(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. आजपासून आपण ते भाषण क्रमश: प्रकाशित करत आहोत.)
१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर ती आशिया आणि अखिल जगासाठी देखील महत्त्वाची आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अगणित क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.
…माझ्या जीवनामध्ये ज्या जागतिक घडामोडी पाहता याव्यात अशी माझी मनीषा होती, (जरी तेव्हा त्या स्वप्नवत वाटत होत्या) त्या मला आजच्या या दिवशी फळाला येताना दिसत आहेत वा त्यांची सुरुवात तरी झाली आहे किंवा त्या त्यांच्या परिपूर्तीच्या मार्गावरती तरी आहेत.
…या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, असे मी व्यक्तीश: जाहीर करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताच्या भावी कार्याचा एक भाग आहेत, या अशा गोष्टी आहेत की जेथे भारताने नेतृत्व करणे आवश्यकच आहे. कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू साध्य व्हावेत किंवा भारताचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही; – अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये – किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर वर्चस्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ईश्वरासाठी व या जगतासाठी साहाय्यक म्हणून जीवन जगण्यासाठी आणि अखिल मानव-वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे.
ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी आहेत :
१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या (civilisation) प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर ते आधारित असेल. ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनापद्धती ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.
५) सरतेशेवटी, उत्क्रांतीची अशी एक नवीन पायरी उदयाला येईल की जी चेतनेचे उच्चतर पातळीवर उन्नयन करेल. आणि त्यायोगे ती – मानवांनी जेव्हापासून विचार करायला आणि व्यक्तिगत परिपूर्णतेची व एका परिपूर्ण समाजरचनेची स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हापासून मानवजातीला अस्तित्वविषयक ज्या अनेकानेक समस्यांनी गोंधळात टाकले होते, अस्वस्थ केले होते – अशा समस्यांचे निराकरण करायला सुरूवात करेल. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 36 : 474-475)
अखिल सृष्टीसाठी असलेल्या दिव्य योजनेमध्ये भारताला मध्यवर्ती भूमिका बजावावी लागणार आहे, हे श्रीअरविंद आणि…
(श्रीमाताजीकृत प्रार्थना) १० एप्रिल १९१४ अचानकपणे पडदा भेदला गेला आणि समोर विस्तीर्ण क्षितिज खुले झाले…
(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण गेले दोन दिवस…
(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण विचारात घेतला. आज…
(कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र आपण काल विचारात घेतले. आज आपण…
(अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, वुड्रो विल्सन यांच्या कन्या कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन या श्रीअरविंद लिखित ‘एसेज…