साधना, योग आणि रूपांतरण – २६५
प्राणाचे रूपांतरण
प्राणाला जबरदस्तीने काही करायला भाग पाडणे शक्य असले तरी तसे करणे सोपे नसते. सातत्याने अत्यंत मनःपूर्वकतेने प्राणाला पटवून सांगणे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे अधिक सोपे असते. परंतु असे करण्याच्या या मानसिक पद्धतीमध्ये, प्राण हा बरेचदा स्वतःच्या कोणत्यातरी फायद्यासाठी आध्यात्मिक आदर्शाला स्वतःहून जोडून घेतो, हे खरे आहे. प्राणाने स्वतःच स्वतःसमोर अनावृत (expose) व्हावे यासाठी, प्राणामध्ये प्रकाश सदोदित खाली उतरवत राहणे हा एक परिणामकारक मार्ग असतो. असे केल्यामुळे स्वतःमध्ये काय चुकीचे आहे हे पाहण्यासाठी तो प्रवृत्त होतो आणि सरतेशेवटी आपल्यामध्ये परिवर्तन घडावे यासाठी तो प्रामाणिकपणे इच्छा बाळगू लागतो.
प्राणिक प्रकृतीमध्ये हा प्रकाश एकतर अंतरंगामधून, चैत्य अस्तित्वाकडून आणता येतो नाहीतर तो वरून, मनाच्या माध्यमातून उतरविता येतो. मनाच्या ऊर्ध्वस्थित असणारा प्रकाश आणि शक्ती अवतरित व्हावी म्हणून त्यांस आवाहन करणे ही पूर्णयोगाच्या अनेकविध पद्धतींपैकी एक प्रमुख पद्धती आहे. परंतु कोणताही मार्ग अवलंबला तरीदेखील तो नेहमीच चिकाटीने आणि धीरयुक्त आध्यात्मिक परिश्रमाने अमलात आणावा लागतो.
प्राणामध्ये अकस्मात परिवर्तन घडविता येऊ शकते पण अशा अकस्मात झालेल्या परिवर्तनानंतरसुद्धा त्याच्या परिणामकारकतेसाठी, त्यावर काम करावे लागते, त्यावर परिश्रम घ्यावे लागतात, ते परिवर्तन प्राणाच्या प्रत्येक भागावर अंमलात आणावे लागते. जोपर्यंत त्याचा परिणाम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ते करावे लागते आणि त्यासाठी बरेचदा दीर्घ काळ लागतो. शारीरिक चेतनेबाबत सांगायचे तर, दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतरच तिच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य असते. हां, एखाद्या विशिष्ट घटकामध्ये त्वरेने परिवर्तन करता येऊ शकते पण समग्र परिवर्तन घडविण्यासाठी दीर्घकाळ आणि चिकाटीने परिश्रम करावे लागतात.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 110-111)
- श्रीमाताजी आणि समीपता – २६ - May 21, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – २५ - May 20, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – २४ - May 19, 2025