भारताचे पुनरुत्थान – १६

‘कर्मयोगिन्’या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १९ जून १९०९

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा आहे आणि त्याचेच आम्ही आग्रहाने प्रतिपादन करतो आणि त्याचेच अनुसरण करतो.

मानवतेला आमचे असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वातून वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक सखोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्या, आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील. निसर्गाच्या शक्तींना आरामदायक सुखसोयींच्या दिमतीस जुंपून या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवत, मनुष्याचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करून आणि बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच त्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान होणे गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. त्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता असल्यामुळेच, भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करत आहे.”

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26-27)

भारताचे पुनरुत्थान – १५

(इ. स. १९१८ साली ‘राष्ट्रीय शिक्षण सप्ताहा’निमित्त श्री. अरविंद घोष यांनी दिलेला संदेश)

हा असा काळ आहे की, जेव्हा अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याची पावले कोणत्या दिशेने वळण घेणार आहेत हे येणाऱ्या शतकासाठी म्हणून दमदारपणाने निर्धारित केले जात आहे. आणि हे निर्धारण कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे नाही तर, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक व बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत असे हे शतक आहे आणि हे एक महान निर्णायक वळण आहे.

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, त्या कर्मांची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत. आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या देशवासीयांच्या अंतरात्म्याला देण्यात आलेली ही एक संधी असणार आहे; देशवासीयांना इथे एक (जाणीवपूर्वक) निवड करावी लागणार आहे आणि त्याबरोबरच, ती त्यांच्यासाठी एक कसोटीदेखील असणार आहे. ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडेल, अशी आपण सदिच्छा बाळगू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 413)

भारताचे पुनरुत्थान – १४

उत्तरार्ध

इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ‘ईश्वरी इच्छा’ असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थ, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला आवाहन करू शकता आणि तुम्ही तसे केल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे ‘श्रद्धा’ या शब्दाचा अर्थ वास्तविक ‘ईश्वरी इच्छे’सहित परिपूर्ण श्रद्धा असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला जाण असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असल्याने, ईश्वरी इच्छा काय आहे हे त्या दृष्टीला स्पष्ट दिसते आणि तिला हेसुद्धा ज्ञात असते की, जे घडणार आहे ते ईश्वराच्या इच्छेनुसारच घडणार आहे. श्रद्धा अंध नसते; उलट आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणल्यामुळे श्रद्धा सर्वज्ञ बनू शकते.

इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह तात्पुरत्या किंवा स्थायी स्वरूपात ती त्या सर्वांना प्रदान करू शकते. एकांतवासात राहणाऱ्या एखाद्या माणसाचा विचार हा, निःस्वार्थ व निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यामुळे, राष्ट्राचा विचार बनू शकतो. एखाद्या एकट्या वीराची इच्छा ही लाखो भित्र्या लोकांच्या हृदयांमध्येदेखील धैर्य निर्माण करू शकते. ही साधना आपण सिद्धीस नेलीच पाहिजे. आपल्या मुक्तीची ही पूर्वअट आहे.

आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित सदोष व अपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हलविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते कार्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वराच्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ या आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

भारताचे पुनरुत्थान – १३

पूर्वार्ध

लेखनकाळ : इ.स.१९१०
खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परममोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा अभाव आपल्याकडे असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, त्यांचा अवलंब आपण आपल्या कार्यफलाच्या आसक्तीला चिकटून राहून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईने जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, (स्वतःला बंधमुक्त करण्यासारख्या कार्यामध्ये) न भूतो न भविष्यति अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. ही साधनेची गरज असते.

ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे; ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वव्यापी’, ‘सर्वज्ञ’ शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकसमानच आहे. आपण त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला जर त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सुकर होतो.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

भारताचे पुनरुत्थान – १२

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८

मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी समता, मानवी बंधुता यांच्या खऱ्या उगमस्रोताकडे वळविणे हे भारताचे जीवितकार्य आहे. मनुष्य जेव्हा आत्मस्वातंत्र्य अनुभवतो तेव्हा इतर सर्व स्वातंत्र्य त्याच्या सेवेला हजर असतात; कारण ईश्वर हा ‘मुक्त’ असतो आणि तो कशानेही बांधला जाऊ शकत नाही. मनुष्य जेव्हा भ्रांतीपासून मुक्त झालेला असतो तेव्हा त्याला या जगामध्ये अंतर्भूत असलेल्या दिव्य समत्वाचा बोध होतो. प्रेम आणि न्याय यांच्या माध्यमातून हे दिव्य समत्व स्वतःची परिपूर्ती करत असते. व्यक्तीला जेव्हा असा बोध होतो तेव्हा तो बोधच स्वयमेव शासनाच्या व समाजाच्या कायद्यामध्ये रूपांतरित होतो.

एखाद्या व्यक्तीला जेव्हा या दिव्य समत्वाचा बोध होतो तेव्हा तो अखिल जगाचा बंधू होतो आणि त्याला कोणत्याही पदावर विराजमान केले तरी तो प्रेमाच्या व न्यायाच्या कायद्याने, बंधुत्वाच्या नात्याने, सर्व मानवांची सेवा करतो. जेव्हा हा बोध धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक अनुमानांचा तसेच राजकीय आकांक्षांचा आधार बनेल तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजव्यवस्थेच्या रचनेमध्ये त्यांच्या त्यांच्या योग्य जागी विराजमान होतील आणि मग पुन्हा ‘सत्ययुग’ अवतरेल.

हे लोकशाहीचे आशियाई आकलन आहे आणि ते जगाला ज्ञात करून देण्यापूर्वी भारताने प्रथम लोकशाहीचा स्वत:साठी म्हणून पुनर्शोध घेतला पाहिजे. मनुष्याने आत्म्यामध्ये मुक्त असावे आणि सक्तीने नव्हे तर, प्रेमाने सेवाकार्यास बांधील असावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. आत्म्याप्रमाणे समान असावे आणि इतरांच्या स्वार्थी हितसंबंधांनुसार नव्हे तर, समाजाची सेवा करण्याची त्याची जी क्षमता असेल त्यानुसार त्याने स्वत:चे समाजातील स्थान निर्धारित करावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. त्याच्या बंधुभगिनींशी त्याचे नाते सुसंवादी असावे, दोघांमध्ये शोषक व शोषिताचे किंवा भक्ष्य व भक्ष्यकाचे नाते नसावे, तसेच दास्यत्वाच्या बेड्यांनी नव्हे तर परस्परांच्या प्रेमाने व सेवाभावामुळे एकमेकांशी संबंधित असावे; हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे.

लोकशाही ही माणसाच्या हक्कांवर आधारलेली असते असे म्हटले जाते; त्याला प्रत्युत्तर देताना असे म्हटले जाते की, ती हक्कांपेक्षा मनुष्याच्या कर्तव्यांवर आधारली गेली पाहिजे; परंतु हक्क असोत वा कर्तव्य या दोन्ही संकल्पनाच मुळात युरोपियन आहेत. जेथे स्वार्थीपणा हाच कृतीचा मूलाधार असतो अशा जगाच्या दृष्टिकोनातून, हक्क आणि कर्तव्य हे द्वंद्व (कृत्रिमरित्या) तयार करण्यात आलेले असते. मात्र धर्म ही अशी एक भारतीय संकल्पना आहे की, ज्या संकल्पनेमध्ये हक्क आणि कर्तव्य या दोहोंमधील कृत्रिम द्वंद्व मावळून जाते आणि त्यांच्यामधील सखोल व शाश्वत ऐक्य त्यांना पुन्हा प्राप्त होते. धर्म हाच लोकशाहीचा आधार आहे हे सत्य आशियाने ओळखले पाहिजे. कारण युरोपचा आत्मा आणि आशियाचा आत्मा या दोहोंमधील फरक नेमका येथेच आहे. आशियाई उत्क्रांती धर्माच्या माध्यमातून तिच्या परिपूर्णतेला पोहोचते, हे तिचे रहस्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 931-932)

भारताचे पुनरुत्थान – ११

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. ०५ मार्च १९०८

भारताला आता जर का एका महान सामाजिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती याच कारणासाठी की, भारताचा प्राचीन व अविचल आत्मा ज्यामधून अभिव्यक्त होऊ शकत नाही अशा रूपांशी आपण अजूनही जखडून राहिलो तर, त्यामुळे स्वराज्याचा आदर्श सिद्धीस जाऊ शकणार नाही. भारतमातेने भूतकाळात पांघरलेली जीर्ण वस्त्रं बदलली पाहिजेत म्हणजे तिचे सौंदर्य पुन्हा एकदा उजळून निघेल. तिने तिच्या देहरूपामध्येदेखील बदल केला पाहिजे म्हणजे त्यामधून तिचा आत्मा नव्याने अभिव्यक्त होऊ शकेल. असा बदल केला तर ती युरोपाची नक्कल होईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. कारण तिची व्यक्तिविशिष्टता (individuality) इतकी बलशाली आहे की, तिच्याबाबतीत अशा प्रकारचे अवमूल्यन होऊच शकणार नाही. तसेच तिचा आत्मा एवढा स्थिरचित्त आणि स्वयंपूर्ण आहे की, ती अशा तऱ्हेची शरणागती पत्करणेही शक्य नाही.

भारतामध्ये पुन्हा आर्थिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती एवढ्यासाठीच की, अन्यथा वाणिज्य-क्षेत्रातील व उद्योग-क्षेत्रातील स्वराज्याला तिच्या जुन्या औद्योगिक जीवनाच्या सुरेख पण अरूंद इमारतीमध्ये वाव मिळणार नाही. स्वतंत्र आणि परिपूर्ण राष्ट्रीय जीवनाच्या औद्योगिक उर्जांना बलशाली क्षेत्राची आणि विशाल जलप्रवाहांची आवश्यकता असते. युरोपने आत्ता ज्याप्रमाणे मानवतेच्या उदात्त भावभावनांची पायमल्ली चालविली आहे, तशाच प्रकारच्या रोगग्रस्त आणि विस्कळीत समाजस्थितीमध्ये आर्थिक क्रांती आपल्याला नेऊन ठेवेल अशी भीती बाळगण्याचेदेखील कारण नाही. जी शिकवण म्हणजे भारतमातेचे जणू जीवनच आहे, जी तिच्या अमरत्वाचे रहस्य आहे अशी शिकवण ही – पाश्चात्त्य देशांमध्ये ‘उद्योगधंद्या’च्या नावाखाली संघटित स्वार्थीपणा, क्रूरपणा आणि लोभ, हाव यांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे – त्याचीच प्रतिकृती ठरण्याइतपत कदापिही विस्मरणात जाऊ शकणार नाही. भारतमाता स्वत:ची परिस्थिती स्वतः निर्माण करेल, समाजामध्ये व्यवस्थेचे रहस्य शोधण्यासाठी समाजवाद जो व्यर्थ आटापिटा करत असतो ते रहस्य भारतमाता शोधून काढेल आणि जग व आत्मा यांच्यामध्ये सुसंवाद कसा प्रस्थापित करायचा असतो हेदेखील ती पृथ्वीवासियांना पुन्हा एकदा शिकवेल.

सध्या जे काही घडत आहे त्यामध्ये एक महान आणि महत्त्वाचे रूपांतर घडून येत आहे, आणि हे रूपांतर केवळ आपल्यासाठीच नव्हे तर अखिल जगासाठी महत्त्वाचे असणार आहे, याचा बोध आपल्याला होऊ शकला आणि त्यामागील सत्य आपल्याला प्रतीत झाले तर येणाऱ्या काळात, कोणतीही भीती वा शंका न बाळगता आपण स्वतःला त्यात झोकून देऊ.

भारत हा राष्ट्रांचा गुरू आहे. मानवी जिवाला गंभीर आजारांमधून बाहेर काढणारा जणू धन्वंतरी म्हणजे भारत आहे. जगत्-जीवनाची पुन्हा एकवार नवरचना करावी आणि मनुष्याला त्याच्या आत्म्याची शांती पुन्हा एकदा प्राप्त करून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 905-906)

भारताचे पुनरुत्थान – १०

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८

मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे प्रत्यंतर येणे) म्हणजे संपूर्ण साक्षात्कार आणि तोच समग्र धर्म आहे. जेव्हा भारताला (आद्य) शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्याकडून मिळालेल्या शिकवणुकीचे स्मरण होईल; श्रीरामकृष्ण (परमहंस) कोणते सत्य प्रकट करण्यासाठी आले होते याची जेव्हा भारताला जाणीव होईल तेव्हा भारताचा अभ्युदय होईल. वेदान्त हेच भारताचे जीवन आहे.

जो हिंदू आहे तो कधीच आपण (मानव) म्हणजे केवळ बौद्धिक जीव आहोत, असा विचार करणार नाही. ज्याने ईश्वर कधीच पाहिलेला नाही त्याने खुशाल बुद्धीचे गुणगान करावे, असे हिंदुधर्म मानतो. केवळ ईश्वराच्याच महानतेचे आणि तेजस्वितेचे गुणगान करावे असा आदेश त्या ईश्वरानेच हिंदुधर्माला दिला आहे आणि हिंदुधर्म हजारो वर्षे त्याचेच गुणगान करत आला आहे.

पहिल्यांदा जेव्हा कधी आपण युरोपियन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या (science) प्रकाशाने स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, जग उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची गोळाबेरीज म्हणजे अपराविद्या. पण त्याहून अधिक उच्च अशी एक विद्या आहे, महान असे एक ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो, तेव्हा आपणच कर्ते आहोत अशा भ्रमात आपण वावरत असतो आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम व सर्वशक्तिमान आहे असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा भ्रामक आणि मायिक दृष्टिकोन असतो.

एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरंगात वसलेल्या ईश्वराची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर बुद्धी हीच सर्वोच्च असते, यावर तो पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. (बुद्धीपेक्षा श्रेष्ठ) एक उच्चतर आवाज असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. हृदयामध्ये ईश्वराचा अधिवास असतो. ईश्वर मेंदुद्वारे कार्य करतो, पण मेंदू हे त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते, ती गोष्ट हृदयाला आधीच ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदुच्या पलीकडे जाऊन, हृदयापर्यंत पोहोचू शकतो तोच शाश्वताची (Eternal) वाणी ऐकू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 891-892)

भारताचे पुनरुत्थान – ०९

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २१ फेब्रुवारी १९०८

जगाचे भवितव्य हे भारतावर अवलंबून आहे. जेव्हा कधी भारत त्याच्या निद्रेमधून जागा होतो तेव्हा तो झळाळणारे काही अद्भुत प्रकाशकिरण जगाला प्रदान करतो आणि ते प्रकाशकिरण अनेकानेक राष्ट्रांना प्रकाशित करण्यासाठी पुरेसे असतात. भारताला एखादा विचार करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो मात्र तोच विचार करण्यासाठी इतर राष्ट्रांना शतकानुशतके व्यतीत करावी लागतात.

ईश्वराने भारताच्या हाती प्राचीन वेदविद्येचा ग्रंथ दिला आणि तो ग्रंथ उघडण्याची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तो ग्रंथ त्याच्या हृदयामध्ये कुलूपबंद करून ठेवण्याचा आदेशही त्याला दिला. कधीकधी त्यातील एखादे प्रकरण तर कधी एखादे पान उघड करून दिले जात असे, तर कधीकधी अगदी एखादे वाक्यसुद्धा! आणि अशी वाक्यं ही पुढे युगानुयुगांसाठी प्रेरणा बनून राहिली आहेत आणि त्यांनी मानवतेचे शेकडो वर्षे भरणपोषण केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 890)

भारताचे पुनरुत्थान – ०८

(श्री. अरविंद घोष यांनी ३१ जानेवारी १९०८ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणातील अंशभाग)

राष्ट्राचा आत्मसन्मान हाच आपला धर्म आणि आत्मयज्ञ हीच आपली एकमेव कृती किंवा हेच आपले एकमेव कर्तव्य! आपल्यामधील दैवी गुण प्रकट व्हावेत यासाठी आपण पुरेसा वाव दिला पाहिजे. क्षुल्लक भावनांचा त्याग केला पाहिजे. मरणाचा प्रसंग आला तरी घाबरता कामा नये.

मागे हटू नका; राष्ट्रासाठी यातना सहन करा. ईश्वर हाच तुमचा आधार आहे. तुम्ही जर असे केलेत तर भारताला त्वरित त्याचे गतवैभव आणि कीर्ती पुन्हा प्राप्त होईल. जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून भारत उभा राहील. तो इतर राष्ट्रांना शिक्षित करेल; त्याच्यामधून खऱ्या ज्ञानाचे तेज ओसंडून वाहील आणि भारत वेदान्ताची तत्त्वे रुजवेल. आपले राष्ट्र हे मानववंशाच्या आणि संपूर्ण जगाच्या हितासाठी पुढे सरसावेल. संपूर्ण जग हे त्याच्याद्वारे संचालित केले जाईल. पण केव्हा? जेव्हा आपण सर्वजण आपल्या राष्ट्राचे ऋण फेडण्यास तयार होऊ तेव्हाच हे घडून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 860)

भारताचे पुनरुत्थान – ०७

(श्री. अरविंद घोष यांनी मुंबईमध्ये दि. १९ जानेवारी १९०८ रोजी केलेल्या भाषणातील हा मजकूर…)

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २३ फेब्रुवारी १९०८

सध्या भारतामध्ये स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणविणारा एक पंथ आहे, हा पंथ तुमच्याकडे (महाराष्ट्रामध्ये) बंगालमधून आलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या पंथाचा स्वीकार केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेऊ लागलात तेव्हाच तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे. तुमच्या लक्षात आले का? याचा अर्थ काय होतो हे तुमच्या ध्यानात आले का? तुम्ही कशाचा स्वीकार केला आहे हे तुम्हाला समजले का? का तुम्ही आपण कोणीतरी अधिक श्रेष्ठ आहोत या बौद्धिक ठाम विश्वासाच्या अभिमानापोटी त्या पंथाचा स्वीकार केला आहे?

तुम्ही स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवता. पण राष्ट्रीय विचारसरणी (Nationalism) म्हणजे काय? तर, ती म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम नाही. राष्ट्रीय विचारसरणी म्हणजे ईश्वराद्वारे प्रदान करण्यात आलेला एक धर्म आहे. हा असा एक पंथ आहे की ज्यामध्ये तुम्हाला जगावेच लागेल. केवळ एक प्रकारच्या बौद्धिक अभिमानापोटी जर कोणी स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत असेल, आपण अधिक महान देशभक्त आहोत, जे स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत नाहीत त्यांच्यापेक्षा आपण कोणीतरी उच्चतर आहोत असे जर एखादा समजत असेल तर त्याने स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणण्याचे धाडस करू नये हे बरे!

तुम्ही जर राष्ट्रप्रेमी बनू इच्छित असाल, तुम्ही जर राष्ट्रीय विचारसरणीच्या धर्माला संमती देऊ पाहत असाल तर तुम्ही ती गोष्ट धार्मिक वृत्तीनेच केली पाहिजे. तुम्ही तुमच्या स्व-देशाच्या मुक्तीसाठी कार्य करणारे ‘ईश्वरा’चे साधन आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही ‘ईश्वरा’चे साधन म्हणूनच जीवन जगले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 818-819)