पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १२

हठयोग

 

योगशास्त्रानुसार, संपूर्ण जडभौतिक देह आणि त्याची सर्व कार्य, तसेच सगळी मज्जासंस्था यांना व्यापून असणाऱ्या प्राणांच्या पाच प्रकारच्या हालचाली असतात. हठयोगी श्वसनाची बाह्य प्रक्रिया थांबवितो आणि एक प्रकारे ती किल्ली, प्राणाच्या या पाच शक्तींवर नियंत्रण निर्माण करण्याचा मार्ग खुला करते. हठयोगी या प्राणाच्या आंतरिक क्रिया संवेदनपूर्वक जाणू लागतो. तसेच तो स्वतःच्या संपूर्ण शारीरिक जीवनाविषयी आणि कृतींविषयी मानसिकदृष्ट्या देखील जागरूक होतो. तो आपला प्राण आपल्या शरीराच्या सर्व नाड्यांमधून किंवा नाडी-प्रवाहांमधून फिरवू शकतो. नाडीसंस्थेची जी सहा चक्रे अथवा स्नायुग्रंथिमय केंद्रे आहेत, त्यांच्या कार्याविषयी तो जागृत होतो आणि त्यांचे सद्यस्थितीत जे मर्यादित, सवयीनुसार, यांत्रिक कार्य चाललेले असते; त्या प्रत्येकाचे कार्य या मर्यादांच्या पलीकडे जावे म्हणून, ती केंद्रे तो खुली करू शकतो. थोडक्यात सांगावयाचे तर, हठयोगी शरीरातील प्राणावर पूर्ण हुकमत चालवू शकतो; सूक्ष्मतम नाडीगत प्राणावर तसेच स्थूलतम शारीर अवयवातील प्राणावर तो सारखीच हुकमत चालवू शकतो…

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 535)

दिव्यत्वाचा शोध घेणे हेच आध्यात्मिक सत्याच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या धडपडीचे खरोखर पहिले कारण आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्याव्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत् आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05)

हठयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ११

प्राकाम्य – इंद्रिय आणि मनावर पूर्णतया पटुता म्हणजे प्राकाम्य. प्राकाम्यामध्ये टेलिपथी, अतिंद्रिय दृष्टी या व यासारख्या असामान्य समजल्या जाणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो.

व्याप्ती – इतर व्यक्तींचे विचार, त्यांची शक्ती, त्यांच्या भावना ग्रहण करण्याची शक्ती आणि स्वतःचे विचार, भावना, शक्ती आणि व्यक्तिमत्त्व यांचे इतरांवर प्रक्षेपण करण्याची शक्ती म्हणजे व्याप्ती.

ऐश्वर्य – घटनांवर नियंत्रण, ईशत्व, समृद्धी आणि इच्छित अशा सर्व वस्तुमात्रांवर नियंत्रण म्हणजे ऐश्वर्य.

वशिता – मौखिक किंवा लिखित शब्दांच्या त्वरित आज्ञापालनाची शक्ती म्हणजे वशिता.

इशिता – जड किंवा बुद्धिविहीन असणाऱ्या सर्व वस्तुमात्रांवर आणि प्रकृतीच्या सर्व शक्तींवर परिपूर्ण नियंत्रण म्हणजे इशिता.

यापैकी काही शक्तींचा संमोहनाची किंवा इच्छाशक्तीची लक्षणे या सदराखाली युरोपमध्ये नुकताच शोध लागला आहे; परंतु प्राचीन काळातील हठयोग्यांच्या किंवा अगदी आत्ताच्याही काही आधुनिक हठयोग्यांच्या सिद्धीच्या तुलनेत, युरोपियन अनुभव अगदीच तोकडे आणि अशास्त्रीय आहेत. प्राणायामातून विकसित झालेल्या इच्छाशक्तीची गणना आध्यात्मिक नव्हे तर, आंतरात्मिक शक्तीमध्ये केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505-506)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १०

हठयोग

ज्या गतिशील ऊर्जेमुळे हे ब्रह्मांड चालत राहाते त्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व म्हणजे ‘प्राणायाम’. प्राणाचे किंवा प्राणिक शक्तीचे, मानवी शरीरातील सर्वाधिक लक्षात येणारे कार्य म्हणजे श्वासोच्छ्वास, जो सामान्य माणसांना जीवनासाठी आणि हालचालींसाठी आवश्यक असतो. हठयोगी त्यावर विजय मिळवितो आणि स्वतःला त्यापासून वेगळे राखतो. परंतु या एवढ्या एकाच प्राणिक क्रियेवर त्याचे लक्ष केंद्रित झालेले नसते.

हठयोगी पाच मुख्य प्राणिक शक्तींमधील आणि इतर लहानमोठ्या पुष्कळ प्राणिक शक्तींमधील भेद जाणू शकतो. त्या प्रत्येक प्राणिक शक्तींना त्याने स्वतंत्र नामाभिधान दिलेले आहे आणि हे जे प्राणिक प्रवाह कार्यरत असतात, त्या सर्व असंख्य प्राणिक प्रवाहांवर नियंत्रण ठेवायला तो योगी शिकतो. जशी आसनं असंख्य आहेत, तशीच प्राणायामाच्या विविध प्रकारांची संख्याही पुष्कळ मोठी आहे. आणि जोपर्यंत मनुष्य त्या साऱ्या प्रकारांवर प्रभुत्व मिळवीत नाही, तोपर्यंत तो मनुष्य परिपूर्ण हठयोगी आहे, असे मानले जात नाही. आसनांमधून प्राप्त झालेली प्राणिक ऊर्जा, जोश, सुदृढ आरोग्य या गोष्टींवर प्राणजयामुळे शिक्कामोर्तब होते; प्राणजयामुळे व्यक्तीला, तिला हवे तितक्या काळ जीवन जगण्याची शक्ती प्रदान करण्यात येते. आणि प्राणजयामुळे चार शारीरिक सिद्धींमध्ये, पाच आंतरात्मिक सिद्धींचीही भर पडते…

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०९

हठयोग

लघिमा, अणिमा, गरिमा आणि महिमा या चार शारीरिक सिद्धींचा विकास करून, त्यायोगे शारीरिक प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेणे, हे हठयोगाचे दुसरे उद्दिष्ट असते.

‘लघिमे’च्या योगे मनुष्य, त्याचे प्राकृतिक तत्त्व असल्याप्रमाणे वाऱ्यावर स्वार होऊन, हवेमध्ये विहार करू शकतो.

परिपूर्ण ‘अणिमे’च्या योगे, व्यक्ती सूक्ष्म देहाची प्रकृती ही स्थूल देहामध्ये उतरवू शकते. त्यामुळे अग्नी त्याला जाळू शकत नाही, शस्त्रास्त्रांचे घाव त्यावर बसू शकत नाहीत, हवेविना गुदमरायला होत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही.

परिपूर्ण ‘गरिमा’ सिद्धीच्या योगे, ज्यामुळे हिमस्खलनाचा धक्काही बसणार नाही अशा प्रकारची दृढ स्थिरता व्यक्ती विकसित करू शकते.

परिपूर्ण ‘महिमा’ सिद्धीच्या योगे तो, आपल्या स्नायूंचा विकास न करताही, हर्क्युलसपेक्षाही अधिक पराक्रम करू शकतो.

या अशा प्रकारच्या सिद्धी आता पूर्णतेने माणसांमध्ये पाहावयास मिळत नाहीत परंतु हठयोगातील सर्व योग्यांकडे काही अंशी त्या असायच्या. जी व्यक्ती थोडीशी का होईना, परंतु योगसाधनेमध्ये खोलवर गेलेली आहे किंवा ज्या व्यक्तीने सिद्धींचा व्यक्तिशः अनुभव घेतलेला आहे, अशी कोणतीही व्यक्ती त्यांच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करू शकणार नाही.

ज्याला तप किंवा वीर्य किंवा योगाग्नी असे म्हणण्यात येते, ती योगिक शक्ती देहामध्ये विकसित करणे, हे हठयोगाचे तिसरे उद्दिष्ट असते. शरीरातील सगळी वीर्य शक्ती मेंदूपर्यंत ओढणे आणि शरीराच्या शुद्धीसाठी आणि शरीराचे विद्युतीभवन होण्यासाठी आवश्यक असेल, तेवढीच ती शक्ती खाली उतरविणे, म्हणजे ‘ऊर्ध्वरेत बनणे’ हे हठयोगाचे चौथे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 504-505)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०८

हठयोगाचे उद्दिष्ट

शुद्ध हठयोग हा शरीराच्या माध्यमातून परिपूर्णत्व गाठण्याचे साधन आहे. त्याच्या प्रक्रिया ह्या शारीरिक, तणावयुक्त, अवाढव्य, जटिल आणि अवघड असतात. आसन, प्राणायाम आणि शरीराची शुद्धी या गोष्टी त्याच्या केंद्रस्थानी असतात. आधुनिक किंवा मिश्रित हठयोगामध्ये आसनांची संख्या मर्यादित झाली आहे; पण तरीसुद्धा ती आसने पुष्कळ आणि वेदनादायी आहेत. प्राचीन किंवा शुद्ध हठयोगामध्ये तर त्यांची संख्या अगणित होती आणि पूर्वीचे हठयोगी ती सर्व आसने करत असत. आसन म्हणजे शरीराची एक विशिष्ट अशी स्थिती होय. आणि ती सुयोग्य स्थिती असते किंवा त्यावर विजय मिळविलेली अशी स्थिती असते. तांत्रिक भाषेत बोलावयाचे झाले तर, मनुष्य जेव्हा कितीही तणावयुक्त किंवा वरकरणी पाहता अशक्य अशा एका स्थितीमध्ये, शरीराला त्या ताणाची जाणीव होऊ न देता, हटातटाने काहीही करावे न लागता, जेव्हा अनिश्चित काळपर्यंत राहू शकतो; तेव्हा त्याने त्या आसनावर विजय मिळविला आहे, असे म्हटले जाते. आसनांचे पहिले उद्दिष्ट ‘शरीरजय’ हे असते. कारण शरीर दिव्य बनण्यापूर्वी शरीरावर विजय मिळविणे आवश्यक असते. शरीराने प्रभुत्व गाजविता कामा नये तर, शरीरावर प्रभुत्व गाजविता यायला हवे, ह्या दृष्टीने हा शरीरजय आवश्यक असतो…

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 504-505)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०७

विश्व हा भ्रम आहे, विश्व मिथ्या आहे या मताशी मी सहमत नाही. ब्रह्म हे जसे विश्वातीत केवलतत्त्वामध्ये आहे तसेच ते येथेही आहे. जे अज्ञान आपल्याला अंध बनविते आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य स्वरूप ओळखण्यास तसेच, या विश्वामध्ये असणाऱ्या व विश्वाच्या अतीतही असणाऱ्या ब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यास प्रतिरोध करते अशा अज्ञानावर मात केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 329)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०६

कोणतीही आंतरात्मिक साधना जी आपल्याला अंशतः किंवा पूर्णतः चेतनेच्या आध्यात्मिक अवस्थेमध्ये घेऊन जाते; आंतरात्मिक सत्याविषयी किंवा परमोच्च सत्याविषयी कोणताही सहजस्फूर्त असा किंवा पद्धतशीर असा दृष्टिकोन ; ईश्वराशी ऐक्याची किंवा सायुज्याची कोणतीही अवस्था; मानवजातीमध्ये सार्वत्रिक असणाऱ्या स्वाभाविक जाणिवेपेक्षा अधिक व्यापक, अधिक सखोल किंवा अधिक उच्चतर अशा जाणिवेमध्ये प्रवेश या साऱ्या गोष्टी आपोआपच ‘योग’ या शब्दाच्या श्रेणीमध्ये समाविष्ट होतात. योग आपल्याला पृष्ठवर्ती जाणिवेकडून आपल्या जाणिवेच्या गहनतेप्रत घेऊन जातो किंवा तो आपला त्याच्या अगदी गाभ्यामध्येच प्रवेश करून देतो; आपल्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या गुप्त असणाऱ्या अत्युच्च उंचीप्रत तो आपल्याला घेऊन जातो. योग आपल्याला आत्म्याची रहस्यं आणि ईश्वराची रहस्यं दाखवून देतो. तो आपल्याला ज्ञान देतो, दृष्टी देतो, तो आपल्याला अंतर्वासी, विश्वगत आणि विश्वातीत सत्याचे दर्शन घडवितो; आणि हेच त्याचे परम असे प्रयोजन असते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 329)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०५

 

योग म्हणजे ऐक्य. मानवी आत्म्याचे सर्वोच्च आत्म्याशी ऐक्य आणि मानवजातीच्या सद्यस्थितीतील प्रकृतीचे शाश्वत, परम किंवा ईश्वरी प्रकृतीशी ऐक्य, हे योगाचे समग्र उद्दिष्ट आहे.

जेवढे हे ऐक्य महान, तेवढा तो योग महान आणि जेवढे हे ऐक्य परिपूर्ण, तेवढा तो योग परिपूर्ण.

….जो योग जगतातील ईश्वराचा स्वीकार करतो, जो योग सर्व जीवांमध्ये एकत्व पाहतो, जो योग मानवजातीशी ऐक्य साधतो आणि जो योग हे जीवन आणि अस्तित्व ईश्वरी चेतनेने भरून टाकतो आणि जो योग कोणा एका मनुष्याला व्यक्तिशः नव्हे, तर संपूर्ण मानववंशालाच समग्र परिपूर्णतेच्या दिशेने घेऊन जातो, तो योग ‘पूर्ण योग’ होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 334-335)

 

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०४

योग हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून व्यक्ती वस्तुमात्रांमागील सत्याशी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त जाणिवेकडून आंतरिक आणि सत्य जाणिवेप्रत घेऊन जाण्यात येते. योग-चेतना (Yoga Consciousness) ही बाह्य, व्यक्त विश्वाचे ज्ञान वगळत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते, ती त्याकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्यात्कारी अनुभवही घेत नाही. योग-चेतना आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात बदल घडविते. आणि त्याला सदवस्तुचा कायदा लागू करते; प्राणिमात्रांच्या अज्ञानी कायद्याच्या जागी ईश्वरी संकल्प आणि ज्ञानाचा कायदा प्रस्थापित करते. जाणिवेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

*

योग हे एक शास्त्र आहे, ती एक प्रक्रिया आहे; योग हा एक प्रयास आणि कर्म आहे. ज्यायोगे, मनुष्य त्याच्या सामान्य मानसिक जाणिवेच्या मर्यादा उल्लंघून, अधिक विशालतर अशा आध्यात्मिक चेतनेप्रत जाण्याचा प्रयत्न करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 327)