नैराश्यापासून सुटका – १०

(साधनाभ्यासामध्ये प्राण सहकार्य करत नाहीये, हे असे का होत असावे अशी विचारणा एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी केली आहे. तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर…)

तुमचा प्राण (vital) इच्छावासनांच्या कचाट्यात सापडला होता त्यामुळे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे नियंत्रित न झाल्यामुळे, तो आता अशा रितीने स्वत:च्याच तंत्राने वागू लागला आहे. जेव्हाजेव्हा त्याच्या इच्छावासना पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हातेव्हा तो असाच आक्रस्ताळेपणा करत असतो. मानसिक इच्छाशक्तीकडून जेव्हा प्राणावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि त्याला त्याच्या जागी ठेवले जात नाही तेव्हा, दिसून येणारी मनुष्याच्या प्राणाची ही सार्वत्रिक प्रतिक्रिया असते.
*
पुढील दोन प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्राण सहकार्य करत नाही.
१) जेव्हा त्याच्या सामान्य अहंनिष्ठ कृतींना किंवा त्या कृतीमागील हेतुंना वाव दिला जात नाही तेव्हा प्राण सहकार्य करत नाही.
२) जेव्हा व्यक्ती अगदी शारीर स्तरापर्यंत खाली उतरते आणि जोपर्यंत वरची ‘शक्ती‌’ तिथे कार्यकारी नसते तोपर्यंत, प्राण कधीकधी किंवा काही काळासाठी सुस्त होऊन जातो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 138, 138-139)

नैराश्यापासून सुटका – ०९

माणसे ईश्वराभिमुख होत नाहीत आणि त्यामुळे ती स्वत:हूनच दु:ख आणि वेदना यांची अप्रत्यक्षरित्या निवड करत असतात. एवढेच नव्हे तर, प्राणिक चेतनेमध्येच (vital consciousness) असे काहीतरी असते की, जीवनामध्ये जर दुःखसंकटे नसतील तर तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. शरीराला दु:खभोगाचे भय असते, तिटकारा असतो; पण ‘प्राण’ मात्र त्याला जीवनरूपी लीलेचाच एक भाग म्हणून स्वीकारतो.
*
प्राण जीवन-नाट्याचा आनंद घेत असतो, दु:खसंकटांमध्ये देखील तो मजा घेत असतो. त्याच्या दृष्टीने नैराश्याचे क्षण म्हणजे विकृती नसते तर, जीवनलीलेचाच तो एक भाग आहे असे म्हणून तो त्यांचा स्वीकार करत असतो. अर्थात प्राणामध्ये देखील बंडखोरीची वृत्ती असते आणि त्यामध्ये तो मजा घेत असतो. ज्या भागाला दु:खभोग नकोसे असतात आणि ज्याला त्यापासून सुटका करून घेणे आवडते ती ‘शारीरिक चेतना’ (physical consciousness) असते; पण प्राण मात्र पुन्हा पुन्हा तिला रेटत राहतो आणि त्यामुळे शारीरिक चेतनेची (दु:खभोगापासून) सुटका होऊ शकत नाही. बंडखोरी असो की निराशेला कवटाळणे असो, दोन्ही बाबींना जबाबदार असतो तो राजसिक-तामसिक प्राणिक अहंकार (rajaso-tamasic vital ego)! रजोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे बंडखोरी असते व तमोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे नैराश्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 178, 178)

नैराश्यापासून सुटका – ०८

 

निराशा कोणत्या ना कोणत्यातरी निमित्ताने येते; पण वास्तविक ती कोणत्या एखाद्या विशिष्ट कारणामुळे नव्हे तर, स्वतःच्या मर्जीनुसार येत असते. निराशा प्रत्येकामध्ये अशा रितीनेच कार्य करत असते.
*
कण्हणे-विव्हळणे, रुदन करणे, किंबहुना व्यथावेदना आणि सर्व प्रकारचे दु:खभोग, यांमध्ये जो सुख घेतो तो ‘आत्मा’ नसतो, तर तो ‘प्राण’ किंवा त्याच्यातील एखादा भाग असतो.
*
कोणत्याही प्रकारचे नैराश्य वाईटच, कारण त्यामुळे चेतना निम्नस्तरावर येते, त्यामुळे ऊर्जा खर्च होते आणि मनुष्य विरोधी शक्तींच्या अंमलाखाली येतो.
*
नैराश्य मग ते कसेही आणि कोठूनही आलेले असले तरी, त्याबाबतीत एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे ते नैराश्य बाहेर फेकून दिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 183, 178, 183, 186)

नैराश्यापासून सुटका – ०७

(नैराश्य कोणत्या कारणांनी येऊ शकते यासंबंधी श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे सांगत आहेत.)

सहसा निराशेच्या लाटा या सामान्य ‘प्रकृती’मधून येतात. जेव्हा कोणतेच कारण नसते तेव्हा मन निराशेसाठी आंतरिक किंवा बाह्य असे एखादे निमित्त शोधून काढते. निराशेचे कारण न कळण्याचे हे एक कारण असू शकते.

दुसरे असेही एक कारण असू शकते की, कर्माची किंवा साधनेची जी वाटचाल चालू आहे, तिचे अनुसरण करण्याची जिवामधील (being) एखाद्या भागाची उमेद नाहीशी झालेली असू शकते किंवा तो भाग त्या वाटचालीचे अनुसरण करण्यास अनिच्छुक असू शकतो किंवा तो श्रान्तक्लान्त झालेला असू शकतो.

तो जर प्राणिक अस्तित्वामधील (vital being) एखादा भाग असेल तर, आपले पितळ उघडे पडू नये म्हणून किंवा ते कारण दूर होऊ नये म्हणून तो स्वतःला दडवून ठेवू शकतो. तो जर शारीरिक अस्तित्वामधील एखादा भाग असेल तर तो नुसताच मंद आणि अंधुक, स्वतःला व्यक्त करण्यास अक्षम असणारा असा असू शकतो.

आणि शेवटचे एक कारण म्हणजे ती निराशा अवचेतन (subconscient) भागामधून आलेली असू शकते. विनाकारण नैराश्य दाटून येणे, हेही निराशेच्या अनेकविध कारणांपैकी एक कारण असू शकते. व्यक्तीने स्वतःच स्वतःचे निरीक्षण करून, नक्की काय कारण आहे ते शोधले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 185)

नैराश्यापासून सुटका – ०६

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला (strength) निश्चितच एक मूल्य असते, पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान व्यक्ती ज्यांना अगदी नगण्य समजतात अशा अनेक जणांना ‘ईश्वरी कृपे‌’मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना आणि कोणतीही मानसिक शक्ती किंवा प्रशिक्षण नसताना, व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे त्यांच्यापाशी) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांनी (फक्त आणि फक्त) अभीप्साच बाळगली होती आणि त्यांना एकाएकी, अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते.

ही जी तथ्यं आहेत, ती आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांच्या बाबतीत एवढा उहापोह का केला जातो, त्यांच्या बाबतीत इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

सामर्थ्य, जर आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती प्रामाणिकपणामध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती या सगळ्यामधून पार होतेच, हे मी असंख्य वेळा सांगितले आहे. मी अनेकवेळा ईश्वरी कृपे‌विषयीदेखील बोललो आहे. “शोक करू नकोस; मी तुला सर्व पापांमधून आणि अनिष्ट गोष्टींपासून मुक्त करेन,” (अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुच:) हे ‘गीते‌’मधील वचन मी अनेकवेळा उद्धृत केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

नैराश्यापासून सुटका – ०४

 

अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. ”अमुक एक गोष्ट मी केलीच पाहिजे आणि ती मी करीनच,” असा दृढ संकल्प कायम राखणे हा यशाचा मूलमंत्र, हा विजयाचा निर्धार तुम्ही केला पाहिजे. हे अशक्य वाटते आहे का? अशक्य अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नसते. अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काहीच नसते. व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा एकदा का दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होते.

 

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116)

नैराश्यापासून सुटका – ०३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही, किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याबाबतीत झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ‘ईश्वर’ हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)

नैराश्यापासून सुटका – ०२

तुम्ही कधीच एकाकी नसता, हे कधीही विसरू नका. ‘ईश्वर’ तुमच्या सोबत असून तो तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे. ‘तो’ असा सोबती आहे की जो कधीच साथसंगत सोडत नाही; ‘तो’ असा मित्र आहे, ज्याचे प्रेम तुम्हाला सामर्थ्यवान बनविते आणि समाधान देते. तुम्हाला जितका जास्त एकाकीपणा जाणवेल, तेवढे तुम्ही त्या ईश्वराच्या तेजोमय उपस्थितीची जाणीव होण्यासाठी अधिक तयार व्हाल. श्रद्धा बाळगा, ‘तो’ तुमच्यासाठी सारेकाही करेल.
*
जेव्हा परिस्थिती वाईटाहून अधिक वाईट होत आहे असे वाटते, तत्क्षणी, आपण श्रद्धेची परमोच्च कृती केली पाहिजे आणि ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला कधीच अंतर देणार नाही, हे आपण जाणून असले पाहिजे. अरूणोदयापूर्वीच्या घटिका या नेहमीच सर्वाधिक अंधकारमय असतात. स्वातंत्र्य जवळ येण्यापूर्वीची गुलामी ही सर्वात जास्त वेदनादायी असते. परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये आशेची चिरंतन ज्योत तेवत असते आणि ती निराशेला जागाच ठेवत नाही.

– श्रीमाताजी (CWM 14 : 09), (CWM 15 : 177)

नैराश्यापासून सुटका – ०१

जीवन विविधरंगी असते. कधी चैत्रपालवी तर कधी वैशाख-वणवा, कधी नयनरम्य तर कधी ओसाडरुक्ष दृश्य, कधी मोरपंखी कोमलता तर कधी पाषाणाची कठोरता; अशा बहुरंगी, बहुढंगी चढ-उतारावरून, खाच-खळग्यातून जीवनप्रवाह खळाळता राहतो. मानवी जीवनही आशा-निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते. कधी तप्त वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्याचा अनुभव येतो तर कधी दवबिंदू-भिजल्या कोवळ्या गवतावर फेरफटका मारण्याचा स्पर्श-सुखद अनुभव येतो. यापैकी कोणताही अनुभव आला तरी, अध्यात्म आपल्याला या सगळ्याकडे पाहण्याची एक सम-दृष्टी प्रदान करते. आजच्या स्पर्धात्मक जगात आशेपेक्षा निराशेचे प्रसंगच अधिक येताना दिसतात. अशा वेळी तर हमखास आपल्या मदतीला येतो तो अध्याम-विचार! व्यक्तीला निराशेकडून आशेकडे आणि नंतर आशा-निराशातीत अवस्थेकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य या विचारामध्ये असते.

उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘नैराश्यापासून सुटका’ या मालिकेमध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे या विषयावरील विचार आपण समजावून घेणार आहोत. वाचक नेहमीप्रमाणेच या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.

यदाकदाचित मनावर निराशेची काजळी जमली असेल तर, ती झटकून टाकू या आणि नव-वर्षानिमित्त नव-आशेचा स्फुल्लिंग मनात तेवता ठेवू या.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक