पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०१
प्रास्ताविक
“जीवन आणि त्याच्या अग्निपरीक्षा यांना शांत, अविचल मनाने, धीराने आणि ईश्वरी शक्तीवरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता येणे हा पूर्णयोगाच्या साधनेचा पहिला धडा आहे,” हा विचार आपण काल जाणून घेतला. पूर्णयोगाची साधना करायची असेल तर, राग, लोभादी विकारांपासून, तसेच निराशा, मिथ्यत्व इत्यादी गोष्टींपासून साधकाने स्वतःची सुटका करून घेणे अपेक्षित असते.
पूर्णयोगाच्या साधनेमध्ये एका बाजूने उपरोक्त गोष्टींना नकार देणे अपेक्षित असते, तर दुसऱ्या बाजूने काही गुणांचा अंगीकार करणे तितकेच आवश्यक असते. अभीप्सा, श्रद्धा, सहनशीलता, प्रयत्नसातत्य किंवा चिकाटी, प्रामाणिकपणा, व्यापकता, समत्व, खुलेपणा, समर्पण यांसारख्या गोष्टी म्हणजे पूर्णयोगातील परवलीचे शब्द आहेत. आपल्याला हे सर्वच शब्द ऐकून, वाचून माहीत असतात खरे; पण त्या शब्दांचा आवाका किती मोठा आहे, त्या एकेका शब्दामध्ये केवढा गहन अर्थ सामावलेला आहे, याची आपल्याला क्वचितच जाण असते.
श्रीअरविंदांनी साधकांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रोत्तरांच्या माध्यमातून त्या शब्दांचा, किंबहुना पूर्णयोगातील या संज्ञांचा गर्भितार्थ अलगदपणे आपल्या हाती येतो. तो अर्थ आपल्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यासाठी ‘अभीप्सा मासिका’तर्फे उद्यापासून एक नवीन मालिका सुरू करत आहोत. ‘पूर्णयोगाचे अधिष्ठान’ असणारे हे सारे गुण कमीअधिक प्रमाणात अंगीकारण्याचा प्रयत्न एक साधक म्हणून आपण करू शकलो तर त्या आधारावर पूर्णयोगाची भलीमोठी इमारत उभारता येणे शक्य होईल.
वाचक नेहमीप्रमाणेच ‘पूर्णयोगाचे अधिष्ठान’ या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.
धन्यवाद!
संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक