भारतमातेला केलेले अभिवादन
(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन…)
हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते, हे जननी, एकेकाळी तुझ्या लेकरांनी तुझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत, परकीयांची चाकरी केली, तुझा अव्हेर केला तरीही, नैराश्याच्या त्या घोर अंधकारसमयीदेखील तू तुझ्या लेकरांचा कधीही त्याग केला नाहीस. आता जेव्हा ती जागृत झाली आहेत आणि तुझ्या मुक्ततेच्या या उष:काली तुझ्या मुखावर तेज:प्रभा विलसत आहे, हे माते, अशा या मंगल क्षणी आम्ही तुला अभिवादन करत आहोत.
आज आमच्यासमोर स्वातंत्र्याचे क्षितिज उलगडत आहे. तेच क्षितिज हे विविध राष्ट्रांच्या समूहातील खऱ्या जीवनाचे आणि तुझ्या खऱ्या महानतेचेही क्षितिज व्हावे यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही नेहमी उच्च आदर्शांची कास धरू शकू असा मार्ग आम्हाला दाखव. हे माते, आत्ममार्गावरील अग्रणी आणि अखिल मानवजातीची खरी सुहृद व साहाय्यकर्ती तूच आहेस हे तुझे रूप आम्ही जगासमोर प्रकट करू शकू यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर.
– श्रीमाताजी (CWM 13 : 352)
- भारतमातेला केलेले अभिवादन - October 12, 2026
- अनंत व चिरंतन किरणांचे आविष्करण - October 6, 2026
- तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी - September 29, 2026






