साधना, योग आणि रूपांतरण – २२४
अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य करून घेतले आहे त्यांना स्वतःच्या अंतरंगामध्ये असलेल्या, व्यक्तित्वाच्या अगदी गहनतेमध्ये असलेल्या, शाश्वत आणि अनंत जीवनाची जाणीव झालेली आहे आणि ही चेतना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून, त्यांना या आंतरिक अनुभवाशी सातत्याने संबंधितच राहावे लागते, यासाठी त्यांना आंतरिक निदिध्यासामध्ये म्हणजे कमीअधिक प्रमाणात सातत्याने ध्यानामध्ये राहणे आवश्यक असते. आणि जेव्हा ते त्या ध्यानावस्थेमधून बाहेर येतात तेव्हा, (जर त्यांनी संपूर्णपणे कर्मव्यवहार करणे सोडून दिले नसेल तर), त्यांची बाह्यवर्ती प्रकृती आधी जशी होती तशीच असते; त्यांची विचारपद्धती, प्रतिक्रिया देण्याची पद्धती यामध्येदेखील फारसा काही फरक झालेला नसतो.
या उदाहरणाबाबत, हा आंतरिक साक्षात्कार, चेतनेचे हे रूपांतरण, ज्या व्यक्तीने ते साध्य करून घेतलेले असते त्या व्यक्तीपुरतेच उपयोगी असते. त्यामुळे जडद्रव्याच्या किंवा पृथ्वीवरील जीवनाच्या परिस्थितीमध्ये यत्किंचितही फरक होत नाही. समग्र रूपांतरण जर यशस्वी व्हायचे असेल तर, सर्व मनुष्यमात्र, किंबहुना सर्व सजीव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण हेदेखील रूपांतरित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा गोष्टी जशा आहेत तशाच राहतील. व्यक्तिगत अनुभव पार्थिव जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाही. रूपांतरणाच्या जुन्या संकल्पनेमध्ये चैत्य पुरुषाविषयी आणि आंतरिक जीवनाविषयी सचेत होणे अभिप्रेत असते. परंतु, रूपांतरणाची आमची जी संकल्पना आहे, ज्याविषयी आपण बोलत आहोत, ती संकल्पना आणि रूपांतरणाची जुनी संकल्पना यामध्ये हा मूलभूत फरक आहे.
म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कोणता एखादा व्यक्तीसमूह किंवा सर्व मनुष्यमात्र एवढेच नव्हे तर, संपूर्ण जीवन, कमीअधिक विकसित झालेली ही एकंदर जड-भौतिक चेतनाच रूपांतरित झाली पाहिजे. हे असे रूपांतरण घडून आले नाही तर या जगातील सर्व दुःख, सर्व संकटं आणि सर्व अत्याचार आत्ताप्रमाणेच कायम राहतील. काही व्यक्ती त्यांच्यामध्ये झालेल्या आंतरात्मिक विकसनामुळे यातून सुटका करून घेऊ शकतील पण सर्वसाधारण समाज मात्र त्याच दुःखपूर्ण स्थितीमध्ये खितपत पडलेला असेल. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 15 : 293-294)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२५ - January 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२४ - January 16, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२३ - January 15, 2025