विचार शलाका – २३

(आम्हाला आश्रमामध्ये येऊनच योगसाधना करायची आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना श्रीअरविंद सांगत आहेत…)

एखादी व्यक्ती जर दूर अंतरावर राहून साहाय्य प्राप्त करून घेऊ शकली नाही तर ती व्यक्ती येथे (आश्रमात) योगसाधना करण्याची अपेक्षा कशी बाळगू शकते? (पूर्णयोग) ही अशी योगपद्धती आहे की जी तोंडी सूचना किंवा इतर कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. तर स्वत:ला खुले (open) करण्याचे सामर्थ्य आणि अगदी संपूर्ण नि:स्तब्धतेमध्ये देखील ‘ती’ शक्ती व तिचा प्रभाव ग्रहण करण्याचे सामर्थ्य या गोष्टींवर ही योगपद्धती अवलंबलेली आहे. त्या शक्तीला जे दूर अंतरावरून ग्रहण करू शकत नाहीत ते इथेसुद्धा (आश्रमात) ती शक्ती ग्रहण करू शकणार नाहीत. स्वत:मध्ये स्थिरता, प्रामाणिकपणा, शांती, सहनशीलता आणि चिकाटी या गोष्टी प्रस्थापित केल्याशिवाय हा योग आचरता येणे शक्य नाही, कारण यामध्ये पुष्कळ अडचणींना, समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यावर निश्चिततपणे व पूर्णत: मात करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 597)

विचार शलाका – २२

व्यक्ती जेव्हा स्वत:च्या आनंदात व मौजमजेत मश्गुल असते आणि जीवनात गोष्टी जशा येतात तसतशी जगत राहते तसतशी ती त्यांना सामोरी जाते, त्यातील गांभीर्याकडे डोळेझाक करते आणि जीवन प्रत्यक्षात जसे आहे तसे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे टाळते, एका शब्दात सांगायचे तर हे ‘विसरण्याचा’ प्रयत्न करते की, येथे सोडवण्यासाठी एक समस्या आहे, काहीतरी असे आहे की जे आपणास शोधायचे आहे. आपणास जगण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी एक कारण आहे, आपण इथे नुसता वेळ घालविणे आणि काहीही न शिकता किंवा काहीही न करता निघून जाणे यासाठी आलेलो नाही. या सर्व गोष्टी व्यक्ती विसरत असते तेव्हा ती खरोखरीच स्वत:चा वेळ व्यर्थ दवडत असते. आपल्याला जी संधी दिली गेली आहे ती संधी व्यक्ती वाया घालवत असते – अशी संधी – जिला मी अद्वितीय म्हणू शकत नाही, पण ती अद्भुत अशी अस्तित्वाची संधी असून, ते प्रगतीचे क्षेत्र असते. ती संधी अनंतातील एक असा क्षण असते की, जेव्हा तुम्ही जीवनाचे रहस्य शोधू शकता. कारण भौतिक, जडदेहात्मक अस्तित्व हे एका आश्चर्यकारक सुसंधीचे रूप असते; जीवनाचे प्रयोजन शोधण्यासाठी प्रदान केली गेलेली ती एक शक्यता (possibility) असते. गहनतर सत्याच्या दिशेने तुमचे एक पाऊल पुढे पडावे, तसेच जे तुम्हाला दिव्य जीवनाच्या शाश्वत हर्षाच्या संपर्कात आणून ठेवते ते रहस्य तुम्ही शोधून काढावे म्हणून मिळालेली ही सुसंधी असते.

मी तुम्हाला पूर्वी अनेकदा सांगितलेले आहे की, दुःखाची आणि वेदनांची इच्छा बाळगणे ही एक रोगट वृत्ती असते, ती टाळली पाहिजे, परंतु विसराळूपणाच्या नावाखाली त्यापासून दूर पळणे, वरवरच्या, उच्छृंखल क्रियाकलापाच्या माध्यमातून, वेगळेच वळण घेऊन त्यापासून दूर पळणे हा भ्याडपणा असतो. जेव्हा दुःख येते तेव्हा आपल्याला ते काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. जितक्या लवकर त्यापासून आपण धडा घेऊ तितक्या प्रमाणात दुःखाची आवश्यकता कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्या मागचे रहस्य कळते, तेव्हा दुःखभोगाची शक्यताच मावळून जाते. ते रहस्य आपल्याला त्या दु:खाचा हेतू, त्याचे मूळ, त्याचे कारण यांचा उलगडा करून देते आणि त्या दु:खाच्या अतीत जाण्याचा मार्ग दाखवून देते. अहंभावातून वर उठावे हे ते रहस्य आहे, दु:खाच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, ‘त्या’च्यामध्ये विलीन व्हावे, कुठल्याही गोष्टीला ‘त्या’च्यापासून स्वत:ला विभक्त करू देण्यास संधी देऊ नये. एकदा का हे रहस्य व्यक्तीने शोधून काढले आणि स्वत:च्या अस्तित्वात त्याची अनुभूती घेतली की, दुःखाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग पळून जातात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून केवळ अस्तित्वाच्या सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान असतो असे नव्हे, तर जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 42-43)

विचार शलाका – २१

आपण असे म्हणू शकतो की, मनुष्य हा त्याच्या प्रकृतीच्या अस्तित्वाच्या सर्व अवस्थांचा सर्वशक्तिशाली स्वामी आहे. पण ते तो विसरला आहे.

सर्वसामर्थ्यवान अशी ही त्याची स्वाभाविक अवस्था आहे पण त्याचे त्याला विस्मरण झाले आहे…

उत्क्रांतीच्या वळणावर, माणसाने त्याची सर्वशक्तिमानता विसरणेच आवश्यक होते, कारण या सर्वशक्तिमानतेमुळे त्याची छाती गर्व आणि अभिमान याने फुलली होती आणि तो पूर्णत: विकृत बनला होता. म्हणून त्यासाठी इतर कितीतरी गोष्टी त्याच्यापेक्षा अधिक बलवान आणि शक्तिशाली आहेत याची त्याला जाणीव करून देणे भागच होते; पण मूलत: ते तसे नव्हते. ती प्रगतीच्या वळणाची आवश्यकता होती इतकेच!

मनुष्य हा संभाव्यतेच्या दृष्टीने देव आहे. मात्र तो स्वत:ला प्रत्यक्षातच देव समजू लागला होता. पण एखाद्या किड्यामुंगीपेक्षा आपण अधिक सरस नाही हे त्याने शिकण्याची गरज होती. आणि त्यामुळे जीवनाने त्याला इतके आणि अशा तऱ्हेने पिळवटून काढले की, जेणेकरून त्याला ते उमगावे… अगदीच काहीनाही तर, त्याला निदान त्या गोष्टीची थोडी जाणीव तरी व्हावी. माणूस जेव्हा अगदी योग्य दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा त्याला लगेचच समजून येते की, संभाव्यतेच्या दृष्टीने तो देवच आहे. मात्र त्याने तसे बनले पाहिजे, म्हणजे, जे जे तसे (दैवी) नाही त्यावर त्याने मात केली पाहिजे.

देवांबरोबरचे हे नाते खूपच स्वारस्यपूर्ण असते… दिव्य जिवांच्या शक्तिमानतेमुळे, त्यांच्या सौंदर्यामुळे, दिव्य जिवांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या सिद्धींमुळे जोवर मनुष्य स्तंभित होत असतो, जोवर तो त्यांच्या स्तुतीमध्ये हरवून जात असतो, तोवर तो त्यांचा गुलाम असतो. पण ते दिव्य जीव म्हणजे परमेश्वरी अस्तित्वाची विविध रूपं असल्याचे जेव्हा त्याला उमगते आणि तो स्वत:सुद्धा, त्या परमेश्वरी अस्तित्वाचेच आणखी एक वेगळे रूप आहे, हे त्याला जाणवते – जे रूप त्याने बनले मात्र पाहिजे – तेव्हा मग, दिव्य जीव आणि मनुष्य यांच्यातील नाते बदलते. तेव्हा तो त्यांचा गुलाम राहात नाही. – तो मग त्यांचा गुलाम असत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 38-39)

विचार शलाका – २०

मानवी प्रकृतीमध्ये असलेली – निष्क्रियता, जडत्व, आळस, अल्पसंतुष्टता, सर्व प्रयत्नांबद्दल असेलेले वैर – यांविरुद्ध लढा दिला पाहिजे असे श्रीअरविंद येथे (Thoughts and Glimpses मधील उताऱ्यात) सांगत आहेत. बरेचदा संघर्षाची भीती वाटते म्हणून शांतीचे भोक्ते बनलेल्या आणि ही शांती प्राप्त करून घेण्यापूर्वीच विश्रांतीची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्ती आपण जीवनांत पाहतो. अशा व्यक्ती अल्पशा प्रगतीमुळेच संतुष्ट होतात आणि त्यानंतर अर्ध्या वाटेवरच विसावा घेता यावा म्हणून, आपल्या कल्पना आणि इच्छा यांद्वारे ते त्या अल्पस्वल्प प्रगतीलाच अद्भुत साक्षात्कार ठरवून मोकळे होतात.

सामान्य जीवनांत तर असा अनुभव अधिकच येतो. त्याची सुरुवात वास्तविक पाहता समाजाच्या सुखवस्तू, गर्भश्रीमंत वर्गामध्ये झालेली दिसते. या सुखवस्तू ध्येयाचा त्यांनी मानवतेसमोर जो आदर्श ठेवला त्यामुळेच आजच्या मानवाला मृतवत बनवले आहे आणि मनुष्य आज असा झाला आहे. “तारुण्य आहे तोपर्यंत तुम्ही काम करा. पैसा व मानसन्मान मिळवा, दूरदर्शीपणाने काही कमाई बाजूला ठेवा, बरेचसे भांडवल साठवा. एखाद्या हुद्द्याची जागा मिळवा म्हणजे साधारण चाळीशीच्या सुमारास तुम्हास स्वस्थपणे बसता येईल; साठवलेल्या संपत्तीचा उपभोग घेता येईल, पुढे मग पेन्शन आहेच.” म्हणजेच निढळ्या घामाने मिळविलेल्या विश्रांतिसुखाचा आस्वाद तुम्ही घ्या, असे म्हटले जाते. एकाच ठिकाणी बसून राहणे, वाटेतच थांबणे, पुढे पाऊल न टाकणे, झोपी जाणे, उतरणीस लागणे व अकालीच परलोकाच्या वाटेस लागणे व शेवटी या जगापासून स्वत:ची सुटका करून घेणे हेच जीवनाचे उद्दिष्ट सांगितले जाते. खाली बसायचे, पुढे पाऊलही टाकायचे नाही!

ज्या क्षणी प्रगती करणे तुम्ही थांबवता, त्याक्षणी तुमचा अध:पात सुरू होतो. ज्या क्षणी तुम्ही, आहे त्यात संतोष मानता व अधिक काही मिळविण्याची आकांक्षा सोडून देता, त्या क्षणापासून तुमचा मृत्यू सुरू होतो. जीवन ही गती आहे, धडपड आहे. जीवन म्हणजे सतत पुढे पुढे कूच करत राहणे, जणू गिर्यारोहण करणे. भावी अनुभव व साक्षात्कार यांकरता सतत उंच उंच चढत जाणे म्हणजे जीवन. विश्रांतीची गरज भासणे, विश्रांतीची इच्छा धरणे यापेक्षा दुसरी भयंकर गोष्ट नाही. कर्मामध्ये, प्रयत्नामध्ये, पुढे पुढे कूच करण्यातच तुम्हाला विश्रांती लाभली पाहिजे. ‘ईश्वरी कृपे’वर संपूर्ण भार टाकल्यामुळे जिवाला जी विश्रांती व स्वस्थता लाभते, वासना-विरहिततेमुळे व अहंकारावरील विजयामुळे जी विश्रांती मिळते तीच खरी विश्रांती होय.

सतत विशाल होण्यात, विश्वाला व्यापणारी चेतना प्राप्त करून घेण्यात खरे स्वास्थ्य, खरी विश्रांती असते. अखिल जगाएवढे व्यापक, विस्तृत व्हा म्हणजे नेहमीच विश्रांत स्थितीत तुम्ही विराजमान व्हाल. कर्मबाहुल्यांत, युद्धाच्या धुमश्चक्रीत, प्रयत्नसातत्यामध्येच तुम्हाला अनंत व शाश्वतकाळची विश्रांती आढळून होईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 65-66)

विचार शलाका – १९

व्यक्ती दिव्यत्वाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी या पृथ्वीवर आलेली असते, हेच त्याच्या पार्थिव अस्तित्वाचे औचित्य आहे.

अन्यथा या प्रयोजनाविना त्याचे पार्थिव जीवन म्हणजे एक राक्षसीपणा ठरला असता.

‘ईश्वरा’चा पुनर्शोध घेणे आणि स्वत:च ‘तो’ बनणे, ‘त्या’चे आविष्करण करणे, बाह्य जीवनात सुद्धा ‘त्या’चा अनुभव घेणे हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन (जीवनात) नसते, तर हे पार्थिव जीवन म्हणजे एक भयंकर, अघोरी अशी बाब ठरली असती.

साहजिकच आहे, लोक जेवढे जास्त जाणीवशून्य असतात तेवढीच त्यांना ही गोष्ट कळण्याची शक्यता कमी असते. कारण ते वस्तुनिष्ठपणे पाहात नाहीत, स्वत:च्या जीवनसरणीविषयी जागरुक नसतानाही, किंवा त्रयस्थ होऊन स्वत:चा वस्तुनिष्ठपणे विचार न करता ते केवळ सवयीनुसार, यांत्रिकपणे जगत राहतात. आणि मग जसजशी जाणीव, चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे त्यांना कळू लागते की हे जीवन – जसे ते आत्ता आहे – तसे जीवन हा किती भयप्रद नरक आहे.

आणि जीवन त्याला ज्या दिशेने घेऊन जात असते त्याविषयी जेव्हा तो सचेत (conscious) होतो, तेव्हाच तो जीवनाचा स्वीकार करू शकतो, आणि त्याचे आकलन करून घेऊ शकतो. केवळ जीवनाच्या या प्रयोजनामुळेच जीवन स्वीकारार्ह होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 119)

विचार शलाका – १८

मानवता आज ज्या भयानक गर्तेत बुडाली आहे, त्यापासून तिला वाचविण्यासाठी चेतनेचे आमूलाग्र परिवर्तन होणेच आवश्यक आहे, दुसरे काहीही तिला त्यापासून वाचवू शकणार नाही.

सर्व तथाकथित ‘व्यावहारिक’ साधने म्हणून जी सांगितली जातात ती साधने म्हणजे माणसांनी डोळ्यांवर पट्टी बांधून स्वत:लाच आंधळे बनविण्यासारखा बालीशपणा आहे, की ज्यामुळे ते खऱ्या आवश्यकतेकडे व रामबाण उपायाकडे दुर्लक्ष करतात.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 61)

विचार शलाका – १७

एकेकाळी ज्याबद्दल आशा बाळगण्यात आली होती की, शिक्षण आणि बौद्धिक प्रशिक्षण यामुळे माणूस बदलू शकेल; पण तसे प्रत्यक्ष अनुभवांती आढळून आले नाही. त्यामुळे झाले काय तर, मानवाच्या वैयक्तिक आणि सामूहिक अहंभावाला, त्याच्या स्व-दृढीकरणासाठी (self-affirmation) अधिक चांगली माहिती प्राप्त झाली आणि अधिक कार्यक्षम अशी यंत्रणा उपलब्ध झाली इतकेच, पण मानवाचा पूर्वीचा अपरिवर्तित अहंकार मात्र तसाच शिल्लक राहिला.

*

मानवी प्रकृतीत बदल न होऊन देखील मानवी जीवनांत खरा बदल होऊ शकेल अशी आशा करणे हे तर्कहीन आहे तसेच ते अध्यात्मालाही न पटणारे विधान आहे. ते अनैसर्गिक आणि अवास्तव, अशक्य कोटीच्या चमत्काराची अपेक्षा करण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 1094, 1096)

विचार शलाका – १६

श्रीमाताजी : हे जग संघर्ष, दुःखभोग, अडचणी, ताणतणाव यांचे बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. आणि प्रत्येकाला या सगळ्यांतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध असते. जर तुम्ही ‘परमोच्च कृपे’च्या सान्निध्यावर विसंबून राहिलात, तिच्यासमोर नतमस्तक झालात तर तोच एकमेव मार्ग आहे…

प्रश्न : पण हे असे सामर्थ्य कोठे मिळवायचे ?

श्रीमाताजी : तुमच्याच अंतरंगात. ‘दैवी सान्निध्य’ तुमच्या आतच आहे. तुम्ही त्याचा शोध बाहेर घेता; अंतरंगात पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे ‘त्या’चे सान्निध्य आहे. तुम्हाला सामर्थ्य मिळण्यासाठी इतरांकडून प्रशंसा हवी असते – तुम्हाला त्यातून ते सामर्थ्य कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या आतच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वोच्च उद्दिष्ट, सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगली पाहिजे. पण ते तुमच्या आतच आहे – अन्यथा तुम्ही त्याच्याशी कधीच संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्ज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व गवसेल.

आणि असे समजू नका की, हे खूप अवघड आहे. ते अवघड आहे कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या सान्निध्याची जाणीव होत नाही.

पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे, त्याचा मार्ग कोणता, हे जाणण्यासाठी अंतरंगांतील सर्वोच्च ज्ञानावर एकाग्रता केलीत व प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथे अंतरंगातच, आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करीत असल्याचे जाणवेल.

आणि जर काही अडचण आलीच तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी; तुम्ही त्या अडचणीला परम प्रज्ञेकडे सुपूर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो तुमच्या चिंतेचा विषय उरतच नाही; तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, जो स्वत:च तो विषय हाती घेतो आणि त्याचे काय करायचे ते इतर कोणाहीपेक्षा तोच अधिक चांगल्या रीतीने जाणत असतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 399-400)

विचार शलाका – १५

…सर्व दुःखं ही समर्पण परिपूर्ण न झाल्याचे लक्षण असते. मग जेव्हा तुम्हाला तुमच्या आत असा एक ‘आघात’ जाणवतो तेव्हा ‘अरे, हे वाईट झाले किंवा परिस्थिती कठीण आहे’ असे म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणता, “माझे समर्पण परिपूर्ण नाहीये.” तेव्हा ते म्हणणे योग्य ठरेल. आणि मग तुम्हाला ती ‘कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही पुढे मार्गक्रमण करता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता की जी कशानेही क्षुब्ध होऊ शकत नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना अशा स्मितहास्याने उत्तर देता की, जे ईश्वरी कृपेवरील पूर्ण विश्वासामुळे येत असते आणि हाच दु:खांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो, दुसरा कोणताही मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

विचार शलाका – १४

आपल्या चेतनेचे जेव्हा परिवर्तन होईल तेव्हाच परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.

*

परिवर्तन…

०१. द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये
०२. मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये
०३. अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये
०४. अंधाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये
०५. असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये
०६. दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये
०७. युद्धाचे परिवर्तन शांततेमध्ये
०८. भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये
०९. अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये
१०. संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये
११. गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये
१२. पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 223)