आध्यात्मिकता १८

जे साधक परिपूर्णतेपर्यंत किंवा त्या जवळपाससुद्धा पोहोचलेले नाहीत त्यांच्या बोलण्यातले आणि वागण्यातले अंतर, त्यांचे विपरीत वर्तन तुम्ही पाहता आणि आध्यात्मिक अनुभव वगैरे असे काही नसते किंवा त्यात काही अर्थ नसतो असे तुम्ही म्हणता; परंतु त्या साधकांचे वर्तन हे तुमच्या म्हणण्यासाठी पुरावा कसा काय ठरू शकतो? एखाद्या माणसाला जेव्हा कधी कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक अनुभव येतो किंवा साक्षात्कार होतो तेव्हा लगेचच त्या क्षणी तो माणूस एक निर्दोष किंवा दुर्बलता-विरहित असा परिपूर्ण मनुष्य बनला पाहिजे, असे तुम्ही लिहिले आहे. हे म्हणजे एक अशी अपेक्षा करण्यासारखे आहे की, ज्या अपेक्षेचे समाधान करणे अशक्य आहे आणि अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे, ‘आध्यात्मिक जीवन हा एकाएकी घडून येणारा, अवर्णनीय असा चमत्कार नसून, आध्यात्मिक जीवन म्हणजे एक प्रकारचा विकास आहे.’ या तथ्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एखादा साधक हा आधीपासूनच सिद्ध-योगी आहे असे समजून त्याचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही. प्रदीर्घ मार्गावरील जेमतेम पाव टक्के किंवा त्याहूनही कमी अंतर जे चालून गेले आहेत, त्यांच्याबाबतीत तर असे मूल्यमापन करताच कामा नये….

इतकेच काय पण, अगदी महान योगीसुद्धा पूर्णत्वप्राप्तीचा दावा करत नाहीत, आणि ते तसे अगदी परिपूर्णतया निर्दोष नसल्यामुळे, त्यांची ‘आध्यात्मिकता’ मिथ्या आहे किंवा तिचा या जगाला काही उपयोगच नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. शिवाय आध्यात्मिक माणसं ही अनेक प्रकारची असतात. त्यांच्यापैकी काही जण त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभवांवरच समाधानी असतात आणि बाह्य जीवनातील पूर्णत्व किंवा प्रगती यांच्यासाठी प्रयत्नशील नसतात. काहीजण संत असतात, तर काही जणांना संतत्वाचा ध्यास नसतो. अन्य काही जण वैश्विक चेतनेमध्ये, ‘सर्वव्यापी ईश्वरा’च्या संपर्कात किंवा त्याच्याशी सायुज्य पावून जीवन जगण्यामध्ये आणि स्वत:च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शक्तींना क्रीडा करू देण्यामध्ये समाधानी असतात, म्हणजेच ते ‘परमहंस’ स्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणे असतात.

…कोणत्यातरी एका काटेकोर व्याख्येमध्ये बसावावी किंवा एखाद्या ठरावीक बंदिस्त मानसिक नियमामध्ये बांधून ठेवावी अशी ‘आध्यात्मिक जीवन’ ही काही एक वस्तू नाही, तर ‘आध्यात्मिक जीवन’ हे उत्क्रांतीचे एक विशाल क्षेत्र आहे, ‘आध्यात्मिक जीवन’ म्हणजे असे एक विशाल साम्राज्य असते, की त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अन्य सर्व साम्राज्यांहूनही अधिक विशाल असण्याची क्षमता त्याच्या ठायी असते; ज्यामध्ये शेकडो प्रांत असतात, हजारो प्रकार असतात, स्तर असतात, रूपं असतात, मार्ग असतात, आध्यात्मिक आदर्शांमध्ये विभिन्नता असते, आध्यात्मिक उपलब्धीच्या विविध श्रेणी असतात.

– श्रीअरविंद [CWSA 31 : 656-657]

आध्यात्मिकता १५

आत्म-नियमनाच्या सर्व साधनापद्धती (उदा. आहार परिमित असावा इत्यादी गोष्टी) या जर केवळ नैतिक गुणांचे पालन करायचे म्हणून आचरणात आणल्या गेल्या तर, त्यामधून आध्यात्मिक स्थिती (spiritual state) प्राप्त होईलच असे नाही. त्या जर ‘आध्यात्मिक तपस्या’ म्हणून आचरणात आणल्या गेल्या तरच त्यांचे – किमान त्यातील बहुतांशी साधनापद्धतींचे साहाय्य होऊ शकते. एखादा मनुष्य अगदी अल्प आहार घेत असेल म्हणून तो आध्यात्मिक असलाच पाहिजे असे नाही – परंतु त्याचे मित-आहार घेणे हे जर त्याने, अन्नाविषयीच्या हावरटपासून सुटका करून घेण्यासाठी, आत्म-प्रभुत्वाचे (self-mastery) एक साधन म्हणून उपयोगात आणले तर, ते त्याला साहाय्यकारी ठरते.

– श्रीअरविंद [CWSA 31 : 429]

आध्यात्मिकता १४

अध्यात्म-साधनेसाठी ‘प्रामाणिकपणा’ ही अगदी अत्यावश्यक गोष्ट असते आणि कुटिलता हा त्यामधील कायमचा अडथळा असतो. ‘सात्त्विक वृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि सज्ज असते आणि राजसिक वृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून गेलेली असते,’ असे मानले जाते.

त्याच वेळी हेही खरे आहे की, ‘आध्यात्मिकता’ ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कोणती गोष्ट आवश्यक असेलच तर ती म्हणजे खरी ऊर्ध्वमुख अभीप्सा! आणि ही अभीप्सा सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक वृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्त्विक वृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक वृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ‘ईश्वरी विशुद्धता’, ‘प्रकाश’ आणि ‘प्रेम’ यांच्याकडे वळू शकते.

अर्थात, व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून त्या कनिष्ठ प्रकृतीला हद्दपार करेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गच्युत होण्याची देखील (to fall from the path) शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटलेली असते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि ईश्वर-भक्तांमध्ये रूपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई (चैतन्य महाप्रभुंचे शिष्य), बिल्वमंगल आणि त्यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ‘ईश्वरा’च्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात; मग त्या माणसाने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असोत किंवा कितीही चुका केलेल्या असोत.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर असणारी अनुक्रमे तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ‘आत्म्या’च्या उच्चतेकडे जाताना, ती दोन्हीही चांगली भाजून निघतात.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

आध्यात्मिकता ११

मानसिक विचार, नैतिक प्रयास, उत्तम चारित्र्य, जनहित, आत्म-त्याग, आत्म-परित्याग, परोपकार, मानवाची किंवा मनुष्यमात्राची सेवा या गोष्टींना पाश्चात्य लोक आध्यात्मिक अभीप्सेचे किंवा आध्यात्मिक सिद्धीचे शिखर मानतात. यासंबंधी लिहून झाल्यावर श्रीअरविंद या पत्रामध्ये पुढे लिहितात…..

(वर उल्लेख केलेल्या गोष्टी) म्हणजे पृथ्वीवरील उपलब्धींचा जर अखेरचा शब्द असता, तर अन्य कोणत्या गोष्टींची आवश्यकताच भासली नसती. आत्म्याचा किंवा स्वतःचा अगदी जवळून आणि सुस्पष्टपणे घेतलेला शोध, प्राणाच्या पाठीमागे आणि मनाच्या वर असणाऱ्या गोष्टींसाठी झटून केलेले प्रयत्न, ‘चिरंतना’विषयी किंवा ‘अनंता’विषयी असलेली ओढ, बुद्धिच्या, चारित्र्याच्या आणि मानवतेच्या गतकालीन जीवनध्येयांच्या संकुचित साच्यांमुळे मर्यादित न झालेली, चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या स्वातंत्र्यासाठी आणि विशालतेसाठी असलेली भूक, ‘ईश्वरा’च्या किंवा विशुद्ध आनंदाच्या ऐक्यासाठी असलेली तृष्णा, मानसिक व प्राणिक मूल्यांशी जखडल्या न गेलेल्या आध्यात्मिक अस्तित्वाचे सौंदर्य या साऱ्या गोष्टींना येथे स्थान नसल्यामुळे आणि त्यांची येथे आवश्यकतादेखील नसल्यामुळे, त्या अनावश्यक स्वप्न म्हणून बाद कराव्या लागल्या असत्या. परंतु असे असूनही, या गोष्टींची नुसती स्वप्नंच पाहिली गेली आहेत, अथवा नुसता त्यांचा ध्यासच घेतला गेला आहे असे नाही, तर मर्त्य, मानवी देहामध्ये जन्म घेतलेले जीव तेथवर जाऊन पोहोचले आहेत, त्या गोष्टींचा पडताळा त्यांनी घेतला आहे. तेथे ‘आध्यात्मिकता’ असते.

मानवी मानसिक, नैतिक, सौंदर्यात्मक, प्राणिक साच्यांच्या पलीकडे जाण्यासाठी, ते साचे मोडणे आणि (चिरंतनाविषयीची ओढ इ. गोष्टी, ज्यांचा वर उल्लेख झाला) त्या गोष्टी ज्या चेतनेचे मूलद्रव्य आहेत, हे अनुभव ज्या चेतनेच्या दृष्टीने अगदी सहज-स्वाभाविक आहेत अशा चेतनेमध्ये प्रवेश करणे हा ‘आध्यात्मिकते’चा गाभा आहे. त्यापेक्षा निम्नतर अशी कोणतीही गोष्ट, किंवा उपरोक्त गोष्टींपेक्षा निम्नतर अशा कोणत्याही गोष्टीचा ध्यास किंवा अगदीच काही नाही तरी, त्यांचा झालेला आंशिक साक्षात्कार या गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिकता’ नव्हे. यांपैकी कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार, त्याच्या अनेक पैलूंपैकी, किमान एका पैलूचा तरी अनुभव, ज्याला आला आहे तो मनुष्य ‘आध्यात्मिक’ असतो; या गोष्टींचा ध्यास घेऊन, त्यासाठी जो प्रयत्नशील आहे, तो ‘आध्यात्मिक साधक’ असतो.

अन्य गोष्टी बौद्धिक, नैतिक दृष्टीने कितीही उदात्त असल्या, सौंदर्यदृष्ट्या अतिशय सुंदर आणि सुसंवादी असल्या, प्राणिकदृष्ट्या वैभवसंपन्न, महान आणि शक्तिशाली असल्या किंवा शारीरिकदृष्ट्या निर्दोष असल्या तरी या सर्व गोष्टी म्हणजे मार्गावरील एक मौलिक उपलब्धी आहे एवढेच म्हणता येईल, या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे, कारण येथे अजूनही व्यक्तीने मनाची ‘सीमारेषा’ ओलांडून एका नव्या साम्राज्यात प्रवेश केलेला नसतो. [‘आध्यात्मिकता’ मालिकेमधील ‘मानवी परिपूर्णत्व आणि आध्यात्मिकता’ हा भाग येथे संपला.]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 424-425]

आध्यात्मिकता १०

धार्मिक माणसं ही आध्यात्मिक असतात असे लोकं मानतात पण एखादी व्यक्ती अगदी खूप धार्मिक असूनही ती आध्यात्मिक नाही, असे असू शकते. आध्यात्मिकतेची जी लोकप्रिय संकल्पना आहे त्याद्वारे, गूढविद्येच्या शक्तीचे अद्भुत विक्रम, तपस्व्यांचे विक्रम, चमत्कार, तुमच्या त्या संन्यासीबाबांची थक्क करणारी सादरीकरणे या गोष्टींना आध्यात्मिक सिद्धीचे कार्य आणि महान ‘योगी’ असण्याची लक्षणे म्हणून संबोधण्यात येते आणि तेथेच गल्लत होते. परंतु एखादी व्यक्ती अगदी शक्तिमान गूढवादी असू शकते, किंवा आपल्या तपस्येच्या आधारावर ती अद्भुत गोष्टी करू शकते आणि तरीही ती अजिबात आध्यात्मिक नाही असे असू शकते. म्हणजे आध्यात्मिकतेच्या खऱ्या अर्थाने, आध्यात्मिक या शब्दाचा जो सुयोग्य आणि मूळचा अर्थ आहे त्या अर्थाने ती व्यक्ती आध्यात्मिक नाही असे असू शकते.

ज्याने आध्यात्मिक चेतना प्राप्त करून घेतली आहे, ज्याला आंतरिक किंवा उच्चतर ‘आत्म्या’चा साक्षात्कार झाला आहे, ज्याचा ‘ईश्वरा’शी संपर्क झाला आहे किंवा ज्याचे ‘ईश्वरा’शी किंवा जे चिरंतन आहे त्याच्याशी ऐक्य झाले आहे किंवा जो त्या दिशेने वाटचाल करत आहे किंवा जो या गोष्टींसाठी प्रयत्नशील आहे, तो आध्यात्मिक आहे, असे म्हणता येईल. ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा खरा आणि मूळचा अर्थ असा आहे. जे जीवन अशा रीतीने त्या शोधावर आणि त्या उपलब्धीवर आधारित असते अशा जीवनाद्वारेच ‘आध्यात्मिक’ परिपूर्णता प्राप्त होऊ शकते. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 417]

आध्यात्मिकता ०९

आपल्या कुटुंबीयांसाठी पैसे कमावणे आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडणे; एक भला आणि नीतिसंपन्न माणूस बनणे; सुयोग्य नागरिक, देशभक्त, देशासाठी कार्यकर्ता बनणे ही गोष्ट, कोणत्यातरी दूरस्थ आणि अदृश्य ‘देवते’च्या शोधार्थ, निष्क्रियपणे ध्यानाला बसण्यापेक्षा अधिक ‘आध्यात्मिक’ आहे, असे आपल्याला अलीकडे वारंवार सांगण्यात येते. परोपकार, जनहित, मानवतेची सेवा या गोष्टींना खऱ्या आध्यात्मिक गोष्टी म्हणून मानण्यात येते. मानसिक आदर्शवाद, नैतिक प्रयत्न, सौंदर्यात्मक विशुद्धता या गोष्टींना आधुनिक मनाद्वारे, आध्यात्मिक गोष्टी म्हणून पुढे केले जाते. आपण उत्तमातील उत्तम आणि सर्वोच्च असे जे काही साध्य करून घेऊ शकत असू तर ते हेच आहे असे दर्शविले जाते. – तथापि त्याचवेळी, एकीकडे वाढता भ्रमनिरास, असमाधान, त्यांच्यातील पोकळपणाची भावना या गोष्टीदेखील वाढीस लागत आहेत.

वरील सर्वच गोष्टींचा निश्चितपणे काही उपयोग आहे, कारण प्रत्येक गोष्टीचे त्याच्या त्याच्या स्थानी त्याचे त्याचे एक मूल्य असते आणि जे लोक या गोष्टींनी समाधानी होतात ते त्याला सर्वाधिक महत्त्व देतात, आणि या गोष्टी म्हणजेच सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या ‘कर्तव्यकर्म’ आहेत, असे मानून त्या धारण करतात, हे स्वाभाविकच आहे.

परंतु आध्यात्मिकता ही या गोष्टींवर अवलंबून नसते, तर ती स्वतःच्या स्वतंत्र पायावर आधारलेली असते आणि आध्यात्मिक चेतनेखेरीज अन्य कोणत्याही पायावर या गोष्टी जोपर्यंत आधारलेल्या असतात आणि आंतरिक आध्यात्मिक अधिष्ठानावर त्या जोपर्यंत रूपांतरित होत नाहीत तोपर्यंत आध्यात्मिकता त्या गोष्टींचा समावेशदेखील स्वत:मध्ये करून घेत नाही. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 417]

आध्यात्मिकता ०८

तुम्ही तुमच्या पत्रामध्ये वर्णन केलेल्या परिपूर्णत्वाच्या गोष्टी या कितीही चांगल्या असल्या तरी, त्याचे वर्णन मी ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा जो खरा अर्थ आहे त्या अर्थाने करणार नाही. कारण त्यामध्ये आध्यात्मिकतेच्या सारभूत आवश्यक अशा गोष्टींचा अभाव आहे. सर्व प्रकारचे पूर्णत्व हे खरोखर चांगलेच असते, कारण या किंवा त्या स्तरावर, या किंवा त्या मर्यादेत पूर्ण आत्माविष्काराच्या दिशेने, चेतनेचा जो प्रेरक-दाब (pressure) जडभौतिक विश्वावर पडतो, त्याची ती खूण असते. एका विशिष्ट अर्थाने ती स्वयमेव ‘ईश्वरा’चीच प्रेरणा असते, जी विविध रूपांमध्ये दडलेली असते. तिच्याद्वारे, चेतनेच्या निम्नतर श्रेणींमध्ये स्वयमेव ‘ईश्वर’च स्वतःच्या चढत्यावाढत्या आत्म-प्रकटीकरणाच्या (self-revelation) दिशेने स्वतःला प्रवृत्त करत असतो.

अचर निसर्गामध्ये एखाद्या वस्तूचे किंवा दृश्याचे पूर्णत्व; सामर्थ्य, वेग, शारीरिक सौंदर्य, धैर्य किंवा प्राण्यांची एकनिष्ठता, प्रेम, बुद्धिमत्ता यांचे सचेतन पूर्णत्व; कला, संगीत, काव्य, साहित्य यांचे पूर्णत्व; परिपूर्ण राजधुरंधर, योद्धा, कलाकार, कारागिर यांच्या मानसिक कृतीच्या कोणत्याही प्रकारातील बुद्धीचे पूर्णत्व; प्राणिक शक्ती आणि क्षमता यांचे पूर्णत्व; नैतिक गुणांमधील, चारित्र्यामधील, स्वभावधर्मातील पूर्णत्व – या सर्व गोष्टींना त्यांचे त्यांचे उच्च मूल्य आहे; उत्क्रांतीच्या शिडीवरील एक पायरी या दृष्टीने त्यांचे प्रत्येकाचे असे एक स्थान आहे; चैतन्याच्या उदयाच्या क्रमबद्ध पायऱ्या म्हणून त्यांचे मोल आहे. त्या पाठीमागे असलेल्या ‘ईश्वरा’च्या या अदृश्य प्रेरणेमुळे, त्याला आध्यात्मिक असे संबोधावे असे जर कोणाला वाटत असेल तर त्याने तसे खुशाल संबोधावे; फार फार तर, ती गुप्त चैतन्याच्या उदयाची पूर्वतयारी आहे, असे म्हणता येईल. परंतु, आवश्यक भेद केल्यानेच, विचार आणि ज्ञान प्रगत होऊ शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुष्कळसा गोंधळ निर्माण झाला आहे.

हा मानसिक आदर्शवाद, नैतिक विकास, धार्मिक पावित्र्य आणि उत्साह, गूढशक्ती आणि त्याचे विक्रम या सगळ्या गोष्टींची आजवर ‘आध्यात्मिकता’ म्हणून गणना करण्यात आली होती आणि आध्यात्मिक उत्क्रांती ही चेतनेच्या निम्नतर स्तरांशीच जखडून ठेवण्यात आली होती; वास्तविक त्या गोष्टींनी अनुभवाद्वारे आध्यात्मिक चेतनेसाठी जिवाची तयारी करून दिली होती, पण या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे.

हे पूर्णत्व तेव्हाच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक बनते, जेव्हा हे पूर्णत्व जागृत झालेल्या आध्यात्मिक चेतनेवर आधारलेले असते आणि त्याने त्या चेतनेचे विशिष्ट सार ग्रहण केलेले असते. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 416]

(आपल्यामधील) चेतना स्वत:ला कोठे ठेवते आणि ती स्वत:ला कोठे केंद्रित करते यावर सारे काही अवलंबून आहे. चेतना जर स्वत: अहंकाराशी संबंधित राहील किंवा अहंकारामध्ये स्वत:ला ठेवेल तर तुम्ही अहंकाराशी एकरूप होऊन जाता. चेतना जर मनाशी संबंधित राहील किंवा तेथे स्वत:ला ठेवेल तर ती मनाशी आणि त्याच्या क्रियांशी, तत्सम गोष्टींशी एकात्म पावेल. चेतना जर बाह्य गोष्टींवरच भर देईल, तर ती बहिवर्ती अस्तित्वामध्येच राहू लागेल आणि आंतरिक मन, प्राण आणि आंतरतम असणाऱ्या चैत्याची तिला विस्मृती होईल. चेतना जर आत वळली आणि तिने तिथे भर दिला तर तिथे ती स्वत:ला ‘आंतरिक पुरुष’ (Inner being) म्हणून ओळखते, किंवा अधिक खोलवर गेली तर ती स्वत:ला ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) म्हणून ओळखते; जर ती देहाच्या बाहेर असलेल्या पातळ्यांवर चढून गेली तर, ज्या आत्म्याला स्वाभाविकपणेच त्याच्या विशालतेचे आणि मुक्ततेचे भान असते त्या आत्म्याशी तद्रूप होऊन, ती स्वत:ला शरीर, प्राण वा मन म्हणून नव्हे तर, ‘आत्मा’ (self) म्हणून ओळखते.

चेतनेचा भर कशावर आहे त्यावरून सर्व फरक पडतो. म्हणूनच व्यक्तीने स्वत:ची चेतना अंतरंगामध्ये नेण्यासाठी किंवा उर्ध्वगामी करण्यासाठी, ती हृदयामध्ये किंवा मनामध्ये केंद्रित केली पाहिजे.

चेतनेचा हा कल सारे काही ठरवीत असतो. तोच व्यक्तीला मनोप्रधान, प्राणप्रधान, शरीरप्रधान किंवा आत्मप्रधान अशा स्वरुपाचा बनवतो. तोच व्यक्तीला बंधनात अडकवतो किंवा बंधमुक्त करतो; ‘पुरुषा’प्रमाणे साक्षी बनवितो किंवा ‘प्रकृती’प्रमाणे गुंतवून ठेवतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 20-21)

माणसामध्ये नेहमीच दोन भिन्न प्रकारच्या चेतना असतात, एक बहिर्वर्ती चेतना – ज्यामध्ये तो जीवन जगत असतो आणि दुसरी आंतरिक, झाकलेली चेतना की ज्याविषयी त्याला काहीच माहीत नसते. जेव्हा व्यक्ती साधना करू लागते तेव्हा, ही आंतरिक चेतना खुली होऊ लागते आणि व्यक्ती अंतरंगामध्ये जाऊन, तेथे सर्व प्रकारचे अनुभव घेऊ शकते.

व्यक्तीची साधना जसजशी प्रगत होऊ लागते तसतशी व्यक्ती आता अधिकाधिक आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहू लागते आणि बाह्य अस्तित्व हे अधिकाधिक उथळ वाटू लागते. सुरुवातीला आंतरिक चेतना ही स्वप्नवत भासत असते आणि बाह्य जाणीव ही जाग्रत वास्तव वाटत असते. कालांतराने ही आंतरिक चेतना खरीखुरी वाटू लागते आणि बऱ्याच जणांना मग बाह्य चेतना एखादे स्वप्न किंवा आभास असल्याप्रमाणे किंवा ती काहीशी उथळ व बाह्य असल्याचे जाणवते.

ही आंतरिक चेतना गभीर शांतीचे, प्रकाशाचे, आनंदाचे, प्रेमाचे, ‘ईश्वरा’च्या जवळीकीचे किंवा ‘ईश्वरा’च्या उपस्थितीचे, ‘दिव्यमाते’चे स्थान असल्याचे जाणवू लागते. तेव्हा मग व्यक्ती आंतरिक आणि बाह्य अशा दोन चेतनांविषयी जागृत होऊ लागते.

बाह्य चेतना ही आंतरिक चेतनेच्या समकक्ष चेतनेमध्ये परिवर्तित व्हावी आणि तिचे साधन बनावी; बाह्य चेतना देखील शांती, प्रकाश, ‘ईश्वरी’ ऐक्याने परिपूर्ण व्हावी याविषयी व्यक्ती जागृत होऊ लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89)

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते.

पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा विस्मृतीची एक प्रकारची भिंत असते; एक आंतरिक अस्तित्व (Inner being) – आंतरिक मन, प्राण, शरीर असते आणि आंतरतम भागामध्ये चैत्य पुरुष (an Inmost or Psychic being) असतो; मात्र आपण या साऱ्यांविषयी अनभिज्ञ असतो. तेथून पृष्ठभागावर जे जे काही येते फक्त त्याचीच जाणीव आपल्याला असते; त्याचा उगम कोठे आहे किंवा ते पृष्ठभागावर कोठून, कसे आले याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते.

‘योगसाधने’तून ती भिंत हळूहळू ढासळू लागते आणि आपल्याला आपल्यातील आंतरिक आणि आंतरतम अशा अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. असे केल्यामुळे आपल्यामध्ये जी एक नवीन ‘योगमय’ चेतना निर्माण होते त्या चेतनेला सभोवती असलेल्या वैश्विक चेतनेशी आणि वर असलेल्या उच्चतर आध्यात्मिक चेतनेशी थेट संपर्क साधणे शक्य असते.

ज्याप्रमाणे व्यक्तीकडे स्वत:ची अशी चेतना असते, त्याचप्रमाणे वैश्विक चेतना, वैश्विक ‘अस्तित्व’, वैश्विक ‘मन’, वैश्विक ‘प्राण’, वैश्विक भौतिक जाणीवयुक्त ‘प्रकृती’ देखील असते. आपण आपल्या बाह्य शारीर अस्तित्वामध्येच कोंडून पडल्यामुळे आपण त्या साऱ्याविषयी अनभिज्ञ असतो.

आंतरिक जागृतीमुळे आणि ऊर्ध्वमुख विकसनामुळे वैश्विक चेतना, वैश्विक ‘प्रकृती’, वैश्विक ‘आत्मा’ आणि त्याच्या हालचालींविषयी आपण जागृत होतो; आपली चेतना व्यापक होऊन, आपण त्या वैश्विक चेतनेशी तद्रूप होऊ शकतो. वैश्विक ‘प्रकृती’च्या शक्ती सातत्याने आपल्यावर कार्य करत असतात. वैश्विक प्रकृतीच्या शक्ती कशा कार्य करतात याची आपल्याला कल्पनादेखील नसते किंवा आपल्यावर चालणाऱ्या त्यांच्या कार्यावर आपण नियंत्रणही ठेवू शकत नाही. विश्वप्रकृतीविषयी सचेत झाल्यानेच आपण त्यांचे कार्य ओळखू शकतो आणि त्यावर नियंत्रणही मिळवू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 19-20)