नैराश्यापासून सुटका – ०३
नैराश्यापासून सुटका – ०३
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही, किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याबाबतीत झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.
योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ‘ईश्वर’ हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योगमार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.
तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगाकडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!
– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







