साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य व्यक्तित्वातील अशुद्धता तशाच कायम राहण्याची शक्यता असेल ना?

श्रीमाताजी : हो, अर्थातच. केवळ आंतरिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या प्राचीन योगपरंपरा आणि आपला पूर्णयोग यामध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. प्राचीन समजूत अशी होती, आणि काही व्यक्ती भगवद्गीतेचा अर्थ या पद्धतीनेही लावत असत की, ज्याप्रमाणे धुराशिवाय अग्नी नसतो त्याप्रमाणे अज्ञानाशिवाय जीवन नसते. हा सार्वत्रिक अनुभव असतो पण ही काही आपली संकल्पना नाही, हो ना?

आपल्याला अनुभवातून हे माहीत आहे की, आपण जर शारीर-चेतनेपेक्षाही खाली म्हणजे अवचेतनेपर्यंत (subconscient) खाली उतरलो, किंबहुना त्याहूनही खाली म्हणजे अचेतनतेपर्यंत (inconscient) खाली उतरलो तर, आपल्याला आपल्यामध्ये अनुवंशिकतेमधून आलेल्या गोष्टींचे (atavism) मूळ सापडू शकते तसेच आपल्या प्रारंभिक शिक्षणामधून आणि आपण ज्या वातावरणामध्ये जीवन जगत असतो त्यामधून जे काही आलेले असते त्याचे मूळही आपल्याला सापडू शकते. आणि त्यामुळेच व्यक्तीमध्ये, म्हणजे तिच्या बाह्य प्रकृतीमध्ये, एक प्रकारची विशेष वैशिष्ट्यपूर्णता निर्माण होते आणि सर्वसाधारणतः असे समजले जाते की, आपण असेच जन्माला आलेलो आहोत आणि आयुष्यभर आपण असेच राहणार आहोत. परंतु अवचेतनेपर्यंत, अचेतनेपर्यंत खाली उतरून व्यक्ती तेथे जाऊन या घडणीचे मूळ शोधून काढू शकते. आणि जे तयार झाले आहे ते नाहीसे देखील करू शकते. म्हणजे व्यक्ती सामान्य प्रकृतीच्या गतिविधी आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये सचेत आणि जाणीवपूर्वक कृतीने परिवर्तन घडवून आणू शकते आणि अशा रीतीने ती खरोखरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे रूपांतरण घडवून आणू शकते. ही काही सामान्य उपलब्धी नाही, परंतु ती करून घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे, हे असे करता येणे शक्य असते, एवढेच नव्हे, तर असे करण्यात आलेले आहे हे व्यक्ती ठामपणे म्हणू शकते. समग्र रूपांतरणाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असते. परंतु त्यानंतर, मी आधी ज्याचा उल्लेख केला ते पेशींचे रूपांतरण करणे अजूनही बाकी आहे.

अन्नमय पुरुषामध्ये (physical being) पूर्णतः परिवर्तन करणे शक्य आहे परंतु ही गोष्ट आजवर कधीही करण्यात आलेली नाही.

– श्रीमाताजी (CWM 15 : 294-295)

श्रीमाताजी