भारताचे पुनरुत्थान – ०२

भारताचे पुनरुत्थान – ०२

१६ एप्रिल १९०७ (दै. बंदे मातरम्) – कलकत्ता

महान आणि प्राचीन भारताच्या गतकालीन गतवैभवाबद्दल अनेक जणं शोक व्यक्त करतात आणि प्राचीन काळातील ऋषी, विचार व सभ्यतेचे प्रेरक निर्माणकर्ते हे जणूकाही आमच्या काळातील वीरयुगाचा एक चमत्कार होते आणि सद्यकालीन क्लेशकारक वातावरणामध्ये आणि अधःपतित माणसांमध्ये अशा लोकांनी पुन्हा जन्मच घेऊ नये, असे म्हणताना आढळतात. परंतु (असे म्हणणे) हा अपराध आहे, त्रिवार अपराध आहे.

आपली भारत भूमी ही शाश्वत भूमी आहे, आपली प्रजा चिरंतन आहे, आपला धर्म सनातन आहे; ज्याचे सामर्थ्य, ज्याची महानता, ज्याचे पावित्र्य हे झाकोळले जाऊ शकेल पण ते कधीच, अगदी एका क्षणभरासाठीसुद्धा पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही. वीरपुरूष, ऋषी, संत हे आपल्या भारत भूमीची नैसर्गिक फलसंपदा आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये असे एकही युग नव्हते की जेव्हा वीरपुरूष, ऋषी, संत-सत्पुरूष जन्माला आले नव्हते. ज्यामधून नवीन भारत उदयास येत आहे असा, ‘वंदे मातरम्’ हा संजीवक मंत्र ज्यांनी (श्री. बंकिमचंद्र चटर्जी यांनी) आपल्याला दिला, त्यांचे नाव उत्तरकालीन युगातील ऋषींच्या नावामध्ये समाविष्ट केले पाहिजे याची जाणीव, अखेरीस का होईना पण आता आपल्याला झाली आहे.

ऋषी आणि संत यांच्यामध्ये फरक असतो. ऋषींचे जीवन कदाचित त्यांच्या श्रेष्ठ पावित्र्यामुळे किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या आदर्श सौंदर्यामुळे ठळकपणे नजरेत भरणार नाही. ते स्वतः काय होते यामुळे नव्हे तर, त्यांनी जे काही अभिव्यक्त केले होते यामुळे ते महान ठरू शकतात. आपल्या राष्ट्राला आणि अखिल मानवतेला एक महान आणि चैतन्यदायी संदेश देण्याची आवश्यकता होती आणि हा संदेश शब्दरूपात साकार करण्यासाठी ‘ईश्वरा’ने त्यांच्या (बंकिमचंद्रांच्या) मुखाची निवड केली आहे. एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा दूरदृष्टीचे प्रकटीकरण होण्याची आवश्यकता होती आणि त्या ‘सर्वशक्तिमान ईश्वरा’ने सर्वप्रथम त्यांची दृष्टी उघडली आहे. त्यांना जी दृष्टी प्रदान करण्यात आली होती, त्यांना जो संदेश प्राप्त झाला होता, तो त्यांनी त्यांच्यामध्ये असलेल्या सर्वसामर्थ्यानिशी, अंतःस्फूर्तीच्या एका परमोच्च क्षणी शब्दांमध्ये अभिव्यक्त करून, संपूर्ण जगासमोर घोषित केला होता. माणसांच्या आंतरतम प्रकृतीला हेलावण्यासाठी, त्यांची मने स्वच्छ करण्यासाठी, त्यांच्या अंत:करणाचा ठाव घेण्यासाठी आणि एरवी, माणसांच्या सामान्य क्षणांमध्ये जे करणे त्यांना अशक्य ठरले असते त्या कृती करण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्या संदेशाचा केवळ उच्चार करणेच पुरेसे होते. त्या शब्दांमध्ये मंत्राचे सामर्थ्य होते, त्या मंत्रवत शब्दांच्या प्रकटीकरणासाठी त्यांचा जन्म झाला होता आणि त्या मंत्राचे ते द्रष्टे होते.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 637)

श्रीअरविंद