ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अडचण दूर करण्याचा उपाय

(तुमच्यामध्ये काही बदल घडवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नेमके काय केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

तुमच्यामध्ये समजा एखादा दोष आहे आणि तो तुम्ही दूर करू इच्छित आहात पण तरीही तो जर टिकून राहिला आणि तुम्ही म्हणालात की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर खरंच तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता. कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात. तुमच्या चेतनेशी संबंधित नसलेली अशी कोणतीच गोष्ट तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि ज्या गोष्टी तुमच्या चेतनेशी संबंधित असतात त्यावर तुम्ही निश्चितपणे प्रभुत्व मिळवू शकता.

बाहेरून येणाऱ्या गोष्टी किंवा सूचना यासुद्धा तेवढ्या प्रमाणातच तुम्हाला स्पर्श करू शकतात जेवढ्या प्रमाणात तुमच्या चेतनेने त्यांना संमती दिलेली असते. तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची जडणघडण झालेली असते.

तुम्ही जर असे म्हणाल की, “मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करूनसुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. ‘सगळे करून सुद्धा’, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट ‘जॅक इन द बॉक्स’ या खेळातल्याप्रमाणे अचानक उसळी मारून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते.

म्हणून, तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे-छोटे अंधारे कानेकोपरे शोधून काढले पाहिजेत. त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल. आणि एके काळी तुम्हाला जी गोष्ट अशक्य वाटली होती ती गोष्ट करणे तुम्हाला शक्य होईल. ती फक्त व्यवहार्यच होईल असे नाही, तर ती पूर्णदेखील झालेली असेल.

तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रितीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि ही गोष्ट सर्वच बाबतीत लागू पडते. म्हणजे अगदी शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सर्वत्र सारखीच लागू पडते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 74)

Latest posts by श्रीमाताजी (see all)
श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

खरी समस्या

तुमच्या सचेत अस्तित्वामधील (conscious being) कोणत्या तरी एखाद्या घटकाला तुमच्यामधीलच अमुक एक अडचण (वाईट सवय,…

2 days ago

दृढ निश्चयातून बदल

  (बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी…

3 days ago

बदलास नाखूष असणारा घटक

(स्वत:मध्ये बदल व्हावा असे व्यक्तीला वाटत असले तरी तो बदल का होत नाही याचे कारण…

4 days ago

अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर

  साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते? श्रीमाताजी : सोपे…

5 days ago

बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०३

  (श्रीमाताजींनी बालकांना प्रामाणिकपणाचे महत्त्व कसे समजावून सांगितले, ते आपण कालच्या भागात समजावून घेतले.) मुलांना…

6 days ago

बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०२

(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही…

7 days ago