साधना, योग आणि रूपांतरण – ८३

(साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.)

आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे शारीर-अस्तित्व उरतच नाही. किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या मुक्त विशालतेमधील केवळ एक बिंदू आहात असा तो अनुभव असतो. त्यामुळे व्यक्तीला किंवा तिच्या एखाद्या घटकाला शरीरातून बाहेर पडता येते आणि तो घटक इतरत्र जाऊ शकतो. शरीरातून बाहेर पडून इतरत्र जाण्याच्या या कृतीसोबतच सहसा एक प्रकारच्या आंशिक समाधीची अन्यथा संपूर्ण योगतंद्रीची अवस्था येते. किंवा त्यामुळे चेतना सशक्त होऊ शकते. आता ती चेतना शरीरापुरतीच किंवा बाह्यवर्ती प्रकृतीच्या सवयींपुरतीच मर्यादित राहत नाही. त्याची परिणती चेतना अंतरंगामध्ये शिरण्यामध्ये, आंतरिक मानसिक गहनतांमध्ये प्रवेश करण्यामध्ये, तसेच चेतना आतंरिक प्राणामध्ये, आंतरिक सूक्ष्म देहामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये होते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या अगदी आंतरतम चैत्य अस्तित्वाविषयी किंवा आंतरिक मानसिक, प्राणिक आणि सूक्ष्म शारीर अस्तित्वाविषयी सजग होते. त्यामुळे व्यक्ती प्रकृतीच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या त्या त्या क्षेत्रांमध्ये, त्या स्तरांमध्ये, त्या जगतांमध्ये वास्तव्य करण्यास आणि तेथे वावरण्यास सक्षम होते.

कनिष्ठ चेतनेच्या या पुनःपुन्हा आणि नित्य होणाऱ्या आरोहणामुळे मन, प्राण आणि शरीर हे घटक अतिमानसिक स्तरापर्यंतच्या उच्चतर स्तरांच्या संपर्कात येण्यासाठी सक्षम होतात आणि त्या उच्चतर स्तरांच्या प्रकाशामुळे, त्यांच्या शक्तीमुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे भारित होतात. आणि पुनःपुन्हा व नित्य होणारे ‘दिव्य चेतने’चे आणि तिच्या ‘ऊर्जे’चे हे अवरोहण हेच समग्र अस्तित्वाच्या आणि समग्र प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 216)

श्रीअरविंद