साधना, योग आणि रूपांतरण – ७०

अगदी पूर्ण शांतपणे बसावेसे वाटणे आणि निद्रेचा अंमल जाणवणे या गोष्टींचे आळस हे कारण नसते. आणि ही समजूत तुम्ही डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. अविचल, शांत राहावे आणि अंतरंगामध्ये प्रवेश करावा याकडे तुमचा कल वळत आहे, हे त्याचे कारण आहे. साधना जेव्हा काहीशा उत्कटतेने सुरू होते तेव्हा बऱ्याचदा काही काळ असे वाटत राहते. नंतर आंतरिक आणि बाह्य चेतना यांमध्ये अधिक प्रमाणात समतोल साध्य होतो किंवा असे म्हणणे अधिक उचित ठरेल की, बाह्य चेतनेमध्ये परिवर्तन घडू लागते आणि ती आंतरिक चेतनेशी तादात्म्य पावू लागते. त्यामुळे (ध्यानाच्या वेळी झोप येणे या गोष्टीमुळे) तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका.

*

(ध्यानाच्या वेळी झोप लागण्याच्या प्रवृत्तीबाबत श्रीअरविंद येथे लिहीत आहेत.) योगसाधना करण्यास ज्यांनी नुकताच आरंभ केला आहे अशा व्यक्तींना जाणवणारा हा एक सर्वसाधारण अडथळा आहे. ही झोप हळूहळू दोन मार्गांनी नाहीशी होते.
०१) एकाग्रताशक्ती अधिक तीव्र केल्यामुळे
०२) निद्रा स्वतःच एक प्रकारच्या स्वप्न-समाधीमध्ये परिवर्तित होते; स्वप्न-समाधीमध्ये व्यक्तीला स्वप्नांखेरिज जे आंतरिक अनुभव येत असतात त्यांची तिला जाणीव असते. (म्हणजे, येथे जाग्रत चेतना काही काळासाठी हरविल्यासारखी होते, परंतु तिची जागा निद्रेद्वारे घेतली जात नाही तर ती अंतर्मुख चेतनेद्वारे घेतली जाते. या स्थितीमध्ये व्यक्ती मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वाच्या अतिभौतिकामध्ये वावरत असते.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 319, 320)

श्रीअरविंद