ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ईश्वराकडे मागायचे?

विचारशलाका २३

 

साधक : समजा, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा तिला मागर्दर्शनाची आवश्यकता असेल किंवा तिला इतर काही हवे असेल, तर त्या व्यक्तीला तिच्या गरजेनुसार ती गोष्ट ‘ईश्वरा’कडून कशी मिळू शकेल?

श्रीमाताजी : ‘ईश्वरा’कडे ती गोष्ट तुम्ही मागितलीत तर ती तुम्हाला मिळू शकेल. पण तुम्ही जर त्याची मागणीच केली नाहीत, तर ती तुम्हाला कशी मिळेल?

तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळलात आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवलात आणि ‘त्याच्या’कडे मागणी केलीत तर, आवश्यक असलेली गोष्ट तुम्हाला मिळेल – अर्थात् जी गोष्ट गरजेची आहे असे ‘तुम्हाला वाटते’ ती मिळेलच असे नाही; तर तुम्हाला ज्या गोष्टीची ‘खरोखरच गरज’ असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. परंतु त्यासाठी त्या गोष्टीची तुम्ही ‘त्याच्या’कडे मागणी केली पाहिजे.

मात्र तुम्ही हा प्रयोग प्रामाणिकपणे केला पाहिजे. ती गोष्ट मिळविण्यासाठी इतर सर्व प्रकारचे बाह्य मार्ग आधी अवलंबायचे, धडपड करायची आणि (सर्व मार्ग खुंटले की मग) नंतर ‘ईश्वरा’कडून अपेक्षा बाळगायची की, त्याने तुम्हाला ती गोष्ट द्यावी, आणि तीसुद्धा तुम्ही त्याच्याकडे न मागता; हे असे करता कामा नये. खरे म्हणजे, दुसऱ्यांकडून जेव्हा तुम्हाला काही हवे असते, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते मागता, हो की नाही? आणि ‘ईश्वरा’ने मात्र ती गोष्ट तुम्ही न मागतासुद्धा तुम्हाला द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही त्याच्याकडून कशी बरे बाळगता?

सामान्य चेतनेच्या स्तरावर मात्र ही प्रक्रिया (अपेक्षित प्रक्रियेच्या) बरोबर उलट घडते. तुम्ही काहीतरी गृहीत धरता आणि म्हणता, “मला अमुक एका गोष्टीची गरज आहे, मला या नातेसंबंधाची आवश्यकता आहे; मला हे प्रेम, ही ममता हवी आहे; मला अमुक गोष्टीचे ज्ञान हवे आहे इत्यादी आणि ‘ईश्वरा’ने ते मला दिलेच पाहिजे, अन्यथा तो ‘ईश्वर’च नाही.” म्हणजे असे की, तुम्ही समस्या पूर्णपणे उलट करून टाकता.

पहिली गोष्ट ही की, तुम्ही म्हणता, ”मला अमुक गोष्टीची गरज आहे.” पण तुम्हाला खरंच माहीत असते का, की त्या गोष्टीची तुम्हाला खरोखरीच गरज आहे? की तशी तुमच्या मनात काहीतरी धूसर कल्पना असते? का ती केवळ एक इच्छा असते? का (मनात उमटलेला) तो फक्त एक अज्ञानी तरंग असतो? पहिला मुद्दा असा की, तुम्हाला त्याविषयी काहीच माहीत नसते.

दुसरा मुद्दा हा की, “मला याची आवश्यकता आहे,” असे म्हणत, खरंतर तुम्ही तुमची इच्छाच ‘ईश्वरा’वर लादू पाहत असता आणि तरीदेखील, “मला ते दे”, अशी मागणीसुद्धा तुम्ही ‘त्याच्या’जवळ करत नाही. उलट तुम्ही म्हणता, “मला ते हवे आहे. आणि ज्याअर्थी मला अमुक एक गोष्ट हवी आहे, त्याअर्थी मला ती मिळालीच पाहिजे, अगदी स्वाभाविकपणे, सहजपणे मला ती मिळाली पाहिजे, मला जे हवे ते देणे, हे ‘ईश्वरा’चे कामच आहे.”

पण जेव्हा असे घडते तेव्हा, तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, हे एकतर तुम्हाला माहीत नसते. आणि दुसरे म्हणजे तो केवळ तुमच्या मनाचा खेळ असतो, आणि त्यात काही तथ्य नसते आणि त्या देवघेवीमध्येही, तुम्ही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या जीवनाकडून मिळावी अशी अपेक्षा बाळगता आणि ‘ईश्वरा’कडे वळतसुद्धा नाही, ‘त्या’च्यामध्ये व तुमच्यामध्ये कोणतेही नाते तुम्ही निर्माण करत नाही, ‘त्या’चा क्षणभरही विचार करत नाही, किंवा ‘त्या’च्याकडे जेव्हा वळता तेव्हा तुमच्या दृष्टिकोनात थोडीसुद्धा मन:पूर्वकता बाळगत नाही. आणि तुम्ही त्या ‘ईश्वरा’कडे काहीच मागितलेले नसते त्यामुळे, ‘त्याने’ तुम्हाला देण्याचे काही कारणच उरत नाही.

पण तुम्ही जर ‘ईश्वरा’कडे मागणी केलीत, तर ‘तो’ ‘ईश्वर’च असल्यामुळे, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले कळत असते आणि त्यामुळे तुम्हाला ज्याची (खरोखरच) गरज आहे ते तो तुम्हाला देईलच.

परंतु, तरीही जर तुम्ही हट्ट धराल आणि तुमची इच्छा त्याच्यावर लादू पहाल, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि खरंतर तुम्हाला त्या गोष्टीची काहीच गरज नव्हती, हे दाखवून देण्यासाठी तो तुम्ही मागितलेली गोष्ट कदाचित देईलही. पण नंतर तुम्ही पुन्हा तक्रार करू लागता आणि म्हणू लागता की, “मला त्रास होईल अशी गोष्ट ‘ईश्वरा’ने मला दिलीच कशासाठी?” पण तुम्ही तेव्हा हे पूर्णपणे विसरलेले असता, की ती गोष्ट तुम्हीच त्याच्याकडे मागितली होती.

दोन्ही बाबतीत, तुम्ही तक्रारच करता. तुम्ही जे काही मागितले होते, ते ‘त्या’ने तुम्हाला दिले आणि त्यामुळे तुम्हाला उपाय होण्याऐवजी जर अपायच झाला, तरी तुम्ही तक्रार करता आणि ‘त्या’ने ते तुम्हाला दिले नाही तरी तुम्ही तक्रारच करता. “हे काय ! मी तर ‘त्याला’ सांगितले की, मला याची गरज आहे आणि तरी ‘तो’ मला ते देत का नाही?” दोन्ही बाबतीत तुम्ही तक्रारच करता आणि बिचाऱ्या ‘ईश्वरा’लाच दोषी ठरवता.

या सर्व गोष्टींपेक्षा, तुमच्यामध्ये ‘त्या’चा शोध घेण्याची अभीप्सा असेल, उत्कंठा असेल, तीव्र, आर्त इच्छा असेल, तशी आत्यंतिक निकड तुम्हाला वाटत असेल, ज्याला साधारणत: तुम्ही कमीअधिक स्पष्टपणे तुमच्या अस्तित्वाचे सारभूत ‘सत्य’ समजता, वस्तुजाताचे मूळ ‘उगमस्थान’ समजता, सर्वोत्तम ‘हितकारक’ अशी बाब समजता, आपल्या सर्व इच्छांवरील ‘समाधान’ मानता, आपल्या सर्व समस्यांवरील ‘उपाय’ मानता, त्याविषयीची तीव्र निकड तुम्हाला भासत असेल, ते प्राप्त करून घेण्याची अभीप्सा तुम्ही बाळगत असाल, तर त्यानंतर तुम्ही ‘ईश्वरा’ला कधीच असे म्हणणार नाही, की ” मला हे दे, मला ते दे.” किंवा ”याची मला गरज आहे, ते मला मिळालेच पाहिजे.” तुम्ही ‘त्या’ला अशी विनवणी कराल की, ”माझ्यासाठी जे गरजेचे आहे ते तू कर आणि माझ्या अस्तित्वाच्या ‘सत्या’प्रत तू मला घेऊन चल; हे ‘ईश्वरा’, माझ्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे असे तुझ्या ‘परमप्रज्ञे’ला दिसते, ती तू मला प्रदान कर.”

आणि त्यानंतर मात्र, मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची तुम्हाला खात्री असेल. आणि ‘ईश्वर’ही मग तुम्हाला अपायकारक असे काही तुम्हाला देणार नाही.

…आणि नंतर, पुष्कळ धडपड केल्यानंतर, पुष्कळ चुका केल्यानंतर, बऱ्यापैकी दुःखकष्ट सहन केल्यानंतर, आणि खूप नाऊमेद झाल्यानंतर, मग सरतेशेवटी कधीतरी, एखादी व्यक्ती शहाणी, समजदार बनायला सुरुवात होते आणि स्तंभित होऊन, अकुंठित होऊन, जाणू पाहते की, या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? म्हणजेच असे की, स्वत:च्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा एखाद्याला काही तरणोपायच नसतो का? आणि तेव्हा मग, त्या क्षणी ती व्यक्ती ‘ईश्वरा’समोर बाहू फैलावून असे म्हणू शकते की, “मी इथे आहे, माझा स्वीकार कर आणि मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल.” त्यानंतर मग सारे काही सुरळीत व्हायला सुरुवात होते.

– श्रीमाताजी [CWM 08 : 121-124]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…

18 hours ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…

2 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…

3 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…

4 days ago

चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण

साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…

5 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…

6 days ago