समर्पण – ०४
तुमच्या आत्म्याचे जे जे काही आहे ते ते सारे ईश्वराला, ज्याचे तुम्ही एक भाग आहात अशा महत्तर चेतनेला देऊ करणे, हे समर्पणामध्ये अभिप्रेत आहे. समर्पण तुम्हाला क्षीण करणार नाही तर त्यामुळे वृद्धी होईल; ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाची कोणतीही घट करणार नाही, काहीही दुर्बल करणार नाही किंवा तुमचे व्यक्तित्व नष्टही करणार नाही; तर समर्पण तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवेल, वृद्धिंगत करेल. दानाच्या सगळ्या आनंदासहित असलेले मुक्त समस्त दान हे समर्पणामध्ये अभिप्रेत असते; त्यामध्ये त्यागाची भावना नसते. आपण काही त्याग करत आहोत अशी थोडीशीही भावना तुमच्या मनात असेल तर मग ते काही समर्पण नव्हे. त्याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी हातचे राखून ठेवू पाहत आहात किंवा तुम्ही काहीतरी कुरकूर करत, कष्टाने आणि सायासाने देण्याचा प्रयत्न करत आहात; त्यामध्ये भेट देण्याचा कोणताच आनंद नाही; एव्हढेच काय पण तुम्ही काहीतरी देत आहात ही भावनादेखील त्यामध्ये असत नाही.
तुम्ही जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्या अस्तित्वाने संकोचून, दबून, अवघडून अशी करत असता तेव्हा ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात, हे निश्चित जाणा. खरे समर्पण तुम्हाला व्यापक करते, ते तुमची क्षमता वाढविते; तुम्हाला स्व-प्रयत्नाद्वारे कधीच प्राप्त करून घेता आले नसते एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्पण तुमच्या गुणवत्तेमध्ये आणि संख्यात्मकतेमध्ये भर घालत असते. गुणात्मकतेतील आणि संख्यात्मकतेतील हे मोठे प्रमाण, तुम्ही समर्पणापूर्वी जे काही मिळवू शकला असता त्याच्यापेक्षा अगदी भिन्न असते. तुमचा एका नवीन जगामध्येच प्रवेश होतो, अशा एका व्यापकतेमध्ये प्रवेश होतो की, जर तुम्ही समर्पण केले नसते तर त्या व्यापकतेमध्ये तुमचा कधीच प्रवेश होऊ शकला नसता.
एखादा पाण्याचा थेंब सागरामध्ये पडला आणि तेथेसुद्धा जर त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले, तर तो केवळ पाण्याचा एक लहानसा थेंब म्हणूनच शिल्लक राहील, अधिक काहीच बनणार नाही आणि परिणामत: त्या लहानशा थेंबाचा सभोवताली असलेल्या प्रचंडतेपुढे टिकाव लागणार नाही, कारण त्याने समर्पण केलेले नव्हते. परंतु, तेच समर्पणामुळे, तो त्या सागराशी एकजीव होतो आणि मग तो त्या संपूर्ण सागराच्या अथांगतेशी, त्याच्या शक्तीशी, त्याच्या प्रकृतीशी जोडला जातो आणि त्यात सहभागी होतो.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 114-115)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…