चार शारीरिक सिद्धी
पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०९
हठयोग
लघिमा, अणिमा, गरिमा आणि महिमा या चार शारीरिक सिद्धींचा विकास करून, त्यायोगे शारीरिक प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेणे, हे हठयोगाचे दुसरे उद्दिष्ट असते.
‘लघिमे’च्या योगे मनुष्य, त्याचे प्राकृतिक तत्त्व असल्याप्रमाणे वाऱ्यावर स्वार होऊन, हवेमध्ये विहार करू शकतो.
परिपूर्ण ‘अणिमे’च्या योगे, व्यक्ती सूक्ष्म देहाची प्रकृती ही स्थूल देहामध्ये उतरवू शकते. त्यामुळे अग्नी त्याला जाळू शकत नाही, शस्त्रास्त्रांचे घाव त्यावर बसू शकत नाहीत, हवेविना गुदमरायला होत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही.
परिपूर्ण ‘गरिमा’ सिद्धीच्या योगे, ज्यामुळे हिमस्खलनाचा धक्काही बसणार नाही अशा प्रकारची दृढ स्थिरता व्यक्ती विकसित करू शकते.
परिपूर्ण ‘महिमा’ सिद्धीच्या योगे तो, आपल्या स्नायूंचा विकास न करताही, हर्क्युलसपेक्षाही अधिक पराक्रम करू शकतो.
या अशा प्रकारच्या सिद्धी आता पूर्णतेने माणसांमध्ये पाहावयास मिळत नाहीत परंतु हठयोगातील सर्व योग्यांकडे काही अंशी त्या असायच्या. जी व्यक्ती थोडीशी का होईना, परंतु योगसाधनेमध्ये खोलवर गेलेली आहे किंवा ज्या व्यक्तीने सिद्धींचा व्यक्तिशः अनुभव घेतलेला आहे, अशी कोणतीही व्यक्ती त्यांच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करू शकणार नाही.
ज्याला तप किंवा वीर्य किंवा योगाग्नी असे म्हणण्यात येते, ती योगिक शक्ती देहामध्ये विकसित करणे, हे हठयोगाचे तिसरे उद्दिष्ट असते. शरीरातील सगळी वीर्य शक्ती मेंदूपर्यंत ओढणे आणि शरीराच्या शुद्धीसाठी आणि शरीराचे विद्युतीभवन होण्यासाठी आवश्यक असेल, तेवढीच ती शक्ती खाली उतरविणे, म्हणजे ‘ऊर्ध्वरेत बनणे’ हे हठयोगाचे चौथे उद्दिष्ट असते.
– श्रीअरविंद
(CWSA 01 : 504-505)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







