अनंत व चिरंतन किरणांचे आविष्करण

(श्रीमाताजीकृत प्रार्थना)

१० एप्रिल १९१४

अचानकपणे पडदा भेदला गेला आणि समोर विस्तीर्ण क्षितिज खुले झाले आणि त्या स्वच्छ दृश्यासमोर माझ्या समग्र अस्तित्वाने कृतज्ञतेच्या असीम भावनेतून उचंबळून येत, तुझ्या चरणी लोटांगण घातले. हा इतका गहन आणि परिपूर्ण आनंद असतानासुद्धा, सारे काही स्थिर होते, चिरंतनाच्या शांतीनिशी सारे काही शांतशांत होते.

आता कोणत्या मर्यादाच उरलेल्या नाहीत असे मला वाटत आहे. आता मला या देहाची जाणीव होत नाहीये, संवेदना नाहीत, भावना नाहीत, विचार नाहीत; तर एक स्वच्छ, निर्मळ, निःशब्द भव्यता तिच्या प्रेम आणि प्रकाशानिशी माझ्यामध्ये प्रविष्ट झाली आहे, तेथे आता केवळ एक अनिर्वचनीय सौंदर्याने भरून गेलेले अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व म्हणजेच मी स्वतः आहे असे आता मला जाणवत आहे आणि ‘मी स्वतः’ असे म्हणत असताना, त्यामध्ये जो पूर्वीचा स्वार्थी आणि संकुचित ‘मी’ होता, तो तसूभरसुद्धा शिल्लक उरलेला नाही. इतके की, मला आता हे सांगताच येत नाहीये की, ही मी आहे की मी म्हणजे – आमच्या नियतीचा उदात्त स्वामी असणाऱ्या हे प्रभो – तूच आहेस.

असे वाटत आहे की, सर्व काही ऊर्जा, धैर्य, सामर्थ्य, इच्छाशक्ती, अनंत माधुर्य, अतुलनीय करुणा आहे… मला आता केवळ एकाच गोष्टीचे भान आहे, ते म्हणजे स्थिर आणि विशुद्ध भव्यतेचे…

हे प्रभो, तू माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला आहेस. मी तुझ्याकडे ज्याची याचना केली होती ते तू मला दिले आहेस. माझ्यातील ‘मी’ नाहीसा झाला आहे, आता केवळ तुझ्या सेवेसाठी समर्पित केलेले एक सालस, विनम्र साधन आणि तुझ्या अनंत व चिरंतन किरणांचे आविष्करण आणि संघनीकृत झालेले एक केंद्र (centre of concentration) तेवढे शिल्लक आहे. तू माझे जीवन हाती घेतले आहेस आणि ते तुझे बनविले आहेस; तू माझी इच्छाशक्ती हाती घेतली आहेस आणि ती तुझीच बनविली आहेस; तू माझे प्रेम हाती घेतले आहेस आणि तुझ्या प्रेमाशी ते एकरूप केले आहेस; तू माझे विचार हाती घेतले आहेस आणि तुझ्या परिपूर्ण चेतनेने त्यांची जागा घेतली आहे. अचंबित होऊन हा देह, मौन आणि शरणागत भक्तिभावाने तुझ्या चरणधुळीमध्ये नतमस्तक होत आहे. आता अन्य काहीही शिल्लक उरलेले नाही; तुझ्या अपरिवर्तनीय शांतीच्या वैभवानिशी फक्त तूच शिल्लक आहेस.

– श्रीमाताजी (CWM 01 : 123-124)

(ही मालिका आज समाप्त होत आहे.)

श्रीमाताजी