विचार शलाका – २९

रूपांतरणाचा योग (पूर्णयोग) हा सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. व्यक्तीला जर का असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे, आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दु:खे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी हरकत नाही ते तितकेसे महत्त्वाचे नाही. “मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी जर व्यक्तीची अवस्था असेल तर मात्र गोष्ट निराळी.

 

अन्यथा मी म्हणेन, “चांगले वागा, सुखी असा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे.” चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होतात ती अपवादात्मक अशी परिस्थिती होती हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग चेतनेचा काही अंश, तिचा प्रकाश, तिचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल. आणि ते खूप चांगले असेल. पण, एकदा का तुम्ही योगमार्गावर पाऊल ठेवलेत की, तुमचा निर्णय वज्रकठोर असला पाहिजे आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी तुम्ही थेट ध्येयाकडे वाटचाल केलीच पाहिजे.

 

– श्रीमाताजी

(CWM 07 : 200)

विचार शलाका – २८

सांसरिक जीवन हे स्वभावत:च ‘अशांतीचे क्षेत्र’ आहे. त्यामधून जर योग्य रीतीने वाटचाल करायची असेल तर, व्यक्तीने आपली कर्मं आणि आपले जीवन ‘ईश्वरा’ला समर्पित केले पाहिजे आणि आपल्या अंतरंगातील ‘दिव्य’ शांतीसाठी त्या ‘ईश्वरा’ची प्रार्थना केली पाहिजे. मन जेव्हा शांत, स्थिर होते तेव्हा, ‘दिव्यमाता’च आपल्या जीवनाला आधार देत आहे असे व्यक्ती अनुभवू शकते आणि तेव्हा मग ती व्यक्ती सर्वकाही त्या ‘दिव्यमाते’च्या हाती सोपवून देते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 31 : 345)

विचार शलाका – २७

व्यक्ती जेव्हा बाह्य जगात राहात असते तेव्हा ती आश्रमातल्याप्रमाणे वागू शकत नाही – व्यक्तीला इतरांमध्ये मिसळावे लागते आणि इतरांशी बाह्यत: सर्वसाधारण संबंध तरी ठेवावे लागतात. महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आंतरिक चेतना ‘ईश्वरा’प्रत उन्मुख ठेवणे आणि त्यात विकसित होणे. व्यक्ती जसजसे ते करू लागेल, तसतसा कमीअधिक वेगाने, साधनेच्या आंतरिक तीव्रतेनुसार इतरांविषयीचा तिचा दृष्टिकोन बदलेल. सर्व काही अधिकाधिकपणे ‘ईश्वरी’ दृष्टीने बघितले जाईल आणि भावना व कृती इत्यादी गोष्टी पूर्वीच्या बाह्य प्रतिक्रियांच्या द्वारा ठरविल्या न जाता, तुमच्या अंतरंगातील वर्धिष्णू अशा चेतनेच्याद्वारे ठरविल्या जातील.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 344)

विचार शलाका – २६

व्यक्तीला जेव्हा सर्वसामान्य वातावरणात राहून, दैनंदिन जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला तयार करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे – सर्वांगीण समता व अलिप्तता, आणि या अज्ञानमय विश्वात सद्यस्थितीतदेखील ‘ईश्वर’ आहे आणि ‘ईश्वरी इच्छा’ सर्व गोष्टींमध्ये कार्यकारी आहे याविषयी सश्रद्ध राहून, ‘गीते’मध्ये सांगितल्यानुसार ‘समता’वृत्तीची जोपासना करणे – हा आहे. …व्यक्तीमध्ये तसेच प्रकृतीमध्ये, प्रकाश व आनंद यांच्या पदार्पणाचा आणि स्थापनेचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आध्यात्मिक समतेमध्ये विकसित होणे, हा असतो. त्यामुळे असुखकर, असहमत वस्तुंविषयीची तुमची अडचणदेखील दूर होईल. सर्व प्रकारच्या असमाधानकारकतेचा सामना या ‘समते’च्या वृत्तीद्वारे केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 344)

विचार शलाका – २५

(‘पूर्णयोग’ साध्य करायचा असेल तर व्यक्तीने कोणती गोष्ट नीट समजून घ्यायला हवी, ती गोष्ट श्रीमाताजी येथे सांगत आहेत. एखाद्या व्यक्तीची ईश्वरविषयक जी काही संकल्पना असते, ती म्हणजेच केवळ ईश्वर नाही, तर इतरांच्या त्याच्याविषयीच्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पनांनुसार देखील ईश्वर असू शकतो, आणि कोणाच्याच संकल्पनेत बसू शकणार नाही असाही तो असू शकतो, हे व्यक्तीने समजून घेतले पाहिजे असे श्रीमाताजी सांगत आहेत. त्या पुढे म्हणतात..)

सहजस्फूर्तपणे किंवा ईश्वराबाबत पुसटशीही जाणीव नसताना देखील, लोक त्यांच्या त्यांच्या संकल्पनेला साजेसे ‘ईश्वरा’ने असावे असा आग्रह धरतात. विचार न करताच अगदी उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला सांगतात, “हा ईश्वर आहे, हा ईश्वर नाही!’ वास्तविक, ईश्वराबद्दल ते असे कितीसे जाणत असतात?

… “दिव्यत्व म्हणजे काय?” असे तुम्ही त्यांना विचारले तर मात्र उत्तर देणे त्यांना कठीण जाते, त्यांना काहीच माहीत नसते. …एखाद्या व्यक्तीला जाण जेवढी कमी, तेवढी ती व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी अधिक मतं बनविते, हे निखालस सत्य आहे. आणि जेवढी एखाद्या व्यक्तीला जाण अधिक, तेवढी ती मतप्रदर्शन कमी करते. आणि पुढे पुढे तर एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्ती निरीक्षण करू लागते पण कोणतेही मत बनविणे तिला अशक्य होऊन बसते. व्यक्ती गोष्टी पाहू शकते, त्या जशा आहेत अगदी तशा त्या पाहू शकते, त्यांच्यातील परस्परसंबंध ती पाहू शकते, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून त्या गोष्टी ती पाहू शकते, त्या सद्यस्थितीत जिथे आहेत आणि जिथे त्या असायला पाहिजेत यातील फरक व्यक्तीला उमगतो. – या दोहोंमधील ही तफावत ही जगातील एक फार मोठी अव्यवस्था आहे हे सुद्धा अशा व्यक्तीला दिसते – पण ती व्यक्ती त्यावर टिप्पणी करत नाही, ती फक्त निरीक्षण करते.

आणि एक क्षण असा येतो की जेव्हा, “हा ईश्वर आहे आणि तो ईश्वर नाही” असे म्हणणे देखील त्या व्यक्तीला अवघड जाते. कारण, खरे सांगायचे तर, एक काळ असा येतो की, तिच्या दृष्टीला संपूर्ण विश्वच अशा समग्रपणे, सर्वंकष रीतीने दिसू लागते की तिला हे कळून चुकते की, येथे कशालाही धक्का न पोहोचू देता, येथील एकही गोष्ट या विश्वापासून वेगळी काढता येणे अशक्य आहे.

आणि अजून एकदोन पावले पुढे गेल्यावर व्यक्तीला निश्चितपणे असे कळते की, ‘ईश्वर-विरोधी’ वाटल्यामुळे आपल्याला ज्याचा धक्का बसला होता, ती गोष्ट केवळ तिच्या योग्य जागी नाही इतकेच. प्रत्येक गोष्ट अगदी तिच्या अचूक जागीच असली पाहिजे. तसेच, या आविष्कृत झालेल्या विश्वामध्ये सातत्याने नवनवीन तत्त्वांची, घटकांची भर घातली जात असते, त्या घटकांच्या सुसंवादी प्रगतिशील अशा व्यवस्थेमध्ये जेणेकरून तिचा प्रवेश होणे शक्य होईल, इतपत ती गोष्ट लवचिक, घडणसुलभ (plastic) देखील असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 01-02)

विचार शलाका – २४

व्यक्तीने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर आपण उभे नाही ना, याची काळजी घ्यावयास हवी. श्रीअरविंदांचे हेच सांगणे आहे की, व्यक्तीने ‘दुहेरी जीवन’ (‘double life’) जगता कामा नये. तिने एक तर ही गोष्ट सोडावयास हवी किंवा ती – एकाच वेळी दोन्हींचे अनुसरण करता येत नाही….

अर्थात त्यासाठी व्यक्तीने तिच्या जीवनात असलेल्या परिस्थितीतून बाहेर पडलेच पाहिजे असे काही आवश्यक नाही; व्यक्तीने तिचा आंतरिक दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. जे करणे व्यक्तीच्या सवयीचे झाले आहे ते तिने करावयास हरकत नाही पण ते करताना दृष्टिकोन मात्र निराळा असावा. योगसाधना करण्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा परित्याग करून एकांतवासात जाणे, एखाद्या आश्रमातच जाऊन राहणे गरजेचे आहे, असे मी म्हणत नाही. पण, एक मात्र खरे आहे की, एखादी व्यक्ती जर प्रपंचात व प्रापंचिक परिस्थितीमध्ये राहून योगाचरण करीत असेल तर ते अधिक अवघड असते, परंतु ते अधिक परिपूर्ण सुद्धा असते. कारण प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात गेलेल्या व्यक्तीसमोर उभ्या ठाकत नाहीत; कारण अशा व्यक्तीच्या बाबतीत समस्यांचे प्रमाण अगदीच कमी झालेले असते. प्रापंचिक व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते; त्याच्या भोवती असणाऱ्या, आणि ज्यांच्याशी तिचा सतत संबंध येतो त्या व्यक्तींच्या वागण्याचे आकलन न होण्यापासून याची सुरुवात होते; व्यक्तीने त्यासाठी तयार असले पाहिजे, सहनशीलता आणि अतीव अलिप्तता यांसह सुसज्ज असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात व काय बोलतात याची योगमार्गाची वाटचाल करणाऱ्या व्यक्तीने पर्वा करू नये; हा पूर्णपणे अपरिहार्य असा आरंभबिंदू असतो. तुमच्याबद्दल जग काय बोलते अथवा विचार करते, तुम्हाला ते कसे वागवते याबाबत तुम्ही पूर्णपणे निर्लिप्त असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय समजूत करून घेतात हे तुमच्यालेखी गौण असले पाहिजे आणि त्याचा तुम्हाला यत्किंचितही स्पर्श होता कामा नये. याच कारणामुळे, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात जाऊन योगसाधना करण्यापेक्षा, व्यक्तीला तिच्या सभोवताली असलेल्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये राहून योगसाधना करणे हे सहसा अधिक अवघड असते. हे खरोखरच जास्त अवघड असते, पण आपण येथे (आश्रमात) सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलोच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 377-378)