साधना, योग आणि रूपांतरण – १९२

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०८

एकाग्रतेचा परिणाम सहसा अगदी त्वरेने घडून येत नाही; मात्र काही जणांमध्ये तो एकदम वेगवान आणि अचानकपणे घडून येतो; परंतु बहुतेकांना मात्र पूर्वतयारीसाठी आणि समायोजनासाठी कमीअधिक कालावधी लागतो. विशेषतः अभीप्सा आणि तपस्येद्वारे, जिथे प्रकृतीची काही प्रमाणात का होईना पण पूर्वतयारी झालेली नसते, तिथे अधिक कालावधी लागतो.

ज्ञानमार्गाची एक ‘अद्वैती’ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या मन, प्राण आणि शरीराशी असलेल्या तादात्म्याला नकार देते, ती सातत्याने असे म्हणत राहते की, “मी मन नाही”, “मी प्राण नाही”, “मी शरीर नाही.” या गोष्टींना ती स्वतःच्या खऱ्या ‘स्व’पासून अलग करून पाहते आणि कालांतराने व्यक्तीला साऱ्या मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया-प्रक्रिया आणि मन, प्राण व शरीराच्या स्वयमेव जाणिवासुद्धा बाह्य व बहिवर्ती क्रिया बनत चालल्याचे जाणवू लागते. त्याचवेळी अंतरंगामध्ये, त्यांच्यापासून निर्लिप्त अशी अलग स्वयंभू अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते, जी जाणीव वैश्विक आणि परात्पर चैतन्याच्या साक्षात्कारामध्ये खुली होते.

अशीच आणखी एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ती म्हणजे सांख्य दर्शनाची पद्धत. या पद्धतीमध्ये ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’चे विलगीकरण केले जाते. यामध्ये मनावर ‘साक्षित्वा’ची भूमिका लादली जाते म्हणजे मन, प्राण, शरीराच्या सर्व कृती या ‘मी’ आणि ‘माझे’ यांपासून वेगळ्या असतात, त्या बाह्य क्रिया बनलेल्या असतात, पण ‘प्रकृती’शी संबंधित असतात आणि ‘मी’च्या बाह्य व्यक्तित्वावर लादल्या जातात. या कोणत्याही गोष्टींनी ‘मी’ बांधला जात नाही, ‘मी’ हा त्यांपासून निर्लिप्त असतो; शांत, साक्षी ‘पुरुष’ असतो. परिणामतः व्यक्तीमध्ये एक प्रकारचे विभाजन वाढीस लागते. साधकाला स्वतःच्या अंतरंगामध्ये एका स्थिर, शांत, स्वतंत्र चेतनेच्या वाढीची जाणीव होते, ज्या चेतनेला पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शारीरिक प्रकृतीच्या खेळापासून आपण स्वतः दूरस्थ आहोत याची जाणीव होते.

सहसा जेव्हा असे घडून येते तेव्हा उच्चतर ‘चेतने’ची शांती, उच्चतर ‘शक्ती’चे कार्य अगदी त्वरेने खाली आणणे शक्य असते, आणि त्यामुळे ‘योगा’ची संपूर्ण वाटचाल वेगाने घडून येऊ शकते. परंतु बरेचदा, आवाहन (call) आणि एकाग्रतेला प्रतिसाद म्हणून ‘शक्ती’च स्वतःहून खाली अवतरित होते आणि मग, उपरोक्त गोष्टी आवश्यक असतील तर ती त्या करते आणि साहाय्यकारी व अनिवार्य अशा इतर मार्गांचा किंवा प्रक्रियांचा उपयोग करते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 328-329)

श्रीअरविंद