एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज
दि.०१ नोव्हेंबर १९५४
(श्रीअरविंदांनी ज्याला ‘एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज’ असे म्हटले होते त्या ध्वजाची मूळ संकल्पना श्रीमाताजींची आहे. निळ्या रंगाच्या चौरसाकृतीच्या मध्यभागी सुवर्णरंगातील श्रीमाताजींचे बोधचिन्ह हे त्या ध्वजाचे स्वरूप आहे.)
श्रीमाताजींनी त्यासंबंधी दिलेला संदेश असा : “आज ०१ नोव्हेंबर, आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे. आमच्याकडे एक ध्वज आहे ज्याला श्रीअरविंद यांनी ‘एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज’ असे संबोधले आहे. त्याचा चौरस आकार, त्याचा रंग आणि त्यावरील प्रत्येक तपशील यांना एक प्रतीकात्मक अर्थ आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्याचे ध्वजारोहण झाले होते. आता या फ्रेंच वसाहती भारताबरोबर एकसंघ झाल्यामुळे, ०१ नोव्हेंबर १९५४ रोजी परत ध्वजारोहण करण्यात येईल. भविष्यात जेव्हा जेव्हा भारत स्वतःचे भूभाग पुनर्प्राप्त करेल तेव्हा तेव्हा असे ध्वजारोहण केले जाईल. या जगामध्ये एकात्म भारताला एक विशेष कामगिरी पूर्ण करायची आहे. श्रीअरविंदांनी स्वत:चे समग्र जीवन त्यासाठी व्यतीत केले आणि तेच करण्यासाठी आम्हीसुद्धा कटिबद्ध आहोत.”
एका प्रसंगी बोलताना श्रीमाताजी म्हणाल्या होत्या, ”आमच्यासाठी हा ध्वज म्हणजे पुनरुज्जीवित, एकात्म आणि विजयी भारताचे प्रतीक आहे. असा भारत, जो गुलामगिरीची सारी बंधने झुगारून, शतकांची निद्रा झटकून जागा होत आहे, पुन्हा एकदा एक महान आणि एकात्म भारत म्हणून तो उदयाला येणार आहे, त्यासाठी नवजन्माच्या साऱ्या यातनाही त्याने सोसल्या आहेत, अशा भारताने आत्म्याच्या सर्वश्रेष्ठ आदर्शाकडे जगाला घेऊन जायचे आहे.”
निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण रंगातील बोधचिन्ह या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, “भारताच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा हा ध्वज आहे आणि या जीवनकार्याच्या परिपूर्तीमध्येच भारताची एकात्मता साध्य होणार आहे.”
– श्रीमाताजी (CWM 13 : 354; 12 : 260; 13 : 352)
- एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज - November 2, 2026
- भारताच्या नागरिक श्रीमाताजी - November 1, 2026
- सत्याचा मानदंड - October 31, 2026






