अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मृत्यु अशी कोणती गोष्टच अस्तित्वात नाही, कारण, शरीर नष्ट होते पण शरीर म्हणजे काही मनुष्य नव्हे. जे अस्तित्वविहीन (nonexistent) आहे ते कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही, तद्वतच जे वस्तुतः अस्तित्वात आहे, त्याचे अस्तित्व कधीही लोप पावू शकत नाही; ते ज्या माध्यमांतून प्रकट होते त्या माध्यमांची रूपे बदलू शकतात परंतु त्याचे अस्तित्व मात्र लोप पावू शकत नाही. आत्मा असतोच आणि तो कधीही नष्ट होऊ शकत नाही. अस्तित्वात असणे आणि नसणे यामधील विरोध, अस्तित्व (Being) आणि अस्तित्वात येणे (Becoming) यांच्यामधील समतोल हा मनाचा अस्तित्वविषयक दृष्टिकोन असतो; आणि या दृष्टिकोनाचा निरास तेव्हाच होतो जेव्हा आत्मा हाच एकमेव अविनाशी असून, त्याच्याद्वारेच या विश्वाचा विस्तार झाला आहे; हा साक्षात्कार मनाला होतो. समर्याद शरीरांना अंत असतो, परंतु त्याच्यावर ज्याची सत्ता असते, जो या शरीराचा वापर करतो तो (आत्मा) मात्र अनंत, अमर्याद, शाश्वत आणि अविनाशी असतो. मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणेच तोसुद्धा जुने शरीर त्यजून नवीन देह धारण करतो. आणि यामध्ये दुःख करण्यासारखे, खचून जाण्यासारखे किंवा कोमेजून जाण्यासारखे काय आहे ? हा (आत्मा) जन्माला येत नाही किंवा तो मरतही नाही; जी एकदाच अस्तित्वात येते आणि ती निघून गेली तर पुन्हा अस्तित्वातच येणार नाही, अशी काही ही गोष्ट नाही. ती गोष्ट अजन्मा, पुरातन आणि शाश्वत आहे; शरीराच्या हत्येने तिची हत्या होत नाही. अमर्त्य आत्म्याची हत्या कोण करू शकेल ? शस्त्रांनी त्याचा छेद करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही किंवा वारा त्याला सुकवू शकत नाही. शाश्वतपणे स्थिर, अविचल, सर्वव्यापी असणारा तो आत्मा सदैव, अगदी नेहमीच अस्तित्वात असतो. शरीराप्रमाणे तो व्यक्त होत नाही पण सर्व व्यक्ताहून तो अव्यक्त आत्मा श्रेष्ठ आहे. विचारांनी त्याचे विश्लेषण करता येत नाही तरीही समग्र मनापेक्षा तो महान असतो; जीवन, त्याची अंगे आणि जीवनाच्या विषयांप्रमाणे आत्म्यामध्ये परिवर्तन आणि फेरबदल होणे शक्य नसते; परंतु, तो मन, प्राण आणि शरीराच्या परिवर्तनापलीकडचा असूनही, हे सर्व जण जिचे आकलन करून घेण्यासाठी धडपड करत असतात अशी ती एक सद्वस्तु असते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 62-63)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

आपण सारे एकच आत्मा आहोत, आपण तो ईश्वर आहोत, आपल्या आकलनापलीकडे असणारे अद्भुत असे म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, त्याच्याविषयी बोलतो, त्याच्याविषयी ऐकतो. आपण कितीही धडपड केली, शोध घेतला, ज्ञानी माणसांकडून ज्ञान ग्रहण केले आणि ज्ञान प्राप्त झाले असे घोषित केले तरीही कोणत्याच मानवी मनाला त्या परमतत्त्वाचे (Absolute) कधीच आकलन झालेले नाही. शरीराचा स्वामी असणारे ते परमतत्त्व, या विश्वाद्वारे झाकलेले आहे; सर्व जीवन ही केवळ त्याची पडछाया आहे; आत्म्याचे शारीरिक आविष्कारामध्ये येणे आणि मृत्युद्वारे निघून जाणे ही आत्म्याच्या अनेक गतिविधींपैकी केवळ एक किरकोळ गतिविधी आहे…

एकच गोष्ट सत्य आहे आणि त्यामध्येच आपल्याला जगायचे आहे, ते ‘शाश्वत तत्त्व’ स्वत:च्या तीर्थयात्रेच्या महान चक्रामध्ये मनुष्याचा आत्मा म्हणून स्वतःला आविष्कृत करत असते, त्या आत्म्याच्या या तीर्थयात्रेमध्ये जन्म आणि मृत्यू हे मैलाचे दगड असतात, पलीकडील विश्वं ही त्याची विश्रांतीची ठिकाणे असतात, त्यांच्या सहित तो प्रवास करत असतो. जीवनातील सर्व सुखदुःखाची परिस्थिती ही आपल्या प्रगतीची, युद्धाची, विजयाची साधने असतात, या साधनांसहित तो प्रवास करत असतो. आणि ‘अमर्त्यत्वा’सहित तो आत्मा आपल्या स्व-गृहाकडे प्रवास करत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 63-64)

अमर्त्यत्वासंबंधी वैदिक शिकवण

मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून सत्याकडे वळले पाहिजे; त्याने प्रकाशाकडे वळले पाहिजे आणि अंधकाराच्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी शक्तींच्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन मनुष्य या गोष्टी करतो; ईश्वरी शक्तींच्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते. या हेतूसाठी जगभरात, बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना, गुह्य पद्धतीने आंतरिक अर्थ प्रदान करण्यात आला आहे; ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात; ती यज्ञाची प्रतीके मानव व देव यांना जोडणारी असतात, ती त्या दोहोंमध्ये घनिष्ठ विनिमय घडवत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्य घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निवास करू लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे सत्याचे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते अमर्त्यत्वाच्या शक्ती आहेत, ते अनंत मातेचे पुत्र आहेत; अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो सत्याचा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, “ऋतस्य पंथः” असे ज्याला म्हटले जाते त्या सत्याच्या धर्मामध्ये मनुष्याचे उन्नत होणे आहे, विकसित होणे आहे. मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’ च्या मर्यादा तोडून अमर्त्यत्वाकडे जाऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आत्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि सत्याच्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमर्त्यत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमर्त्यत्वाचा पाया असतो आणि तेथे त्रिविध अनंताचे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आत्मिक साधनेची उभारणी केली; नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय योगाचा गाभा सामावला गेला.

*

आपल्यामध्ये असणाऱ्या ईश्वराप्रत उन्नत झाल्याने, आपण स्वतंत्र होतो, या विश्वाच्या बंधनामधून आणि मृत्युपाशापासून मुक्त होतो. कारण ईश्वर म्हणजे स्वातंत्र्य, ईश्वर म्हणजे अमर्त्यत्व. “मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्र्नुते” अर्थात मृत्युच्या अतीत होऊन आपण अमर्त्यत्व अनुभवतो.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 202-203), (CWSA 17 : 304)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – १०

आता आपण सर्वात भयंकर अशा लढाईकडे वळतो; देहामध्ये लढले जाणारे हे शारीरिक युद्ध, कोणत्याही विश्रांतीविना किंवा कोणत्याही तहाविना सुरु असते. हे युद्ध जन्माबरोबरच सुरू होते आणि दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाच्या पराभवानेच ते संपुष्टात येणे शक्य असते. एकतर रूपांतरण-शक्तीचा (force of transformation) पराभव होतो किंवा विघटन-शक्तीचा (force of disintegration) पराभव होतो. जन्माबरोबरच या संघर्षाला सुरुवात होते असे मी म्हटले याचे कारण असे की, बऱ्याच काळानंतर जरी या दोन प्रक्रियांमधील संघर्षामध्ये जाणीवपूर्वकता आणि हेतुपूर्वकता येत असली तरी, खरे तर व्यक्ती जेव्हा या विश्वात प्रविष्ट होते अगदी त्या क्षणीच या दोन्ही प्रक्रियांमधील संघर्षाला सुरुवात झालेली असते. कारण ज्याप्रमाणे वाढ, सुसंवादी विकास, आक्रमणाचा प्रतिकार, आजारपणापासून सुटका होऊन परत सामान्य जीवन सुरळीत होणे, प्रत्येक प्रगमनशील सुधारणा, या गोष्टी रूपांतरकारी शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात; अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक अस्वास्थ्य, प्रत्येक आजार, प्रत्येक विकृती, प्रत्येक अपघात हे विघटनकारी-शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात. नंतर जेव्हा, चेतनेच्या विकासाबरोबर, ही लढाई हेतुपुरस्सर होते, तेव्हा त्याची परिणती या दोन विरोधी आणि प्रतिस्पर्धी प्रक्रियांमधील उन्मत्त स्पर्धेमध्ये होते; रूपांतरण की मृत्यू, या दोहोंपैकी आधी कोण आपले ध्येय गाठणार हे पाहण्याची एक शर्यतच सुरू होते. ही शर्यत म्हणजे निरंतर प्रयत्न, पुनरुज्जीवनकारी शक्तीला तिने खाली अवतरावे म्हणून तिच्यावर सातत्याने केलेले ध्यान आणि या शक्तीप्रत पेशींची ग्रहणशीलता वाढावी म्हणून केलेले प्रयत्न असतात. ही शर्यत म्हणजे, विध्वंस व अवनती यांच्या विनाशकारी शक्तीकार्याच्या विरोधात क्रमाक्रमाने दिलेली झुंज असते. ज्या ज्या कोणत्या गोष्टी आरोहणकारी उर्मीला प्रतिसाद देण्यास सक्षम असतील; ज्या प्रबोधनाला, शुद्धीकरणाला आणि स्थिरतेला प्रतिसाद देण्यासाठी सक्षम असतील अशा प्रत्येक गोष्टीभोवती असलेली या विनाशकारी शक्तींची पकड ढिली करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजे ही शर्यत असते. हा संघर्ष अंधकारमय आणि दुराग्रही असतो, बहुधा यामध्ये कोणतेही दृश्य परिणाम दिसून येत नाहीत किंवा जे आंशिक विजय प्राप्त केले गेले त्यांच्या कोणत्याही बाह्य खाणाखुणाही दिसून येत नाहीत आणि हे विजयदेखील नेहमीच अनिश्चित स्वरूपाचे असतात. – कारण जे कार्य झाले आहे ते पुन्हा करण्याची आवश्यकता आहे, असे नेहमीच वाटत राहते; पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल हे, इतरत्र कोठेतरी माघार घ्यावी लागल्याची किंमत चुकती करूनच पुढे पडत असते. आणि आदल्या दिवशी जे काम केलेले असते ते दुसऱ्याच दिवशी पुन्हा पूर्वपदास आलेले असते. वस्तुतः, विजय तेव्हाच निश्चित आणि चिरस्थायी होऊ शकेल जेव्हा तो संपूर्ण विजय असेल. या साऱ्याला वेळ लागतो, खूप काळ लागतो, वर्षेच्या वर्षे निष्कारणपणे लोटतात, आणि त्यामुळे प्रतिकूल शक्तींची ताकद मात्र वाढते.

एखाद्या खंदकाजवळ जसा पहारेकरी उभा असावा तशी चेतना सदासर्वकाळ उभी असते; भीतीचा लवलेश नको किंवा दक्षतेमध्येही कसर नको अशा पद्धतीने, तुम्ही मात्र दृढ राहिलेच पाहिजे, कोणतीही किंमत द्यावी लागली तरीही तुम्ही दृढ राहिले पाहिजे, जे जीवितकार्य पूर्ण करायचे आहे त्यावर अविचल श्रद्धा ठेवत आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या, तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि तुम्हाला टिकवून ठेवणाऱ्या शक्तीच्या साहाय्यावर तुम्ही अविचल श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण जो अतीव तितिक्षा (endurance) बाळगतो, त्याचाच शेवटी विजय होतो.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 86-87)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०९

भावनांनंतर येतात संवेदना. येथे ही लढाई निर्दयी होते आणि समोरचे शत्रू क्रूर असतात. त्यांना तुमच्यातील अगदी लहानातल्या लहान दुर्बलतेचा देखील सुगावा लागू शकतो आणि तुम्ही जेथे संरक्षणविहीन असता तेथे ते शत्रू नेमकेपणाने हल्ला चढवितात. तुम्ही जे विजय मिळविता ते क्षणभंगुर ठरतात आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच लढाया तुम्हाला अनिश्चित काळपर्यंत लढत राहाव्या लागतात. तुम्ही ज्यांना पराभूत केले आहे असे तुम्हाला वाटत असते, ते शत्रू पुन्हा पुन्हा उभे ठाकतात आणि तुमच्यावर हल्ला चढवितात. तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असला पाहिजे; प्रत्येक पराजय, प्रत्येक अस्वीकार, प्रत्येक नकार, प्रत्येक नाउमेद झेलण्याइतकी अथक सहनशीलता तुमच्याकडे असली पाहिजे आणि ऐहिक घटना आणि दैनंदिन अनुभव हे तुमच्या आत्मशोधाच्या नेहमीच विरोधात जाणारे असल्यामुळे, तुम्हाला जरी त्यांचा उबग आला तरी तो शोध चालू ठेवण्यासाठी, तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असणे आवश्यक असते. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 86)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०८

दुसरी लढाई असते ती भावनांची लढाई असते. व्यक्ती ज्यावर प्रेम करत असते, व्यक्तीने जे जे काही निर्माण केलेले असते, त्याविषयी असलेल्या आसक्तीच्या विरोधात ही लढाई असते. खूप मोठ्या परिश्रमाने, बरेचदा महत्प्रयासांनी तुम्ही तुमचे घर, कारकीर्द, काही सामाजिक, साहित्यिक, कलाविषयक, विज्ञानविषयक किंवा काही राजकीय कार्य उभे केलेले असते ; तुम्ही ज्याच्या केंद्रस्थानी आहात असे एक वातावरण तुम्ही निर्माण केलेले असते आणि जेवढे ते तुमच्यावर अवलंबून असते तेवढेच तुम्हीदेखील त्याच्यावर अवलंबून असता. माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी, साहाय्यक यांच्या घोळक्यात तुम्ही वावरत असता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करता तेव्हा तुमच्या विचारांमधील, तुमच्या स्वतःबद्दलच्या विचाराइतकाच हिस्सा या लोकांच्या विचारांनी व्यापलेला असतो. इतका की, जर त्यांना तुमच्यापासून अचानकपणे दूर केले तर तुम्हाला चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागेल; जणू काही तुमच्या अस्तित्वामधील एखादा महत्त्वाचा भागच नाहीसा झाल्यासारखे तुम्हाला वाटू लागेल.

आजवर ज्या गोष्टींनी तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आणि प्रयोजन बहुतांश प्रमाणात ठरवलेले असते, त्या सर्व गोष्टींचा त्याग करायचा, असा येथे मुद्दा नाही. परंतु तुम्ही या गोष्टींविषयी असणारी आसक्ती सोडून दिली पाहिजे, त्यांच्याविनाही तुम्हाला जीवन जगता येते असे तुम्हाला जाणवले पाहिजे; किंवा, खरेतर ते जर तुम्हाला सोडून गेले तर नवीन परिस्थितीमध्ये, तुम्ही स्वतःसाठी एक नवीन जीवन घडविण्याची तयारी ठेवली पाहिजे, आणि हे अनिश्चित काळपर्यंत करत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण अमर्त्यतेचा हाच परिणाम असणार आहे. या अवस्थेची मांडणी अशी करता येईल : अत्यंत काळजीपूर्वकपणे आणि लक्षपूर्वकतेने प्रत्येक गोष्ट करायची, त्याची व्यवस्था लावायची आणि तरीसुद्धा सर्व प्रकारच्या इच्छा आणि आसक्तीपासून मुक्त राहायचे, हे जमले पाहिजे; कारण जर तुम्हाला मृत्युपासून सुटका हवी असेल तर नाशिवंत असणाऱ्या कोणत्याच गोष्टीने तुम्ही बांधले जाता कामा नये. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 85-86)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०७

पहिली लढाई लढायची तीच मुळात भीषण असते; सामूहिक सूचनेच्या विरोधात ही मानसिक लढाई असते. प्रकृतीच्या अजूनपर्यंत निरपवाद भासणाऱ्या एका नियमावर आधारित, हजारो वर्षांच्या अनुभवांवर आधारित अशा प्रचंड आणि दबाव टाकणाऱ्या, सक्ती करणाऱ्या सामूहिक सूचनेविरुद्ध ही लढाई असते. “मृत्यू हा कायमचाच आहे, तो वेगळा असा काही असूच शकत नाही; मृत्यू अटळ आहे आणि तो काहीतरी वेगळा असू शकतो अशी आशा बाळगणे म्हणजे वेडेपणा आहे,’’ अशा एका हटवादी विधानामध्ये ती सामूहिक सूचना स्वतःला अनुवादित करते. आणि याबाबतीत सर्वांचे एकमत असते आणि आजवर एखाद्या अत्यंत प्रगत अभ्यासकानेदेखील याला विसंवादी सूर लावल्याचे म्हणजे भविष्याबद्दल आशा बाळगण्याचा सूर लावल्याचे धाडस केलेले दिसत नाही. बऱ्याचशा धर्मांनी तर मृत्युच्या वास्तवावरच स्वतःच्या कार्याची शक्ती आधारित केली आहे. आणि देवाने माणसाला नश्वर बनविलेले आहे त्यामुळे माणूस मृत पावावा हेच त्याला अपेक्षित आहे असे प्रतिपादन ते धर्म करतात. त्यातील अनेक धर्मांनी मृत्युकडे एक सुटका म्हणून, मुक्ती म्हणून आणि कधीकधी तर बक्षीस म्हणूनदेखील पाहिले आहे. त्यांचा असा आदेश असतो की, “सर्वोच्चाच्या इच्छेला शरण जा, कोणतेही बंड न करता, मृत्युची संकल्पना स्वीकारा म्हणजे मग तुम्हाला शांती आणि आनंद लाभेल.’’ हे सारे असे असतानादेखील, विचलित न होणारा संकल्प तसाच टिकून राहावा यासाठी मनाने स्वत:चा दृढ विश्वास अविचल राखला पाहिजे. अर्थात ज्याने मृत्युवर विजय मिळविण्याचा निश्चय केला आहे त्याच्यावर या सगळ्या सूचनांचा कोणताही परिणाम होत नाही आणि प्रगल्भ साक्षात्कारावर आधारित असलेल्या त्याच्या दृढ विश्वासावर याचा कोणताही परिणाम होऊ शकतही नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 85)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०६

आणि शेवटी ते लोक, जे उपजतच योद्धे असतात. जीवन जसे आहे तसे ते स्वीकारूच शकत नाहीत; त्यांना त्यांचा अमर्त्यतेचा अधिकार, पूर्ण आणि पार्थिव अमर्त्यतेचा अधिकार त्यांच्या अंतरंगातूनच स्पंदित होताना जाणवत असतो. मृत्यू म्हणजे एका वाईट सवयीखेरीज अन्य काही नाही याचे त्यांना एक प्रकारचे अंतर्बोधात्मक ज्ञान असते; आणि मृत्युवर विजय मिळवायचाच अशा निश्चयानिशीच जणू ते जन्माला आल्यासारखे वाटतात. मात्र या विजयासाठी त्यांना क्रूर आणि सूक्ष्म हल्लेखोरांच्या सैन्याविरुद्ध घनघोर युद्ध करावे लागते आणि हा लढा सतत द्यावा लागतो, अगदी अक्षरशः प्रति क्षणाला हा लढा द्यावा लागतो. ज्याच्याकडे दुर्दम्य वृत्ती आहे त्यानेच हा प्रयत्न करावा. ही लढाई अनेक आघाड्यांवर चालते; एकमेकांमध्ये मिसळलेल्या आणि एकमेकांना पूरक असणाऱ्या अशा अनेक पातळ्यांवर ही लढाई चालू असते. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? ०५

ज्यांची देवावर, त्यांच्या देवावर श्रद्धा आहे आणि ज्यांनी आपले जीवन देवाला वाहिले आहे अशा व्यक्तींसाठी तिसरी एक पद्धत आहे. अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि अशा व्यक्ती त्या साऱ्या घटना केवळ शांतचित्ताने स्वीकारतात असे नाही तर,त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडते ते त्यांच्या भल्यासाठीच घडते याची अशा व्यक्तींना पूर्ण खात्री असते.त्यांची त्यांच्या देवावर आणि त्याच्याशी असलेल्या नात्यावर एक गूढ, गाढ श्रद्धा असते.देवाला त्यांनी त्यांच्या इच्छेचे पूर्णतया समर्पण केलेले असते आणि जीवन व मृत्युच्या अपघातांपासून संपूर्णतया स्वतंत्र असलेले असे देवाचे अविचल प्रेम व संरक्षण अशा व्यक्तींना जाणवत असते.आपल्या प्रेममूर्तीच्या चरणांशी निःशेषतया आत्म-समर्पित होऊन आपण पडून राहिलेलो आहोत किंवा त्याने त्याच्या हातांचा जणू पाळणा केला आहे आणि त्यात आपण पहुडले आहोत असा सदोदित अनुभव अशा व्यक्ती घेत असतात आणि एक प्रकारचे पूर्ण संरक्षण त्या व्यक्ती सदोदित अनुभवत असतात.त्यांच्या चित्तामध्ये कोठेही भीतीला,चिंतेला किंवा यातनांना जागाच नसते; या साऱ्या गोष्टींची जागा एका शांत, मोदयुक्त आनंदाने घेतलेली असते. परंतु असे अंतःसाक्षात्कारी (mystic) असणे हे प्रत्येकाचेच भाग्य नसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०४

…ज्या व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये जीवन जगतात आणि भावनांना स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण करू देतात अशा भावनाशील व्यक्तींबाबत मात्र ही (तर्कबुद्धीची) पद्धत तितकीशी उपयुक्त ठरू शकत नाही. निःसंशयपणे अशा व्यक्तींनी दुसऱ्या मार्गाचा म्हणजे आंतरिक शोधाच्या पद्धतीचा आश्रय घ्यायला हवा. सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो चैत्य चेतनेचा (Psychic Consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो. तुमच्या दृढ संकल्पाद्वारे, तो तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत होईल. तुम्ही कायमच जिवंत होतात, तुम्ही कायम जिवंत असणार आहात, हे तुम्हाला जाणवेल. तेव्हा, तुम्ही शरीरापासून पूर्णपणे स्वतंत्र होता. तुमचे जागृत अस्तित्व आता शरीरावर अवलंबून राहत नाही. तुम्ही आत्ता ज्यामधून आविष्कृत झाला आहात ते शरीर म्हणजे, अनेकानेक क्षणभंगुर आकारांपैकी, केवळ एक आकार आहे; हे तुम्हाला जाणवू लागते. आता मृत्यू हा अंत असत नाही तर, ते केवळ एक संक्रमण असते. मग सगळी भीती क्षणार्धात नाहीशी होते आणि तुम्ही जीवनामध्ये एखाद्या मुक्त मनुष्याप्रमाणे शांत खात्रीपूर्वक मार्गक्रमण करू लागता. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 83-84)