विचार शलाका – २३

समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic) प्रतिसाद देत आहे आणि उच्चतर मानसिक अंग स्वीकार करत आहे किंवा अगदी आंतरिक प्राणिक अंग शरणागत होत आहे आणि आंतरिक शारीरिक चेतनेला प्रभाव जाणवत आहे, फक्त एवढेच पुरेसे नाही. अस्तित्वाचा कोणताही घटक असा असता कामा नये, अगदी अत्यंत बाह्यवर्ती भागसुद्धा असा असता कामा नये की जो स्वतःला अलग राखत आहे, शंका, गोंधळ आणि डावपेच यांच्या मागे काहीतरी दडवून ठेवत आहे, किंवा एखादा भाग बंड करत आहे किंवा नकार देत आहे, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – १३

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या रात्रींविषयी जागरूक होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊया. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागरूक बनावे अशी ‘ईश्वरा’ची इच्छा असेल तेव्हा मी जागरूक होईन.” दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ‘ईश्वरा’ला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल आणि तुम्ही म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागरूक होईन.” येथे तुम्ही, तसे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ‘ईश्वरार्पण’ करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागरूक बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ‘ईश्वरी’ संकल्पाद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते. तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नव्हे तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही असते पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे जे काही परिणाम असतील ते स्वीकारणे म्हणजे समर्पण. अगदी ते परिणाम तुम्ही जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण. या उलट दुसरीकडे, जर तुमचे समर्पण निष्क्रिय असेल तर तुम्ही काहीच करणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, धडपड करणार नाही; तुम्ही सुखाने झोपी जाल आणि चमत्कार घडण्याची वाट पाहत राहाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19)

समर्पण – ५९

हातचे काहीही राखून न ठेवता, स्वत:च्या सर्व घटकांनिशी जे स्वत:ला ‘ईश्वरा’स समर्पित करतात अशा साधकांना, ‘ईश्वर’ स्वत:लाच देऊन टाकतो. अशा साधकांना स्थिरता, प्रकाश, शक्तीसामर्थ्य, परमानंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता आणि आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

समर्पण – ५८

या योगामध्ये दोन प्रक्रिया असतात, आणि त्यामध्ये एक संक्रमण-अवस्था असते; या योगाचे दोन कालावधी असतात – एक समर्पणाची प्रक्रिया आणि त्याचा परिणामस्वरूप असणारा, कळसाध्याय!

योगसाधनेचा पहिला टप्पा : पूर्वतयारी

पहिल्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती तिच्या घटकांमध्ये दिव्यत्वाचे ग्रहण करता यावे म्हणून स्वतःला तयार करत असते. या पहिल्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांच्या माध्यमाद्वारेच कार्य करावे लागते, परंतु त्या प्रयत्नांना वरून अधिकाधिक प्रमाणात साहाय्य मिळत असते.

परंतु ह्या प्रक्रियेच्या पुढच्या संक्रमण-अवस्थेच्या टप्प्यावर आपले वैयक्तिक आणि त्यामुळे अर्थातच अज्ञानग्रस्त प्रयत्न हे पुढेपुढे अपुरे पडू लागतात आणि मग तेथे उच्चतर प्रकृती कार्यरत होते; शाश्वत शक्ती ही मर्त्यतेच्या या मर्यादित रूपामध्ये अवतरित होते आणि क्रमाक्रमाने त्याचा ताबा घेते आणि त्याचे रूपांतरण करते. आधी जी पहिली अटळ अशी क्रिया होती, त्या कनिष्ठ क्रियेची जागा आता दुसऱ्या कालावधीमध्ये एका अधिक श्रेष्ठ अशा क्रियेद्वारे घेतली जाते; परंतु जेव्हा आत्म-समर्पण हे पूर्णत्व पावते तेव्हाच हे घडून येते.

आपल्यामधील अहंभावात्मक पुरुष स्वतःच्या शक्तीने किंवा इच्छेने किंवा ज्ञानाने किंवा स्वतःच्या कोणत्याही गुणाने स्वतःचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये करू शकत नाही; तो फार फार तर एवढेच करू शकतो की, तो स्वतःला रूपांतरणासाठी योग्य बनवू शकतो आणि तो जे बनण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याला अधिकाधिक समर्पण करू शकतो. जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार कार्यरत आहे तोपर्यंत आपली वैयक्तिक कृती ही स्वरूपतः नेहमीच अस्तित्वाच्या कनिष्ठ श्रेणींचा एक भाग असणार आणि ती तशी असणेच आवश्यक असते; ती धूसर किंवा अर्ध-प्रकाशित असते, ती तिच्या क्षेत्रामध्ये मर्यादित आणि तिच्या सामर्थ्यामध्ये अगदीच अंशतः प्रभावी असते.

आपल्या प्रकृतीमध्ये नुसते झगमगते परिवर्तन न घडविता, आध्यात्मिक रूपांतरण घडवायचे असेल तर, आपल्या व्यक्तिगत अद्भुत कार्यामध्ये प्रभावशाली व्हावे म्हणून आपण ‘दिव्य शक्ती’ला आवाहन केले पाहिजे; कारण आवश्यक असणारे अमर्याद, सर्वज्ञ, निर्णायक सामर्थ्य फक्त तिच्याकडेच असते. मात्र मानवी वैयक्तिक कृतीची जागा संपूर्णतया दिव्यत्वाने घेणे ही गोष्ट एकाएकी घडणे पूर्णपणे शक्य नसते. खालून होणारी सर्व लुडबुड की जी उच्चतर कृतीच्या सत्याला खोटे ठरविते, त्या लुडबुडीचा प्रथम प्रतिबंध केला पाहिजे किंवा ती अगदी नि:सत्त्व केली पाहिजे. आणि ही गोष्ट स्वेच्छेने केली पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीचे मिथ्यत्व आणि सारे आवेग यांना सातत्यपूर्ण, पुनःपुन्हा आणि नेहमीच नकार देणे तसेच आपल्या घटकांमध्ये वृद्धिंगत होणाऱ्या सत्याला आग्रहपूर्वक साहाय्य करणे हे आपल्याकडून अपेक्षित आहे. कारण क्रमाक्रमाने स्थिरावत जाणाऱ्या आपल्या प्रकृतीला आणि येणारा बोधक ‘प्रकाश’, ‘शुद्धता’ आणि ‘शक्ती’ टिकून राहण्यासाठी, त्यांच्या विकसनासाठी आणि त्यांच्या अंतिम परिपूर्णत्वासाठी, आपण त्यांचा मुक्तपणे स्वीकार करण्याची आवश्यकता असते; तसेच त्यांच्या विरोधात जे जे काही असेल, किंवा त्यांच्यापेक्षा जे जे काही गौण असेल किंवा त्यांच्याशी जे मिळतेजुळते नसेल त्याला आपण हट्टाग्रहाने नकार देणेच आवश्यक असते.

स्वतःची तयारी करण्याच्या या पहिल्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या या कालावधीमध्ये, आपण ज्याच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो त्या ‘दिव्यत्वा’वर आपल्या समग्र अस्तित्वाचे एककेंद्रीकरण करणे आणि त्याचाच स्वाभाविक परिणाम म्हणून, या ‘दिव्यत्वाचे खरे सत्य’ नसलेले असे जे जे काही आहे, त्याला घालवून देणे (katharsis), त्याला सातत्यपूर्ण नाकारणे, ही पद्धत आपण उपयोगात आणणे आवश्यक असते. आपण जे काही आहोत, आपण जो विचार करतो, आपल्याला जे संवेदित होते किंवा आपण जे काही करतो त्या साऱ्याचे संपूर्ण आत्मनिवेदन म्हणजे या प्रयत्नसातत्याचा परिणाम असेल. आपल्या या आत्मनिवेदनाची परिणती अंतिमतः त्या ‘परमोच्चा’प्रत केलेल्या संपूर्ण आत्मदानामध्ये झाली पाहिजे; कारण समग्र प्रकृतीचे सर्वसमावेशक निःशेष समर्पण म्हणजे त्याच्या पूर्णत्वाची खूण असेल; त्याचा मुकुटमणी असेल.

योगसाधनेचा दुसरा टप्पा : संक्रमण अवस्था

योगसाधनेच्या दुसऱ्या टप्प्यात, मानव आणि ईश्वरी कार्यकारित्व यांच्या संक्रमणामध्ये, एक चढतीवाढती, परिशुद्ध झालेली आणि सावध निष्क्रियता वाढीस लागलेली आढळेल; अन्य कोणत्याही शक्तीला नव्हे तर, केवळ ‘दिव्य शक्ती’ला अधिकाधिक प्रकाशमान असा दिव्य प्रतिसाद मिळताना आढळेल; आणि त्याचा परिणाम म्हणून वरून, एक महान आणि जागरूक चमत्कारसदृश्य कार्यकारितेचा चढतावाढता प्रवाह अनुभवास येईल.

योगसाधनेचा अंतिम टप्पा : दिव्यत्वाचे फूल उमलणे

अंतिम कालावधीमध्ये कोणतेही प्रयत्न शिल्लक राहात नाहीत, कोणतीही ठरावीक पद्धत असत नाही, कोणती ठरावीक साधना असत नाही; प्रयत्न आणि तपस्या या दोहोंची जागा, पार्थिव प्रकृतीच्या परिशुद्ध झालेल्या आणि परिपूर्ण झालेल्या कळीमधून एका नैसर्गिक, शुद्ध, शक्तिशाली आणि आनंददायी दिव्यत्वाचे फूल उमलण्याने घेतली जाईल. योगसाधनेच्या क्रियेचे हे स्वाभाविक टप्पे आहेत.

या प्रक्रिया नेहमीच, अगदी एकापाठोपाठ एक याच क्रमाने घडतात, असे नाही. पहिली प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरुवात झालेली असते; दुसरी प्रक्रिया पूर्णत्वाला जाईपर्यंत पहिली प्रक्रिया आंशिक रूपात चालू राहते; अंतिम दिव्य कार्यकारकत्व अंतिमतया सुस्थिर होण्यापूर्वी आणि प्रकृतीसाठी ते सामान्य होण्यापूर्वी, एक अभिवचन या स्वरूपात ते वेळोवेळी आविष्कृत होत राहते. व्यक्तीला तिच्या वैयक्तिक परिश्रमामध्ये आणि प्रयत्नामध्येसुद्धा दिशादर्शन करणारे असे, त्या व्यक्तीपेक्षा अधिक उच्चतर आणि अधिक महान असे काहीतरी नेहमीच असते. कनिष्ठ प्रकृतीच्या अप्रत्यक्ष नियंत्रणापासून व्यक्तीच्या सर्व घटकांसहित समग्र प्रकृतीची परिशुद्धता होण्यापूर्वीसुद्धा पुष्कळ आधीपासून व्यक्तीला पडद्यामागून मिळणाऱ्या या महत्तर मार्गदर्शनाची जाणीव होऊ शकते; व्यक्तीला काही कालावधीसाठी त्याची पूर्णपणे जाणीव होऊ शकते, तसेच व्यक्तीच्या अस्तित्वाच्या काही भागांना तर ही जाणीव कायमस्वरूपी होऊ शकते. तसेच, कधीकधी ती व्यक्ती अगदी आरंभापासूनसुद्धा याबाबत सजग असू शकते; जरी इतर घटक नाहीत तरी, व्यक्तीचे मन आणि हृदय हे या पकड घेणाऱ्या आणि मर्मभेदक अशा मार्गदर्शनाला एका विशिष्ट प्रारंभिक पूर्णतेनिशी योगसाधनेच्या अगदी पहिल्या पायरीपासूनच प्रतिसाद देऊ शकतात. परंतु जसजसा हा अंतिम टप्पा नजिक येऊ लागतो तसतसा, महान थेट नियंत्रणाच्या सातत्यपूर्ण, परिपूर्ण आणि एकसमान कृतीमुळे या संक्रमण-अवस्थेमध्ये आणि अंतिम टप्प्यामध्ये अधिकाधिक भेद पडू लागतो. आपल्यापुरतेच व्यक्तिगत नसलेल्या, या महत्तर दिव्यतर मार्गदर्शनाचे हे प्राबल्य म्हणजे व्यक्तीची प्रकृती ही समग्र आध्यात्मिक रूपांतरणासाठी चढत्यावाढत्या प्रमाणात परिपक्व होत चालली आहे याचे निदर्शक असते. आत्म-निवेदन हे फक्त तत्त्वतःच नव्हे तर कृतीमध्ये आणि शक्तीमध्येसुद्धा स्वीकारले गेले आहे, याचे हे अचूक लक्षण असते. निवडलेल्या, विस्मयकारी प्रकाशाच्या, शक्तीच्या आणि आनंदाच्या मानवी पात्रावर परमेश्वराने आपला प्रकाशमान वरदहस्त ठेवल्याची ती खूण असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 86-88)

समर्पण – ५७

प्रश्न : आपले समर्पण हे समग्र आहे किंवा नाही हे व्यक्तीला कसे समजेल?

श्रीमाताजी : मला तरी यात काही अवघड आहे असे वाटत नाही. व्यक्तीने एक छोटासा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. एखादा असे म्हणू शकेल की, “मी ‘ईश्वरा’ला समर्पित झालो आहे, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने ठरवावी अशी माझी इच्छा आहे, बघू या.” तेव्हा हा तुमचा आरंभबिंदू असतो.

अजून एक छोटासा प्रयोग लक्षात घेऊ : समजा ईश्वर ठरविणार आहे की, अमुक अमुक गोष्ट घडणार आहे आणि नेमकी ती तुमच्या भावनांच्या विरोधात जाणारी असेल. तर अशा वेळी व्यक्ती स्वत:लाच म्हणते, “जर ईश्वराने मला, ‘तू अमुक अमुक गोष्ट सोडून द्यायची आहे’ असे सांगितले तर?…’’ – तुमची प्रतिक्रिया काय होते ते लगेच पाहा, तुम्हाला स्पष्टपणे कळून चुकेल; जर त्यामुळे आतमध्ये काहीतरी टोचणी लागली असेल तर तुम्ही स्वत:ला असे सांगू शकता, “समर्पण अजून परिपूर्ण झालेले नाही” – कारण आत कोठेतरी रुखरुख लागलेली आहे, आत काहीतरी ठुसठुसत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 345-346)

समर्पण ५६

प्रश्न : ‘ईश्वरा’प्रत समर्पण केल्याचा साधकाने जो निश्चय केलेला असतो त्याचा, त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काही परिणाम झाला आहे, हे दर्शविणारे लक्षण कोणते ?

श्रीमाताजी : समर्पणाच्या निश्चयातून काही विशिष्ट असे परिणाम दिसून येतात, असे श्रीअरविंद म्हणतात. पहिला परिणाम म्हणजे कोणताही प्रश्न उपस्थित न करता, अगदी सहजतेने (ईश्वराचे) आज्ञाधारक बनणे आणि दुसरा परिणाम म्हणजे, ‘ईश्वरा’च्या प्रभावाखेरीज इतर सर्व प्रभाव नाकारण्याची शक्ती असणे. हे फार मोठे परिणाम आहेत. एखाद्या व्यक्तीने जर या गोष्टी साध्य केलेल्या असतील तर, ती व्यक्ती आधीपासूनच बऱ्यापैकी प्रगत दशेत आहे, असे समजावे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 129)

समर्पण ५५

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया चांगल्या रीतीने सुरू झालेली असली तरीदेखील, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वरी अस्तित्व’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते – त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

समर्पण – ५४

कोणताच मार्ग हा पूर्णतः सोपा नसतो आणि समर्पणाच्या मार्गाबाबत सांगायचे तर, खरेखुरे आणि संपूर्ण समर्पण करणे हीच एक मोठी अवघड गोष्ट असते. परंतु एकदा का ते घडून आले की मग त्यामुळे गोष्टी निश्चितपणे अधिक सोप्या होतात – म्हणजे या साऱ्या गोष्टी क्षणार्धात घडून येतात असे नाही किंवा अडीअडचणी नाहीशा होतात असेही नाही; पण तेथे एक प्रकारची आश्वासकता असते, एक आधार असतो, आणि एक तणावरहितता असते की जी प्रतिकाराच्या वाईटातल्या वाईट रूपांपासून स्वातंत्र्य प्रदान करते आणि चेतनेला शांती तसेच सामर्थ्य प्रदान करते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 81-82)

समर्पण – ५३

समर्पण नसेल तर संपूर्ण अस्तित्वाचे रूपांतरण शक्य नाही.

– श्रीअरविन्द
(CWSA 29 : 79)

*

आपल्याला शारीर चेतनेचा त्याग नव्हे तर, तिचे रूपांतरण करायचे आहे. आणि म्हणूनच, येथे श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा मार्ग सुचविला आहे. तो मार्ग आहे ‘ईश्वरा’प्रत समर्पणाचा मार्ग – शारीरिक क्रिया आणि शारीरचेतना यांचा समावेश करून घेणारा, क्रमाक्रमाने परिपूर्ण होत जाणाऱ्या समर्पणाचा मार्ग त्यांनी सुचविला आहे. आणि व्यक्ती जर त्यामध्ये यशस्वी झाली तर, शरीर हे अडथळा बनण्याऐवजी ते साहाय्यक ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 300)

समर्पण – ५२

तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण करायचे ठरविलेले असते, तसा निर्णय तुम्ही घेतलेला असतो. परंतु तुमच्या बाबतीत अचानक, काहीतरी असुखद असे घडते, अनपेक्षित असे घडते आणि तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया ही विरोध करण्याचीच असते. परंतु तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण केलेले असते, तुम्ही एकदाच कायमचे म्हटलेले असते की, “आता माझे जीवन हे ईश्वराचे आहे.” आणि मग अचानक एखादा अतिशय असुखद प्रसंग घडतो (आणि तसा तो खरोखरच घडू शकतो.) आणि मग तुमच्यामधीलच असा एखादा घटक की ज्याला समर्पण नको असते, तो घटक विरोधी प्रतिक्रिया देतो. परंतु इथे, जर तुम्हाला तुमच्या अर्पणाच्याबाबतीत खरेखुरे तर्कशुद्ध राहायचे असेल तर तुम्ही तो असुखद प्रसंग पुढे आणला पाहिजे आणि तो सुद्धा ईश्वरार्पण केला पाहिजे आणि त्या ईश्वराला अतीव प्रामाणिकपणे म्हटले पाहिजे की, “तुझीच इच्छा पूर्ण होवो; जर तू त्या पद्धतीने ठरविले असशील, तर ते त्या पद्धतीनेच घडेल.” अशी स्वेच्छापूर्वक आणि उत्स्फूर्त निष्ठा पाहिजे, आणि म्हणूनच हे अतिशय अवघड आहे.

ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेतली होती, पण जी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही, अशा अगदी लहानातील लहान गोष्टीबाबत सुद्धा, विरोधी प्रतिक्रिया येण्याऐवजी तुम्ही अगदी आपोआपच, दुर्दम्यपणे, दोन पावले मागे जाता आणि म्हणता, “नाही, विरोध करता कामा नये.” – जर तुम्ही संपूर्ण समर्पण केले असेल, अगदी समग्र समर्पण केले असेल, तर विरोधी प्रतिक्रिया उमटत नाही. सुखद प्रसंगाबाबत जितके तुम्ही अविचल, शांत, स्थिरचित्त असता, तितकेच तुम्ही असुखद प्रसंगाबाबतदेखील अविचल, शांत, स्थिरचित्त असता. जर एखादी गोष्ट अमुक एका प्रकारे घडली तर बरे होईल, अशी तुमची कल्पना असू शकते, पण जर का ती काही वेगळ्याच पद्धतीने घडली तरी, हे योग्यच झाले, असे तुम्हाला वाटते.

उदाहरणार्थ, तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतलेली असते, काहीतरी घडावे म्हणून, तुम्ही पुष्कळ वेळ दिलेला असतो, तुमची बरीच ऊर्जा, बरीचशी इच्छाशक्ती वापरलेली असते; परंतु, हे सारे ईश्वरी कार्यासाठी खर्च केलेले असते. (याला म्हणतात, अर्पण.) आता असे समजूया की, एवढे सगळे कष्ट घेतल्यानंतर, एवढे सगळे कार्य केल्यानंतर, एवढे सारे प्रयत्न केल्यानंतरही, ती गोष्ट अगदी वेगळ्याच पद्धतीने घडून आली, म्हणजे त्यात यश आले नाही. जर तुम्ही खरोखर समर्पित असाल तर अशा वेळी तुम्ही म्हणाल, “चांगले झाले, हे योग्यच आहे. मला जे करता येणे शक्य होते ते सारे मी केले, जितक्या चांगल्या पद्धतीने करता येणे शक्य होते तितके चांगले केले, आता हा माझा निर्णय नाही, हा ईश्वराचा निर्णय आहे, त्याने जे काही ठरविले आहे ते मी पूर्णतया स्वीकारत आहे.” आणि तेच जर दुसऱ्या बाजूला, जर तुम्ही प्रगाढ आणि सहजस्फूर्त असे समर्पण केलेले नसेल तर तुम्ही स्वतःशीच म्हणता, “हे असे कसे झाले? मी निःस्वार्थीपणे ही गोष्ट केली होती, त्याच्यासाठी इतके कष्ट उपसले होते, त्रास सहन केला होता, तो ईश्वरी कार्यासाठी सहन केला होता आणि आता हे असे फळ पदरी पडले, यश मिळालेच नाही.” शंभरापैकी नव्याण्णव वेळा तरी असेच घडते. म्हणूनच खरेखुरे समर्पण ही खूप अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 52-53)