आपल्यामधील चैत्य घटक हा असा भाग असतो की, जो थेट ईश्वराकडून आलेला असतो आणि ईश्वराच्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन-प्राण-शरीर यांच्या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते; पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते. ते केंद्र प्रथमत: विकसित झालेले नसते आणि जरी अगदी विकसित झालेच तरीही, ते नेहमीच किंवा बहुतांशी वेळा पुढे आलेले नसते; मन-प्राण-शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढेच, त्यांच्या माध्यमातूनच आणि त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते.

ईश्वरानुगामी अनुभूतींच्या योगे, त्याची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा जेव्हा उच्चतर क्रिया होते, त्या प्रत्येक वेळी त्याला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, ह्या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष वा चैत्य अस्तित्व’ असे म्हणतो.

मनुष्य आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच मनुष्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारणच अनभिज्ञ राहते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या ह्या पूर्णयोगामध्ये त्याला मागून पुढे पृष्ठभागी आणले पाहिजे.

इंग्रजी भाषेमध्ये ‘आत्मा आणि चैत्य पुरुष’ (Soul & Psychic) हे दोन्ही शब्द अगदीच ढोबळमानाने आणि विविध अर्थांनी वापरले जातात. बहुतांशी वेळा तर, मन आणि आत्मा ह्यांमध्ये स्पष्ट फरकच केला जात नाही आणि त्यापेक्षा अधिक गंभीर गोंधळ पुढील बाबतीत केला जातो : ‘आत्मा’ वा ‘चैत्य’ या शब्दाद्वारे त्यांना, खराखुरा आत्मा वा चैत्य पुरुष अभिप्रेत नसतो, तर इच्छावासनांचे प्राणिक अस्तित्व – म्हणजे वासनात्मा वा भ्रामक आत्मा (desire-soul) हाच अभिप्रेत असतो.

मन वा प्राण यांपासून चैत्य पुरुष हा पूर्णत: भिन्न असतो; मन व प्राण दोघेही हृदयस्थानी जिथे एकत्रित येतात तेथे, तो त्यांच्या पाठीमागे उभा असतो. त्याचे मध्यवर्ती स्थान तेथे असते, हृदयात नव्हे तर, हृदयाच्या पाठीमागे असते. हृदय हे भावभावनांचे स्थान असते, असे लोक सहसा ज्याविषयी म्हणतात, त्या मानवी भावभावना म्हणजे मानसिक प्राणिक आवेग असतात; त्या सहसा चैत्य स्वरूपाच्या असत नाहीत. मन आणि प्राणशक्तीपेक्षा भिन्न असणारी, पार्श्वस्थानी असणारी ही बहुतांशी गुप्त शक्ती म्हणजे खरा आत्मा होय, आपल्यातील चैत्य पुरुष होय.

वास्तविक, चैत्य पुरुषाची शक्ती ही मन, प्राण व शरीर यांच्यावर कार्य करू शकते, विचारांचे, बोधाचे, भावनांचे (ह्याच भावना नंतर चैत्य भावना बनतात) तसेच संवेदना, कृती आणि आपल्यातील इतर सर्वच गोष्टींचे शुद्धीकरण करते आणि त्यांनी दिव्य गतिविधी बनावे म्हणून त्यांची पूर्वतयारी करून घेते.

भारतीय भाषांमध्ये या चैत्य पुरुषाचे वर्णन ‘हृदयामधील पुरुष’ असेही केले जाते. येथे आंतरहृदयाचा किंवा गुप्त असणाऱ्या हृदयाचा (हृदये गुहायाम्) असा बोध व्हावयास हवा.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103-104)

मानवातील दिव्यत्वाचा प्रतिनिधी म्हणजे ‘चैत्य पुरुष’ (Psychic Being) होय. असे पाहा की, ईश्वर ही काहीतरी दूर कोठेतरी, अप्राप्य असणारी अशी गोष्ट नाही. ईश्वर तुमच्या अंतरंगामध्येच आहे पण तुम्हाला मात्र त्याची पूर्ण जाणीव नाही.

खरंतर…आत्ता तो तुमच्यामध्ये ‘अस्तित्व’ असण्यापेक्षा, ‘प्रभाव’ या स्वरूपात कृती करतो. पण तो एक जितेजागते अस्तित्व असला पाहिजे. तो काय आहे? कसा आहे? ईश्वर या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? इ. प्रश्न, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वत:लाच विचारू शकला पाहिजेत. प्रथम ईश्वर कसा पाहतो, मग ईश्वर इच्छा कशी बाळगतो आणि अंतत: ईश्वर कशा रीतीने कार्य करतो; असा विचार करावयास हवा. आणि हे शोधण्यासाठी कोणत्यातरी निर्जन प्रदेशामध्ये जाण्याची जरुरी नाही, तो अगदी येथेच आहे.

फक्त इतकेच की, आत्ताच्या या घडीला आपल्यातील सर्व जुन्या सवयी व सर्वसामान्य अचेतना यांनी आपल्यावर एक प्रकारचे आवरण निर्माण केले आहे आणि ते आवरणच आपल्याला त्याला पाहण्यापासून व त्याच्या संवेदनेपासून रोखत आहे. तुम्ही ते आवरण दूर केलेच पाहिजे.

खरं तर, तुम्ही आता एक जाणीवयुक्त असे साधन बनले पाहिजे – ईश्वराविषयी जागरूक बनले पाहिजे. बहुधा यासाठी एक उभे आयुष्य खर्ची पडते, तर कधीकधी काही लोकांना त्यासाठी जन्मानुजन्मं लागू शकतात. इथे सद्यस्थितीत तुम्ही काही महिन्यातच ते करू शकता. ज्यांच्यापाशी अतिउत्कट अशी अभीप्सा आहे, ते अगदी थोड्या महिन्यातच हे साध्य करून घेऊ शकतील.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 428)

आत्मा (The soul) आणि चैत्य पुरुष (The psychic being) ह्या दोघांचा गाभा जरी समान असला तरी, ह्या दोन्ही गोष्टी अगदी एकसारख्या मात्र नक्कीच नाहीत.

प्रत्येक व्यक्तीच्या केंद्रस्थानी स्थित असणारा ईश्वरी स्फुल्लिंग म्हणजे आत्मा होय; तो त्याच्या ईश्वरी उगमाशी अभिन्न असतो; तो मनुष्यातील ईश्वर असतो.

पार्थिव उत्क्रांतीच्या दरम्यान, असंख्य जन्मांच्या प्रक्रियेतून, ह्या आत्म्याभोवती, म्हणजे ह्या दिव्य केंद्राभोवती चैत्य पुरुषाची क्रमश: जडणघडण होत जाते. चैत्य पुरुष पूर्ण सुघटित आणि समग्रतेने जागृत होऊन, ज्या दिव्य केंद्राभोवती त्याची घडण होत असते त्या आत्म्याभोवतीचा तो जागृत कोश बनत नाही तोपर्यंत, अशा क्षणापर्यंत येत नाही तोपर्यंत ही जडणघडण चालूच राहते. आणि एकदा तो अशा रीतीने ईश्वराशी एकत्व पावला की मग मात्र, तो त्या ईश्वराचे या विश्वातील परिपूर्ण असे साधन बनतो.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 245-246)

*

अपराप्रकृतीमध्ये, ईश्वराचा हा शाश्वत अंश आत्मा म्हणून, दिव्य अग्नीचे एक स्फुल्लिंग म्हणून प्रतीत होतो, तो व्यक्तिगत विकसन-प्रक्रियेला आधार पुरवत असतो; शारीरिक, प्राणिक, मानसिक अस्तित्वाला आधार पुरवत असतो.

जाणिवेच्या विकसनाबरोबर वृद्धिंगत होत जाणारा, स्फुल्लिंगाचे रूपांतर अग्नीमध्ये होत जाणारा ईश्वरांश म्हणजे चैत्य पुरुष होय. त्यामुळे चैत्य पुरुष हा विकसनशील असतो, तो जीवात्म्याप्रमाणे विकासपूर्व (prior to the evolution) नसतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 56)

प्रश्न : चैत्य पुरुषाचे कार्य काय असते?

श्रीमाताजी : वीजेच्या दिव्याला विद्युतजनित्राला (Power Generator) जोडणाऱ्या विजेच्या तारेप्रमाणे त्याचे कार्य असते, समजले?

श्रोता : ईश्वर म्हणजे विद्युतजनित्र आणि दिवा म्हणजे आपले शरीर, असेच ना?

श्रीमाताजी : शरीर म्हणजे आपले दृश्य अस्तित्व. म्हणजे असे की, जडभौतिकामध्ये जर चैत्य अस्तित्व नसते तर, जडाला ईश्वराशी कोणताही थेट संबंध प्रस्थापित करता आला नसता. जडातील या चैत्य अस्तित्वामुळेच, जडाचा ईश्वराशी थेटपणे, सुखाने संबंध निर्माण होऊ शकतो आणि ते अस्तित्व मानवाला सांगू शकते की, ‘तुझ्या अंतरंगामध्ये ईश्वराचा निवास आहे, तू फक्त आत प्रवेश कर म्हणजे मग तुला तेथे तो गवसेल.’ ही अशी गोष्ट आहे की, जी खासकरून मनुष्याला लागू पडते किंवा खरंतर ती पृथ्वीवासियांना लागू पडते असे म्हणता येईल. हे चैत्य अस्तित्व मनुष्यमात्रांमध्ये अधिक जागृत, अधिक सुघटित, अधिक जागृत आणि अधिक स्वतंत्रदेखील बनते. मनुष्य-प्राण्यामध्ये ते अधिक व्यक्तिभूत (individualised) होते; वास्तविक, ही पृथ्वीचीच खासियत आहे. अगदी अचेतन, अस्पष्ट अशा जडभौतिकामध्ये ते थेटपणे, खासकरून आणि मोक्षद स्वरूपात ओतण्यात आले आहे; जेणेकरून ते पुन्हा एकवार दिव्य चेतना (Divine Consciousness), दिव्य उपस्थिती (The divine Presence) आणि अंतत: स्वत:च दिव्यत्व (The Divine Himself) या स्थितींमधून जागृत होत जाईल; मनुष्यामध्ये असणाऱ्या या चैत्याच्या अस्तित्वामुळेच मनुष्य हा अपवादात्मक जीव ठरतो. …
त्यात तथ्य आहे – इतके की, या विश्वाच्या इतर पातळ्यांवर असे काही जीव असतात, ज्याला काही माणसं देवसदृश्य, किंवा देव असे म्हणतात, किंवा श्रीअरविंदांनी ज्याला ‘अधिमानसिक जीव’ (The Overmind) असे म्हटले आहे, असे जीव चैत्य अस्तित्वाचा अनुभव घेता यावा म्हणून, या पृथ्वीतलावर शरीरधारणा करण्यासाठी अतिशय उत्सुक असतात कारण त्यांना तो अनुभव मिळत नसतो. मानवाकडे नसणारे असे अनेक गुण ह्या जीवांकडे निश्चितपणे असतात पण केवळ या पृथ्वीवरच, अन्यत्र कोठेही न आढळणाऱ्या या अत्यंत खास अशा, दिव्य अस्तित्वाचा मात्र त्यांच्यामध्ये अभाव असतो. उच्चतर मन, अधिमानसिक पातळी व अशा इतर प्रांतांतील, उच्चतर विश्वांमधील या रहिवाशांमध्ये चैत्य अस्तित्व नसते.

अर्थातच, प्राणिक विश्वांमधील (The vital worlds) जीवांमध्येही ते नसते. परंतु त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते कारण त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाही. त्यातही काही अगदी अपवादात्मक, दुर्मिळ जीव असे असतात की, ज्यांना स्वत:मध्ये बदल घडून यावा असे वाटत असते, आणि त्यासाठी ते त्वरा करतात, ते ताबडतोब प्राकृतिक देह धारण करतात. इतरांना मात्र ते नको असते….परंतु ही वस्तुस्थिती आहे, आणि मला हे सांगणेच भाग आहे की, हे सारे असे असे आहे.

स्वत:मध्ये असे हे चैत्य अस्तित्व बाळगणे हा मनुष्यमात्राचा अगदी अपवादात्मक असा गुणधर्म आहे आणि खरे सांगायचे तर, मनुष्य मात्र त्याचा पूर्ण लाभ घेत नाही. ज्याची वांछा बाळगावी असा हा काही गुणधर्म आहे असे लोकांना वाटतच नाही. त्यांच्या मनातील संकल्पना, त्यांच्या प्राणाच्या इच्छावासना, आणि त्यांच्या शरीराच्या सवयी यांनाच ते प्राधान्य देतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 160-161)

• पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतरे आणि प्रतिक्रिया यांपासून स्वत:ला दूर राखणे अगदी अनिवार्य असते.

• सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल, ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे, असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी कोणती प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

• तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

• कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून तिला सामोरे जा.

• आणि तरीसुद्धा, तुम्ही अजून कोणती प्रगती करणे आवश्यक आहे ह्याचा शोध घेण्यामध्ये कायम सतर्क राहा आणि तसे करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका.

• वरवर दिसणाऱ्या भौतिक घटनांकडे पाहून त्यांचे अर्थ लावू नका. कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

• एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर ती ताकद असेलच, तर तक्रार करण्याऐवजी ती बदलून टाका.

• तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका.

• एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात.

• खाण्यापूर्वी काही सेकंद अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य असे द्रव्य मिळावे आणि तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल.

• झोपी जाण्यापूर्वी काही सेकंद अशी अभीप्सा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरु करू शकाल.

• कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच नाही तर, परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

• जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी, ते शब्द पडताळून पाहण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा वेळ चित्त एकाग्र करा आणि जे शब्द बाहेर पडणे नितांत आवश्यक आहेत तेवढेच बोलण्यास संमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास संमती द्या.

• सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

• तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, बाह्य रूपे केवळ नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे फाटलेले कपडे जसे टाकून द्यावेत त्याप्रमाणे असतात, ह्याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल.

• आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायला नको असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल ; आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 33-35)

साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे.

येथे तत्त्व हे आहे की, प्रकृती ही आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती असली पाहिजे म्हणजे, व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन व्हायला नको. आणि यासाठी, अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत.

समर्पण साधना :
त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःच्या सर्व गतिविधी ह्या ईश्वरार्पण करायच्या आणि आंतरिक मार्गदर्शनासाठी व स्वतःची प्रकृती, उच्चतर शक्तीने हाती घ्यावी म्हणून तिला साद घालायची. जर का आंतरिक आत्म-उन्मीलन झाले असेल, जर का चैत्य पुरुष पुढे आलेला असेल तर मग, फार काही अडचण येत नाही – कारण त्याबरोबरच चैत्य विवेकसुद्धा येतो. सातत्याने सूचना मिळत राहतात, आणि अंततः त्याचे शासन सुरु होते, हे शासन सर्व अपूर्णता दाखवून देते आणि शांतपणे, धीराने त्या काढूनही टाकते; त्यामुळे योग्य मानसिक व प्राणिक हालचाली घडून येतात आणि त्यातून शारीरिक जाणिवेला सुद्धा एक आकार पुनर्प्राप्त होतो.

साक्षी भावाची साधना :
दुसरी पद्धत म्हणजे मन, प्राण आणि शारीरिक अस्तित्वाच्या साऱ्या हालचालींपासून अलिप्त होऊन मागे उभे राहवयाचे आणि त्यांच्या सर्व गतिविधी म्हणजे आपल्या सद्अस्तित्वाचा एक भाग आहेत असे न मानता; भूतकाळातील कर्मामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या, व्यक्तीमधील सामान्य प्रकृतीच्या नित्य रचना आहेत असे समजायचे.

व्यक्ती यामध्ये जितक्या प्रमाणात यशस्वी होते, म्हणजे जितक्या प्रमाणात ती निर्लिप्त होते, आणि मन व त्याच्या गतिविधी ह्या म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही ; प्राण व त्याच्या गतिविधी म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही; शरीर व त्याच्या हालचाली म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही, तेव्हा व्यक्ती शांत, स्थिर, अमर्याद, अलिप्त अशा आणि ज्यामध्ये ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सद्अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसत असते आणि जे त्याचे थेट प्रतिनिधी असू शकते अशा, अंतरंगात असणाऱ्या आपल्या आंतरिक अस्तित्वाविषयी म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांविषयी जागृत व्हायला लागते. आणि अशा या शांत आंतरिक अस्तित्वातूनच मग, जे त्याज्य आहे त्याचा अस्वीकार व्हायला सुरुवात होते; जे राखावयास हवे आणि ज्याचे परिवर्तन करावयास हवे त्याचा स्वीकार सुरु होतो. परिपूर्णत्वाविषयीची अगदी आंतरतम अशी इच्छा उदयास येते किंवा प्रकृतीच्या परिवर्तनासाठी जे आवश्यक आहे तेच प्रत्येक पावलागणिक करता यावे म्हणून दिव्य शक्तीचा धावा करणे सुरु होते.

त्यातूनच मग आंतरतम अशा चैत्य अस्तित्वाप्रत आणि त्याच्या मार्गदर्शक प्रभावाप्रत किंवा त्याच्या थेट मार्गदर्शनाप्रत मन, प्राण व शरीर खुले होण्याची शक्यता असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये, ह्या दोन्ही पद्धती एकदमच उदयास येतात आणि एकत्रितपणे कार्य करतात आणि शेवटी एकमेकींमध्ये मिसळून जातात. पण व्यक्ती यातील कोणत्याही एका पद्धतीपासूनही सुरुवात करू शकते. जी पद्धत अनुसरण्यास सोपी आहे आणि जी व्यक्तीला अगदी स्वाभाविक वाटते त्या पद्धतीने तिने सुरुवात करावी. अंततः, सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये जेथे वैयक्तिक प्रयत्न खुंटतात, तेव्हा गुरुच्या मदतीचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि साक्षात्कारासाठी जे आवश्यक आहे ते किंवा लगेचची जी कोणती पायरी आवश्यक आहे ती गोष्ट त्यांच्याद्वारे घडून येऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)

साधक : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे कारावयाचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची ?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते. आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. हे पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगावयास सुरुवात करणे हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना आहे, तिची दोन मुख्य केंद्र आहेत. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नाही तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता :
हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास, व्यक्तीला व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे, आत्म्याचे किंवा चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, तिला आणि तिच्या सर्व हालचालींना सत्याच्या दिशेने वळवू लागतो, ईश्वराच्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होते, त्या सर्वोच्चाप्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर शक्ती आणि चेतना, आमच्या ऊर्ध्वस्थित राहून, आमची वाट पाहत असते, तिचे आमच्या प्रकृतीमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी, तो तिला आवाहन करतो.

स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि हृदयातील ईश्वराच्या उपस्थितीची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

मस्तकामध्ये एकाग्रता :
दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करावयाची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते.

पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केलेच पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना वैश्विक आत्म्याच्या, दिव्य शांतीच्या, दिव्य प्रकाशाच्या, दिव्य शक्तीच्या, दिव्य ज्ञानाच्या, दिव्य आनंदाच्या संपर्कात येते व त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून, तेच होऊन जाते.

मनाच्या अचंचलतेची अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि आत्म्याचा आणि ऊर्ध्वस्थित अशा ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये जाणिवेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये, आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये चढून तेथे जीवन जगण्याच्या ऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित सत्याचे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले तर ते अधिक इष्ट असते.

(उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)

चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान पुढीलप्रमाणे :

१) चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान म्हणजे प्रेम आणि भक्ती होय, पण प्राणिक प्रेम नव्हे, अपेक्षा बाळगणारे, अहंकारी प्रेम नव्हे तर, कोणत्याही अटी, दावे नसलेले, स्वयंभू असे प्रेम.

२) अंतरंगातील दिव्य मातेशी संपर्क किंवा दिव्य मातेची उपस्थिती.

३) अंतरंगातून मिळणारे अचूक मार्गदर्शन.

४) चैत्य पुरुषाच्या प्रभावाचे व मार्गदर्शनाचे अनुसरण केल्याने मन, प्राण व शारीर जाणिवेचे शांत होणे व शुद्धीकरण घडून येणे.

५) उच्चतर आध्यात्मिक चेतनेचे, स्वीकारक्षम झालेल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी, कनिष्ठ जाणिवांचे उच्च आध्यात्मिक चेतनेप्रत खुले होणे – चैत्य जाणिवेमुळे प्रत्येक गोष्टीत योग्य विचार, योग्य आकलन, योग्य भावना, योग्य दृष्टिकोन तयार होतो आणि अशा योग्य दृष्टिकोनानिशी, परिपूर्ण ग्रहणक्षमतेने कनिष्ठ चेतना उच्च चेतनेप्रत खुली होते.

एखादी व्यक्ती मन, प्राण यांच्यामधून स्वत:ची चेतना वर उंचावू शकते आणि उच्च स्तरावरील शक्ती, आनंद, प्रकाश, ज्ञान खाली आणू शकते परंतु, हे खूप अवघड असते आणि त्यातही त्याच्या परिणामांची खात्री देता येत नाही. आणि जर जीव त्यासाठी तयार झालेला नसेल, किंवा त्याचे पुरेसे शुद्धीकरण झालेले नसेल तर ते धोकादायक देखील असते. जाणिवपूर्वकतेने चैत्यपुरुषाच्या माध्यमातून आरोहण करणे, हा सर्वात चांगला मार्ग आहे. अशा प्रकारे जर तुम्ही चैत्य केंद्रातून आरोहण करत असाल तर ते अधिक बरे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 339)

श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रांमधून –

दिव्य माता भेटावी म्हणून डोळ्यांत अश्रू येणे हे एक प्रकारचे चैत्य दुःख आहे; परंतु चैत्य अश्रू हे दुःखपूर्ण असण्याची आवश्यकता नाही, भावुकता आणि आनंदाचेदेखील अश्रू असू शकतात.

शांतीच्या आणि स्थिरचित्ततेच्या या स्थितीमध्ये हृदयाच्या मागे असणाऱ्या आंतरिक चैत्य पुरुषाचा स्पर्श झाल्याने कदाचित अश्रू आले असतील. जो आत्मा पृष्ठस्तरावर येऊ पाहत आहे त्या आत्म्याच्या अभीप्सेची आणि भक्तीची ही खूण असते. जर चैत्य पुरुष पृष्ठभागावर येऊ शकला, आणि सर्व प्रकृतीमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊ शकला, सर्व अस्तित्व ईश्वराभिमुख होऊ शकले तर असे अश्रू येणे कालांतराने नाहीसे होईल.

*

तुम्ही ज्याविषयी बोलत आहात त्या भावनेसहित रडू येणे ही चैत्य दुःखाची खूण आहे; त्यामधून चैत्य पुरुषाची अभीप्साच अभिव्यक्त होते. परंतु त्याबरोबर निराशा किंवा हताशपणा येता कामा नये. उलट, तुम्ही श्रद्धेला अधिकच चिकटून राहिले पाहिजे कारण तुमच्यामध्ये खरीखुरी अभीप्सा आहे – आणि त्याविषयी तीळमात्र शंका असू शकत नाही, बाह्य प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही एक ना एक दिवस त्याची परिपूर्ती होणारच. आंतरिक शांती व स्थिरचित्तता या गोष्टी ज्या श्रद्धेमध्ये आहेत ती श्रद्धा तुम्ही पुन्हा प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि त्याबरोबरच, काय करावयास हवे यासंबंधी स्पष्ट जाणीव कायम राखत, आंतरिक व बाह्य परिवर्तनासाठी एक स्थिर अशी अभीप्सा बाळगली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 375-376)

ईश्वराशी एकात्म पावण्याची इच्छा, ईश्वरच हवा ह्या भावनेतील खरीखुरी उत्कटता म्हणजे काय असे एकाने विचारले आहे. आणि त्यालाच स्वत:मधील दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभीप्सांचा स्वत:मध्ये शोध लागलेला आहे, विशेषत: ईश्वरविषयक उत्कटतेबाबत असणाऱ्या दोन प्रकारांचा शोध लागला आहे. तो म्हणतो, त्यातील एका वेळी एक प्रकारची यातना असते, एक हृदयस्पर्शी वेदना असते, आणि दुसऱ्या वेळी, एक प्रकारची आतुरता आणि त्याच वेळी खूप आनंददेखील असतो. हे त्याचे निरीक्षण अगदी अचूक आहे. आणि आता त्याचा प्रश्न असा आहे की, आपल्याला वेदनामिश्रित अशी उत्कटता कधी जाणवते आणि प्रसन्नतायुक्त उत्कटता कधी जाणवते?

मला माहीत नाही, तुमच्यापैकी किती जणांना ह्याचा किंवा अशासारखा अनुभव आलेला आहे पण हा अगदी दुर्मिळ पण सहजस्फूर्त येणारा असा अनुभव आहे आणि त्याचे उत्तरही अगदी साधे आहे. चैत्य जाणिवेची उपस्थिती त्या अभीप्सेबरोबर संयुक्त झाली की लगेचच, त्या उत्कटतेला एक निराळेच रूप प्राप्त होते, जणु काही अवर्णनीय अशा आनंदाच्या अर्काने ती भरून जाते. हा अशा प्रकारचा आनंद असतो की, तो इतर सर्व गोष्टींमध्ये भरलेला असल्याचे जाणवते. ह्या अभीप्सेचे बाह्य रूप कोणते का असेना, मार्गामध्ये त्याला कितीही अडचणी, अडथळे आले तरी, ही प्रसन्नता तिथे असतेच; जणुकाही ती सर्वत्र भरून राहिलेली असते आणि इतर काहीही असले तरी ती तुम्हाला तिच्याबरोबर घेऊन जाते. चैत्य उपस्थितीचे हे एक खात्रीशीर लक्षण आहे.

ह्याचा अर्थ असा की, तुमच्या चैत्य जाणिवेबरोबर तुमचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे, तो कमीअधिक परिपूर्ण असेल, सातत्याच्या दृष्टीने तो अधिक-उणा असेल पण तो संपर्क प्रस्थापित झालेला आहे. त्या क्षणी मात्र त्या चैत्य पुरुषामुळे, चैत्य जाणिवेमुळेच तुमची अभीप्सा भरून जाते की, ज्यामुळे तिला तिचे खरे सत्त्व लाभते. आणि तीच गोष्ट प्रसन्नतेच्या रूपाने अभिव्यक्त झालेली असते. आणि जेव्हा ती चैत्य जाणीव तेथे नसते, तेव्हा मग ती अभीप्सा अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांमधूनसुद्धा उदित होऊ शकते; ती मुख्यत: मनातून उदित होऊ शकते, किंवा मुख्यत्वेकरून प्राणामधून किंवा अगदी शरीरामधूनही उदित होऊ शकते किंवा कधीकधी तर ती तिन्हींमधून एकत्रितपणे उदित होऊ शकते – ती सर्व प्रकारच्या संमिश्रणांमधून उदित होऊ शकते.

पण सर्वसाधारणपणे सांगावयाचे झाले तर, जर उत्कटता असेल तर तेथे प्राण आवश्यकच असतो. प्राणामुळे उत्कटता येते आणि प्राण हे जसे उत्कटतेचे केंद्र आहे तसेच ते अडीअडचणी, अडथळे, विरोधाभास यांचे पण स्थान असते आणि अडचणींची तीव्रता व अभीप्सेची तीव्रता यांच्यामध्येच संघर्ष होऊन, ही व्यथा निर्माण होते. परंतु त्यामुळे व्यक्तीने अभीप्सा बाळगणे सोडून देण्याचे काही कारण नाही. तुम्हाला या व्यथावेदनेचे कारण उमगले की झाले.

आणि मग जर का तुम्ही, तुमच्या अभीप्सेमध्ये अजून एका घटकाचा प्रवेश करून देऊ शकलात तर, हा घटक म्हणजे ईश्वरी कृपेवरील तुमचा विश्वास, ईश्वरी प्रतिसादाविषयीची खात्री, ही जर त्या अभीप्सेमध्ये मिसळली तर व्यथावेदना, दुःख या सगळ्या गोष्टी प्रतिसंतुलित होऊन जातात आणि मग तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना वा भीतिविना अभीप्सा बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 248-250)