ईश्वरी कृपा – ०७

व्यक्ती संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, तिने जर त्या ईश्वरी ‘कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे अशी त्या व्यक्तिची भावना असेल तर, ते अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र “ईश्वरी कृपेने हे काय केले, ते का केले” असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तिने असे म्हणता कामा नये की, “मला असे होईल असे वाटले होते, म्हणून मी असे असे केले,” कारण व्यक्तिला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे काही हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ईश्वरी ‘कृपा’ तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितित, व्यक्तिने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले ; त्यात काही गैर नाही.

जेव्हा केलेली मागणी मान्य केली जात नाही आणि अशा वेळी व्यक्ती बंड करून उठते तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तिने समजून घेतले पाहिजे की, तिची जी इच्छा असते, अभीप्सा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच त्या व्यक्तिसाठी जे हितावह होते त्याचीच तिने मागणी केलेली असेल, असेही नाही. अशा वेळी व्यक्तिने थोडेसे समजूतदार झाले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “ठीक आहे, जशी तुझी इच्छा.” पण जोवर व्यक्तिला आतून काही आवडीनिवडी आहेत, अग्रक्रम आहेत तेव्हा तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने मूर्खपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि त्या व्यक्तिला खरोखर, मनापासून तशी चूक परत होऊ नये असे वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तिने अगदी अंत:करणपूर्वक, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर, तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची अधिक शक्यता असते.

तुम्हाला विरोध करणे हे ‘ईश्वरा’ला आवडते, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे, तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या इच्छेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागितले असेल, ते द्यायला तो नेहमीच तत्पर असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

ईश्वरी कृपा – ०६

(गूढविद्येचे कोणतेही ज्ञान नसतानादेखील, दूर अंतरावरील एखाद्या गरजू व्यक्तिला मदत किंवा संरक्षण पोहोचविणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला असता, श्रीमाताजींनी त्याचा एक मार्ग सांगितला, तो असा…)

व्यक्तिकडे जर (गूढविद्येचे) कोणतेही ज्ञान नसेल; पण तिचा ईश्वरी ‘कृपे’वर विश्वास असेल, – ईश्वरी ‘कृपा’ नावाची काहीतरी एक गोष्ट या विश्वामध्ये आहे, तीच आपल्या प्रार्थनेला, आपल्या अभीप्सेला, आपल्या हाकेला प्रतिसाद देते, अशी त्या व्यक्तिची श्रद्धा असेल आणि त्यावेळी व्यक्तिने मनोमय रचना करून, जर ती त्या ईश्वरी ‘कृपे’ला अर्पण केली आणि त्यावर विश्वास ठेवला, ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा म्हणून याचना केली आणि ईश्वरी ‘कृपा’ हस्तक्षेप करेलच अशी श्रद्धा बाळगली तर, ती यशस्वी होण्याची दाट शक्यता असते.

प्रयत्न करून पाहा, तुम्हाला खात्रीने त्याचे परिणाम दिसून येतील.

प्रश्न : ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा अशी मनापासून प्रार्थना जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा, तिला एखादा विशिष्ट असा परिणाम अपेक्षित असतो ना?

श्रीमाताजी : ते प्रार्थनेच्या भावार्थावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तिने ईश्वराला किंवा ईश्वरी ‘कृपे’ला केवळ साद घातली आणि स्वत:ला त्याच्या हाती सोपवून दिले तर, ती व्यक्ती कोणत्याही विशिष्ट अशा फळाची अपेक्षा करत नसते. जर विशिष्ट परिणाम हवा असेल तर, व्यक्तिने स्वत:ची प्रार्थना स्वत:च शब्दबद्ध केली पाहिजे; व्यक्तिने त्यासाठी मागणी केली पाहिजे. तुम्ही जर ईश्वरी ‘कृपे’विषयी तीव्र आस बाळगत असाल, तिला आवाहन करत असाल, तिची विनवणी करत असाल आणि जर कोणतीही ठरावीक अशी तुमची मागणी नसेल तर, तुमच्या बाबतीत काय करायचे, हे ती ईश्वरी ‘कृपा’च ठरवेल, तुम्ही नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 253-254)

ईश्वरी कृपा – ०५

ईश्वरासाठी जो अभीप्सा बाळगत असतो, त्याच्यासमोर नेहमी जी कोणती अडचण उभी राहते तीच स्वयमेव त्याच्यासाठी एक प्रवेशद्वार ठरते; त्या माध्यमातून तो स्वतःच्या व्यक्तिगत पद्धतीने ईश्वराची प्राप्ती करून घेणार असतो; त्याला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत घेऊन जाणारा त्याचा तो विशिष्ट मार्ग असतो.

अशी देखील वस्तुस्थिती असते की, जर एखाद्याला शेकडो अडचणी आल्या तर, त्याला होणारा साक्षात्कारही विलक्षण असतो – अर्थात, हे उघड आहे की, त्याच्यामध्ये जर धीर आणि चिकाटी असेल, आणि ज्या दोषांमुळे अडचणी निर्माण झाल्या, त्या दोषांविरुद्ध अभीप्सेच्या अग्निची ज्वाला जर तो कायम तेवती ठेवेल, तरच त्याला तो तसा साक्षात्कार होईल.

आणि लक्षात ठेवा की : सर्वसाधारणपणे ईश्वराची कृपादेखील तुमच्या अडचणींच्या प्रमाणातच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 :143)

ईश्वरी कृपा – ०४

प्रश्न : ईश्वराचा धावा केला तर ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते का?

श्रीमाताजी : धावा केला असताना? हो. मात्र केवळ त्यामुळेच आणि तेवढ्यासाठीच ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते असे मात्र नाही. पण खचितच, व्यक्तिची जर ईश्वरी कृपेवर श्रद्धा असेल आणि व्यक्ती तशी अभीप्सा बाळगत असेल आणि एखादे लहान मूल आईकडे धावत जाऊन जसे म्हणते की, “आई, मला अमुक अमुक दे,” त्या साधेपणाने जर व्यक्ती धावा करेल, आणि ईश्वरी कृपेकडे वळेल आणि म्हणेल, “मला अमुक अमुक दे,” तर माझा विश्वास आहे की, ती ते ऐकते. अर्थात व्यक्तिने स्वतःसाठी अहितकारक असेल असे जर काही मागितले तर मात्र ती ते ऐकत नाही. व्यक्ती जर काहीतरी घातक किंवा प्रतिकूल अशा एखाद्या गोष्टीची मागणी करेल, तर मग मात्र ती ऐकली जाणार नाही.

प्रश्न : हा धावा आणि त्याच्या परिणामाचे कारण काय?

श्रीमाताजी : कदाचित व्यक्तीने धावा करावा हे विधिलिखित असावे. म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे आधी?’ अशा सारखाच हा प्रकार आहे. ईश्वरी कृपेचा धावा करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारी ‘ईश्वरी कृपा’च असते, का, ईश्वरी कृपेचा धावा केल्यामुळे ‘ईश्वरी कृपा’ होते, हे सांगणे कठीण आहे.

मूलतः श्रद्धेचाच अभाव असण्याची बहुतांशी शक्यता असते. आपल्या विचारांमध्येच एक छोटासा कोपरा असा असतो, की जो शंका उपस्थित करतो, वादविवाद करतो, आणि त्यानेच सारे काही बिनसून जाते. व्यक्ती जेव्हा अतिशय चिंताजनक परिस्थितिमध्ये असते, जेव्हा मनाला जाणवते की, ते काहीही करू शकत नाहीये, अगदी काहीच करू शकत नाहीये, जेव्हा ते अगदी वेड्यासारखे, असमर्थ होऊन चूपचाप उभे राहते, तेव्हा, त्या क्षणी, व्यक्ती जर उच्चतर मदतीसाठी धावा करेल, म्हणजे एखादी व्यक्ती निराशाग्रस्त असताना जसा धावा करते अगदी तेवढ्याच उत्कटतेने व्यक्ती धावा करेल, तर तेव्हा परिणाम दिसून येतो. पण जर का तुमचा विचार युक्तिवादच करत राहिला आणि म्हणाला, “हो, मी आस बाळगली आहे खरी, मी प्रार्थनाही केली आहे पण वेळ आली आहे की नाही देवच जाणे, आणि ईश्वरी कृपा होईल का, आणि ते शक्य आहे की नाही कोण जाणे,” असे झाले तर मग सगळेच संपून जाते, ती (‘ईश्वरी कृपा’) कार्य करत नाही. ही एक अगदी नेहमीच आढळून येणारी गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 366-367)

ईश्वरी कृपा – ०३

“एखादी व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, तिला जर ईश्वरी कृपा सर्वत्र दिसू लागली तर, अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्व-शक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे, जीवन जगू लागेल. आणि असे जीवन जगणे हाच ईश्वरी कार्यातील सर्वोत्तम शक्य असा सहयोग ठरेल.”

(श्रीमाताजींचे वरील वचन त्यांनी स्वत: वाचून दाखविले आणि नंतर त्याचे स्पष्टीकरण केले. ते असे -)

यातील पहिली अवस्था प्रत्यक्षात उतरविणे हे तितकेसे सोपे नाही. जीवनात जाणिवपूर्वक विकास, नित्य निरीक्षण आणि सतत आलेले अनुभव यांचा तो परिणाम असतो.

मी हे तुम्हाला या आधीही अनेक वेळा सांगितले आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितिमध्ये असता आणि काही विशिष्ट घटना घडतात, तेव्हा या घटना तुमच्या इच्छाआकांक्षांच्या किंवा तुम्हाला जे सर्वात चांगले आहे असे वाटत असते, त्याच्या बरेचदा विरोधात जाणाऱ्या असतात आणि मग बरेचदा तुम्हाला या साऱ्याचे वाईट वाटते आणि तुम्ही स्वतःच्याच मनाशी म्हणता, “जर ते तसे झाले असते तर किती बरे झाले असते, ते जर असे झाले असते तर किंवा ते जर तसे झाले असते तर…” अगदी लहानसहान आणि मोठ्या गोष्टींबाबतही असेच चाललेले असते. आणि मग वर्षांमागून वर्ष निघून जातात, घटना उलगडत जातात, तुमची प्रगती होत राहते, तुम्ही अधिक जागरूक होता, तुम्हाला गोष्टींचे आकलन अधिक चांगल्या रितीने होऊ लागते आणि मग जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते – सुरुवातीला तुम्हाला अचंबा वाटतो आणि नंतर त्याकडे तुम्ही हसत हसत पाहता – तेव्हा जी परिस्थिती तुम्हाला अगदी अनर्थकारक किंवा प्रतिकूल वाटली होती आज तीच परिस्थिती तुमच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम गोष्ट ठरलेली असते; तुमची प्रगती होण्यासाठी जे घडून येणे आवश्यक होते आणि शक्य होते तेच घडून आलेले असते. आणि तुम्ही थोडे जरी समजूतदार असाल तर तुम्ही स्वतःलाच सांगता, “खरोखर, ‘ईश्वरी कृपा’ अगाध आहे.”

तर यासारख्या गोष्टी जेव्हा तुमच्या आयुष्यात वारंवार घडतात तेव्हा तुम्हाला जाणवू लागते की, बाह्यरूपे फसवी असली आणि माणसाचा आंधळेपणा असला तरीदेखील, ‘ईश्वरी कृपा’ मात्र सर्वत्र कार्यरत असते, आणि त्यामुळे जग त्या क्षणाला ज्या अवस्थेत असते त्या परिस्थितिमध्ये जे सर्वोत्तम घडणे शक्य असते तेच त्या प्रत्येक क्षणी घडून येते. आपली दृष्टी मर्यादित असल्यामुळे किंबहुना, आपल्या पसंती-नापसंतीने आपण अंध झालेलो असल्याने, गोष्टी अशा अशा असतात, हे आपल्याला उमगत नाही.

व्यक्ती जेव्हा या गोष्टींकडे पाहू लागते तेव्हा ती एका अवर्णनीय अशा आश्चर्यकारक स्थितीमध्ये प्रवेश करते. कारण या बाह्य रूपांपाठीमागे असणाऱ्या अनंत, अद्भुत, सर्वशक्तिमान अशा ईश्वरी कृपेची तिला जाणीव होऊ लागते – ही ‘ईश्वरी कृपा’ सारे काही जाणते, ती साऱ्या गोष्टींचे संघटन करते, त्यांची व्यवस्था लावते आणि आपल्याला आवडो वा न आवडो, आपल्याला ती ज्ञात असो वा नसो, तरीसुद्धा ती आपल्याला परमश्रेष्ठ अशा ध्येयाकडे, ईश्वराशी ऐक्य या ध्येयाकडे, ईश्वराबद्दलची जाणीव आणि त्याच्याशी ऐक्य या ध्येयाकडे घेऊन जात असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 255-256)

ईश्वरी कृपा – ०२

‘ईश्वरी कृपे’वरील तुमचा विश्वास आणि श्रद्धा कितीही अगाध असली; प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक क्षणाला, जीवनातील प्रत्येक अवस्थेत ‘ईश्वरी कृपा’च कार्यरत आहे, हे पाहण्याची तुमची क्षमता कितीही महान असली तरी, तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची अद्भुत विशालता, त्या कार्यपूर्तीमधील बारकावा, त्यातील अचूकता समजून घेण्यात कधीच यशस्वी होणार नाही. जगातील परिस्थिती विचारात घेता, ईश्वरी साक्षात्काराप्रत चाललेली वाटचाल ही अधिक वेगवान, अधिक परिपूर्ण, शक्य तेवढी अधिक समग्र आणि सुसंवादी व्हावी या दृष्टीने, ईश्वरी कृपा कुठपर्यंत प्रत्येक गोष्ट करते, सर्व गोष्टींच्या पाठीमागे तीच कशी असते, सर्व गोष्टी ती कशा सुसंघटित करते, त्यांचे संयोजन कसे करते, हे तुम्हाला कधीच समजू शकणार नाही.

मात्र ज्या क्षणी तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या संपर्कात येता, तत्क्षणी अवकाशातील एकेक बिंदू, आणि काळातील प्रत्येक क्षण, तुम्हाला त्या ‘ईश्वरी कृपे’चे निरंतर चालणारे कार्य, ‘ईश्वरी कृपे’ची सातत्यपूर्ण मध्यस्थी (Intervention) नेत्रदीपक पद्धतीने दाखवून देत असतो.

आणि एकदा का तुम्हाला त्याचे दर्शन झाले की, मग तुमच्या लक्षात येते की, तुमची आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग तुम्हाला कधीही भीती, अस्वस्थता, पश्चात्ताप किंवा संकोच वाटता कामा नये, किंवा अगदी दुःखभोगही जाणवता कामा नयेत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये. व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, जर तिला ‘ईश्वरी कृपा’ सर्वत्र दिसू लागली की, मग अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्वशक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे जीवन जगू लागेल.

आणि असे जीवन जगणे हाच ‘ईश्वरी कार्या’तील सर्वोत्तम शक्य असा सहयोग असेल.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 250)

ईश्वरी कृपा – ०१

संपूर्ण आविष्करणामध्ये, जग ज्या दुःखामध्ये, अंधकारामध्ये आणि ज्या मूर्खतेमध्ये पहुडले आहे त्यातून या जगाला बाहेर काढण्याचे काम ती अनंत ‘कृपा’ सातत्याने करत असते. अनंत काळापासून ही ‘ईश्वरी कृपा’ कार्यरत आहे, तिचे प्रयत्न अविरत चालू आहेत आणि असे असूनदेखील, अधिक महान, अधिक सत्य, अधिक सुंदर अशा गोष्टींच्या आवश्यकतेची जाणीव होण्यासाठी या जगाला हजारो वर्षे लागली !

आपल्या स्वतःच्याच अस्तित्वामध्ये आपल्याला विरोधाचा जो सामना करावा लागतो त्यावरून, ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याला या जगाचा किती प्रचंड विरोध होत असेल याचे अनुमान, प्रत्येकजण लावू शकतो.

आणि तेव्हाच मग ऊर्ध्वस्थित असलेल्या ‘प्रकाशा’प्रत आणि ‘शक्ती’प्रत आणि जे ‘सत्य’ स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्या ‘सत्या’प्रत, जर सर्व गोष्टी संपूर्णपणे अर्पण केल्या नाहीत, तर सगळ्या बाह्य गोष्टी, सगळ्या मानसिक रचना, सगळे भौतिक प्रयत्न हे व्यर्थ आहेत, फोल आहेत हे व्यक्तिला उमगते; तेव्हा अशी व्यक्ती निणार्यक प्रगती करण्यासाठी सिद्ध होते. आणि मग ज्याच्यामध्येच सर्वकाही परिवर्तन करण्याची शक्ती आहे अशा, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्या ‘ईश्वरा’ला आपल्या अस्तित्वाचे परिपूर्ण, समग्र आणि उत्कट असे आत्मदान करणे, हाच व्यक्तिचा एकमेव खरा प्रभावी दृष्टिकोन असतो.

जेव्हा तुमच्या अंतरंगात असणाऱ्या आत्म्याप्रत तुम्ही खुले होता तेव्हा, जे जीवन खरोखरच जगण्याजोगे आहे, अशा उच्चतर जीवनाची तुम्हाला गोडी चाखायला मिळते आणि त्यानंतर तुमच्यामध्ये त्या जीवनाप्रत उन्नत होण्याची, तेथवर जाऊन पोहोचण्याची इच्छा उदयाला येते, आणि मग ‘हे शक्य आहे’ असा विश्वास निर्माण होतो आणि अंतिमतः त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याचे सामर्थ्य निर्माण होते आणि अगदी ध्येयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याचा संकल्प उदयास येतो.

सर्वप्रथम व्यक्तिने जागे झाले पाहिजे, तेव्हाच व्यक्ती विजय प्राप्त करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 419-420)

अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये असताना व्यक्तीला देवाची आठवण होते, अशी व्यक्ती देवाचा धावा करते, त्या परिस्थितीमधून सोडवावे म्हणून त्याची प्रार्थना करते, ‘ईश्वरी कृपा’ व्हावी अशी तिला आस असते. आणि कधीकधी ‘ईश्वरी कृपा’ घडूनही येते. पण ती केव्हा झाली, कशी झाली, कृपा झाली म्हणजे नेमके काय झाले, व्यक्तीने अशा वेळी काय करायला हवे, तिचा दृष्टिकोन कसा असावा? किंवा कृपा व्हावी म्हणून काय करायला हवे, याची तिला जाण नसते. कृपा होणे म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे सारे काही होणे अशी व्यक्तीची समजूत असते, त्यामध्ये कितपत तथ्य आहे, या साऱ्याचा मागोवा श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांच्या आधारे घेण्याचा आपण उद्यापासून प्रयत्न करणार आहोत.

तसेच एकंदर विश्वसंचालनामध्ये ‘ईश्वरी कृपे’चे कार्य कसे चालते, तेही आपण येथे समजावून घेणार आहोत. सामान्य जीवन ज्या कर्मसिद्धान्ताच्या नियमानुसार चालल्यासारखे दिसते, त्या सिद्धान्ताच्या वर ‘ईश्वरी कृपा’ असते, आणि तिच्यामध्ये गतकर्मांच्या बंधनांचा निरास करण्याची क्षमता असते, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या वचनांच्या आधारे, ‘ईश्वरी कृपा’ म्हणजे नेमके काय ते आपण समजावून घेऊ. उद्यापासून ‘ईश्वरी कृपा’ ही मालिका सुरु करत आहोत. धन्यवाद…

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

तुम्ही या जगामध्ये एका विशिष्ट वातावरणामध्ये, विशिष्ट लोकांमध्ये जन्माला आलेले असता. तुम्ही जेव्हा अगदी लहान असता तेव्हा तुमच्या सभोवार जे असते ते तुम्हाला अगदी सहज-स्वाभाविक असे वाटत असते कारण तुम्ही त्यामध्येच जन्माला आलेले असता आणि तुम्हाला त्याची सवय झालेली असते. परंतु कालांतराने, तुमच्यामध्ये आध्यात्मिक अभीप्सा जागृत होते, तेव्हा ज्या वातावरणात आजवर तुम्ही राहत होतात त्याच वातावरणात तुम्हाला पूर्णतया अस्वस्थ असल्यासारखे वाटू लागते. कारण उदाहरणच घ्यायचे झाले तर, ज्या लोकांनी तुमचे संगोपन केलेले असते त्यांच्यामध्ये तुमच्यासारखी अभीप्सा नसते किंवा तुमच्यामध्ये ज्या कल्पना विकसित होत असतात, त्याच्याशी पूर्णत: विरोधी अशा त्यांच्या कल्पना असतात. अशावेळी “बघा, माझे कुटुंब हे असे आहे, आता मी तरी काय करू?…” वगैरे गोष्टी सांगत बसण्यापेक्षा तुम्ही शोधार्थ बाहेर पडू शकता. (अगदी प्रवासालाच निघाले पाहिजे असे नाही.) ज्यांना तुमच्याविषयी आत्मीयता वाटते अशा जीवांच्या शोधात, ज्यांच्यामध्ये तुमच्यासारखीच अभीप्सा आहे, अशा व्यक्तींच्या शोधार्थ तुम्ही बाहेर पडू शकता. तुमच्याप्रमाणेच कशाच्या तरी प्राप्तीची आस असणाऱ्या व्यक्तींशी तुमची गाठ पडावी अशी तुमची जर प्रामाणिक असेल तर, तशा व्यक्ती तुम्हाला या ना त्या प्रकारे भेटण्याचे प्रसंग तुमच्या जीवनात नेहमीच येतात, कधीकधी अशी परिस्थिती अगदी अवचितपणे जुळून येते. आणि तुमच्या मानसिक स्थितीशी अगदी मिळतीजुळती मानसिकता असणाऱ्या अशा एक वा अधिक व्यक्तींशी जेव्हा तुमची गाठभेट होते, तेव्हा अगदी सहजस्वाभाविकपणे तुमच्यामध्ये जवळीक, आत्मीयता, मैत्री यांचे अनुबंध निर्माण होतात. आणि तुमच्या आपापसांत एक प्रकारचे बंधुत्वाचे नाते तयार होते, त्याला एक ‘खरेखुरे कुटुंब’ असे म्हणता येईल. तुम्ही एकत्र असता कारण तुम्ही एकमेकांच्या जवळचे असता. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्यामध्ये समान अभीप्सा असते. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्या जीवनात तुम्ही समान ध्येय प्राप्त करून घेऊ इच्छित असता. तुमच्या परस्परांमध्ये एक प्रकारचा आंतरिक सुसंवाद असतो आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधता तेव्हा तुम्हाला सहजपणे त्याचे आकलन होते, चर्चा करत बसण्याची गरज भासत नाही. हेच असते खरेखुरे कुटुंब, अभीप्सा बाळगणारे आणि आध्यात्मिकतेकडे वळलेले खरेखुरे कुटुंब!

– श्रीमाताजी
(CWM 04 : 258-259)

मानवी जीवनामधील सामान्य प्राणिक प्रकृतीचा (vital nature) भाग असणाऱ्या नातेसंबंधांना आध्यात्मिक जीवनात काही किंमत नाही – किंबहुना ते प्रगतीमध्ये अडथळा उत्पन्न करतात; कारण मन आणि प्राणसुद्धा पूर्णतः ईश्वराकडेच वळविले पाहिजेत. इतकेच काय पण, साधनेचा हेतूच आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि साऱ्या गोष्टी एका नव्या आध्यात्मिक आधारावर उभ्या करणे हा असतो; आणि या गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा व्यक्ती ईश्वराशी पूर्णतया एकात्म पावलेली असते. तोपर्यंत व्यक्तीमध्ये सर्वांबाबत एक स्थिर सद्भावना असली पाहिजे, परंतु प्राणिक प्रकारच्या नातेसंबंधांचा काहीही उपयोग नाही कारण ते नातेसंबंध व्यक्तीची चेतना प्राणिक स्तरावरच ठेवतात आणि चेतनेला उच्च स्तराप्रत उन्नत होण्यास प्रतिबंध करतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)