समर्पण – १५

ईश्वराशी ऐक्य म्हणजे योग आणि योग हा आत्मदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येतो – तुम्ही ईश्वराप्रत जे आत्मदान करता त्याच्या पायावर तो उभा राहतो. प्रारंभी तुम्ही या आत्मदानाची सुरुवात अगदी सरसकट करता, म्हणजे जणू कायमसाठी एकदाच आत्मदान करता; तुम्ही म्हणता, ‘मी ईश्वराचा सेवक आहे, माझे जीवन मी पूर्णतः ईश्वराला दिले आहे, आणि माझे सारे प्रयत्न दिव्य जीवनाच्या साक्षात्कारासाठीच आहेत.” परंतु ही फक्त पहिली पायरी आहे, कारण ही गोष्ट पुरेशी नाही. जरी तुम्ही निश्चय केलेला आहे, जरी तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन ईश्वराला देऊ करण्याचे ठरविलेले आहे तरीदेखील प्रत्येक क्षणाला तुम्हाला त्याची आठवण ठेवली पाहिजे आणि तुमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी ती प्रत्यक्षात उतरविली पाहिजे. तुम्हाला प्रत्येक पावलागणिक ही आठवण पाहिजे की, तुम्ही ईश्वराचे आहेत; तुम्ही कोणताही विचार करत असा किंवा कर्म करत असा, तुमच्या माध्यमातून ती ईश्वरी चेतनाच कार्य करत आहे, असा तुम्हाला सतत अनुभव यायला पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीला तुमची स्वतःची असे संबोधू शकाल अशी कोणतीच गोष्ट असता कामा नये; सारे काही ईश्वराकडूनच येत आहे असे तुम्हाला जाणवले पाहिजे आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या त्या गोष्टीच्या स्रोताला परत अर्पण केली पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्हाला याची जाणीव होते तेव्हा, एरवी ज्या गोष्टीकडे तुम्ही फारसे लक्ष पुरविले नसते, किंवा ज्याची एरवी फारशी पर्वा केली नसती अशा कोणत्याच गोष्टी आता क्षुल्लक, किरकोळ उरत नाहीत; त्या साऱ्यांनाच एक अर्थ प्राप्त होतो आणि पलीकडील एक विशाल क्षितिज खुले होते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23)

समर्पण – १४

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; आडपडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. आणि व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी असे आत्मदान करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढतीवाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन जर कमी सक्रिय बनले आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी आत्मदानाव्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)

समर्पण – १३

मी जे काही तुम्हाला सांगू इच्छितो ते मन आणि प्राण यांचे आंतरिक समर्पण ! अर्थातच बाह्य समर्पणदेखील असते. व्यक्ती जर त्या योग्यतेला पोहोचली असेल तर मग ते मार्गदर्शन थेट प्राप्त झालेले असेल किंवा व्यक्तीला चैत्य पुरुषाचे किंवा गुरुचे मार्गदर्शन लाभत असेल, त्याचे पालन करणे, आत्म्याच्या किंवा साधनेच्या आवश्यकतेच्या जे विरोधात असेल अशा सर्व गोष्टी सोडून देणे, अर्पण करणे ह्या साऱ्या गोष्टींचा समावेश बाह्य समर्पणामध्ये होतो.

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत. ‘मला दुसरेतिसरे काहीही नको, ईश्वरच हवा,’ असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते. …”मी ईश्वराला माझे समर्पण करू इच्छितो आणि माझ्या आत्म्याचीच ती मागणी असल्याने, इतर काहीही नाही, तर फक्त तेच ! मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी इतर काहीही मागणार नाही, केवळ हीच माझी मागणी असेल. जेणेकरून, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग त्याचे ते कार्य गुप्त असेल वा प्रकट असेल, ते झाकलेले असेल वा आविष्कृत झाले असेल, पण ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी आग्रह धरणार नाही; त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे, मी त्याच्यावर विश्वास ठेवेन, त्याची इच्छा प्रमाण मानेन; त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन; कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्ण विसंबून राहीन आणि कधीही मार्ग सोडणार नाही. माझे मन शांत होऊन, त्याच्याकडे वळू दे आणि ते त्याच्या प्रकाशाप्रत खुले होऊ दे; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे, त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत तो खुला होऊ दे. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच. काहीही झाले तरी, मी ही अभीप्सा आणि आत्मदान दृढ बाळगेन आणि हे घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.” व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण ह्या गोष्टी परिपूर्णतया एकदम होणे शक्य नाही; मानसिक व प्राणिक हालचाली आड येत राहतात; पण जर व्यक्ती वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये विकसित होत राहतात. उर्वरित गोष्टी ह्या (ईश्वरी मार्गदर्शनाच्या) आज्ञापालनाचा भाग असतात; ईश्वरी मार्गदर्शन जेव्हा स्वतःला आविष्कृत करू लागते तेव्हा, व्यक्तीने स्वतःच्या मानसिक किंवा प्राणिक हालचालींना त्यामध्ये लुडबूड करू न देता त्या मार्गदर्शनाबरहुकूम आज्ञापालन केले पाहिजे.

…व्यक्तीने ईश्वराप्रत पोहोचावे यासाठी अनेकानेक मार्ग उपलब्ध आहेत. परंतु मला ज्ञात असलेली ही अशी एकमेव साधना आहे की जिच्यामध्ये, प्रकृतीची तयारी होण्यापूर्वीच, ईश्वराकडून साधना हाती घेतली जाणे, ही गोष्ट एक संवेद्य (sensible) वास्तविकता बनते. इतर साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती आणि तिचे साहाय्य हे वेळोवेळी जाणवू शकते पण बहुतांश वेळा, जोवर सारे काही सिद्ध होत नाही तोपर्यंत ते साहाय्य पडद्याआडच राहते. काही साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती ही ग्राह्य मानली जात नाही; त्या पद्धतीमध्ये सारे काही तपस्येच्या द्वारेच करावे लागते. बहुतेक सर्व पद्धतींमध्ये या दोन्हींचा संकर असतो, तपस्या ईश्वराच्या थेट साहाय्यासाठी आणि मध्यस्थीसाठी अंतिमतः आवाहन करते. ‘ईश्वरच सारे काही करत असतो’ ही संकल्पना आणि त्याची अनुभूती या गोष्टी समर्पणावर आधारित योगसाधनांशीच संबंधित असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 70-71)

समर्पण – १२

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते आणि हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे. जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदान (self-giving) देखील अपूर्ण असते. …समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, कार्यपूर्ती होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 75-76)

समर्पण – ११

समर्पणाविषयी बऱ्याच चुकीच्या कल्पना प्रचचित आहेत. समर्पण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा निरास (abdication) या कल्पनेने त्याकडे पाहतात पण ही घोडचूक आहे. कारण व्यक्ती ही दिव्य चेतनेचा एक पैलू आविष्कृत करण्यासाठी आलेली असते, आणि व्यक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकृतीच्या अभिव्यक्तीमधूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व निर्माण होत असते; जी कनिष्ठ प्रकृती त्या व्यक्तिमत्त्वाचा क्षय करत असते आणि त्यामध्ये विकृती निर्माण करत असते, त्या कनिष्ठ प्रकृतीच्या साऱ्या प्रभावांपासून हे व्यक्तिमत्त्व, ईश्वराबद्लचा योग्य दृष्टिकोन स्वीकारून परिशुद्ध केले जाते आणि त्यामुळे ते अधिकच वैयक्तिक, अधिकच त्याच्या स्वतःसारखे आणि अधिक समग्र बनते. व्यक्तिमत्त्वाचे सामर्थ्य आणि सत्यत्व हे अधिकच उजळून वैशिष्ट्यपूर्णतेने झळाळते. सर्व अंधकार आणि अज्ञानामध्ये मिसळलेले असताना, कनिष्ठ प्रकृतीच्या साऱ्या मळाने आणि मिश्रणाने मिश्रित झालेले असताना त्याचे चारित्र्य जेवढे नेमकेपणाने लक्षात आले नसते, तेवढे आता ते लक्षवेधी बनते. ते उन्नत होते, त्याचे उदात्तीकरण होते, त्याची क्षमता अधिक वृद्धिंगत होते, त्याच्या शक्यता कमाल प्रमाणात प्रत्यक्षात उतरतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 116)

समर्पण – १०

परमेश्वराने घालून दिलेल्या ज्या अटी आहेत, त्यांची पूर्तता न करतादेखील, तुमच्या मागणीप्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्यास दिव्य शक्ती बांधील आहे आणि ती त्याप्रमाणे करेलच, ही भ्रांत कल्पना काढून टाका. तुमचे समर्पण खरेखुरे आणि समग्र करा, तेव्हाच तुमच्यासाठी इतर सारे काही केले जाईल.

*

तुमच्यासाठी ती दिव्यशक्ती समर्पण देखील घडवून आणेल ही भ्रांत आणि मूढ अपेक्षा सोडून द्या. परमशक्ती तुमच्याकडून समर्पणाची मागणी करते, पण ते समर्पण ती तुमच्यावर लादत नाही; जोपर्यंत अपरिवर्तनीय असे रूपांतरण होत नाही तोपर्यंत ईश्वराला नकार देण्यास किंवा त्याचे अस्तित्व न मानण्यास किंवा स्वतःचे आत्मदान परत घेण्यास तुम्ही प्रत्येक क्षणाला मुक्त असता, अर्थात, त्याचे जे काही आध्यात्मिक परिणाम होतील ते सहन करण्याची तुम्हाला इच्छा असेल तर.

तुमचे समर्पण हे स्वतःहून केलेले आणि मुक्त असले पाहिजे; ते जडभौतिकाच्या स्वयंचलनाचे किंवा यांत्रिक उपकरणाचे समर्पण असता कामा नये; तर ते एका जिवंत व्यक्तीचे समर्पण असले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 04)

समर्पण – ०९

आत्मसमर्पणाचा संकल्प करणे ही योगाची पहिली प्रक्रिया आहे. तुमच्या समग्र हृदयानिशी आणि तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी तुम्ही स्वतःला ईश्वराच्या हाती सोपवा. कोणत्याही अटी नकोत, कोणत्याही गोष्टीची मागणी नको, अगदी योगामधील सिद्धीची मागणीदेखील नको; तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून त्या ईश्वराचीच इच्छा थेटपणे कार्यवाहीत व्हावी, या व्यतिरिक्त अन्य कोणतीही मागणी नको. जे कोणी त्याच्याकडून मागणी करतात, देव त्यांना त्यांनी जे मागितलेले असते ते देतो, परंतु जे स्वतःला समर्पित करतात आणि कोणतीही मागणी करत नाहीत, त्यांना ईश्वर त्यांनी ज्या कशाची मागणी केली असती किंवा त्यांना ज्याची आवश्यकता भासली असती ते सारे काही प्रदान करतो आणि त्याशिवाय, ईश्वर स्वतःलाही त्यांना देऊ करतो आणि त्याच्या प्रेमाचे सहजस्फूर्त असे वरदानही प्रदान करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)

समर्पण – ०८

(खरे समर्पण आणि तामसिक समर्पण यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकांकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. जर या गोष्टी साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यायोगे येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे समर्पण. आणि या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते ते म्हणजे खात्री, विश्वास आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य राखणे.

अभीप्सा मावळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले, तर त्याचा अर्थ असा की, साधक तेथे स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे – त्याचा अर्थ असा होईल की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा मला आता आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली तर तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?” उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. तोपर्यंत, मला जरी श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्ण सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्याबाबतीत नैराश्यदेखील काही करू शकत नाही; नैराश्य जर का आलेच तर त्यालाच अपयशी होऊन परतावे लागते.

“मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे, अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते तामसिक समर्पण असते. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एक दृष्टिकोन (तामसिक समर्पणाचा) काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा आहे, आणि अन्य दृष्टिकोन साधकाचा आहे. असा साधक सर्वोत्तम ते सारे काही करतो, परंतु जेव्हा तो काही काळासाठी निष्क्रिय होतो आणि जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीमध्ये विश्वास राखतो आणि साऱ्या गोष्टींमागे श्रीमाताजींचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. आणि त्याच्या या विश्वासामुळे तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकवार साधनेची क्रिया हाती घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 139-140)

समर्पण – ०६

हृदयामध्ये ईश्वराद्वारे मला सतत मार्गदर्शन मिळत आहे अशी एखाद्या व्यक्तीची समजूत असणे, हे काही अनिवार्यपणे समर्पणच असते असे नाही. समर्पण असण्यासाठी व्यक्तीने निःसंग असले पाहिजे आणि दिव्य शक्ती कोणत्या व अदिव्य शक्ती कोणत्या ते ओळखून, व्यक्तीने अदिव्य शक्तींना नकार दिला पाहिजे. अशा प्रकारे विवेक बाळगल्यानेच व्यक्ती हृदयस्थ ईश्वराप्रत खरेखुरे समर्पण करू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 68)

*

जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांनाही हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ”परिस्थितीच कठीण आहे,” असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “माझे समर्पण परिपूर्ण झालेले नाही.” तर ते योग्य आहे. आणि मग ईश्वरी दिव्यकृपा तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तुम्ही वाटचाल करता. आणि मग एके दिवशी तुम्ही अशा शांतीमध्ये उदय पावता की ज्या शांतीचा भंग कोणतीच गोष्ट करू शकत नाही. दिव्य कृपेबद्दलचा जो पूर्ण विश्वास असतो त्यातून उदयाला येणाऱ्या सुहास्य वदनासारख्याच सुहास्य वदनाने तुम्ही साऱ्या विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आघातांना, गैरसमजांना, दुरिच्छांना सामोरे जाता. आणि या साऱ्यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्गच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

समर्पण – ०५

दिव्य शक्तीने सर्वाचा स्वीकार करावा आणि त्यात परिवर्तन घडवून आणावे म्हणून, तुमचे म्हणून जे काही आहे ते सर्व आणि तुम्ही स्वतः यांना, ईश्वराला समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण.
*
जेव्हा समग्र अस्तित्वच ईश्वराच्या प्रकाशाकडे आणि प्रभावाकडे वळते आणि हातचे काहीही राखून न ठेवता, सारे काही त्या ईश्वरावर सोपविते, तेव्हा त्याला खरेखुरे समर्पण आणि प्रामाणिकता म्हणतात.
*
समर्पण, म्हणजे आपल्याला अज्ञात असलेल्या ईश्वरी इच्छेचा संपूर्ण आणि उत्फूर्त स्वीकार.

(CWSA 29 : 67), (Mother You Said So), (Conversation with a Disciple)