भविष्यकालीन विश्वधर्माचा पाया

 

(दि. १९.०६.१९०९)

हिंदुधर्म हा सर्वाधिक चौकस आणि सर्वाधिक विश्वासार्ह आहे. तो चौकस आहे असे म्हणण्याचे कारण की, हिंदुधर्माने आजवर सर्वाधिक वेळा प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच त्यामध्ये सर्वाधिक प्रयोग करण्यात आले आहेत. तो सर्वाधिक विश्वासार्ह आहे असे म्हणण्याचे कारण की, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण व सकारात्मक आध्यात्मिक ज्ञान आणि सखोल अनुभूती आहे. असा हा विशाल हिंदुधर्म म्हणजे केवळ एक मतप्रणाली वा मतप्रणालींचा समुच्चय नव्हे तर, तो जीवनधर्म आहे. हिंदुधर्म ही केवळ सामाजिक चौकट नव्हे तर, तो भूतकालीन आणि भावी सामाजिक उत्क्रांतीचा आत्मा आहे. तो कशालाही नकार देत नाही, तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यावर व प्रयोग करण्यावर भर देतो; आणि अशा रितीने एकदा का अनुभवांती व प्रयोगांती गोष्टींची पारख झाली की त्या साऱ्याची योजना तो आत्मोद्धारासाठी करतो. अशा या हिंदुधर्मामध्येच भविष्यकालीन विश्वधर्माचा पाया आम्हास आढळतो.

भारताच्या सनातन धर्मामध्ये वेद, वेदान्त, गीता, उपनिषदे, दर्शने, पुराणे, तंत्र असे अनेक धर्मग्रंथ येतात; हा धर्म बायबल वा कुराण यांचाही अव्हेर करीत नाही; पण त्याचा खराखुरा अधिकृत धर्मग्रंथ हा त्याच्या हृदयांत असतो की जेथे चिरंतनाचा निवास असतो. आमच्या स्वत:च्या आंतरिक आध्यात्मिक अनुभूतीमध्येच आम्ही जगभरातील धर्मग्रंथांचा स्रोत आणि त्याचे प्रमाण शोधले पाहिजे; तेथेच आम्ही ज्ञान, प्रेम व आचरण यांचे नियम आणि कर्मयोगाची प्रेरणा व त्याचे अधिष्ठान शोधले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26)

श्रीअरविंद