भारताची अग्निपरीक्षा
दि.०३.०६.१९४७
(भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबेटन यांनी ०२ जून १९४७ रोजी रेडिओवरून एक भाषण दिले होते. त्यामध्ये भारत-पाकिस्तान फाळणीचा आणि भारताच्या काही विशिष्ट प्रांतांची हिंदू व मुस्लीम राज्यांमध्ये विभागणी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हे प्रसारण ऐकल्यानंतर श्रीमाताजींनी पुढील उद्गार काढले होते.)
भारताच्या स्वातंत्र्याची सुव्यवस्था लावण्याबाबत आपल्या ज्या अडचणी आहेत त्यावर तोडगा म्हणून एक प्रस्ताव आपल्यासमोर ठेवण्यात आला आहे आणि खेदाने व जड अंतःकरणाने भारतीय नेत्यांकडून तो स्वीकारला गेला आहे.
परंतु (नियतीकडून) आपल्यासमोर हा प्रस्ताव का ठेवण्यात आला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तर, आपल्या भांडणतंट्यांमधील निरर्थकता कळावी म्हणून हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
आपल्याला हा प्रस्ताव स्वीकारणे का भाग पडले, हे तुम्हाला माहीत आहे का? कारण आपल्या भांडणतंट्यांमधील निरर्थकता आपली आपल्यालाच कळावी म्हणून, आपल्याला हा प्रस्ताव स्वीकारणे भाग पडले आहे.
हे उघडच आहे की, हा काही उपाय असू शकत नाही. ही परीक्षा नाही, तर अग्निपरीक्षा आहे. आपण जर आपल्या पूर्ण प्रामाणिकतेनिशी त्या परीक्षेस सामोरे गेलो तर एक गोष्ट सिद्ध होईल की, भारताचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करून आपण त्याची एकता आणि महानता संपादन करू शकणार नाही; एकमेकांच्या विरोधात उभे ठाकून आपण समृद्धी संपादन करू शकणार नाही; किंवा एका सिद्धान्तांच्या विरोधात दुसरा सिद्धान्त मांडून, आपण सत्यधर्माची सेवा करू शकणार नाही. काहीही असले तरी, भारताचा आत्मा एकसंध आहे. एकात्म आणि अखंड भारताविषयी बोलण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु तोपर्यंत आपण “भारताचा आत्मा चिरायू होवो,” असा उद्घोष करत राहू या.
*
दि. ०६.०६.१९४७
भारताचा आत्मा एक आहे आणि अविभाज्य आहे. भारत जगातील स्वत:च्या नियतकार्याबाबत सचेत आहे. पण तो आविष्करणाच्या बाह्य माध्यमांची वाट पाहात आहे.
– श्रीमाताजी (CWM 13 : 351)
- भारताची अग्निपरीक्षा - October 28, 2026
- भारतमातेला केलेले अभिवादन - October 12, 2026
- अनंत व चिरंतन किरणांचे आविष्करण - October 6, 2026





