ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडलेला असलात तरी त्यांना शिरजोर होऊ देऊ नका आणि अशी वेळ येईल तेव्हा, संरक्षण करणाऱ्या दिव्य शक्ती‌चा आश्रय घ्या. तुम्ही नेहमीच असे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहाल तर, पृष्ठभागावर दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या खळबळीमध्ये, गोंधळामध्येसुद्धा जे नेहमीच स्थिर आणि शांतिपूर्ण असते, असे तुमच्या अंतरंगातील काहीतरी खुले होत आहे, असे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 724-725)

(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित सावित्रीया महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती. हुता यांनी सांगितलेली एक आठवण…)

२८ जून १९६८ रोजी श्रीमाताजींनी सावित्रीमधील काही काव्यपंक्तींचे वाचन केले आणि त्याचे विवरण केले; मी ते ध्वनिमुद्रित करून घेतले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवून घेतले आणि मला ध्यान करण्यास सांगितले. मी डोळे मिटते न मिटते तोच, एक असीम शांती माझ्यामध्ये अवतरली आणि माझ्या सर्वांगाला तिने जणू लपेटून घेतले.

काही वेळाने श्रीमाताजींनी डोळे उघडले आणि माझ्याकडे हसून पाहत त्या म्हणाल्या, “तुला मातृमंदिर परिसराच्या मध्यभागी असलेले ते वडाचे झाड माहीत आहे ना? तिथे तू त्या झाडाखाली बसली आहेस आणि त्या झाडाच्या फांद्यांवरून खाली आलेल्या फुलांच्या माळा सर्वत्र तुझ्या आजूबाजूला हलत-डुलत आहेत, असे आत्ता मला ध्यानात दिसले. वरून तुझ्यावर फुलांचा वर्षावसुद्धा होत होता. आणि तू अगदी शांत होतीस.

श्रीमाताजींचा तो दृष्टान्त मी चित्रामध्ये उतरविला. त्यांनी चित्रामध्ये मला काही किरकोळ फेरफार करायला सांगितले आणि त्यानुसार मी ते बदल केले. माझ्या चित्रामध्ये मी काही खारी, एक हरीण आणि ससासुद्धा काढलेला होता, ते सारे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते चित्र पाहून त्या आनंदित झाल्या होत्या. काही काळ चित्त एकाग्र करून नंतर, त्यांनी एका कागदावर पुढील शब्द लिहिले आंतरिक जीवन.श्रीमाताजींनी आंतरिक जीवनाविषयी लिहिले होते की, “व्यक्तीने एकदा आंतरिक जीवनाचे माधुर्य अनुभवले की नंतर मग तिचे इतर कशानेच समाधान होणार नाही.

हिंदू परंपरेमध्ये वडाच्या झाडाला ज्ञानवृक्षअसे म्हणतात. श्रीमाताजींनी या वृक्षाला ऐक्यअसे नाव दिले. या वृक्षाभोवती संगमरवरी आसनं असावीत आणि लोकांनी तिथे बसून शांतपणे ध्यान करावे, अशी इच्छा श्रीमाताजींनी व्यक्त केली होती. आज आपल्याला तेथे तशी व्यवस्था पाहायला मिळते.

आधारित (The spirit of Auroville 79-81)

श्रीमाताजी : मागे एकदा मी तुमच्याशी, मला माहीत असलेल्या एका गूढवाद्याविषयी बोलले होते. तो स्वतःच्या पद्धतीने हुशार मनुष्य होता. लोक त्याच्याकडे येत असत आणि त्याला विचारत असत, “प्रथम आम्हाला हे सांगा की, हे विश्व अस्तित्वात का आहे?”

तो उत्तर देत असे, “त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे?”

त्यावर लोक म्हणत असत, “पण हे विश्व आत्ता जसे आहे, ते तसेच का आहे?”

त्याचे उत्तर ठरलेले असे. तो म्हणत असे की, “आहे हे असे आहे, त्याने तुम्हाला काय फरक पडतो ?”

मग त्यावर लोकं म्हणत असत, “आम्हाला तरी हे काही समाधानकारक वाटत नाही.

(हा किस्सा सांगून झाल्यावर श्रीमाताजी पुढे म्हणतात) …तर ज्यांना हे विश्व समाधानकारक वाटत नाही, त्यांना मी असे म्हणेन की, ”गोष्टी जशा आहेत तशाच आहेत. तुम्ही करण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी तुम्ही काम करायला सुरूवात करा. ते समाधानकारक वाटावे, ते चांगले व्हावे यासाठीचा मार्ग तुम्ही शोधून काढा. येथे काहीतरी काम करण्यासारखे आहे. काम करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की, ते किती रोचक आहे. तुम्ही ज्या द्रव्याने बनला आहात त्या, एका द्रव्याच्या छोट्या समुच्चयाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. अंतरंगामध्ये प्रवेश करा आणि गुरूकिल्ली शोधून काढा. तुम्हाला केवळ अंतरंगामध्ये आत खोलवर जायचे आहे.ते तुमच्या फारच आवाक्याबाहेरचे आहे, ते तुमच्यापेक्षा खूपच विशाल आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुमच्या छोट्याशा व्यक्तित्वाच्या अंतरंगात प्रवेश करा म्हणजे मग, सर्व द्वारे खुली करणारी एक गुरु किल्ली तुम्हाला आतमध्ये सापडेल.”

श्रीमाताजी (CWM 05 : 39-40)

श्री अरविंद एक आठवण सांगत आहेत…

वीस वर्षांपूर्वी नेव्हिनसन (१९०७ साली झालेल्या सुरत काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले एक ब्रिटिश पत्रकार) यांनी घाबरून जाऊन माझ्याविषयी एक विधान केले होते, “भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष – कधीही न हसणारा माणूस.” त्यांनी त्यामध्ये एका वाक्याची भर घालायला हवी होती, “जो नेहमी हास्यविनोद करत असतो.” पण माझा हा पैलू त्यांना माहीत नव्हता कारण मी त्यांच्याबरोबर वावरताना नेहमीच गंभीर असे किंवा कदाचित तेव्हा माझी विनोदबुद्धी पुरेशी विकसित झाली नसेल.

श्रीअरविंद (CWSA 35 : 51)

*

(अमल किरण हे श्रीअरविंदांचे एक ज्येष्ठ अनुयायी होते. अमल यांची जडणघडण पाश्चात्त्य पद्धतीच्या शिक्षणाद्वारे झाली होती आणि त्यामुळे त्यांना पडणारे सर्व प्रश्न हे एक तर तात्त्विक असत नाहीतर साहित्यविषयक असत. अमल किरण येथे श्रीअरविंद यांच्याशी संबंधित एक प्रसंग कथन करत आहेत.)

एके दिवशी मी श्रीमाताजींना सांगितले की, “श्री अरविंद लिखित दिव्य जीवन हा ग्रंथ पुरेसा तार्किक नाहीये. त्या आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागल्या. आणि मला म्हणाल्या, “असे म्हणणारे तुम्ही पहिलेच गृहस्थ आहात.”

पुढे पहिल्या दर्शनाच्या वेळी मी जेव्हा श्रीअरविंदाच्या समोर उभा होतो तेव्हा माताजींनी तो प्रसंग श्रीअरविंदांना सांगितला. त्या म्हणाल्या, “अमल किरण काय म्हणत आहेत ते ऐकलेत का?” माझे म्हणणे मी श्रीअरविंदांसमोर मांडले. ते ऐकल्यावर श्रीअरविंद यांनी अस्फुट स्मित केले आणि संमतीदर्शक मान हलवली. ती त्यांची पद्धतच होती. ते फारसे बोलत नसत किंवा फारसे व्यक्तही होत

नसत.

आधारित (Light and laughter by Amal Kiran : 14)

*

मुलं लहान असताना त्यांच्या मनामध्ये हे जग सुंदर करण्याची एक स्वाभाविक प्रेरणा असते, ऊर्मी असते. मात्र, बरेचदा मोठी माणसं त्यांना जीवनाचा जो कटू अनुभव आलेला असतो, त्या आधारे मुलांच्या या आदर्शवादी स्वप्नांवर पाणी फिरवतात. पण तसे केल्याने मुलं अशी आदर्शवादी स्वप्नं पाहणेच सोडून देण्याची शक्यता असते. उलट, लहानपणीच्या स्वप्नांना रुजू दिले तर पुढे मोठेपणी ती स्वप्नं कदाचित वास्तवात उतरू शकतात, असा श्रीमाताजींच्या म्हणण्याचा आशय आहे. आणि याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या स्वतःच्या बाबतीतलेच आहे. त्या काय सांगतात ते पाहू, “मी अशा अनेक व्यक्तींच्या संपर्कात आले होते की ज्यांच्यामध्ये जे सखोल व सत्यतर आहे अशाविषयी एक उत्कट आंतरिक आस होती, एक तळमळ होती, परंतु जीवन जगण्यासाठी म्हणून जी धडपड करावी लागते त्यामुळे ते अगदी जखडले गेले होते आणि त्यांचा सगळा वेळ व ऊर्जा त्यामध्येच खर्च होत असे आणि त्यामुळेच ते आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकत नसत. तेव्हा मी खूपच लहान होते. मी तेव्हा नेहमी माझ्या मनाशी म्हणत असे की, जर मला तशी संधी मिळाली तर मी एक लहानसे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. भलेही ते जग अगदी छोटे असेल, परंतु त्या  जगातील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या व यांसारख्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी दिवसभर गुंतून पडावे लागणार नाही. भौतिक जीवनाच्या गरजांची सारी पूर्तता झाल्यानंतर तरी व्यक्ती अगदी सहजस्वाभाविकपणे तिच्या सर्व ऊर्जा आंतरिक साक्षात्काराकडे आणि दिव्य जीवनाच्या दिशेने वळवू शकते का, हे मला पाहायचे होते. माझ्या जीवनाच्या मध्यावर, मला तशी साधनं देण्यात आली आणि मग मला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळाली. ”

श्रीमाताजींना मिळालेली ही संधी म्हणजे श्रीअरविंद आश्रमाच्या निर्मितीची संधी! या आश्रमातील साधकांना स्वतःच्या भौतिक गरजांबाबत, सुखसुविधांबाबत कोणतीही काळजी करावी लागत नाही आणि ते त्यांचा वेळ ईश्वरोपासना, आत्मसाक्षात्कार आणि श्रीअरविंद- कार्य यासाठी देऊ शकतात, हे आपल्याला माहीत आहे.

  • आधारित (CWM 08 : 160-161)

कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा रीतीने पुष्कळ लोकांचे आजार त्यांनी बरे केले होते, त्यामुळे डॉक्टर कूए विख्यात झाले होते.

त्यासंबंधी श्रीमाताजींनी एक किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, माझ्याकडे एक स्त्री येत असे, तिचे केस प्रचंड प्रमाणात गळत असत. आता लवकरच तिला टक्कल पडेल अशी तिची स्थिती झाली होती. त्याच सुमारास कोणीतरी तिला डॉ. कूए यांच्या उपचारप्रणालीची माहिती दिली. तिने तो प्रयोग करायला सुरुवात केली. केस विंचरताना, ती स्वतःच्या मनाशी असा विचार करत असे की, “माझे केस गळणार नाहीत.” पहिल्या एक दोन वेळेला त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण तिने तो प्रयोग नेटाने चालू ठेवला. प्रत्येक वेळी केस विंचरण्यापूर्वी ती निश्चयपूर्वक “मी माझे केस आता विंचरणार आहे पण ते गळणार नाहीत.” असा विचार करत असे. आणि खरोखरच महिन्याभरात तिचे केस गळणे थांबले. नंतर तिने असा विचार करायला सुरुवात केली की, “आता माझे केस वाढत आहेत.” आणि ती त्यामध्ये कमालीची यशस्वी झाली ; खरोखरच मी तिचे वाढलेले केस पाहिले.

मात्र यातील मेख एवढीच की, अशा प्रकारची विचार-रचना करत असताना, तुमच्या मनाच्या दुसऱ्या भागाने असे म्हणता कामा नये की, “मी तसा विचार करत आहे खरा, पण त्याचा काही उपयोग होईल की नाही कोण जाणे?” तुम्ही जर असा निराशावादी विचार केलात तर अशा विचारांनी तुम्ही तुमचे काम स्वतःच वाया घालविता.

श्रीमाताजी पुढे म्हणतात, लोक चुकीच्या पद्धतीने विचार करण्यात त्यांचा वेळ व्यर्थ घालवतात. त्यांची मानसिक क्रिया ही सर्वसामान्यतः अर्धी निराशावादी आणि अर्धी विघातक असते. त्यांनी जे काही केले आहे त्याचे कसे भयानक त्रासदायक परिणाम घडून येतील आणि कोणकोणत्या वाईट गोष्टी घडू शकतील अशा प्रकारची कल्पना करण्यामध्ये ते त्यांचा बहुतांशी वेळ घालवितात. पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा सकारात्मक उपयोग केला असता तर साहजिकच त्यांना त्याचे चांगले परिणाम अनुभवास आले असते.

  • श्रीमाताजी (CWM 07 : 04-05)

माझा एक मित्र होता, त्याला रात्रीच्या वेळी झोपेत स्वतःच्या प्राणिक देहामधून बाहेर जायची सवय होती. त्याने मला एकदा तक्रारवजा सुरात सांगितले की अशा वेळी त्याला नेहमीच एका ढाण्या वाघाशी सामना करावा लागत असे आणि त्यामुळे मग त्याची ती सारी रात्र बेचैनीत जात असे. मी त्याला त्याची सगळी भीती काढून टाकायला सांगितली. आणि “सरळ त्या श्वापदाकडे चालत जा आणि त्याच्या चेहऱ्याकडे एकटक रोखून बघत राहा,” असे सांगितले, अर्थातच “आवश्यकता पडली तर मदतीसाठी धावा कर”, असेही सांगितले. त्याने तसे केले आणि अहो आश्चर्य! त्या वाघाचे रूपांतर अचानक एका अगदी किरकोळ अशा मांजरामध्ये झाले.

एखाद्या प्राणिक अस्तित्वाच्या डोळ्यांमध्ये डोळे मिसळून निर्भयपणे एकटक पाहत राहण्याचा काय जादुई परिणाम घडून येतो, त्याची तुम्हाला कल्पना नाहीये. अगदी या पृथ्वीवर, प्राणिक शक्तींचा अवतार असे ज्यांना म्हणता येईल, ज्याला आपण सहसा प्राणी असे म्हणतो, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने हाताळाल तर, तुम्हाला अगदी सहजी प्रभुत्व मिळण्याची खात्री बाळगता येईल. तुम्ही तीळमात्रही न डगमगता, न घाबरता जर प्रत्यक्ष एखाद्या वाघाच्या डोळ्याला डोळा भिडवून थेटपणे पाहू शकलात तर, तो वाघसुद्धा तुमच्यापासून पळ काढेल. यत्किंचितही न घाबरता जर तुम्ही सापानी रोखलेल्या नजरेला नजर भिडवू शकलात तर, तो साप तुम्हाला कधीच चावू शकणार नाही. पण जर का पाय लटलट कापत असतील आणि केवळ नजर एकटक खिळलेली असेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमच्यामध्ये अजिबात अस्वस्थता असता कामा नये. तुम्हाला भीती वाटावी म्हणून, तो आपला फणा उभारून, तुम्हाला आकर्षित करत राहतो तेव्हा, तुम्ही अगदी शांत आणि एकाग्र असले पाहिजे.

मानवाच्या डोळ्यांमध्ये असलेल्या प्रकाशाविषयी प्राणी सतर्क असतात आणि हा प्रकाश जर माणसं योग्य रीतीने प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये टाकू शकली तर, प्राण्यांना तो प्रकाश सहन करणे अशक्य होते. माणसांच्या नजरेमध्ये एक शक्ती सामावलेली असते; माणसाची नजर जर स्थिर आणि निर्भय असेल तर, त्या शक्तीमुळे प्राणी निष्प्रभ होतात. सारांशरूपाने सांगावयाचे तर, दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या अशा की, कधीही, अगदी कधीही घाबरता कामा नये आणि तुमची ताकद शंभर पटीने अधिक वाढावी म्हणून सर्व परिस्थितीमध्ये योग्य त्या मदतीसाठी ईश्वराचा धावा केला पाहिजे.

  • श्रीमाताजी (CWM 03:166)

 

(तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी तुम्ही, तुमच्या इच्छाआकांक्षामुळे स्वत:च्या त्रुटींकडे डोळेझाक करता कामा नये किंवा त्यांचे समर्थन करता कामा नये, हेदेखील त्या सांगत आहेत.)

तुमच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी कृपा सज्ज असते; तेव्हा तुम्हाला ईश्वरी साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच हे तुमच्या लक्षात येईल. मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

प्रगतीसाठीच्या तळमळीमध्ये असणारा प्रामाणिकपणा व सत्यशोधनाबाबतच्या संकल्पामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि (ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या विशुद्ध मानले जाते अशा) विशुद्ध असण्याच्या आवश्यकतेमध्ये असणारा प्रामाणिकपणा – हा प्रामाणिकपणा हीच सर्व प्रकारच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 192)

 

स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहा – स्वतःची फसवणूक करू नका.
ईश्वराप्रति प्रामाणिक राहा – समर्पणात सौदेबाजी करू नका; कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका.
मनुष्यमात्रांशी साधेसरळपणे वागा – त्यामध्ये कोणताही ढोंगीपणा किंवा दिखावा असता कामा नये.

-श्रीमाताजी (CWM 14 : 70)

 

तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे. (प्रामाणिकपणाचे आचरण करत असताना कोणत्याही प्रलोभनामुळे विचलित न होणे, उद्दिष्टाबाबत कोणतीही तडजोड न करणे हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे.)

ढोंग करू नका – प्रामाणिक व्हा.
(नुसती) आश्वासने देऊ नका – कृती करा.
(नुसती) स्वप्ने पाहू नका – ती प्रत्यक्षात उतरवा.

– श्रीमाताजी (CWM 14 : 66)