समर्पण – ५१

स्वतः काही केल्याशिवाय श्रीमाताजींकडे (कशाचीही) मागणी न करणे; तर आनंद आणि शांती अवतरतात तेव्हा त्यांचा प्रभाव आणि त्यांचे मार्गदर्शन पूर्ण मनोभावे स्वीकारणे; कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, दोष शोधत न बसता तो आनंद आणि ती शांती स्वीकारणे आणि त्यांची आपल्यामध्ये वृद्धी होऊ देणे; ‘शक्ती’ कार्यरत झाल्याचा अनुभव येतो तेव्हा कोणताही विरोध न करता, त्या शक्तीला कार्य करू देणे; ज्ञान प्रदान केले जाते तेव्हा ते स्वीकारणे आणि त्याचे अनुसरण करणे; ‘ईश्वरी इच्छा’ प्रकट केली जाते तेव्हा स्वतःला त्या इच्छेचे साधन बनवणे; हा समर्पणाचा गाभा आहे. ‘ईश्वर’ नेतृत्व करू शकतो, पण तो व्यक्तीला चालवत नाही. प्रत्येक मनोमय जीवाला म्हणजे ज्याला ‘मनुष्य’ असे संबोधले जाते अशा प्रत्येक व्यक्तीला एक आंतरिक स्वातंत्र्य असते; आपले नेतृत्व करण्याची अनुमती त्या ‘ईश्वरी नेतृत्वा’ला द्यायची की द्यायची नाही, हे ठरविण्याचे आंतरिक स्वातंत्र्य व्यक्तीला असते. तसे नसेल तर खरी आध्यात्मिक उत्क्रांती कशी काय शक्य होईल?

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67-68)

समर्पण – ५०

परिपूर्ण असा आत्म-समर्पणाचा दृष्टिकोन अगदी थोड्या प्रमाणात जरी प्रस्थापित करता आला तरी, योग-क्रियांची सारी आवश्यकता अपरिहार्यपणे संपुष्टात येते. कारण तेव्हा आपल्या अंतर्यामीचा ‘देव’ स्वतःच साधक आणि सिद्ध बनतो आणि त्याची दिव्य शक्ती आपल्यामध्ये कार्य करते,… अगदी सर्वाधिक शक्तिशाली राजयोगांतर्गत संयम, सर्वाधिक विकसित प्राणायाम, अत्यंत कठोर ध्यान, अतीव आनंददायी ‘भक्ती’, आत्म-त्यागाची कृती; या साऱ्या गोष्टी एरवी खूपच बलशाली आणि परिणामकारक असतात; परंतु त्या सुद्धा देव कार्याच्या तुलनेत परिणामांच्या दृष्टीने अगदीच क्षीण ठरतात. कारण या साऱ्या गोष्टींवर आपल्या क्षमतेच्या विशिष्ट मर्यादा पडतात, परंतु हे देव कार्य मात्र सामर्थ्याच्या बाबतीत अमर्याद असते कारण ती ‘देवा’ची क्षमता असते. या विश्वासाठी व विश्वातील आपल्या प्रत्येकासाठी आणि त्याव्यतिरिक्त इतरांसाठी देखील सर्वोत्तम काय आहे हे ज्या इच्छेला ज्ञात असते, अशा ईश्वरी इच्छेनेच केवळ ते कार्य परिमित (limited) होते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)

समर्पण – ४९

…(आपल्या व्यक्तित्वामध्ये असे काही घटक असतात, ) त्यांना ईश्वराप्रत संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, त्या ईश्वराची ‘इच्छा’ आणि त्याचे ‘मार्गदर्शन’ यांच्याप्रत स्वतःचे आत्मदान करण्याची त्यांची इच्छा असते; आणि त्याच वेळी, म्हणजे जेव्हा तसा अनुभव येतो – जेव्हा व्यक्ती अगदी प्रामाणिकपणे ईश्वराप्रत आत्मदान करू पाहते तेव्हा, या मार्गावर येणारा हा समान अनुभव आहे, – व्यक्तीला असे वाटू लागते की, मी कोणीच नाही, मी काहीच करू शकत नाही, ‘ईश्वरा’व्यतिरिक्त मला स्वतंत्र अस्तित्वच नाही म्हणजे, जर ‘ईश्वर’ नसेल तर मी जिवंतच राहू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही, मी म्हणजे कोणीच नसेन… हा अनुभव, अर्थातच, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्यकारी अनुभव म्हणून येतो; परंतु जेव्हा हा असा अनुभव येतो तेव्हा, आपल्याच अस्तित्वामध्ये असलेला एखादा घटक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “मला मात्र माफ करा! मला जिवंत राहायचे आहे, मला काहीतरी बनायचेच आहे, मला स्वतःला म्हणून काही गोष्टी करायच्याच आहेत, मला माझे स्वतःचे व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि अर्थातच, या दुसऱ्या घटकाच्या अशा वृत्तीमुळे पहिल्या घटकाने केलेले समर्पण मातीमोल ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 284)

समर्पण – ४८

व्यक्ती जर संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, जर तिने त्या ‘ईश्वरी कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे, अशी त्या व्यक्तीची भावना असेल तर ते त्याहूनही अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र ईश्वरी कृपेने असे का केले अन् तसे का केले, असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तीने असे म्हणता कामा नये की, “मला असे असे होईल असे वाटले होते, म्हणून मी तसे केले,” कारण व्यक्तीला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ‘ईश्वरी कृपा’ ते तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितीत, व्यक्तीने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले; त्यात काही गैर नाही.

केलेली विनंती मान्य केली जात नाही आणि व्यक्ती बंड करते, तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की, व्यक्तीची जी इच्छा असते, आकांक्षा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच केलेली मागणी ही त्या व्यक्तीसाठी हितावहच असेल असेही नाही. अशा घडीला व्यक्तीने थोडेसे अधिक समंजस होऊन म्हटले पाहिजे, “ईश्वरा, जशी ‘तुझी’ इच्छा.” पण जोवर व्यक्तीला आतून काही आवडीनिवडी व अग्रक्रम असतात तोवर तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर असे काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने वेडेपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि तशी चूक परत होऊ नये असे त्या व्यक्तीला खरोखर, मनापासून वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तीने अगदी सच्चेपणाने, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची खूपच शक्यता असते. तुम्हाला विरोध करणे हे ईश्वराला आवडते, असा तुम्ही विचार करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या अभिलाषेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागाल ते द्यायला तो नेहमीच तयार असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

समर्पण – ४७

‘विश्वात्मक’ ईश्वराप्रत असो की ‘विश्वातीत’ ईश्वराप्रत असो, आत्मसमर्पण करण्यातील खरा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या मर्यादांविषयी वाटणारे प्रेम हा होय. हे प्रेम स्वाभाविक असते, कारण अगदी मूळ घडणीपासूनच व्यक्तिपर अस्तित्वामध्ये मर्यादांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती आढळून येते. अन्यथा, पृथगात्मतेची (separateness) जाणीवच असणार नाही – सारे काही एकमेकांमध्ये मिसळल्यासारखे होईल, चेतनेच्या मानसिक आणि प्राणिक गतिविधींमध्ये बरेचदा तसे घडताना दिसते. मन आणि प्राण यांच्याइतके शरीर प्रवाही नसल्यामुळे विशेषतः ते मात्र व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्व राखून ठेवते. पण एकदा का ही पृथगात्मता प्रस्थापित झाली की, मग ती गमावण्याची भीतीसुद्धा तेथे हळूच प्रवेश करते – वास्तविक, अनेक बाबतीत पृथगात्मतेची प्रेरणा हितकर असते, परंतु ईश्वराच्या संदर्भात मात्र ती चुकीच्या रीतीने अंमलात आणली जाते. कारण वास्तविक, ईश्वरामध्ये तुम्ही तुमचे व्यक्तित्व गमावत नसता; तर तुम्ही फक्त तुमचा अहंकार सोडून देत असता आणि खरीखुरी व्यक्ती बनत असता; एक दिव्य व्यक्तिमत्त्व बनत असता. ज्या शारीर चेतनेला सहसा तुम्ही तुमचा ‘स्व’ असे समजता, त्या शारीर चेतनेच्या घडणीप्रमाणे हे व्यक्तिमत्त्व अस्थायी नसते. दिव्य चेतनेचा एक स्पर्श जरी तुम्हाला झाला तर तुम्हाला तत्क्षणी असे जाणवेल की, त्यामध्ये तुम्ही काहीही गमावलेले नाही. उलटपक्षी, शरीराला शंभर वेळा मरण जरी आले तरी टिकून राहणारी, आणि प्राणिक व मानसिक उत्क्रांतीच्या सर्व स्थित्यंतरातून टिकून राहणारी अशी खरी व्यक्तिपर चिरस्थायिता तुम्हाला प्राप्त होते.

*

या किंवा त्या अशा कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे न लागता, एखाद्या व्यक्तीला ‘ईश्वरी इच्छे’प्रत पूर्णतया समर्पण करता येणे, ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. एकदा का व्यक्तित्वाची घडण झाली की, आपले आत्मदान करण्यासाठी, समर्पणासाठी व्यक्तीला पुन्हा पुन्हा कितीतरी प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 169), (CWM 14 : 113)

समर्पण – ४६

व्यक्तिगत प्रयत्न हे उत्तरोत्तर ‘दिव्य शक्ती’च्या क्रियेमध्ये रूपांतरित केले पाहिजेत. जर तुम्हाला दिव्य शक्तीची जाणीव होत असेल तर, तुमच्या प्रयत्नांना त्या दिव्य शक्तीने अधिकाधिक संचालित करावे, तिने ते प्रयत्न हाती घ्यावेत आणि (तिने ते प्रयत्न हाती घेतल्यानंतर,) ते प्रयत्न तुमचे न राहता, ते श्रीमाताजींचे व्हावेत यासाठी, त्या दिव्य शक्तीने त्या प्रयत्नांचे रूपांतर करावे म्हणून तिला आवाहन करा. तेव्हा तिथे एक प्रकारचे रूपांतरण घडेल, तुमच्या व्यक्तिगत आधारामध्ये (मन, प्राण, शरीर यांमध्ये) कार्यरत असणाऱ्या शक्ती हाती घेतल्या जातील; हे रूपांतरण एकाएकी पूर्णत्वाला जाणार नाही तर ते उत्तरोत्तर होत राहील. पण यासाठी आंतरात्मिक संतुलनाची आवश्यकता असते : दिव्य शक्ती म्हणजे काय, व्यक्तिगत प्रयत्नांचे घटक कोणते आणि कनिष्ठ वैश्विक शक्तींकडून त्यात कशी सरमिसळ होत गेली आहे, या गोष्टी अगदी अचूकपणाने पाहणारा विवेक विकसित झाला पाहिजे. आणि जोपर्यंत हे रूपांतरण पूर्णत्वाला पोहोचत नाही, – ज्याला नेहमीच दीर्घकाळ लागतो, – तोपर्यंत त्यासाठी नेहमीच व्यक्तिगत योगदान असणे आवश्यक असते; खऱ्या शक्तीला सातत्यपूर्ण अनुमती, आणि कोणत्याही कनिष्ठ सरमिसळीला सातत्यपूर्ण नकार या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 84-85)

समर्पण – ४५

(श्रीअरविंद एका साधकाला लिहिलेल्या पत्रात समर्पणामध्ये येणाऱ्या प्राणिक अडथळ्यांचे स्वरूप स्पष्ट करत आहेत.)

तुमच्या प्रतिक्रियेचे जे वर्णन तुम्ही केलेत त्यावर उत्तर देताना, ती ‘प्राणिक मागणी’ (Vital demand) आहे असे मी म्हटले होते. कारण शुद्ध आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक आत्मदानामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नसतात; त्यामध्ये तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे, नैराश्य किंवा आशाभंग नसतो, “मी ईश्वरासाठी साधना करून काय उपयोग झाला?” असे म्हणणे नसते, राग नसतो, बंड नसते, अभिमान नसतो किंवा सारे काही सोडून निघून जाण्याची इच्छाही नसते – तर एक प्रगाढ विश्वास असतो आणि परिस्थिती कशीही असली तरी सर्व परिस्थितीमध्ये ईश्वराला बिलगून राहण्याची एक चिकाटी असते. तुमच्यामध्ये या गोष्टी असाव्यात असे मला अपेक्षित आहे; हा एकच असा पाया आहे की ज्याच्या आधारावर व्यक्ती सर्व प्रकारच्या त्रासांपासून आणि प्रतिक्रियांपासून मुक्त राहू शकते आणि स्थिरपणाने प्रगत होऊ शकते.

*

प्राणाला जेव्हा त्याची स्वतःची प्रकृती दाखवून दिली जाते आणि त्यात बदल करावा असे सांगितले जाते, तेव्हा प्राणाची पहिली प्रतिक्रिया बंड करण्याचीच असते.

*

ज्या ज्या वेळी प्राणिक भेसळ पृष्ठभागावर येईल त्या प्रत्येक वेळी तुम्ही तिला नकार दिला पाहिजे. जर तुम्ही या नकाराबाबत दृढ राहिलात तर, त्यामुळे त्या प्राणिक भेसळीची ताकद कमी कमी होत जाईल आणि अंततः नाहीशी होईल. …ती भेसळ म्हणजे जुन्या क्रियांचे हट्टीपणाने पण अतार्किकतेने आणि यांत्रिकतेने टिकून राहणे असते. खरे तर अशाच पद्धतीने या गोष्टी टिकून राहण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही त्यांना नव्याने खतपाणी दिले नाहीत तर या गोष्टी निघून जाणेच क्रमप्राप्त असते.

– श्रीअरविंद
(SABCL 23 : 601 – 602)

समर्पण – ४४

साधनेमध्ये तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ज्या शरणागतीविषयी आणि समर्पणाविषयी बोलत आहात ते समर्पण प्रामाणिक, खरेखुरे आणि समग्र असले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या इच्छांची तुमच्या आध्यात्मिक अभीप्सेमध्ये सरमिसळ करत राहाल तोपर्यंत हे होणे शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही कुटुंब, मुलंबाळं किंवा कोणत्यातरी वस्तुशी किंवा कोणाही व्यक्तीबाबतची प्राणिक आसक्ती पोसत राहाल तोपर्यंत प्रामाणिक, खरेखुरे, समग्र समर्पण शक्य नाही. तुम्हाला योगसाधना करायची असेल तर आध्यात्मिक सत्य ग्रहण करणे आणि तुमच्या विचारांद्वारे, भावनांद्वारे, कृतींद्वारे आणि तुमच्या प्रकृतीद्वारे त्या सत्याचे आविष्करण करणे ही तुमची एकच एक इच्छा आणि अभीप्सा असली पाहिजे. तुम्ही कोणाही बरोबरच्या कोणत्याही नातेसंबंधांबद्दल आसक्ती बाळगता कामा नये. साधकाचे इतरांबरोबर असलेले नातेसंबंध हे साधकासाठी अंतरंगातून आलेले असले पाहिजेत, जेव्हा साधकाला खरी चेतना गवसलेली असेल आणि जेव्हा तो साधक प्रकाशात राहत असेल तेव्हा हे नाते निर्माण झाले पाहिजे. असे नातेसंबंध हे अतिमानसिक सत्यानुसार, दिव्य जीवनासाठी आणि दिव्य कार्यासाठी, दिव्य मातेच्या शक्तीने आणि इच्छेने त्या साधकाच्या अंतरंगामधूनच निर्धारित केलेले असतील. हे नातेसंबंध त्याच्या मनाने आणि त्याच्या प्राणिक इच्छांनी निर्धारित केलेले असता कामा नयेत.

…तुमचा चैत्य पुरुष हा श्रीमाताजींना आत्मदान करण्याच्या, तसेच सत्यामध्ये जीवन जगण्याच्या आणि सत्यामध्येच वृद्धिंगत होण्याच्या क्षमतेचा आहे; परंतु तुमचे कनिष्ठ प्राणिक अस्तित्व हे आसक्ती, संस्कार आणि इच्छांच्या अशुद्ध स्पंदनांनी पूर्ण व्यापलेले आहे आणि तुमचे बाह्यवर्ती शारीरिक मन हे त्याच्या अज्ञानमूलक कल्पना, सवयी सोडून देऊ शकत नाहीये, आणि सत्याप्रत खुले होऊ शकत नाहीये. …जर तुम्हाला ते खरोखर हवे असेल, म्हणजेच केवळ तुमच्या चैत्य पुरुषाला नव्हे तर ते तुमच्या शारीर-मनाला आणि तुमच्या संपूर्ण प्राणिक प्रकृतीलादेखील हवे असेल तर उपरोक्त अज्ञानमूलक कल्पना, सवयी इ. सर्व गोष्टींपासून केवळ श्रीमाताजीच तुम्हाला मुक्त करू शकतील.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 141-142)

समर्पण – ४३

एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे आणि ठरवली पाहिजे : ती अशी की, खरा ईश्वर जसा आहे तसा तो तुम्हाला हवा आहे की, तो जसा असावा अशी तुमची त्याच्याबद्दलची जी कल्पना आहे, त्याच्याशी मिळताजुळता असणारा असा तो तुम्हाला हवा आहे.

ईश्वराला तुम्ही जसे असावयास हवे आहात तसे बनण्याचे आणि तुम्ही जे करणे त्याला अपेक्षित आहे, ते तुम्ही त्याच्या इच्छेनुसार करण्याचे ठरवले आहे का?

तुम्हाला पाहिजे तसे, तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार ईश्वराने करावे व वर्तावे असे तुम्हाला वाटते? का तुम्ही ईश्वराप्रत प्रामाणिकपणाने आणि समग्रतेने समर्पण करण्याचे ठरवले आहे?

– श्रीमाताजी
(CWM 14 : 113)

समर्पण – ४२

…आयुष्यात निदान एकदा तरी, आपल्याबाबतीत अशी परिस्थिती येते की जेव्हा ईश्वरी इच्छेप्रत संपूर्ण समर्पण करण्यासाठी आपण तयार आहोत की नाही, याची परीक्षा होते; आपण ईश्वरत्वाच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या आविष्करणासाठी धडपणारे मानव आहोत का याची परीक्षा होते; परमोच्च विजयासाठी जगातील यच्चयावत सर्व गोष्टींचा म्हणजे ज्या आपल्याला खराब वाटतात किंवा ज्या आपल्याला चांगल्या वाटतात अशाही सर्व गोष्टींचा, परित्याग करण्याची तुमची तयारी आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी आयुष्यात अशी परिस्थिती येत असते. आपल्या बाह्य दुर्बलता आणि दोष यांच्यापेक्षा आपले गुण आणि आपली कर्तव्यं – म्हणजे असे म्हणता येईल की, आपले मानसिक पूर्वग्रह आणि अग्रक्रम, हे शिखरावर जाण्याच्या या आरोहणामध्ये, मार्गावर वाट अडवून उभे राहतात. एखादी त्रुटी ही नेहमीच उड्डाणफळी म्हणून वापरता येते पण गुण मात्र बरेचदा एक मर्यादा बनून, एक अडथळा बनून समोर उभे ठाकतात, त्यांना ओलांडूनच पुढे जावे लागते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 113)