साधना, योग आणि रूपांतरण – १५९

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(मानवी स्तरावरील सामान्य प्रेम आणि दिव्य प्रेम यातील फरक येथे स्पष्ट केला आहे.)

प्रेम हे शुष्क, भावनारहित असू शकत नाही. कारण अशा प्रकारचे प्रेम अस्तित्वातच नसते, आणि श्रीमाताजी ज्या प्रेमाविषयी सांगतात ते प्रेम ही एक अगदी विशुद्ध, अचल आणि नित्य गोष्ट असते. …ते प्रेम सूर्यप्रकाशासारखे स्थिर, सर्वसमावेशक, स्वयंभू असते.

वैयक्तिक असे दिव्य प्रेम सुद्धा असते. परंतु ते व्यक्तिगत मानवी प्रेमाप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या परतफेडीवर अवलंबून नसते. ते वैयक्तिक असते पण अहंभावात्मक नसते. एका सत् अस्तित्वाकडून (real being) दुसऱ्या सत् अस्तित्वाकडे ते प्रवाहित होत असते. पण तसे प्रेम लाभण्यासाठी, (व्यक्ती) सामान्य मानवी दृष्टिकोनातून मुक्त होणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 344-345)

साधना, योग आणि रूपांतरण – १५८

पूर्णयोगांतर्गत भक्ती

भक्तीने व्याकुळ होऊन अश्रुधारा वाहू लागतात त्याविषयी श्रीअरविंद एका पत्रात लिहितात की, आंतरिक अभीप्सेमुळे जेव्हा अश्रू येतात तेव्हा त्या अश्रूंना रोखून धरण्याची काहीही आवश्यकता नाही. परंतु जर ते प्राणिक असतील, वरपांगी असतील, अगदी वरवरचे असतील तर तेव्हा मात्र ते अश्रू म्हणजे भावनिक अव्यवस्थेची आणि क्षोभाची कृती ठरते. प्रार्थनेच्या उत्कटतेला अजिबात नकार देऊ नये; अशाप्रकारची प्रार्थना ही योगसाधनेच्या सर्वात शक्तिशाली माध्यमांपैकी एक असते.
*
फक्त सामान्य प्राणिक भावनांमुळेच (vital emotions) शक्तिव्यय होतो आणि त्यामुळे तुमची एकाग्रता आणि शांती भंग पावते, म्हणून अशा प्राणिक भावनांना प्रोत्साहन देता कामा नये. मुळात भावना ही काही वाईट गोष्ट नाही; भावना म्हणजे प्रकृतीचा एक आवश्यक भाग आहे आणि आंतरात्मिक भावना (psychic emotion) ही तर साधनेला साहाय्यकारी होणाऱ्या गोष्टींमधील एक सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे. आंतरात्मिक भावनेमुळे ‘ईश्वरा’ बद्दलच्या प्रेमामुळे अश्रू येतात किंवा कधी आनंदाश्रू येतात; असे अश्रू अडवता कामा नयेत. त्यामध्ये प्राणिक भावनांची भेसळ झाली तर मात्र साधनेमध्ये अडथळा निर्माण होतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 362), (CWSA 29 : 351)

साधना, योग आणि रूपांतरण – १५७

पूर्णयोगांतर्गत भक्ती

…प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, आनंददायी आशा-अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रेम आणि भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, प्रदीर्घ आणि वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, त्याच्याकडे थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्याच भोवती घुटमळत राहण्याची शक्यता असते.
*
प्रेम, शोक, दुःख, निराशा, भावनिक आनंद इत्यादी भावनांमध्ये गुंतून पडणे आणि त्यावर एक प्रकारचा मानसिक-प्राणिक अतिरिक्त भर देणे याला ‘भावनाविवशता’ असे म्हटले जाते. अगदी उत्कट अशा भावनेमध्येही एक प्रकारची स्थिरशांतता, एक नियंत्रण, शुद्धीकारक संयम आणि मर्यादा असली पाहिजे. व्यक्तीने स्वतःच्या भावना, संवेदना यांच्या अधीन असता कामा नये; तर नेहमीच स्वतःचे स्वामी असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212), (CWSA 29 : 351)

साधना, योग आणि रूपांतरण – १५६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘देवा’वर श्रद्धा असणे, ‘देवा’वर भरवसा ठेवणे, ‘दिव्य शक्ती’ला समर्पण व आत्मदान करणे या आवश्यक, अनिवार्य गोष्टी आहेत. पण ‘देवा’वरील भरवसा हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांच्या अधीन होण्याचे, किंवा दुर्बलता, निरुत्साह यासाठीचे निमित्त ठरता कामा नये. ‘दिव्य सत्या’च्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार देत आणि अथक अभीप्सा बाळगत विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे.

‘ईश्वरा’प्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांच्या, कनिष्ठ गती-प्रवृत्तींच्या अधीन होण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराच्या अधीन होण्याचे किंवा ‘ईश्वरा’चे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींच्या अधीन होण्याचे एक कारण, एक निमित्त होता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 87)

साधना, योग आणि रूपांतरण – १५५

पूर्णयोगांतर्गत भक्ती

माणसं ज्याला ‘प्रेम’ समजतात त्या प्रेमामध्ये सहसा प्राणिक भावना मिसळलेल्या असतात. ‘ईश्वरा’भिमुख झालेले प्रेम हे तशा प्रकारचे प्रेम असता कामा नये. कारण ते प्रेम हे प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक कामना, वासना असते; एक प्रकारची स्वीकृतीची सहजवृत्ती असते; ती मालकीची आणि एकाधिकाराची प्रेरणा असते. असे प्रेम हे दिव्य प्रेम तर नसतेच; पण एवढेच नव्हे तर, योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीही भेसळ होऊ देता कामा नये.

‘ईश्वरा’बद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान असते, ते कोणत्याही मागणीपासून मुक्त असते; ते शरणागती आणि समर्पणाने परिपूर्ण असते; ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही; मत्सर, अभिमान वा राग यांच्या उद्रेकामध्ये ते गुंतून पडत नाही, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात. परिणामतः ‘दिव्य माता’ देखील (अशा प्रेमाखातर) स्वतःलाच देऊ करते, अगदी मुक्तहस्ते! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित होत असते. ‘दिव्य माते’ चे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना पूर्णत्व आणि परिपूर्तीच्या दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. (तेव्हा) तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या बाहुंमध्ये घेऊन, ‘ईश्वरा’कडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. अगदी तुमच्या जडभौतिक अंगांमध्येसुद्धा तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने त्यांना आपलेसे करावे अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. आणि इथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!

जर व्यक्तीने खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि जर ती तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असता कामा नये. आणि व्यक्तीने खरोखरच जर अशी अभीप्सा बाळगली तर, आणि व्यक्ती जसजशी अधिकाधिक शुद्ध, पवित्र होत जाईल, तसतशी निश्चितपणे व्यक्तीला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा यांच्यापासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग जेवढी तुमची क्षमता आहे, जेवढे तुम्ही ग्रहण करू शकता, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे; असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)

साधना, योग आणि रूपांतरण – १५४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : श्रीअरविंदांनी असे सांगितले आहे की, व्यक्ती मानवी प्रेमाकडून दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

श्रीमाताजी : जे मानवी प्रेम ‘भक्ती’ म्हणून, ‘ईश्वर’विषयक भक्तीची ‘शक्ती’ म्हणून आविष्कृत होते त्या प्रेमाविषयी श्रीअरविंद सांगत होते. ते म्हणतात, सुरुवातीला ईश्वराबद्दलचे प्रेम हे अगदी मानवी स्तरावरील प्रेम असते, आणि त्यामध्ये मानवी प्रेमाची सर्व गुणवैशिष्ट्यं दिसून येतात. ती गुणवैशिष्ट्यंसुद्धा श्रीअरविंदांनी खूप चांगल्या रीतीने स्पष्ट केली आहेत. (भलेही तुमचे प्रेम सुरुवातीला मानवी स्तरावरील असेल पण जर) तुम्ही चिकाटी बाळगलीत आणि आवश्यक ते प्रयत्न केलेत तर, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्याशी एकात्म पावून त्यायोगे, मानवी स्तरावरील प्रेमाचे दिव्य प्रेमामध्ये रूपांतर करणे अशक्य मात्र नाही. दोन व्यक्तींमधील प्रेमाचे परिवर्तन ईश्वरी प्रेमामध्ये होऊ शकते, असे श्रीअरविंदांनी म्हटलेले नाही.

कोणा एका व्यक्तीने त्यांना भक्तीसंबंधी, साधकाला ‘ईश्वरा’बद्दल जे प्रेम असते त्याविषयी एकदा काही विचारले होते तेव्हा त्यांनी असे सांगितले होते की, सुरुवातीला तुमचे प्रेम हे पूर्णपणे मानवी स्तरावरील असते. ते तर असेही म्हणाले होते की, कधीकधी तर ते प्रेम अगदी व्यावहारिक देवाणघेवाण या प्रकारचेसुद्धा असते. परंतु तुम्ही जर प्रगती केलीत तर, तुमच्या प्रेमाचे ‘दिव्य’ प्रेमामध्ये, खऱ्या भक्तीमध्ये परिवर्तन होऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 174-175)

साधना, योग आणि रूपांतरण – १५३

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(भगवद्गीतेमध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या चार प्रकारच्या भक्तांचे उल्लेख आले आहेत. त्यातील ‘अर्थार्थी’ भक्ताच्या भक्तीविषयी एका साधकाने श्रीअरविंदांना काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले उत्तर…)

‘ईश्वरा’कडून काहीतरी मिळावे म्हणूनच केवळ ईश्वराचा शोध घेण्याची धडपड करायची हा लोकांचा दृष्टिकोन उचित नाही; पण अशा लोकांना पूर्णपणे मज्जाव केला तर जगातील बहुतांशी लोकं ईश्वरा’कडे कधीच वळणार नाहीत. लोकांची ईश्वराभिमुख होण्यास किमान सुरूवात तरी व्हावी म्हणून या गोष्टींना मुभा देण्यात आली असावी असे मला वाटतं. त्यांच्या ठिकाणी श्रद्धा असल्यास, त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना मिळू शकेल आणि मग हा मार्ग चांगला आहे, असे त्यांना वाटू लागेल आणि पुढे कधीतरी अचानकपणे एके दिवशी, ‘हे असे करणे बरं नाही’, (काहीतरी मिळावे म्हणून ‘ईश्वरा’कडे वळणे चुकीचे आहे) या विचारापाशी ती लोकं येऊन पोहोचतील. ‘ईश्वरा’भिमुख होण्याचे अधिक चांगले मार्ग आहेत आणि अधिक चांगल्या वृत्तीने ‘ईश्वरा’कडे वळले पाहिजे, हे त्यांना कळेल.

लोकांना जे हवे होते ते त्यांना मिळाले नाही आणि तरीसुद्धा जर ते ‘ईश्वरा’भिमुख झाले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आता त्यांची (ईश्वराभिमुख होण्याची) तयारी होत आहे हे दिसून येते. ज्यांची अजूनपर्यंत तयारी झालेली नाही अशा लोकांसाठीची ती बालवाडी आहे, असे समजून आपण त्याकडे पाहू या. पण अर्थातच हे काही आध्यात्मिक जीवन नव्हे, हा तर केवळ एक अगदी प्राथमिक धार्मिक दृष्टिकोन झाला.

कशाचीही अपेक्षा, मागणी न करता केवळ देत राहणे हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे. तथापि साधक, त्याचे आरोग्य उत्तम राहावे किंवा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या साधनेचा एक भाग म्हणून, ‘ईश्वरी शक्ती’ची मागणी करू शकतो; जेणेकरून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचे शरीर सक्षम होईल, सुयोग्य होईल आणि तो ‘ईश्वरी कार्या’साठी एक सक्षम साधन बनू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 08-09)

साधना, योग आणि रूपांतरण – १५२

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘ईश्वराची उपस्थिती’ जाणवेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी (CWM 16 : 160-161)

साधना, योग आणि रूपांतरण – १५१

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(श्रीअरविंदांच्या छायाचित्राकडे पाहत असताना, आपण जणू प्रत्यक्ष श्रीअरविंदांनाच पाहत आहोत, असे एका साधकाला जाणवले आणि त्याने तसे त्यांना लिहून कळविले आहे. त्याला दिलेल्या उत्तरादाखल श्रीअरविंद लिहितात…)

छायाचित्र हे केवळ काहीतरी व्यक्त करण्याचे माध्यम असते, पण तुमच्यापाशी जर योग्य चेतना असेल, तर जिवंत व्यक्तीमधील काहीतरी तुम्ही त्या छायाचित्रात प्रत्यक्षात उतरवू शकता किंवा ते छायाचित्र ज्या व्यक्तीचे आहे, त्या व्यक्तीची जाणीव ते छायाचित्र पाहून तुम्हाला होऊ शकते आणि त्या छायाचित्राला तुम्ही संपर्काचे माध्यम बनवू शकता. मंदिरामधील मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते, तसेच हे असते.

*

आंतरिक भक्ती महत्त्वाची असते आणि ती नसेल तर बाह्य भक्ती ही केवळ एक कृती आणि उपचार होऊन बसते. परंतु बाह्य भक्ती ही जर साधीसरळ आणि प्रामाणिक असेल तर तिचासुद्धा काही उपयोग असतो, आणि तिचेसुद्धा एक स्थान असते.

*

यांत्रिक किंवा कृत्रिम भक्ती अशी कोणती गोष्टच अस्तित्वात असू शकत नाही. एकतर भक्ती असते किंवा ती नसते. भक्ती ही उत्कट असू शकते किंवा नसू शकते, ती परिपूर्ण किंवा अपूर्ण असू शकते. कधीकधी ती आविष्कृत होते तर कधी अप्रकट असते. परंतु यांत्रिक किंवा कृत्रिम भक्ती या संकल्पनेमध्येच विसंगती आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 363, 355, 355)

साधना, योग आणि रूपांतरण – १५०

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(केवळ प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वरी उपस्थितीची जाणीव, अनुभूती, साक्षात्कार इत्यादी काहीच साध्य होत नाहीये, असे एका साधकाने श्रीअरविंदांना लिहून कळविले आहे. त्यावर त्यांनी दिलेले हे उत्तर…)

…निव्वळ प्रार्थनेद्वारे या गोष्टी लगेचच प्राप्त होतील, असे सहसा घडत नाही. परंतु (तुमच्या अस्तित्वाच्या) गाभ्यामध्ये जर जाज्वल्य श्रद्धा असेल किंवा अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिपूर्ण श्रद्धा असेल तरच तसे घडून येते. परंतु याचा असा अर्थ नाही की, ज्यांची श्रद्धा तितकीशी दृढ नाही, किंवा ज्यांचे समर्पण परिपूर्ण नाही ते तिथवर पोहोचूच शकत नाहीत. परंतु मग सहसा त्यांना सुरुवातीला छोट्या छोट्या पायऱ्या पार कराव्या लागतात; आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कालांतराने तपस्येद्वारे आणि प्रयत्नसातत्याद्वारे त्यांना पुरेसे खुलेपण प्राप्त होते. एवढेच नव्हे तर, डळमळणारी श्रद्धा आणि संथ, आंशिक समर्पण यांचीसुद्धा स्वत:ची म्हणून काहीएक शक्ती असते, त्यांचे स्वत:चे असे काही परिणाम असतात. तसे नसते तर, अगदी मोजक्या लोकांनाच साधना करणे शक्य झाले असते. केंद्रवर्ती श्रद्धा म्हणजे ‘आत्म्या’ वर किंवा मागे असलेल्या ‘केंद्रवर्ती अस्तित्वा’वर श्रद्धा असे मला म्हणायचे आहे. ही अशी श्रद्धा असते की, जेव्हा मन शंका घेते, प्राण खचून जातो, आणि शरीर ढासळू पाहते तेव्हासुद्धा ही श्रद्धा टिकून असते. आणि जेव्हा हा आघात संपतो, तेव्हा ती श्रद्धा पुन्हा उसळून येते आणि पुन्हा एकदा मार्गक्रमण करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 95-96)