तुम्ही जेवढे अधिक अचंचल (quieter) व्हाल, तेवढे तुम्ही अधिक शक्तिशाली व्हाल. समत्व हा सर्व आध्यात्मिक शक्तींचा दृढ पाया आहे. तुमची बैठक मोडू शकेल अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही थारा देता कामा नये; तुम्ही तसे करू शकलात, तर मग होणाऱ्या सर्व हल्ल्यांच्या प्रतिकार तुम्ही करू शकता. तसेच, त्याच्या जोडीला जर तुमच्याकडे पुरेसा विवेक असेल आणि जेव्हा अनिष्ट सूचना तुमच्यापाशी येत असतात तेव्हाच तुम्ही जर का त्या पाहू शकलात, पकडू शकलात तर, त्यांना परतवून लावणे हे तुम्हाला सोपे जाते; परंतु कधीकधी त्या नकळतपणे येतात आणि मग त्यांच्याशी मुकाबला करणे अवघड होऊन बसते. जेव्हा असे घडते तेव्हा तुम्ही शांत बसले पाहिजे आणि तेव्हा तुम्ही शांतीला व सखोल आंतरिक अचंचलतेला आवाहन केले पाहिजे. दृढ राहा आणि विश्वासाने, श्रद्धेने आवाहन करा. जर तुमची अभीप्सा शुद्ध आणि स्थिर असेल तर तुम्हाला खात्रीपूर्वक साहाय्य मिळतेच.

विरोधी शक्तींकडून होणारे हल्ले हे अटळ असतात. मार्गावरील परीक्षा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे आणि त्या अग्निदिव्यामधून मोठ्या धैर्याने बाहेर पडले पाहिजे. हा मुकाबला कठीण असू शकतो पण जेव्हा तुम्ही त्यामधून बाहेर पडता, तेव्हा तुम्ही काहीतरी प्राप्त करून घेतलेले असते, तुमचे एक पाऊल पुढे पडलेले असते. कधीकधी तर अशा विरोधी शक्तींच्या अस्तित्वाची आवश्यकताही असते. त्यांच्यामुळे तुमचा निश्चय अधिक दृढ होतो, तुमची अभीप्सा अधिक सुस्पष्ट होते. हेही खरे आहे की, तुम्हीच अशा शक्तींना जिवंत राहण्याचे खाद्य पुरविता म्हणून त्या टिकून राहतात. जोवर तुमच्यामधील काहीतरी त्यांना प्रतिसाद देत राहते तोवर, त्यांचा हस्तक्षेप हा अगदी यथायोग्यच आहे, असे म्हटले पाहिजे.

परिस्थिती कोणतीही असली तरी, जेव्हा विरोधी शक्तींकडून हल्ला होतो तेव्हा हा हल्ला बाहेरून होत आहे, असे समजावे आणि म्हणावे, “हे माझे स्वरूप नाही, मला या गोष्टीशी काहीही घेणेदेणे नाही”; हा दृष्टिकोन सुज्ञपणाचा आहे. सारे कनिष्ठ आवेग, साऱ्या इच्छाआकांक्षा, साऱ्या शंका आणि मनामधील साऱ्या प्रश्नांना तुम्ही याच पद्धतीने हाताळले पाहिजे. जर तुम्ही त्या साऱ्यांबरोबर वाहवत गेलात तर, त्यांच्याशी मुकाबला करण्यातील अडचणी अधिक वाढतात; कारण मग तुम्हाला, तुमच्या स्वतःच्याच प्रकृतीवर मात करण्याच्या कायमस्वरूपी अवघड कामाला सामोरे जावे लागत आहे, असे तुम्हाला जाणवेल. पण जर एकदा का तुम्ही असे म्हणू शकलात की, “नाही, हे माझे स्वरूप नाही. मला त्यांच्याशी काही कर्तव्य नाही”, तर मग त्यांना पिटाळून लावणे अधिक सोपे जाते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 34-35)

आपण भलेही अज्ञानी असलो, चुका करत असलो, दुर्बल असलो आणि आपल्यावर विरोधी शक्तींचे हल्ले होत असले तरी, आणि बाह्यतः तत्काळ अपयश आलेले दिसत असले तरीही, तो ‘ईश्वरी संकल्प’ आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तो आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून, त्या अंतिम साक्षात्काराकडेच घेऊन जात आहे, अशी श्रद्धा आपण बाळगली पाहिजे. ही श्रद्धा आपल्याला समत्व प्रदान करेल; आणि ही श्रद्धाच, जे काही घडते ते अंतिम स्वरूपाचे नसून, मार्गावर वाटचाल करत असताना, या सर्व गोष्टींमधून जावेच लागते, या गोष्टीचा स्वीकार करते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 91)

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. – आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने ‘ईश्वरा’प्रत केलेले आत्म-दान, वरून अवतरित होणारी आध्यात्मिक स्थिरता व शांती, आणि समतेला विरोध करणाऱ्या, अहंकारी आणि राजसिक अशा साऱ्या भावनांना दृढ, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण नकार.

यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे, हृदयामध्ये संपूर्ण समर्पण व अर्पण भाव. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी प्रभावी होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये वृद्धी आणि समर्पण या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 131)

समतेशिवाय साधनेचा पाया पक्का होऊ शकत नाही. परिस्थिती कितीही असुखकर असू दे, इतरांची वागणूक कितीही मान्य न होण्यासारखी असू दे तरी, तुम्ही तिचा पूर्ण शांतपणे आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियेविना स्वीकार करायला शिकलेच पाहिजे. ह्या गोष्टी हीच समत्वाची खरी कसोटी असते. जेव्हा लोक चांगले वागत असतात आणि परिस्थिती सुखकारक असते आणि सर्व गोष्टी सुरळीत चालू असतात, तेव्हा समत्व राखणे आणि शांत राहणे सोपे असते; पण जेव्हा ह्या साऱ्या गोष्टी विपरित असतात तेव्हाच स्थिरता, शांती, समता यांच्या पूर्णत्वाचा कस लावता येणे शक्य होते, त्यांचे दृढीकरण करता येते, त्यांना परिपूर्ण करता येते.

*

समत्व हाच खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार आहे आणि साधक जेव्हा स्वत:च्या प्राणिक प्रवृत्तीला, भावना किंवा वाणी किंवा कृती यामध्ये वाहवत जायला मुभा देतो, तेव्हा तो या समत्वापासूनच ढळत असतो, विचलित होत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 129, 130)

समत्व म्हणजे केवळ शांती नव्हे आणि तटस्थताही नव्हे किंवा अनुभवांपासून मागे हटणेही नव्हे, तर आपल्या मनाच्या व प्राणाच्या ज्या वर्तमान प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे, अतीत जाणे म्हणजे समत्व. समत्व म्हणजे जीवनाला आध्यात्मिक रीतीने सामोरे जाणे, प्रतिसाद देणे. किंबहुना आध्यात्मिक रीतीने जीवनाला कवळणे आणि आपल्या जीवनाला स्वतःच्या व आपल्या आत्म्याच्या कृतीचे परिपूर्ण रूप बनण्यास प्रवृत्त करणे म्हणजे समत्व. आत्म्याची आपल्या अस्तित्वावर सत्ता प्रस्थापित झाल्याचे हे पहिले मर्म आहे. हे समत्व आपल्याला पूर्णतेने साध्य झाले की मग, दिव्य आध्यात्मिक प्रकृतीच्या मूळ भूमिमध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 721)

समत्व म्हणजे नवे अज्ञान किंवा आंधळेपण नव्हे; समत्व हे दृष्टीमध्ये धूसरता आणण्याची तसेच सर्व रंगामधील भिन्नता पुसून टाकण्याची अपेक्षा बाळगत नाही किंवा त्याची आवश्यकताही नसते. विभिन्नता असणारच आहे, अभिव्यक्तीमध्ये वैविध्यही असणार आहे आणि त्याची आपण कदर केली पाहिजे. आपली दृष्टी जेव्हा आंशिक तसेच चुकीच्या प्रेमाने व द्वेषाने, प्रशंसेने व तिरस्काराने, सहानुभूती व विरोधी भावनेने आणि अनुकूल व प्रतिकूल भावनेने मलीन झालेली होती त्यापेक्षा, आपण आता (समत्व दृष्टीच्या साहाय्याने) त्या विविधतेची अधिक न्याय्य प्रकारे कदर करू शकू. मात्र या विविधतेच्या पाठीमागे असलेल्या आणि जो त्या विविधतेमध्ये निवास करतो त्या ‘परिपूर्ण’ आणि ‘अपरिवर्तनीय’ ईश्वरास आपल्याला नेहमीच पाहता आले पाहिजे आणि आपल्याला त्याची जाणीव व्हावयास हवी, आपल्याला त्याचे ज्ञान व्हावयास हवे. किंवा जर तो ईश्वर आपल्यापासून गुप्त असेल तर किमान – आपल्या मानवी मापदंडांना विशिष्ट आविष्कार हा सुसंवादी व परिपूर्ण वाटतो की ओबडधोबड आणि अपूर्ण की अगदी मिथ्या व अनिष्ट वाटतो, यास महत्त्व न देता – त्या विशिष्ट आविष्काराची ईश्वरी आवश्यकता आणि त्या पाठीमागे असणाऱ्या सुबुद्ध प्रयोजनावर तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 224-225)

आंतरिक शांतीचा आधार असतो समता. बाह्य गोष्टींचे हल्ले आणि बाह्य गोष्टींची विविध रूपे, मग ती सुखद असोत वा दुःखद, दुर्भाग्यपूर्ण असोत किंवा सौभाग्यपूर्ण, आनंददायी असोत वा वेदनादायी, मानसन्मानाचे असोत किंवा अपकीर्तीचे, स्तुती असो वा निंदा, मैत्री असो वा शत्रुत्व, पापी असो वा संत, आणि भौतिकदृष्ट्या उष्ण असोत वा शीत असोत इत्यादी सर्व गोष्टींना स्थिर आणि समतायुक्त मनाने स्वीकारण्याची क्षमता म्हणजे समता.

– श्रीअरविंद
(CWSA 10-11 : 03)

प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात?

श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह हा ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असतो; एवढेसे काही झाले की एखादी लहानगी मुलगी जशी घाबरून जाते तशी व्यक्तीची मनोवस्था नसेल; एखादी व्यक्ती जेव्हा व्यवस्थित झोप घेते, व्यवस्थित अन्नसेवन करते… जेव्हा व्यक्ती शांत असते, संतुलित असते, अगदी शांत असते, तेव्हा व्यक्तीचा पाया मजबूत असतो आणि मग अशी व्यक्ती मोठ्या संख्येने शक्तींचा स्वीकार करू शकते.

तुमच्यापैकी कोणी आजवर जर आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली असेल तर, उदाहरणार्थ दिव्य आनंदाची शक्ती ग्रहण केली असेल तर, त्याच्या हे अनुभवास आले असेल की, त्याचे आरोग्य जर उत्तम नसेल तर तो ते अनुभव साठवून ठेवू शकत नाही, टिकवून ठेवू शकत नाही. तो रडू लागतो, ओरडू लागतो, जे काही त्याला प्राप्त झाले आहे ते खर्च करण्यासाठी तो अगदी उतावीळ होऊन जातो. ते करण्यासाठी त्याला हसावे लागते, बोलावे लागते, त्याला हावभाव, हातवारे करावे लागतात अन्यथा तो ती शक्ती राखू शकत नाही, त्याचा कोंडमारा झाल्यासारखे त्याला वाटते. आणि अशा रीतीने हसत राहिल्यामुळे, रडत राहिल्यामुळे, इकडे तिकडे हिंडत राहिल्यामुळे त्याने जे काही प्राप्त केले असते ते, त्या साऱ्या गोष्टी तो गमावून बसतो.

उत्तम संतुलित स्थितीत राहण्यासाठी, जे प्राप्त होत आहे ते आत्मसात करता येण्यासाठी, व्यक्तीने अगदी शांत, अचंचल आणि स्थिर असले पाहिजे. व्यक्तीचा पाया मजबूत असला पाहिजे, आरोग्य उत्तम असले पाहिजे. पाया अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे. ती गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)

प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ?

श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. सर्व घटना मग त्या चांगल्या असोत की वाईट, दुःखीकष्टी न होता, नाउमेद न होता, उतावीळ आणि अस्वस्थ न होता, सहन करण्याची शक्ती म्हणजे आत्म्याचे समत्व. समत्व असले की, काहीही घडले तरी तुम्ही प्रसन्न, शांत राहता.

दुसरे म्हणजे शरीरातील समत्व. हे मानसिक समत्व नसते, तर ते काहीसे भौतिक, शारीरिक समत्व असते; म्हणजे ती अशी एक शारीरिक संतुलनाची स्थिती असते की, ज्यामुळे व्यक्ती कोणताही त्रास न होता, शक्तींचे ग्रहण करू शकते.

व्यक्तीला जर या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर या दोन्ही समत्वांची सारखीच आवश्यकता असते. आणि त्याशिवाय इतरही काही गोष्टी असतातच. उदाहरणार्थ, मनाची बैठक. सर्व प्रकारच्या कल्पना, अगदी परस्परविरोधी का असेनात, सर्व बाजूंनी येत राहतात आणि तरीदेखील व्यक्तीला त्याचा काही त्रास होत नाही अशी स्थिती म्हणजे मनाची बैठक. व्यक्ती त्या कल्पना पाहू शकते आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य स्थानी ठेवू शकते. ती असते मनाची बैठक.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)

उच्चतर चेतनेची शांती जेव्हा अवतरित होते तेव्हा ती नेहमीच तिच्यासोबत समतेची प्रवृत्ती देखील घेऊन येते. कारण कनिष्ठ प्रकृतीच्या लाटांकडून, समतेविना असलेल्या शांतीवर आघात होण्याचा नेहमीच धोका संभवतो.

*

मानसिक चेतनेप्रमाणेच तुम्ही प्राणिक आणि शारीरिक चेतनेमध्येही समत्व आणि स्थिरतेचा दृढ पाया निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. तुमच्यामध्ये ‘शक्ती’ आणि ‘आनंदा’चा पूर्ण प्रवाह अवतरित होऊ दे, परंतु तो प्रवाह धारण करता येईल अशा दृढ आधारामध्येच शक्ती आणि आनंद अवतरित व्हायला हवेत. आणि आधाराच्या (शरीर, प्राण, मन) ठायी ही क्षमता आणि दृढता परिपूर्ण समत्वामधूनच येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 128, 127)