प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल.

योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे.

पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

योगाचे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. तपस्येचा मार्ग खडतर असतो. येथे तुम्ही पूर्णतः स्वत:वर अवलंबून असता, तुम्ही तुमच्या स्वत:च्या ताकदीनिशी योगाला सुरुवात करता. तुम्ही तुमच्या शक्तीच्या प्रमाणात उन्नत होता, प्राप्ती करून घेता. पण येथे नेहमीच पतन होण्याचा धोका असतो. आणि एकदा जर का तुम्ही खाली पडलात तर तुम्ही खोलवर दरीतच फेकले जाऊन, तुमच्या चिंधड्या होतात आणि मग त्यावर कोणताच उपाय नसतो. दुसरा मार्ग समर्पणाचा, हा सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे.… रामकृष्ण परमहंस म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही एकतर माकडाच्या पिल्लाचा नाहीतर मांजराच्या पिल्लाचा मार्ग अवलंबू शकता. माकडिणीचे पिल्लू आईने आपल्याला बरोबर घेऊन जावे यासाठी तिला पकडून ठेवते, पिल्लाने तिला घट्ट पकडलेच पाहिजे, नाहीतर त्याची पकड ढिली होऊन ते खाली पडेल. दुसऱ्या बाजूला, मांजराचे पिल्लू ! ते त्याच्या आईला धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला पकडलेले असते, त्यामुळे त्याला कोणतीच भीती नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला काहीच करावे लागत नाही. आईने त्याला पकडावे म्हणून त्याने फक्त ‘मा मा’ असा आकांत करायचा असतो.

जर तुम्ही हा समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात, तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगाची सुरुवातच करू नका… जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 4-5)

मी नेहमी ऊर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे सौंदर्य, शांती, प्रकाश आहेत; ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत म्हणून नेहमी अभीप्सा बाळगा आणि त्या दिशेने वर पाहा.

खाली, या विश्वातील वाईट गोष्टींकडे पाहू नका. जेव्हा तुम्हाला उदास वाटते तेव्हा माझ्यासमवेत ऊर्ध्व दिशेकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 68)

श्रीमाताजी : तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध हे तुमच्या आंतरिक निवडीच्या स्वातंत्र्यानुसार नव्याने निर्माण केले पाहिजेत. तुम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आला आहात किंवा मोठे झाला आहात ती परिस्थिती तुमच्यावर वातवारणाच्या दबावाने किंवा सामान्य मनाद्वारे वा इतरांच्या निवडीद्वारे लादण्यात आलेली आहे. तुमच्या मौनसंमतीमध्ये देखील सक्तीचा एक भाग असतो. धर्म हा देखील माणसांवर लादण्यात येतो, त्याला धार्मिक भीतीच्या सूचनेचा, वा कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा इतर संकटाच्या धमकीचा आधार असतो. ईश्वराशी तुमचे जे नाते असते त्याबाबतीत मात्र अशा प्रकारची कोणतीही बळजबरी चालत नाही. ते नाते स्वेच्छेचे असावे, ती तुमच्या मनाची आणि हृदयाची निवड असली पाहिजे. आणि ती निवड उत्साहाने आणि आनंदाने केलेली असली पाहिजे. ते कसले आले आहे ऐक्य की, ज्यामध्ये व्यक्ती भयकंपित होते आणि म्हणते, ”माझ्यावर सक्ती करण्यात आली आहे, मी काहीच करू शकत नाही !” सत्य हे स्वत:सिद्ध असते आणि ते जगावर लादता कामा नये. लोकांनी आपला स्वीकार करावा, अशी कोणतीही गरज सत्याला भासत नाही. ते स्वयंभू असल्यामुळे लोक त्याविषयी काय बोलतात किंवा लोकांची त्यावर निष्ठा आहे की नाही, यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असत नाही. पण ज्याला धर्माची स्थापना करावयाची असते त्याला मात्र अनेक अनुयायी असावे लागतात. एखाद्या धर्मामध्ये जरी खरीखुरी महानता नसली तरी, कितीजण त्या धर्माचे अनुयायी आहेत त्या संख्येवर लोक त्या धर्माची ताकद आणि महानता ठरवितात. मात्र आध्यात्मिक सत्याची महानता ही संख्येवर अवलंबून नसते. मला एका नवीन धर्माचा प्रमुख माहीत आहे, जो त्या धर्माच्या संस्थापकाचा मुलगा आहे. तो एकदा म्हणाला की, “अमुक धर्माची जडणघडण होण्यासाठी इतकी शतकं लागली आणि तमुक धर्माला अमुक इतकी शतकं लागली, पण आमच्या धर्मात मात्र गेल्या पन्नास वर्षातच चाळीस लाखांपेक्षा अधिक अनुयायी आहेत, तेव्हा बघा आमचा धर्म केवढा श्रेष्ठ आहे !” एखाद्या धर्माच्या महानतेचे मोजमाप हे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असू शकते, पण जरी अगदी एकही अनुयायी लाभला नाही तरीही सत्य मात्र सत्यच असते. जेथे मोठमोठा गाजावाजा चाललेला असतो तेथे माणसं खेचली जातात; पण जिथे सत्य शांतपणे आविष्कृत होत असते, तेथे कोणीही फिरकत नाहीत. जे स्वत:च्या मोठेपणाचा दावा करतात, त्यांना जोरजोरात सांगावे लागते, जाहिरात करावी लागते, अन्यथा त्यांच्याकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होणार नाहीत. पण लोक त्याविषयी काय म्हणतात याची पर्वा न करता काम केले असेल, तर ते फारसे विख्यात नसते आणि साहजिकच, लोक त्याकडे मोठ्या संख्येने वळत नाहीत. पण सत्याला मात्र जाहिरातबाजीची गरज नसते, ते स्वत:ला दडवून ठेवत नाही पण स्वत:ची प्रसिद्धीदेखील करत नाही. परिणामांची चिंता न करता, आविष्कृत होण्यातच त्याची धन्यता सामावलेली असते, ते प्रशंसा मिळावी म्हणून धडपडत नाही किंवा अप्रशंसा टाळत नाही, जगाने त्याचा स्वीकार केला काय किंवा त्याच्या कडे पाठ फिरवली काय, सत्याला त्याने काहीच फरक पडत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)

अध्यात्माचा, अतिमानसाचा, सामान्य मानवी चेतनेच्या अतीत असणाऱ्या आणि त्या उच्च क्षेत्रामधून जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टीचा वेध घेणे म्हणजे ‘धर्म’ अशी धर्माची व्याख्या श्रीअरविंदांनी केली आहे. अशा रीतीने, धर्म तर्कबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचा वेध घेत असल्याने धर्म हा तर्कातीत असतो. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रामध्ये तर्कबुद्धीचा कसा काय पाडाव लागणार ? त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, एखाद्याने धर्माच्या क्षेत्राचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्यात प्रगती करण्यासाठी तर्कबुद्धीचा वापर करावयाचे ठरविले तर निश्चितपणे त्याच्या चुका होणार. कारण तर्कबुद्धी ही तेथील स्वामी नाही, आणि ती त्यावर प्रकाशदेखील टाकू शकणार नाही. जर तुम्ही कोणताही धर्म तुमच्या बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मापू पाहत असाल तर तुमच्या चुका निश्चितपणे होणार. कारण धर्म हा तर्कक्षेत्राच्या पलीकडचा आणि बाहेरचा आहे. सामान्य जीवनामध्ये बुद्धीचे क्षेत्र ज्या परिघापर्यंत आहे तेथवर तर्कबुद्धी मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, सामान्य मानवी जीवनात प्राणिक आणि मानसिक कृतींवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे हेच तर्कबुद्धीचे खरेखुरे कार्य असते.

उदाहरणार्थ, जर कोणा व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि अशा वेळी जर त्या व्यक्तीने तर्कबुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या तर्कबुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहावयाचा प्रयत्न केला तर, ती व्यक्ती या सर्व गोष्टी परत सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व हालचाली संघटित करणे आणि नियमित करणे हे खरोखर तर्कबुद्धीचे खरे कार्य आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत, का त्या एकमेकींच्या विरोधी आहेत, आपल्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत, का ते सिद्धान्त एकमेकांना मारक आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही तर्कबुद्धीचा आश्रय घेऊ शकता. सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे, आणि त्यापेक्षा देखील अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे, त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना, हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, तो आवेग चालवून देण्याजोगा आहे का, हे पाहण्याचे काम तर्कबुद्धीचे आहे. हे तर्कबुद्धीचे खरे कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 166-167)

प्रश्न : ज्यांची चेतना सामान्य आहे अशा माणसांसाठी धार्मिक विधी महत्त्वाचे असतात का?

श्रीमाताजी : धार्मिक विधी म्हणजे तुला काय म्हणावयाचे आहे?

प्रश्नकर्ता : जप वगैरे गोष्टी.

श्रीमाताजी : ओह ! ती तर अगदीच सापेक्ष गोष्ट आहे. त्या गोष्टींचा तुमच्यावर काय परिणाम होतो आणि तुम्ही त्यावर किती विश्वास ठेवता, यावरच त्यांचे मूल्य अवलंबून असते. जर त्या गोष्टींनी तुमचे मन एकाग्र व्हायला मदत होत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. पण बहुधा सामान्य चेतना असणारे लोक ती गोष्ट अंधश्रद्धेपोटी करतात. त्यांची अशी समजूत असते की, “मी जर ह्या गोष्टी केल्या, मी जर आठवड्यातून एकदा देवळात किंवा चर्च वगैरेंमध्ये गेलो, प्रार्थना केली तर माझ्याबाबतीत काहीतरी चांगले घडून येईल.” ही अंधश्रद्धा आहे, ती जगभर सर्वत्र पसरलेली आहे, पण तिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून अजिबात महत्त्व नाही.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 193)

प्रश्न : धर्माचे स्वरूप नेमके काय आहे? आध्यात्मिक जीवनमार्गातील तो अडथळा आहे का?

श्रीमाताजी : मानवतेच्या उच्चतर मनाशी धर्माचा संबंध असतो. मानवाचे उच्च मन, त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करत असते. मानव ज्याला ईश्वर वा चैतन्य वा सत्य वा श्रद्धा वा ज्ञान वा अनंत, केवल अशा नावांनी संबोधतो, ज्याच्या पर्यंत मानवी मन पोहोचू शकत नाही, पण तरीही तेथे पोहोचण्याचा ते प्रयत्न करत राहते, त्या प्रयत्नाला ‘धर्म’ ही संज्ञा आहे. धर्म हा त्याच्या मूळ उगमापाशी दिव्य, ईश्वरी असू शकतो पण त्याचे व्यवहारातील स्वरूप हे ईश्वरी नसून मानवी असते. वस्तुत: आपण एक धर्म असे न म्हणता अनेक धर्मांविषयी बोलले पाहिजे कारण माणसांनी अनेक धर्मांची स्थापना केली आहे…..

सर्व धर्मांची गोष्ट एकसारखीच आहे. एखाद्या महान गुरुचे या भूतलावर येणे हे धर्माच्या उदयाचे निमित्त असते. तो येतो, तो त्या दिव्य सत्याचा अवतार असतो आणि तो ती दिव्य सद्वस्तु उघड करून दाखवितो; पण माणसं त्याचाच ताबा घेतात, त्याचा व्यापार मांडतात, एखादी राजकीय संघटना असावी तशी त्याची अवस्था करून टाकतात. मग अशा धर्माला शासन, धोरणे, नियम, पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, सणसमारंभ, उत्सव यांनी सजवले जाते आणि या साऱ्या गोष्टी त्या त्या धर्मीयांसाठी जणूकाही निरपवाद व अनुल्लंघनीय अशा बनून जातात. तेव्हा मग धर्म देखील एखाद्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच, त्याच्या निष्ठावान लोकांना बक्षिस देतो आणि जे बंडखोरी करतात किंवा जे धर्मापासून भरकटतात, जे पाखंडी आहेत, जे त्या धर्माचा त्याग करतात, त्यांना तो शिक्षा सुनावतो.

प्रस्थापित आणि अधिकृत अशा कोणत्याही धर्माचा पहिला आणि मुख्य सांगावा हाच असतो की, “माझे तत्त्व सर्वोच्च आहे, तेच एकमेव सत्य आहे, आणि इतर सारे मिथ्या वा गौण आहे.” कारण अशा प्रकारच्या ह्या मूलभूत सिद्धान्ताशिवाय, प्रस्थापित संप्रदायवादी धर्म अस्तित्वातच आले नसते. तुम्हाला एकट्यालाच सर्वोच्च सत्य गवसले आहे किंवा तुम्ही एकट्यानेच त्या ‘एका’ला कवळले आहे अशी जर तुमची खात्री नसेल आणि जर तुम्ही तसा दावा केला नाहीत तर तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही आणि त्यांना तुमच्याभोवती गोळा करू शकत नाही.

धार्मिक मनुष्याचा हा असा अगदी स्वाभाविक दृष्टिकोन असतो; पण त्यामुळेच धर्म हा आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावरील अडथळा म्हणून समोर उभा ठाकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 76-77)

आज आहे तो मानववंश तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, तिचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी, हा देह प्रकृतीच्या साध्यपूर्तीसाठी स्वाधीन करावयाचा का, ह्याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचे पाऊल म्हणून तयार करावयाचे, ह्यामधील निर्णायक निवड करावी लागेल.

ह्या दोन्ही बाबी एकत्रितपणे असू शकत नाहीत; प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्ही कालच्या मनुष्यत्वामध्ये राहू इच्छिता का उद्याच्या अतिमानवतेमध्ये?

– श्रीमाताजी
(CWM 14 : 127)

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारा उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका; तो आशेचा किरण देतो; सांत्वनपर संदेश आणतो.

अशी कोणतीच निशा नाही की, जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते.

*

उगवणारी प्रत्येक उषा नव्या प्रगतीची शक्यता दृष्टिपथात आणते.

*

भूतलावर अवतरणाऱ्या नूतन उष:प्रभेप्रत स्वत:स खुले करा, तुमच्यासमोर एक तेजोमय पथ उलगडेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 44), (CWM 15 : 74,97)

एकसारखेपणातून एकता हा खुळचटपणा आहे. अनेकांच्या युतीमधून एकता प्रत्यक्षात उतरावयास हवी. प्रत्येक जण त्या एकतेचा एक भाग असेल; प्रत्येक जण त्या ‘पूर्णा’साठी अपरिहार्य असेल.

*

प्रत्येक मनुष्याकडे त्याचा स्वत:चा उपाय असतो, परंतु तीच मोठी समस्या असते. प्रत्येकाकडे स्वत:चा असा उपाय असला तरी सत्यामध्ये जीवन व्यतीत करावयाचे असेल तर, हे सर्वच उपाय एकत्रितपणे काम करू शकतील, असा काही (समन्वयकारी) मार्ग आपण शोधला पाहिजे.

म्हणून ही रचना अत्यंत व्यापक, अतिशय लवचीक असली पाहिजे. आणि सर्वांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सद्भावना असली पाहिजे : ती पहिली अट आहे – पहिली वैयक्तिक अट – सद्भावना. दर क्षणी सर्वोत्तम तेच करण्यासाठी प्रत्येकाने पुरेसे लवचीक असले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 202), (CWM 13 : 311)