच करत आहे ह्याची जाणीव होऊ लागते, ते दिसू लागते. आणि तेव्हा मग, जे दिव्य कार्य चालू आहे त्यासाठी, स्वत:च्या दक्ष व जागरुक आरोहणाच्या द्वारे त्याला आवाहन करणे; हा तो दुसरा मार्ग होय.

जोपर्यंत सर्व कृतींच्या ईश्वरी उगमाशी व्यक्ती पूर्णत: समर्पित होत नाही तोवर सहसा, या दोन पद्धतींचे संमिश्रण आढळून येते. तसे समर्पण झाल्यावर मग मात्र सर्व जबाबदारी नाहीशी होते आणि मग साधकाच्या खांद्यावर कोणतेही वैयक्तिक ओझे शिल्लक राहत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82-83)

कोणतेही विचारच मनात उमटू नयेत अशा प्रकारे मन शांत करणे ही गोष्ट सोपी नाही, बहुधा त्याला बराच काळ लागतो. सर्वात आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की, एक प्रकारची मनाची शांती तुम्हाला जाणवली पाहिजे. विचार जरी मनात आलेच तरी, त्यामुळे तुम्ही विचलित होता कामा नये किंवा त्यांनी तुमच्या मनाचा ताबा घेता कामा नये किंवा तुम्ही त्यामध्ये वाहवत जाता कामा नये; जरी मनात विचार आले तरी, ते नुसतेच निघून जात आहेत, असे व्हावयास हवे.

येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे सुरुवाती सुरुवातीला मन ‘साक्षी’ बनते, ते ‘विचारक’ नसते. नंतरनंतर तर ते विचार पाहणारे साक्षीही राहत नाही. त्या विचारांकडे लक्षही जात नाही, विचार केवळ येऊन जात आहेत, असे ते करु शकते. तेव्हा ते स्वत:वरच किंवा त्याने निवडलेल्या एखाद्या वस्तुवर विनासायास लक्ष केंद्रित करू शकते.

साधनेचा पाया म्हणून दोन मुख्य गोष्टी साध्य करून घ्यावयास हव्यात –
• चैत्य पुरुषाचे खुलेपण आणि
• वर असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार.

चैत्य पुरुषाचे खुलेपण :
श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रत आत्मार्पण हे चैत्य पुरुष खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्ती वाढली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे. श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची संवेदना किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ बनवीत आहेत ह्याचे स्मरण ही पुढची खूण आहे. सरते शेवटी, आतील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हावयास सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिविधी व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी, चैत्य बोधाकडून (Psychic Perception) मार्गदर्शन मिळू लागेल; ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्या बाजूलाही सारल्या जातील आणि अशा प्रकारे व्यक्तीच्या सर्व क्रिया त्या एका ईश्वराकडेच वळविल्या जातील.

आत्मसाक्षात्कार :
आत्मसाक्षात्कारासाठी, मनाची शांती आणि मौन ह्या पहिल्या आवश्यक अटी आहेत. नंतर व्यक्तीला एक प्रकारची सुटका, मुक्तता, व्यापकता जाणवायला सुरुवात होते. व्यक्ती एका शांत, अक्षोभित, कोणत्याच गोष्टीने स्पर्शित नसलेल्या, सर्वत्र आणि सर्वांतर्यामी अस्तित्वात असणाऱ्या, ईश्वराशी एकरूप झालेल्या किंवा ईश्वराशी अभिन्न असलेल्या अशा चेतनेमध्ये जीवन जगू लागते. अंतर्दृष्टी खुली होणे, अंतरंगामध्ये शक्तीचे कार्य चालू असल्याची जाणीव होणे किंवा तिच्या कार्याच्या विविध क्रियाप्रक्रिया किंवा त्या कार्याची लक्षणे इ. इ. जाणवणे ह्यासारखे मार्गातील इतर अनुभव येतील किंवा येऊ शकतील. तसेच व्यक्तीला चेतनेचे आरोहण आणि वरून अवतरित होणारी शक्ती, शांती, आनंद वा प्रकाश ह्यांचीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 320)

तासन् तास ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला अनुभव येतात की नाही, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आत्ता अनुभव नव्हे तर चैत्याची वृद्धी हाच तुमचा मार्ग असावयास हवा.

याचा अर्थ म्हणजे, तीन गोष्टी पाहिजेत – पहिली गोष्ट म्हणजे, प्राणिक अहंकार आणि त्याचे गोंधळ, अस्वस्थता, अशांती यांपासून मागे होऊन, श्रद्धा व समर्पणाचा शांत दृष्टिकोन स्वीकारणे.

दुसरी गोष्ट म्हणजे, अंतरंगामध्ये अशा कोणत्यातरी गोष्टीचा उदय की जी गोष्ट, तुमच्या प्रकृतीमधील काय बदलायला हवे हे पाहते आणि तो बदल घडविण्याचा जोशही देते.

तिसरी गोष्ट म्हणजे, साधनेमधील चैत्य भावना की जी, भक्तीमध्ये वाढ करेल. अशी भावना की जी, ईश्वराचे स्मरण करण्यात, त्याच्या विषयीच्या बोलण्यामध्ये, त्याच्याविषयी लिहिण्यामध्ये, अनुभवण्यामध्ये, ईश्वराचा सतत विचार करण्यामध्ये सहजपणाने आनंद अनुभवेल; अशी भावना ही, बाह्यवर्ती गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा अधिकाधिक अगदी शांतपणे ईश्वराभिमुख होऊन, आत्म-उन्नतीमध्ये परिपूर्णपणे वृद्धिंगत होत राहील.

जेव्हा जाणीव ही वरील गोष्टींनी ओतप्रोत भरून जाईल म्हणजे, जेव्हा अशा प्रकारे पूर्ण चैत्य स्थिती असेल, चैत्य खुले झालेले असेल, तेव्हा आपोआप अनुभव यायला लागतील. प्रथम चैत्य खुलेपण आणि त्यानंतर उच्चतर जाणीव व तिचे अनुभव !

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 347-348)

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक प्रेरणांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल, तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष पूर्णत: खुला होईल.

जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण वा प्रेरणेची अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन जर योगसाधना केली जात असेल, किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी, किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची उर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य (Psychic) हे मुक्त होणार नाही, किंवा ते जर मुक्त झालेच तर अंशत:च होईल किंवा कधीकधीच होईल किंवा परत बंदिस्त होऊन जाईल कारण ते प्राणिक कृतींनी झाकले जाईल; चैत्य अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.

तसेच, जर योगसाधनेमध्ये मन अग्रस्थान घेत असेल आणि आंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया ह्या चैत्य रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तर तशीच अ-क्षमता निर्माण होते.

शुद्धता, साधीसुधी प्रामाणिकता आणि कोणत्याही ढोंगाविना वा मागणीविना, भेसळयुक्त नसलेले अनंहकारी आत्मार्पण ह्या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 30: 349)

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती ह्या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू काही एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ईश्वर काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गाढतर चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हावयाचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तीपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; जेणेकरून ती दिव्य शक्ती आपल्या जाणिवेचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणेल. दिव्यत्वाच्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे. या सत्याचा साक्षात्कार जाणिवेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

पूर्णयोगामध्ये चक्रांचे संकल्पपूर्वक खुले होणे नसते, तर शक्तीच्या अवतरणामुळे ती आपलीआपण खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर खुली होत जातात, म्हणजे मूलाधार प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, ती वरून खाली खुली होत जातात, परंतु मूलाधारातून शक्तीचे आरोहण निश्चितपणे होते.

पूर्णयोगामध्ये क्वचितच कधीतरी मज्जारज्जूमध्ये प्रवाहाची जाणीव होते, जशी ती इतर नाडीप्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. पूर्णयोगामध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती होत नाही.

ह्या योगामध्ये उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ईश्वरी शक्तीचे वरून अवतरण होते. ती ईश्वरी शक्ती मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या ह्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात.

दिव्य मातेवर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ ह्या गोष्टी पूर्णयोगाचे मुख्य नियम आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460, 462)

मनुष्यप्राण्यामध्ये नेहमीच दोन प्रकारच्या प्रकृती असतात; एक आंतरिक प्रकृती म्हणजे आत्मिक व आध्यात्मिक, जी ईश्वराच्या संपर्कामध्ये असते; आणि दुसरी बाह्य प्रकृती म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक. ह्या बाह्य प्रकृतीचे भरणपोषण अज्ञानामध्ये झालेले असते आणि ही प्रकृती दोष, अपूर्णता, अशुद्धता यांनी भरलेली असते. आणि त्यामुळेच साधनेमध्ये गोष्टी अचानक एका निमिषार्धात बदलू शकत नाहीत.

आंतरिक अनुभूती वाढत जाते, विस्तारत जाते आणि बाह्य प्रकृतीला ती अधिकाधिक व्यापत जाते. पण जोवर ती अनुभूती बाह्य प्रकृतीला पूर्णतया व्यापत नाही तोवर कोठेतरी अपूर्णता शिल्लक राहतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89-90)