व्यक्तित्वातील ज्या भेदांविषयी तुम्ही बोलत आहात, ती योगिक विकासातील आणि अनुभूतीतील एक आवश्यक अशी पायरी आहे.

आपण जणू काही दुपदरी अस्तित्व आहोत असे व्यक्तीला जाणवते, एक आंतरिक चैत्य अस्तित्व की, जे सत्य आहे असे वाटते आणि दुसरे अस्तित्व म्हणजे बाह्यवर्ती जीवनासाठी साधनभूत असणारे असे बाह्यवर्ती मानवी अस्तित्व. आंतरिकरित्या चैत्य अस्तित्वामध्ये जीवन जगणे व ईश्वराशी जोडलेले राहणे आणि त्याच वेळी बाह्य अस्तित्व बाह्यवर्ती कार्यामध्ये गुंतलेले असणे, हे जे काही तुम्हाला जाणवत आहे ती कर्मयोगाची पहिली पायरी आहे.

तुमच्या या अनुभवांमध्ये चुकीचे असे काही नाही; ते अनुभव अटळ आहेत आणि या पायरीवर अगदी स्वाभाविक असे आहेत. तुम्हाला या दोन्हीमधील सेतुबंधाची जाणीव होत नाही कारण, कदाचित या दोहोंना जोडणारे असे काय आहे ह्याविषयाची तुम्हाला अद्यापि जाण नाही. आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर ह्या गोष्टी, चैत्य अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांना जोडणाऱ्या असतात. आणि त्याविषयी तुम्ही आत्ताच काळजी करण्याचे काही कारण नाही.

महत्त्वाची गोष्ट अशी की, जे आत्ता तुमच्याकडे आहे ते जतन करा, त्याला वाढू द्या, सतत चैत्य अस्तित्वात, तुमच्या सत् अस्तित्वात जगा. मग योग्य वेळी चैत्य जागृत होईल आणि प्रकृतीच्या उर्वरित सर्व घटकांना ईश्वराभिमुख करेल, जेणेकरून ह्या बाह्यवर्ती अस्तित्वाला देखील स्वत:हूनच ईश्वराच्या स्पर्शाची जाणीव होईल आणि ईश्वरच आपला कर्ताकरविता आहे ह्याची जाणीव होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 344-345)

प्रश्न : व्यक्तीने अस्तित्वाचे एकीकरण कसे करावे, हे मला जाणून घ्यावयाचे आहे.

श्रीमाताजी : व्यक्तीच्या एकीकरणाच्या ह्या कार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
१) व्यक्तीने स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी सजग होणे.
२) व्यक्तीला एकदा का आपल्या हालचाली, आवेग, विचार, संकल्पपूर्वक कृती यांविषयीची जाणीव झाली की, त्या सगळ्या गोष्टी चैत्य पुरुषासमोर मांडणे. ह्या हालचाली, आवेग, विचार व संकल्पपूर्वक कृती स्वीकारावी वा नाकारावी हे ठरविण्यासाठी, प्रत्येक गोष्ट चैत्य पुरुषाच्या समोर मांडावयाची असते. त्यापैकी ज्यांचा स्वीकार होईल त्या कायम राखल्या जातील व चालू राहतील आणि ज्या नाकारल्या जातील, त्या पुन्हा कधीही परतून येऊ नयेत ह्यासाठी, जाणिवेच्या बाहेर काढून टाकल्या जातील. हे एक दीर्घकालीन आणि काटेकोरपणे, कसून करण्याचे कार्य आहे, ते योग्य प्रकारे करण्यासाठी वर्षानुवर्षे लागू शकतात.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 414)

“पूर्ण योगामध्ये, शक्यतो हृदयामध्ये लक्ष केंद्रित करून, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्या अस्तित्वाला हाती घ्यावे म्हणून त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याच्या योगे जाणिवेमध्ये पालट होणे याखेरीज इतर कोणतीही पद्धत नाही. एखादी व्यक्ती मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकते परंतु पुष्कळ जणांना अशा प्रकारे उन्मुख होणे फारच कठीण जाते.” – श्रीअरविंद (CWSA 29 : 107),

प्रश्न : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?

श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे आहे. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही प्रथम चैत्याच्या संपर्कातच प्रवेश करता. परंतु जर का तुम्ही डोक्यामध्ये चित्त एकाग्र कराल तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, डोक्याकडून हृदयाकडे जावे लागते. आणि तुम्ही तुमच्या शक्ती एकत्र करून चित्ताची एकाग्रता करणार असाल तर, त्या शक्तींचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक बरे; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. डोक्याकडून येणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 389)

तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, अंधारा काळ हा अपरिहार्य आहे. जेव्हा तुमच्यातील चैत्य सक्रिय असतो तेव्हा कोणत्याही स्पष्ट कारणाविना तुम्हाला एक प्रकारचा आनंद जाणवतो. तो काही काळ तसाच टिकून राहतो आणि परत कोणत्यातरी मानसिक किंवा प्राणिक प्रतिक्रिया उमटतात आणि परत मग तुम्ही त्याच त्या अंधारात जाऊन पडता. हे काही काळ चालत राहणार.

हळूहळू प्रकाशमान दिवस हे अधिकाधिक काळ टिकून राहू शकतील आणि बऱ्याच कालावधीनंतर कधीतरी मग अंधारा काळ येईल आणि तो सुद्धा कमी काळासाठी येईल. अंतिमत: जोवर तो अंधारा काळ पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत हे असे चालत राहील. तोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवावयास हवे की, ढगांमागे सूर्य दडलेला असतोच, तेव्हा तुम्ही काळजी करण्याचे काही कारण नाही.

तुमच्याकडे एखाद्या बालकाप्रमाणे विश्वास असावयास हवा – हा विश्वास की, कोणीतरी तुमची काळजी घेणारे आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकता.

– श्रीमाताजी

*

जेव्हा अहं-केंद्रितता ही मोठ्या प्रमाणात नाहीशी झालेली असते, तसेच श्रीमाताजींप्रत उत्कट भक्ती असते तेव्हा, चैत्य केंद्र थेट खुले होणे हे अधिक सहजसोपे असते. एक प्रकारची आध्यात्मिक विनम्रता आणि समर्पणाची, विसंबून असल्याची भावना ही आवश्यक असते.

– श्रीअरविंद

*

इच्छावासनांचा परित्याग केल्यामुळे, जेव्हा त्या इच्छावासना व्यक्तीचे विचार, भावभावना, कृती यांचे शासन करेनाशा होतात तेव्हा, आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी आत्मार्पण करण्याविषयीची एक स्थिर अशी अभीप्सा व्यक्तीमध्ये उदित होते तेव्हा, कालांतराने चैत्य पुरुष सहसा आपणहूनच खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWM 14 : 247), (CWSA 32 : 163), (CWSA 30 : 349)

सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि केवळ ईश्वराभिमुख होण्याची इच्छा – ही चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची सर्वाधिक उत्तम साधने आहेत, हे श्रीअरविंदांचे वचन लक्षात घ्या.

जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि कोणतीही व्यवधाने नसतील अशी दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करा; शांतपणे बसा आणि चैत्य पुरुषाशी संपर्क साधायचा आहे अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) उरी बाळगून चैत्य पुरुषाचा विचार करा. जरी तुम्हाला त्यात ताबडतोब यश आले नाही तरी नाउमेद होऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार आहे.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 363)

चैत्य शिक्षणाचा आरंभबिंदू असा की, तुमच्यामध्येच अशा कशाचा तरी शोध घ्यावयाचा की, जे तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या जीवनातील परिस्थितीहून स्व-तंत्र असेल; तुम्हाला देण्यात आलेल्या मानसिक घडणीतून त्याचा जन्म झालेला नसेल; तुमची भाषा, तुमच्या प्रथापरंपरा, सवयी, तुमचा देश, युग ह्या सर्वांपासून ते निरपेक्ष, स्व-तंत्र असे असेल.

ज्या युगामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये तुमचा जन्म झाला आहे, तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता तेथील प्रथापरंपरा, चालीरिती, सवयी, तुम्ही जी भाषा बोलता ती भाषा या साऱ्यांच्या सापेक्ष नसणाऱ्या ह्या गोष्टीचा; तुमची घडण ज्या मानसिक ठेवणीमधून झाली त्यामधून जिचा उदय झालेला नाही अशी, तुमचे शरीर आणि तुमच्या जीवनातील परिस्थिती यांच्या सापेक्ष नसलेली, स्व-तंत्र अशी, तुमच्या अस्तित्वामध्येच दडलेली जी एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा शोध घ्यावयाचा हा या चैत्य शिक्षणाचा (Psychic Education) आरंभबिंदू आहे.

तुमच्या अस्तित्वाच्या आत खोलवर अशी एक गोष्ट आहे की, जी स्वत:मध्ये विश्वव्यापकता, अमर्याद विस्तार, अखंड सातत्याची एक भावना बाळगून आहे, त्या गोष्टीचा शोध तुम्ही घ्यावयास हवा.

त्यानंतर तुम्ही स्वत:ला विकेंद्रित करता, विस्तृत करता, व्यापक करता; तुम्ही सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये जगू लागता; एकमेकांना परस्परांपासून विभिन्न करणारे सारे बांध ढासळून पडतात. तुम्ही त्यांच्या विचारांनी विचार करू लागता, त्यांच्या संवेदनांनी स्पंदित होता, त्यांच्या भावभावना तुम्हाला संवेदित होतात, तुम्ही त्यांचे जीवन जगू लागता. आजवर जे जड, अक्रिय वाटत होते ते एकदम जिवंत होऊन जाते, दगडसुद्धा जणु जिवंत होतात, वनस्पतींना संवेदना होतात, त्या इच्छा बाळगतात, त्यांना सुख-दुःख होते, कमीअधिक अस्फुट परंतु स्पष्ट आणि बोलक्या अशा भाषेत प्राणी बोलू लागतात; कालातीत किंवा मर्यादातीत अशा एका अद्भुत चेतनेमध्ये प्रत्येक गोष्ट जिवंत होऊन जाते.

चैत्य साक्षात्काराचा हा केवळ एक पैलू आहे, अजून पुष्कळ पैलू आहेत. तुमच्या अहंकाराचे अडथळे भेदण्यासाठी, तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या भिंती पाडण्यासाठी, तुमच्या प्रतिक्रियांच्या वीर्यहीनतेच्या, आणि तुमच्या इच्छाशक्तीच्या अक्षमतेच्या साऱ्या मर्यादा भेदण्यासाठी ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला साहाय्यभूत होतात.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 32-33)

आत्मज्ञान आणि आत्मनियंत्रण यासाठी जी साधना करणे आवश्यक आहे; त्या साधनेचा आरंभबिंदू म्हणजे ‘चैत्य साधना’ होय. आपल्यामधील आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च सत्याचे स्थान असलेल्या मनोवैज्ञानिक केंद्राला आपण ‘चैत्य’ असे म्हणतो. ते केंद्र, या सर्वोच्च सत्याला जाणून घेऊ शकते आणि त्या सत्याला ते गतिशील, कृतिप्रवण करू शकते. त्यामुळे या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते अस्तित्व हे जोवर आपल्यासाठी एक जिवंत असे वास्तव बनत नाही आणि आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत, त्या अस्तित्वावर लक्ष एकाग्र करणे, हे खूप महत्त्वाचे असते. त्याच्या आकलनासाठी आणि अंतिमत: त्याच्याशी तादात्म्य प्राप्त करून घेण्यासाठी अनेकविध पद्धती विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती मनोवैज्ञानिक आहेत, काही धार्मिक आहेत तर काही अगदी यांत्रिक आहेत.

प्रत्यक्षात, प्रत्येक व्यक्तीने तिला सर्वाधिक योग्य असणारी पद्धत शोधून काढावयास हवी आणि जर व्यक्तीकडे अगदी तळमळीची, अविचल अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) असेल, सातत्यपूर्ण व गतिशील इच्छा असेल तर, व्यक्तीला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी मदत म्हणून कोणता ना कोणता तरी मार्ग निश्चितच सापडतो – बाह्यत: पाहता वाचन व अभ्यास, आणि आंतरिकदृष्टीने पाहता एकाग्रता, ध्यान, साक्षात्कार आणि अनुभूती या त्या पद्धती आहेत.

परंतु एक गोष्ट मात्र अनिवार्य आहे; ती म्हणजे शोध घेण्याची आणि साक्षात्कार करून घेण्याची अनिवार इच्छा. त्याचा शोध आणि साक्षात्कार हा आपल्या जीवाचा अगदी मूलभूत असा एकाग्रतेचा विषय असला पाहिजे, हा असा किमती मोती आहे की जो, आपण कोणतीही किंमत देऊन प्राप्त करून घ्यायलाच हवा. तुम्ही काहीही करत असलात, तुम्ही कोणत्याही उद्योगात, कामात व्यग्र असलात तरीही, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढणे आणि त्याच्याशी एकत्व पावणे ही गोष्ट तुमच्यामध्ये नेहमीच जिवंत असली पाहिजे; तुम्हाला जे काही जाणवते, तुम्ही जो काही विचार करता, तुम्ही ज्या कोणत्या कृती करता त्या पाठीमागे कायम तोच ध्यास असला पाहिजे.

आंतरिक शोधाच्या ह्या मोहिमेला पूरक म्हणून, मनाच्या विकसनाकडे दुर्लक्ष न करणे हेसुद्धा हिताचे ठरते. कारण हे मनरूपी साधन खूप साहाय्यकारी ठरू शकते किंवा तितकेच ते मार्गातील मोठी धोंडदेखील ठरू शकते. स्वाभाविक स्थितीत असताना मानवी मनाची दृष्टी नेहमीच संकुचित असते, त्याची समज मर्यादित असते, ते त्याच्या संकल्पनांच्या बाबतीत खूप हटवादी असते आणि म्हणून त्याला व्यापक करण्यासाठी, त्याला अधिक लवचीक आणि अधिक सखोल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे शक्य तेवढे सर्व दृष्टिकोन विचारात घेतले गेले पाहिजेत.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 4-5)

प्रश्न : आत्मा व्यक्तिभूत होतो आणि क्रमश: चैत्य पुरुषामध्ये रूपांतरित होतो. त्याच्या जलद विकसनासाठी सुयोग्य स्थिती कोणती?

श्रीमाताजी : आत्मा जे प्रगतिशील व्यक्तिरूप धारण करतो त्यामधून चैत्य पुरुष निर्माण होतो, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

कारण आत्मा स्वयमेवच परम ईश्वराचा एक असा भाग असतो की, जो अपरिवर्तनीय आणि शाश्वत असा असतो. चैत्य पुरुष हा प्रगतिशील आणि अमर्त्य असतो.

आत्म-ज्ञानाच्या, आत्म-नियमनाच्या, आत्म-प्रभुत्वाच्या सर्वच पद्धती चांगल्या असतात. जी पद्धत तुमच्या प्रकृतीशी मिळतीजुळती आहे आणि जी सहज स्वाभाविकरितीने तुमच्यापाशी आलेली आहे, अशी पद्धत तुम्ही निवडली पाहिजे. आणि एकदा का ती पद्धत तुम्ही निवडली की, मग मात्र कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले तरी, तुम्ही त्यापासून न ढळता प्रयत्न करत राहिले पाहिजे, तुमची बौद्धिक इच्छाशक्ती तिथे उपयोगात आणली पाहिजे. हे एक असे दीर्घकालीन आणि बारकाव्याने करावयाचे काम आहे की, जे अगदी प्रामाणिकपणानेच हाती घेतले पाहिजे आणि चढत्या वाढत्या प्रामाणिकपणाने, इमानेइतबारे आणि समग्रतेने ते चालू ठेवले पाहिजे. सोपे मार्ग बहुधा कोठेच घेऊन जात नाहीत.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 246-247)

प्रश्न : चैत्य पुरुष जागृत करण्याची प्रभावी साधना कोणती?

श्रीमाताजी : तो जागृतच आहे; तो टक्क जागा आहे. आणि तो जागा आहे, एवढेच नाही तर, तो सक्रिय आहे, एवढेच की, तुम्हाला त्याची जाणीव नाही. तुम्हाला तो संवेदित होत नसल्यामुळे तुम्हाला तो झोपला आहे असे वाटते.

मूलत: ह्या चैत्य पुरुषाची आंतरिक इच्छा जर मानवामध्ये नसती तर, मला वाटते मनुष्यमात्र हा अगदीच निराश, मंद झाला असता, तो जवळजवळ प्राण्यासारखेच जीवन जगला असता. अभीप्सेची प्रत्येक चमक ही त्या चैत्य प्रभावाची अभिव्यक्ती असते. जर चैत्याचे अस्तित्वच नसते, चैत्याचा प्रभाव नसता तर, माणसामध्ये प्रगतीची जाणीव किंवा प्रगतीची इच्छाच कधी निर्माण झाली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 165)

सामान्यत: म्हणजे सर्वसामान्य जीवनामध्ये, व्यक्तीचा चैत्य पुरुषाशी संबंध हा जवळपास नसल्यासारखाच असतो. सर्वसामान्य जीवनामध्ये ज्याचा चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क आहे, अगदी क्षणभरापुरता का असेना, पण ज्याचा असा संपर्क आहे अशी व्यक्ती लाखांमध्ये एकसुद्धा सापडत नाही.

चैत्य पुरुष हा आतून कार्य करू शकतो, पण बाह्य व्यक्तित्वाच्या दृष्टीने, ते कार्य तो इतका अदृश्यपणे आणि इतक्या नकळतपणे करतो की, जणू चैत्य पुरुष त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नसतो. बहुतांशी उदाहरणांमध्ये, अगदी खूप मोठ्या प्रमाणावर, जवळपास सर्वच उदाहरणांमध्ये तो जणू सुप्त असतो, अजिबात सक्रिय नसतो.

स्वत:च्या चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क प्रस्थापित करणे, हे एखाद्या व्यक्तीला पुष्कळ साधनेमधून आणि खूपशा चिवट प्रयत्नांमधूनच शक्य होते. स्वाभाविकपणेच, अशीही काही अपवादात्मक उदाहरणे असतात – परंतु ती खरोखरच अगदी अपवादात्मक असतात आणि ती इतकी कमी असतात की, ती हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगी असतात – जिथे चैत्य पुरुषाची पूर्णत: घडण झालेली आहे, जो मुक्त आहे, जो स्वत:चा स्वामी आहे, आणि ज्याने स्वतःचे कार्य पूर्ण करण्यासाठी मानवी देहामध्ये या पृथ्वीवर परतून यायचा निर्णय घेतलेला आहे, अशी उदाहरणे अगदीच अपवादात्मक असतात. आणि अशा उदाहरणांच्या बाबतीत, जरी त्या व्यक्तीने जाणिवपूर्वकपणे साधना केली नाही तरीही, चैत्य पुरुष इतका शक्तिशाली असू शकतो की, तो कमीअधिक जाणिवयुक्त नाते प्रस्थापित करू शकतो.

परंतु अशी उदाहरणे इतकी अद्वितीय असतात, इतकी दुर्मिळ असतात की, त्या अपवादात्मक उदाहरणांनी नियमच सिद्ध होतो. बाकी सर्वच बाबतीत, सर्वच उदाहरणांमध्ये, चैत्य पुरुषाची जाणीव होण्यासाठी खूप खूप सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.

सहसा असे मानण्यात येते की, व्यक्तीला जर ते तीस वर्षात साध्य करता आले, तीस वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हं, जर ते करता आले तर ती व्यक्ती अत्यंत भाग्यवान गणली जाते. आणि जर असे घडले तर तेही लवकरच घडले, असे म्हणावे लागेल. पण हे सुद्धा इतके दुर्मिळ आहे की, एखादा लगेचच म्हणतो की, “तो कोणीतरी असामान्य माणूस दिसतोय.” जे फार मोठे योगी असतात, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, जे कमी अधिक दिव्य जीव मानले जातात, त्यांच्याबाबतीत हे असे घडते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 269)