भारत – एक दर्शन १३

उपनिषदं म्हणजे भारतीय मनाची एक परमोच्च कृती आहे आणि तशी ती असायलाही हवी कारण भारतीय मनाच्या प्रतिभेचे उच्चतम आत्माविष्करण, त्याचे सर्वांत उन्नत काव्य, विचार आणि शब्दांची महत्तर निर्मिती ही केवळ एक सामान्य दर्जाची साहित्यिक किंवा काव्यात्मक कलाकृती असता कामा नये तर, ती साहित्यकृती म्हणजे थेट आणि सखोल स्वरूपाच्या आध्यात्मिक साक्षात्काराचा जणू महान गंगौघच असला पाहिजे. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेचा आणि आत्म्याच्या असामान्य वळणाचा तो पुरावा आहे. ती एक लक्षणीय वस्तुस्थिती आहे.

उपनिषदं ही एका बाजूने गहनगंभीर धर्मग्रंथ आहेत कारण उपनिषदं म्हणजे गहन अशा आध्यात्मिक अनुभूतींच्या नोंदी आहेत; आणि दुसरीकडे उपनिषदं म्हणजे अक्षय प्रकाश, शक्ती आणि व्यापकतेच्या साक्षात्कारी आणि अंतर्ज्ञानात्मक तत्त्वज्ञानाचे दस्तऐवजदेखील आहेत, मग ती पद्यामध्ये लिहिलेली असू देत वा लयबद्ध गद्यामध्ये लिहिलेली असू देत, उपनिषदं म्हणजे परम, अमोघ अंतःस्फूर्तीतून स्फुरलेली, शब्दरचनेच्या बाबतीत अपरिहार्यपणे निर्दोष असलेली अशी आध्यात्मिक काव्यं आहेत; लय आणि आविष्काराबाबत ती अद्भुत आहेत.

उपनिषदं म्हणजे, ज्या मनामध्ये ‘तत्त्वज्ञान, धर्म आणि काव्य’ एकजीव झालेली आहेत अशा मनाचे आविष्कार आहेत. कारण हा ‘धर्म’ कोणत्या एखाद्या संप्रदायामध्ये परिणत होत नाही किंवा तो एखाद्या धार्मिक-नैतिक आकांक्षेपुरताही सीमित राहत नाही, तर तो ‘ईश्वरा’च्या, ‘स्व’च्या अनंत शोधाप्रत उन्नत होतो, तो आपल्या आत्म्याच्या समग्र आणि सर्वोच्च वास्तवाप्रत आणि अस्तित्वाप्रत उन्नत होतो, आणि तो प्रकाशमान ज्ञानाची आणि प्रेरित व परिपूर्ण अनुभूतीच्या आनंदाची वाणी उच्चारतो. हे ‘तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘सत्या’विषयीचा एखादा अमूर्त बौद्धिक तर्क नाही किंवा तार्किक बुद्धिमत्तेने केलेली कोणतीही रचना नाही, तर ते आंतरतम मनाने आणि आत्म्याने पाहिलेले, अनुभवलेले, जगलेले आणि साठवून ठेवलेले ‘सत्य’ आहे, खात्रीपूर्वक लागलेल्या शोधाचे आणि स्वामित्वाचे ते प्रसन्न उच्चारण आहे. आणि हे ‘काव्य’ म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशा आध्यात्मिक आत्मदृष्टीचे सौंदर्य आणि त्याचे आश्चर्य अभिव्यक्त करण्यासाठी, आणि ‘स्व’च्या, ‘ईश्वरा’च्या आणि विश्वाच्या गहनतम, ज्योतिर्मयी सत्याची अभिव्यक्ती करण्यासाठी, मनाच्या सर्वसामान्य क्षेत्राच्या अतीत, वर उचलल्या गेलेल्या सौंदर्यात्मक मनाचे कार्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 329-330]

भारत – एक दर्शन १२

वैदिक शिकवण ही मनुष्याच्या आंतरिक जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे त्या शिकवणुकीचे मोठे सामर्थ्य आहे आणि त्यामुळेच ती शिकवण नंतरच्या सर्व भारतीय तत्त्वज्ञानांचा, धर्मांचा, योगप्रणालींचा उगम ठरली.

मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून ‘सत्या’कडे वळले पाहिजे; त्याने ‘प्रकाशा’कडे वळले पाहिजे आणि ‘अंधकारा’च्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी ‘शक्तीं’च्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन तो या गोष्टी करतो; ईश्वरी ‘शक्तीं’च्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते.

जगभरातील ‘रहस्यां’ना ज्याप्रमाणे आंतरिक अर्थ देण्यात आलेला असतो त्याप्रमाणेच तो येथे बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना देण्यात आला आहे. ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात; ती प्रतीके मानव व देवदेवतांना जोडत असतात, त्या दोहोंमध्ये विनिमय घडवीत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्यत्व घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निर्माण होऊ लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे ‘सत्या’चे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते ‘अमर्त्यत्वा’च्या शक्ती आहेत, ते अनंत असणाऱ्या ‘माते’चे पुत्र आहेत; अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो ‘सत्या’चा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, ‘ऋतस्य पंथः’ असे ज्याला म्हटले जाते त्या ‘सत्या’च्या धर्मामध्ये मनुष्याचे आरोहण आहे.

मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’च्या मर्यादा तोडून अमर्त्यत्वाकडे येऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आंतरात्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि ‘सत्या’च्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमर्त्यत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमर्त्यत्वाचा पाया आहे आणि तेथे त्रिविध ‘अनंता’चे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आंतरात्मिक साधनेची उभारणी केली; नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय ‘योगा’चा गाभा सामावलेला होता.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 202-203]

भारत – एक दर्शन ११

(हिंदुधर्मातील देवदेवतांच्या वैपुल्याबद्दल अन्य धर्मांमध्ये काहीसा तिरकस सूर लावला जातो. त्या देवदेवतांचे नेमके मर्म काय, हेच श्रीअरविंद येथे एक प्रकारे स्पष्ट करत असल्याचे दिसते.)

ब्रह्मांडातील देवदेवतांच्या आंतरात्मिक गौरवाच्या विस्तारीकरणानिशी आंतरिक ‘वैदिक’ धर्माचा प्रारंभ झाला. जगतांची एक श्रेणी आहे आणि या विश्वामध्ये अस्तित्वाच्या पातळ्यांची एक चढती श्रेणी आहे अशी ‘वैदिक धर्मा’ची प्राथमिक कल्पना होती. त्या जगतांच्या श्रेणीसारखीच, त्याच्याशी संबंधित अशी, मनुष्याच्या प्रकृतीमध्येही चेतनेच्या प्रतलांची किंवा त्यांच्या परिमाणांची किंवा त्यांच्या स्तरांची एक चढती श्रेणी आहे, हे वैदिक धर्माने पाहिले. ‘सत्य’, ‘न्याय’ आणि ‘धर्म’ (Truth, Right and Law) यांची एक त्रयी प्रकृतीच्या या सर्व स्तरांना धारण करते, त्या स्तरांचे ती शासन करते; या त्रयीचे सारभूत स्वरूप एकच असले तरीदेखील ती विभिन्न पण सजातीय रूपं धारण करते.

उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाशाची एक मालिका असते. या मालिकेमध्ये बाह्य भौतिक प्रकाश असतो; मानसिक, प्राणिक आणि आंतरात्मिक चेतनेचे वाहन असणारा असा उच्चतर आणि आंतरिक प्रकाश असतो; तसेच आणखी एक आध्यात्मिक प्रदीपनाचा उच्चतम, आंतरतम असा प्रकाश असतो.

सूर्य म्हणजे सूर्यदेव हा भौतिक सूर्याचा स्वामी होता, परंतु त्याच वेळी वैदिक द्रष्ट्या-कवींसाठी मात्र तो मन उजळविणारे ज्ञान-प्रकाश किरण देणारा आहे, तसेच तो आध्यात्मिक प्रकाशाचा आत्मा, ऊर्जा आणि शरीरदेखील आहे. आणि या सर्व शक्तींमध्ये तो एकमेवाद्वितीय, अनंत ईश्वराचे एक ज्योतिर्मय रूप आहे.

सर्व वैदिक देवदेवतांना अशा प्रकारे बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अशी कार्ये असतात, त्यांना ज्ञात आणि गुप्त अशी ‘नामं’ असतात. या सर्वांची बाह्य व्यक्तित्वं पाहिली असता, त्या देवदेवता म्हणजे जडभौतिक प्रकृतीच्या शक्ती आहेत; आंतरिक अर्थाने पाहता, त्यांना काही आंतरात्मिक कार्य असते, त्यांना काही मनोवैज्ञानिक लक्षणांद्वारा ओळखले जाते. तसेच त्या देवदेवता या एका परमोच्च ‘सद्वस्तु’च्या, ‘एकम्’ सत्च्या, एकमेव अनंत ‘अस्तित्वा’च्या विविध शक्तीदेखील असतात. जाणण्यास अत्यंत कठीण असलेली ही परमश्रेष्ठ ‘सद्वस्तु’, वेदामध्ये बरेचदा ‘तत् सत्यम्’, ‘तद् एकम्’ या नावाने ओळखली जाते.

जे लोक या देवदेवतांना बाह्य भौतिक अर्थच देऊ पाहतात त्यांना वैदिक देवदेवता जी विविध रूपं धारण करतात त्यांचे जटिल स्वरूप समजत नाही आणि त्याविषयी त्यांचा पूर्णपणे गैरसमज होतो. वस्तुतः या देवदेवतांपैकी प्रत्येक देव हा त्या एकमेवाद्वितीय अस्तित्वाची स्वयमेव संपूर्ण आणि स्वतंत्र वैश्विक व्यक्तित्वं आहेत आणि त्यांच्या विविध शक्तींच्या संयोगाने त्या परिपूर्ण अशी वैश्विक शक्ती, ब्रह्मांडगत शक्ती, विश्वदेव्यम्, असे रूप धारण करतात. आणि पुन्हा, त्यांच्या या विशेष कार्याशिवाय, प्रत्येक देवदेवता ही दुसऱ्या देवदेवतांशी मिळून आणखी एक देव तयार होतो, ते देव स्वतःमध्येच वैश्विक दिव्यत्व धारण करून असतात, प्रत्येक देव म्हणजे इतर सर्व देव असतात.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 201-202]

भारत – एक दर्शन १०

‘भारतीयत्व’ ही केवळ एक भावना आहे, परंतु अजूनही त्या विषयीचे ज्ञान नाहीये. काही निश्चित अशी धारणा वा सखोल मर्मदृष्टी नाहीये. अजून आपण आपल्या स्वत:ला जाणून घ्यायचे आहे, आपण कोण होतो, कोण आहोत आणि कोण असणार आहोत; आपण भूतकाळात काय केले आहे आणि भविष्यामध्ये काय करण्याची क्षमता आपण बाळगतो, आपला इतिहास काय आहे, आपले कार्य काय आहे याविषयी आपण अजून अनभिज्ञ आहोत. ‘कर्मयोगिन्’ने हे ज्ञान प्रचलित करण्याचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. (दि. १५ जून १९०९ रोजी श्री. अरविंद घोष यांनी ‘कर्मयोगिन्’ हे साप्ताहिक सुरू केले. राष्ट्रीय धर्म, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावर भाष्य करण्याच्या उद्देशाने हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते.)

वेदान्त असो वा सूफिवाद असो, मंदिर असो वा मशीद असो, नानक, कबीर, रामदास, चैतन्य किंवा गुरु गोविंद असोत, ब्राह्मण, कायस्थ किंवा नामशूद्र असोत, कोणतीही राष्ट्रीय संपदा असो, मग ती अस्सल भारतीय असो किंवा आपण ती आपल्याप्रमाणे अनुकूल करून घेतलेली, आत्मसात केलेली असो, ती ज्ञात करून घेणे आणि तिला तिचे योग्य स्थान देणे, तिची योग्यता ओळखणे यासाठी ‘कर्मयोगिन्’ प्रयत्नशील राहील.

राष्ट्रीय जीवन समृद्ध करण्यासाठी आणि त्याचे भविष्य घडविण्यासाठी या राष्ट्रीय संपदेचा कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणे हे आमचे दुसरे कार्य आहे. त्यांचे भूतकाळाच्या तुलनेत यथार्थ मूल्यमापन करणे सोपे आहे पण भविष्यात त्यांना त्यांचे योग्य स्थान देऊ करणे हे अधिक कठीण आहे.

बाहेरचे जग आणि त्याचे आपल्याबरोबर असलेले नाते आणि आपण त्यांच्याबरोबर कसा व्यवहार ठेवावा हे जाणणे ही तिसरी गोष्ट आहे. आत्ताच्या घडीला आम्हाला हाच प्रश्न अधिक अवघड आणि प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो परंतु त्यावरील उपाय हा इतर सर्वांच्या उपायांवर अवलंबून आहे.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 20-21]

भारत – एक दर्शन ०९

(भारताची आध्यात्मिकता आणि भारताची बहुप्रसवा सर्जनशीलता या दोन गोष्टीमध्येच ‘भारताचा आत्मा’ किंवा ‘भारतीयत्व’ आहे असे नाही. तर अजून तिसरी एक गोष्ट आहे. त्यासंबंधी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

‘प्रखर बुद्धिमत्ता’ ही प्राचीन भारतीय स्वभावाची ताकद होती. ती एकाच वेळी कठोर आणि समृद्ध, मजबूत आणि सूक्ष्म, बलशाली आणि नाजूक होती तसेच ती तत्त्वतः विशाल आणि तपशीलाने विलक्षण होती. सुव्यवस्था आणि योजनापूर्वक मांडणी ही भारतीय स्वभावाची मुख्य प्रवृत्ती होती, परंतु ती सुव्यवस्था आंतरिक धर्माच्या आणि वस्तुंच्या सत्याच्या शोधावर आधारित होती आणि विवेकपूर्ण आचरणाच्या शक्यतेवर कायमच तिची दृष्टी होती.

भारत हा प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘शास्त्रा’ची भूमी राहिलेला आहे. त्याने प्रत्येक मानवी किंवा वैश्विक क्रियाव्यापारांच्या आंतरिक सत्याचा, त्याच्या नियमाचा म्हणजे धर्माचा शोध घेतला आहे. शोध लागल्यानंतर, त्याला व्यापक रूप देण्यासाठी, तसेच योजनापूर्वक मांडणीचा तपशीलवार नियम वास्तवामध्ये उपयोगात आणण्यासाठी आणि तो जीवनाचाच नियम व्हावा यासाठी भारताने पुष्कळ परिश्रम घेतले.

आत्म्याच्या शोधामुळे भारताचा पहिला कालखंड प्रकाशमय होता, दुसऱ्या कालखंडात त्याने धर्माचा शोध पूर्ण केला; तिसरा कालखंड हा प्रारंभिक, साध्यासरळ, सूत्रबद्ध शास्त्राच्या तपशीलवार स्पष्टीकरणाचा होता. परंतु यातली कोणतीच गोष्ट अन्य दोन गोष्टींना वगळणारी नव्हती, तर हे तीनही घटक कायमच अस्तित्वात होते.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 08-09]

भारत – एक दर्शन ०८

भारताला मानवाच्या पलीकडे असलेल्या अगणित देवदेवता दिसल्या, या देवदेवतांच्या अतीत असणारा ‘ईश्वर’ दिसला आणि त्या ‘ईश्वरा’च्या अतीत मानवाची स्वतःची अनिर्वचनीय अशी अनंतता दिसली. भारताला असे दिसून आले की, आपल्या जीवनाच्या पलीकडे जीवनाच्या अनेक श्रेणी आहेत, तसेच आपल्या सद्यकालीन मनाच्या अतीत असलेल्या मनाच्या अनेक श्रेणी त्याला दिसल्या आणि या साऱ्याच्या अतीत भारताला चैतन्याचे वैभव दिसले. मग त्या अंतर्ज्ञानाच्या शांत धडाडीने, ज्या धडाडीला भीती माहीत नाही, आणि आध्यात्मिक असो, बौद्धिक असो, नैतिक असो किंवा प्राणिक धैर्य असो, त्या धैर्याच्या कृतीपासून जी धडाडी कच खात नाही किंवा जिच्यामध्ये न्यूनगंडाची कोणतीही भावना नसते, अशा धडाडीने भारताने उद्घोषित केले की, मानवाने जर त्याच्या इच्छाशक्तीला आणि ज्ञानाला वळण लावले तर उपरोक्त गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट अप्राप्य नाही. मानव मनाच्या या श्रेणींवर विजय प्राप्त करून घेऊ शकतो, तो स्वतः आत्मा बनू शकतो, तो स्वतः देव बनू शकतो, तो स्वतः ‘ईश्वरा’शी एकात्म पावू शकतो, तो स्वतःच अनिर्वचनीय ‘ब्रह्म’ बनू शकतो.

आणि मग भारतीय मानसिकतेचे वैशिष्ट्य असलेल्या तर्कशुद्ध व्यावहारिकतेने आणि वैज्ञानिक दृष्टीने आणि सुरचित पद्धतीने, भारताने त्वरेने त्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यामुळे, युगानुयुगांपासून चालत आलेल्या या अंतर्दृष्टीमुळे आणि अभ्यासामुळे, भारताची आध्यात्मिकता, त्याची शक्तिशाली आंतरात्मिक प्रवृत्ती, अनंताशी दोन हात करून, त्या अनंताला प्राप्त करून घेण्याची उत्कट आस, त्याची अतूट अशी धार्मिक भावना, त्याचा आदर्शवाद, त्याचा योगमार्ग, कला आणि तत्त्वज्ञानाकडे असलेला सातत्यपूर्ण कल या गोष्टी भारताच्या रोमारोमांत ठासून भरल्या आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 07]

भारत – एक दर्शन ०७

ज्याप्रमाणे कोणताही आधार नसताना, स्वप्नवत जादुई ढगांमधून गिरीशिखरं उदयाला येऊ शकत नाहीत त्याप्रमाणेच ‘आध्यात्मिकता’ ही पृथ्वीवर काहीही नसताना, एखाद्या पोकळीमध्ये बहरू शकत नाही. आपण जेव्हा भारताच्या गतकाळाकडे पाहतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिकतेच्या खालोखाल आपल्या नजरेत भरते ती त्याची विस्मयकारक प्राणशक्ती, त्याची जीवनाची अक्षय शक्ती, जीवनाचा आनंद, आणि अकल्पनीय अशी बहुप्रसवा सर्जनशीलता!

किमान तीन हजार वर्षांपासून – खरंतर त्याही आधीपासून – प्रजासत्ताक आणि राज्ये व साम्राज्ये, तत्त्वज्ञाने व ब्रह्मांडशास्त्रं आणि शास्त्रं व पंथ आणि कला व काव्य आणि सर्व प्रकारची प्राचीन स्मारकं, राजमहाल व मंदिरे आणि सार्वजनिक कार्ये, समाज आणि संस्था आणि धर्माज्ञा, कायदे आणि विधिविधाने, प्रथा-परंपरा, भौतिक शास्त्रे, आंतरात्मिक शास्त्रे, योगपद्धती, राजकारण आणि प्रशासनव्यवस्था, लौकिक कला, आध्यात्मिक कला, व्यापारउदीम, उद्योग, कलाकौशल्ये – ही यादी न संपणारी आहे आणि या प्रत्येक मुद्यामध्येसुद्धा विविध उपक्रमांची रेलचेल आहे. या साऱ्याची भारत मुबलकतेने आणि सातत्याने, उदारतेने, अक्षय बहुआयामी निर्मिती करत आला आहे.

भारत निर्माण करत राहतो, करतच राहतो, तो कधीच संतुष्ट होत नाही, तो कधीच थकत नाही, या निर्मितीला जणू अंतच नाही. त्याला विश्रांती घेण्यासाठी थोडीशी उसंत, सुस्त पडून राहण्यासाठी थोडा वेळ किंवा लोळत पडण्यासाठी माळरान यांची क्वचितच गरज भासते असे दिसते.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 07-08]

भारत – एक दर्शन ०६

(युरोपियन लोकांची देशाबद्दलची संकल्पना कशी संकुचित आहे, हे सांगून झाल्यावर, भारतीय मनाची देशाकडे पाहण्याची दृष्टी किती सखोल आहे, हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह असतो, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल.

माणसांच्या समूहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापून जातो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा ‘प्राणमय कोश’, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह असतो. हे दोन्ही देह स्थूल आहेत, मातेचे ते भौतिक आविष्करण असते.

स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो. विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, कृतार्थता, सभ्यता आणि संस्कृती या साऱ्यासाऱ्यांतून राष्ट्राचे सूक्ष्म शरीर आकाराला येते. शारीर-दृष्टीला दिसणाऱ्या बाह्य अस्तित्वाप्रमाणेच सूक्ष्म शरीर देखील मातेच्या जीवनाचाच एक भाग असतो.

राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यातून उदयाला येतो, युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, ती त्या राष्ट्राला इतरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण बनवते.

मातेचे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक ‘उगमस्रोत’ असतो, जो अमर्त्य, अचल असा असतो; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक ‘नारायणा’चे, ‘अनेकां’मध्ये वसणाऱ्या ‘एका’चे – ज्याची आपण सर्वजण बालके आहोत – त्या ‘एका’चे ते आविष्करण असते.

– श्रीअरविंद [CWSA 06-07 : 1115-1116]

भारत – एक दर्शन ०४

‘आध्यात्मिकता’ ही भारतीय मनाची गुरूकिल्ली आहे; भारतीय मनामध्ये अनंततेची जाणीव उपजतच आहे.

जीवनाच्या बाह्यवर्ती गोष्टींची जी शक्ती असते केवळ त्यामध्ये जीवन परिपूर्णत्वाने जगता येत नाही, जीवन योग्य प्रकारे समजावून घ्यायचे तर ते केवळ त्या प्रकाशामध्ये समजावून घेता येत नाही, याची जाण भारताला प्रारंभापासूनच होती. आणि ही अंतर्दृष्टी भारताने अगदी तर्कबुद्धीच्या युगामध्ये आणि वाढत्या अज्ञानयुगामध्येसुद्धा कधीही गमावलेली नाही. भारताला जडभौतिक नियम आणि शक्तींच्या माहात्म्याची जाण होती; भौतिक शास्त्रांच्या थोरवीवर त्याची बारकाईने नजर होती; सामान्य जीवनाच्या कलेचे व्यवस्थापन कसे करायचे हे भारताला ज्ञात होते.

परंतु भारताला हेही समजले की, जोपर्यंत अति-भौतिकाशी (supra-physical) योग्य प्रकारे संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भौतिकाला आपली सार्थकता प्राप्त होत नाही; ब्रह्मांडाच्या जटिलतेचे स्पष्टीकरण मानवाच्या उथळ दृष्टीने पाहून किंवा त्याच्या सद्यकालीन परिभाषेमध्ये करता येत नाही, हे भारताच्या लक्षात आले. त्याच्या हे लक्षात आले की, मानवाला सहसा ज्याची जाणीव नसते अशा शक्ती मानवाच्या अंतरंगामध्येच आहेत, त्याच्या पाठीशी आहेत; मानवाला स्वतःच्या अगदी अल्प भागाचीच जाणीव आहे हे त्याला ज्ञात होते. अदृष्याने दृश्याला नेहमीच परिवेष्टित (surrounds) केलेले असते; ऐंद्रिय जाणिवेच्या सभोवताली अतिंद्रिय असते, एवढेच काय पण सांताच्या सभोवती अनंत नेहमीच व्यापून असते, याची जाण भारताला होती.

मनुष्यामध्ये स्वतःच्या पलीकडे विस्तारीत होण्याची शक्ती आहे, तो स्वतः आत्ता जसा आहे त्याहूनही अधिक पूर्ण आणि अधिक सखोल बनण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हेही भारताला ज्ञात होते – हे सत्य युरोपला आत्ता नुकते कुठे उमगू लागले आहे आणि त्यांच्या सामान्य बुद्धिमतेला ते आत्तासुद्धा खूपच महान असे वाटत आहे.

 

– श्रीअरविंद [CWSA 20 : 06-07]

भारत – एक दर्शन ०३

जीवनविषयक भारतीय संकल्पना ही युरोपीयन संकल्पनांपेक्षा अधिक सखोल अशा केंद्रातून निघते आणि ती युरोपीयन संकल्पनांपेक्षा तुलनेने अधिक आंतरिक मार्गांवरून वाटचाल करत, एका अगदी वेगळ्या उद्दिष्टाप्रत जाऊन पोहोचते. भारतीय विचारदृष्टीचे एक वैशिष्ट्य हे आहे की, ती रूपांच्या माध्यमातून वेध घेते, इतकेच काय पण शक्तीच्या माध्यमातूनदेखील वेध घेते आणि सर्वत्र, प्रत्येक गोष्टीमध्ये ‘आत्म्या’चा शोध घेते.

भारतीयांच्या जीवनविषयक इच्छेचे हे वैशिष्ट्य आहे की, तिला जर आत्म्याचे सत्य गवसले नाही आणि त्या सत्यानुसार ती जगली नाही तर तिला कृतार्थ झाल्यासारखे वाटत नाही, स्वतःला परिपूर्णतेचा स्पर्श झाल्यासारखे तिला वाटत नाही, अधल्यामधल्या कोणत्याही स्थितीमध्ये कायमचे समाधान मानून राहणे तिला न्याय्य वाटत नाही. जगाविषयीची, ‘प्रकृती’विषयीची आणि अस्तित्वाविषयीची भारतीय संकल्पना भौतिक नसून, ती मानसिक आणि आध्यात्मिक आहे. जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती याहून ‘चैतन्य’, आत्मा, चेतना या गोष्टी केवळ महत्तर आहेत असे नाही तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि त्यातूनच जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती या निम्नतर गोष्टींचा उदय होतो. सर्व प्रकारचे सामर्थ्य म्हणजे गुप्त आत्म्याची शक्ती असते किंवा त्याचे माध्यम असते; जगाला धारण करणारी ‘शक्ती’ ही सचेत ‘संकल्पशक्ती’ आहे आणि ‘प्रकृती’ ही तिच्या कार्यकारी शक्तीची यंत्रणा आहे. जडभौतिक द्रव्य हे त्यामध्ये लपलेल्या चेतनेचे शरीर किंवा क्षेत्र आहे, भौतिक विश्व हे ‘चैतन्या’चे रूप आणि चलनवलन आहे. मनुष्य म्हणजे जडद्रव्यापासून जन्माला आलेला प्राण आणि मन नाही आणि तो भौतिक प्रकृतीच्या कायमच आधीन राहणारा आहे, असेही नाही तर, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करून घेणारा असा तो ‘आत्मा’ आहे. भारतीय मनुष्य अस्तित्वाच्या या संकल्पनेवर ज्ञानयुक्त श्रद्धा ठेवतो, त्या संकल्पनेनुसार जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या उच्चकोटीच्या परिश्रमांचे शास्त्र हेच आहे आणि साधनाही हीच असते. अंतत: प्राण आणि शरीराला जखडलेल्या मनाचे कवच फोडून बाहेर यायचे, आणि एका महत्तर आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करायचा ही त्याची आस असते; भारतीय संस्कृतीचा अगदी गाभाभूत अर्थ हाच आहे. ज्या भारतीय आध्यात्मिकतेविषयी बरीच चर्चा केली जाते ती आध्यात्मिकता याच संकल्पनेच्या आधारे घडलेली आहे.

(टीप – श्रीअरविंद येथे आध्यात्मिकतेविषयीची प्राचीन संकल्पना स्पष्ट करत आहेत, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांची आध्यात्मिकतेविषयीची संकल्पना याहून अधिक व्यापक आहे, हे आपण जाणतोच.)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 154-155]