विचार शलाका – १३

योगसाधनेद्वारे व्यक्तीला नियतीचा केवळ वेधच घेता येतो असे नाही, तर व्यक्ती तिच्यात फेरफार करून नियतीला जवळपास पूर्णपणे बदलूनही टाकू शकते. सर्वप्रथम, योगशास्त्र आपल्याला असे शिकविते की, आपण म्हणजे एकसंध, साधेसुधे अस्तित्व नसतो; आणि त्यामुळे अनिवार्यपणे, आपली नियती देखील साधीसुधी, तर्कसंगत म्हणता येईल अशी एकच एक असत नाही. उलट आपण हे समजून घेतले पाहिजे की, सर्वसाधारणपणे बहुतांशी माणसांची नियती ही व्यामिश्र (complex) असते, कधी कधी विसंगतही वाटावी इतकी ती टोकाची असते. ह्या व्यामिश्रतेमुळेच आपणाला ती अनपेक्षित, अनिश्चित, आणि परिणामतः असंभाव्य आहे असे भासत नाही का?

हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यक्तीला हे माहीत असणे आवश्यक आहे की, ….स्वत:च्या सर्वोच्च चेतनेमध्ये स्वत:ला कायम राखणे आणि अशा प्रकारे, स्वतःच्या सर्वोच्च नियतीला कृती व जीवनाच्या इतर भागांवर प्रभुत्व गाजविण्यास अनुमती देणे, यातच जीवनाची कला सामावलेली आहे. तेव्हा चूक होण्याची यत्किंचितही आशंका न बाळगता व्यक्ती असे म्हणू शकते की, कायम चेतनेच्या सर्वोच्च शिखरस्थानी राहा म्हणजे तुमच्या बाबतीत सर्वोत्तम तेच घडेल. पण ते सर्वोच्च शिखर गाठणे इतके सोपे नसते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 77-78)

विचार शलाका – १२

लोकांची मनं, चारित्र्य व अभिरुची उच्च पातळीवर नेणे, स्वभावाचा प्राचीन उमदेपणा परत प्राप्त करून घेणे, सामर्थ्यशाली असे ‘आर्य’ चारित्र्य आणि उच्च कोटीचा ‘आर्य’ दृष्टिकोन, पार्थिव जीवन सुंदर व अद्भुतरम्य बनवणारी समज यांचे पुनरुज्जीवन करणे आणि अशी नेत्रदीपक अभीप्सा, आध्यात्मिक अनुभव, साक्षात्कार की ज्यामुळे आपण या भूतलावरील सर्व मानवसमूहांमध्ये अधिक विशाल-हृदयी, सखोल विचारांचे गणले गेलो, आणि सर्वाधिक सखोल सूक्ष्मतेने जीवनाची ज्ञानोपासना करणारे गणले गेलो, त्या साऱ्याचे पुनरुज्जीवन करणे हे आता आपल्यापुढील तातडीचे व महत्त्वाचे कार्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 246)

विचार शलाका – ११

आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण काहीच नाही, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘कृपा’ यांच्याविना कोणते अस्तित्वच नाही हे खोलवर कळण्यासाठी आयुष्यात कितीतरी टक्केटोणपे खावे लागतात. आणि ज्या क्षणी माणसाला हे उमगते, त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात, त्याचवेळी साऱ्या अडचणी दूर होतात. एखाद्याला जेव्हा हे पूर्णार्थाने कळते आणि विरोध करणारे काहीच शिल्लक रहात नाही… पण त्या क्षणापर्यंतच… तो क्षण यायलाच खूप वेळ लागतो. …हे न विसरण्याइतकी जर एखादी व्यक्ती भाग्यवान असेल तर ती या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)

विचार शलाका – १०

स्वत:च्या अहंकारामध्ये जो जगतो, स्वत:च्या अहंकारासाठी जो जगतो, स्वत:चा अहंकार सुखावेल या आशेने जो जगतो तो मूर्ख असतो. तुम्ही जोपर्यंत अहंकाराच्या वर उठत नाही, जेथे अहंकाराची आवश्यकताच उरत नाही, अशा चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेप्रत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही; तोपर्यंत ध्येय प्राप्त होईल अशी आशाच तुम्ही बाळगू शकत नाही.

एके काळी व्यक्तिगत चेतनेच्या घडणीसाठी अहंकार अनिवार्य आहे असे वाटत होते पण अहंकारासोबतच सर्व अडथळे, दुःखभोग, अडचणी यांचाही जन्म झाला की ज्या गोष्टी आज आपल्याला विरोधी शक्ती आणि अदिव्य शक्ती वाटतात. पण आंतरिक शुद्धी व अहंकार-मुक्ती यांसाठी अशा विरोधी शक्ती देखील आवश्यक होत्या. अहंकार हा एकाच वेळी त्या विरोधी शक्तींच्या कृतीचा परिणाम आणि त्यांच्या दीर्घकाळ टिकून राहण्याचे कारणदेखील असतो. जेव्हा अहंकार नाहीसा होईल, त्याच्याबरोबरच विरोधी शक्तीदेखील नाहीशा होतील. कारण त्यांना या जगात अस्तित्वात राहण्याचे काही कारणच उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 218)

विचार शलाका – ०९

अगदी क्षुल्लक गोष्टीनेदेखील असमाधानी होणाऱ्या तुमच्या अहंकाराला, तुमच्या अस्तित्वाची दारे उद्दाम आणि उद्धट अविश्वासाच्या अशुभ वृत्तीकडे उघडण्याची सवयच लागते की ज्यामुळे तो, जे जे पवित्र व सुंदर असते त्यावर, विशेषत: तुमच्या जिवाच्या अभीप्सेवर आणि ‘परमेश्वरी कृपे’कडून मिळणाऱ्या मदतीवर, चिखलफेक करण्यात काळाचा अपव्यय करतो.

हे असेच चालू दिले तर त्याचा शेवट हा महाभयंकर अशा आपत्तीत व विनाशात होतो. हे संपविण्यासाठी अतिशय कठोर अशी पावले उचलली गेली पाहिजेत, आणि त्यासाठी तुमच्या जिवाचे सहकार्य आवश्यक असते. जिवाने सजग झालेच पाहिजे आणि अहंकाराची अशुभ वृत्तीकडे उघडणारी दारे निश्चयपूर्वक बंद करून, अहंकाराशी लढा देण्यासाठी त्याने सहाय्य केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 23)

विचार शलाका – ०८

“अमुक एक विचार मी का केला? मला असे का वाटले? किंवा मी असे का केले?”, असे प्रश्न जर तुम्ही स्वत:लाच विचारलेत तर, १०० पैकी ९९ वेळा उत्तर नेहमी सारखेच येते. ते म्हणजे “काय माहीत? घडले खरं असे!” म्हणजेच असे म्हणता येईल की, बहुतेकदा तुम्ही अजिबात भानावर नसता.

तुम्ही जेव्हा इतरांसोबत वावरत असता, तेव्हा तुमच्यामधून कोणती स्पंदने निर्माण झाली आणि इतरांकडून कोणती स्पंदने निर्माण झाली हे तुम्हाला कळू शकते का? त्यांची जीवनशैली, त्यांची विशिष्ट स्पंदने तुमच्यावर कुठवर परिणाम करतात, हे तुम्हाला कळू शकते का? याविषयी तुम्हाला अजिबात कल्पना नसते. तुम्ही एक प्रकारच्या “अस्फुट” अशा चेतनेत जगत असता, अर्ध जागृत, अर्ध निद्रिस्त, खूपशा धूसर, अस्पष्ट अशा अवस्थेत जगत असता, की ज्यामुळे तुम्हाला गोष्टींचा वेध घेण्यासाठी चाचपडावे लागते. पण तुम्हाला तुमच्या अंतरंगात काय चालू आहे, ते तसे का चालू आहे याची निश्चित, स्पष्ट, अचूक कल्पना असते का? आणि कोणती स्पंदने तुमच्यामध्ये बाहेरून येत आहेत आणि कोणती तुमच्या आतून येत आहेत याची कल्पना असते का? जे बाहेरून येऊ शकते, ते तुमच्यातील सारे काही बदलून, त्यांना भलतेच वळण देऊ शकते, याची तुम्हाला पुसटशी तरी कल्पना असते का? तुम्ही एक प्रकारच्या अनिश्चित अशा अस्थिरतेत जगत असता, आणि अचानकपणे काही छोट्या गोष्टी तुमच्या जाणिवेत स्फटिकवत सुस्पष्ट होतात, एक क्षणभरासाठी तुम्ही त्यांना पकडलेले असते आणि त्या पुरेशा सुस्पष्ट होऊन जातात, जणू काही तिथे एखादा प्रोजेक्टर होता, पडद्यावर एक चित्र सरकून गेले, क्षणभरासाठी ते सुस्पष्ट झाले. आणि पुढच्याच क्षणाला परत सारे काही धूसर, अनिश्चित झाले. पण तुम्ही याविषयी जागृत नसता, कारण तुम्ही स्वत:ला कधी तसा प्रश्नदेखील विचारलेला नसतो, कारण तुम्ही अशाच प्रकारे जगत असता.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 336)

विचार शलाका – ०७

अहंकार स्वत:चा अधिकार सोडण्यास नकार देतो त्यामुळेच जीवनात नेहमी सर्व तऱ्हेची कटुता येते.

*

सारे जे काही घडत असते, ते आपल्याला केवळ एकमेव धडा शिकविण्यासाठीच घडत असते; तो म्हणजे, जर आपण अहंकाराचा त्याग केला नाही तर शांती ना आपल्याला मिळेल, ना इतरांना! आणि तेच, जीवन जर अहंकारविरहित असेल तर तो एक अद्भुत चमत्कार ठरतो.

*

अहंकाराच्या लीलेविना कोणतेही संघर्ष झाले नसते. आणि नाटके करण्याची प्राणाची प्रवृत्ती नसती तर जीवनात नाट्यमय घटनाही घडल्या नसत्या.

*

तुमच्या अडचणींच्या प्रमाणावरूनच तुम्हाला किती अहंकार आहे ते तुमचे तुम्हाला कळते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 257-258)

विचार शलाका – ०६

सच्च्या साधकभावाने जे जीवन व्यतीत करतात, जे ‘ईश्वरा’ठायीच त्यांची चेतना आणि एकाग्रता दृढ ठेवतात, फक्त ‘ईश्वर’ हेच ज्यांचे साध्य असते, जे दास्य भावाने ‘ईश्वरा’ची सेवा करतात, जे ‘ईश्वरा’शी संपूर्णतया एकनिष्ठ असतात, केवळ त्यांनाच ‘ईश्वर’ संरक्षण देऊ शकतो.

एखाद्याचा आवडीनिवडींचा, सुखसोयींचा आग्रह, दांभिकपणा, अप्रामाणिकपणा व मिथ्याचार यांच्या सर्व गतिविधी इत्यादी वासना या म्हणजे, ‘ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग अडवून उभे ठाकणारे प्रचंड अडथळे असतात. तुम्ही जर तुमची स्वत:ची इच्छा ‘ईश्वरा’वर लादू पहात असाल तर, ते म्हणजे एखादा बॉम्ब तुमच्यावर येऊन आदळावा म्हणून त्या बॉम्बलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. गोष्टी अशा रीतीनेच घडतील, असे मी म्हणत नाही. पण लोक जर जागरूक व अतिशय सतर्क झाले नाहीत आणि सच्च्या साधकभावाने वागले नाहीत, तर गोष्टी अशा रीतीनेच घडण्याची दाट शक्यता असते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 121)

विचार शलाका – ०५

कण्हणेविव्हळणे, रुदन करणे अशा गोष्टींमध्ये पृष्ठस्तरावरील प्रकृतीला आनंद मिळत नाही – पण तिच्या आत असे काहीतरी असते की जे, हसू आणि आसू, आनंद व दुःख, मौजमजा व वेदना यांच्या लीलेमध्ये – वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, या अज्ञानाच्या लीलेमध्ये रस घेते. काही माणसांमध्ये ते काही प्रमाणात पृष्ठभागावरच दिसून येते. जीवनातील दु:खभोगापासून संपूर्ण सुटकेचा प्रस्ताव जर तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलात, तर त्यांच्यातील बहुतेक जण तुमच्याकडे साशंकपणे बघू लागतील. कारण ‘आनंद’, शांती, समाधान यांव्यतिरिक्त जीवनात काहीच नसेल, तर तसे जीवन त्यांना भयंकर कंटाळवाणे वाटेल – अनेकांनी तर तसे बोलूनही दाखविले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178-179)

विचार शलाका – ०४

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच (vital) एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याचा विकृत पीळ असे करतो; प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध गळा काढतो आणि ‘ईश्वर’, जीवन व इतर सारे त्याला छळत असल्याचा त्यांच्यावर आरोप करतो. पण बव्हंशी दुःख-संकटे येतात आणि स्थिरावतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या घटकापासून पूर्णपणे सुटका करून घ्यायलाच हवी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178)