जर उत्क्रांती हे सत्य असेल; ती जीवजातांची केवळ शारीरिक उत्क्रांती नसेल, पण जर का ती चेतनेची उत्क्रांती असेल, तर ती केवळ भौतिक वस्तुस्थिती असू शकत नाही, ती आध्यात्मिकच असावयास हवी. अशा परिस्थितीत, व्यक्तीच उत्क्रांत होते, अधिकाधिक विकसित आणि पूर्ण जाणिवसंपन्नतेमध्ये वृद्धिंगत पावत जाते आणि अर्थातच ही गोष्ट माणसाच्या एका तोकड्या जीवनामध्ये घडून येणे शक्य नाही.

जाणीवयुक्त व्यक्तीची उत्क्रांती जर व्हावयाची असेल तर, त्यासाठी पुनर्जन्म आवश्यकच आहे. पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट आहे आणि ती अशी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे की जिचा आपण अनुभव घेऊ शकतो. पुनर्जन्माचे पुरावे, कधीकधी तर अगदी खात्रीलायक पुरावे आढळतात, त्यांचा तुटवडा नाही पण एवढेच की, आजवर त्यांच्या काळजीपूर्वक नोंदी झालेल्या नाहीत आणि त्या आजवर एकत्रित केल्या गेलेल्या नाहीत.

– श्रीअरविंद

प्रश्न : माताजी, आपण पुनर्जन्मावर विश्वास का ठेवतो?

श्रीमाताजी : ज्यांना गत जीवनांचे स्मरण आहे त्यांनी पुनर्जन्म ही वस्तुस्थिती असल्याचे घोषित केले आहे. आत्ताच्या देहामध्ये असलेली ही चेतना, याआधीच्या जन्मांमध्ये इतर देहांद्वारेही अभिव्यक्त झालेली होती आणि या देहाच्या अंतानंतरही ती टिकून राहणार आहे, हे जाणण्याइतपत ज्यांच्या आंतरिक चेतनेचा विकास झाला आहे, असे आजवर पुष्कळ जण होऊन गेले आणि अजूनही आहेत. ‘पुनर्जन्माचा सिद्धान्त’ चर्चा करत बसावी असा विषय नाही, तर ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी तो वादातीत असा विषय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 400)

*

प्रेमगुणांच्या उपयोजनातून निर्धारित झालेली मूर्त आणि व्यवहार्य अशी कृती म्हणजे परोपकार ! कारण नेहमीच अशी एक शक्ती असतेच असते, की जी सर्वांमध्ये वितरित करता येणे शक्य असते, अर्थात ती अत्यंत व्यक्तिनिरपेक्ष रूपात प्रदान केली गेली पाहिजे. ती शक्ती म्हणजे प्रेम, ज्यामध्ये प्रकाशाचा आणि जीवनाचा समावेश असेल असे प्रेम; म्हणजेच बुद्धिमता, आरोग्य, बहरुन येण्याच्या सर्व शक्यता. हो, आनंदी हृदयामधून, प्रसन्न अशा जीवामधून उदित होणारी, ही सर्वात उदात्त अशी परोपकाराची भावना होय.

ज्याने आंतरिक शांती प्राप्त करून घेतली आहे तो मुक्तिचा अग्रदूत असतो; तो जिथे जातो तेथे – आशा आणि आनंदाचा वाहक बनतो. गरीब बिचाऱ्या, रंजल्यागांजल्या मानवांना ह्या गोष्टींपेक्षा दुसरे तरी काय हवे असते? अशी काही माणसं असतात की, ज्यांचे विचार म्हणजे सर्व प्रेमच असते, ज्यांच्यामधून प्रेमच उदित होत असते. अशीही काही माणसं असतात आणि अशा व्यक्तींची केवळ उपस्थितीही इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक कृतिशील, अधिक सच्चा असा परोपकार असते. अशा व्यक्तींनी एखादा शब्दही उच्चारला नाही किंवा कोणत्याही भावमुद्रा केल्या नाहीत तरीही, आजारी माणसं बरी होतात, दुःखितांना दिलासा मिळतो, अज्ञानी लोकांना ज्ञानाचा प्रकाश मिळतो, दुष्ट लोकदेखील शांत होतात, जे दुःखीकष्टी आहेत त्यांना सांत्वन लाभते आणि ज्यामधून त्यांच्यासाठी नवीन क्षितिजेच खुली होतील, अशा प्रकारचे सखोल रूपांतरण त्यांच्यामध्ये होते आणि त्यातूनच प्रगतीच्या अनंत अशा मार्गावर, निःसंशयपणे एक निर्णायक पाऊल पुढे टाकले जाण्याची क्षमता त्यांच्या अंगी येते. ज्या सर्वांच्या सेवक बनतात आणि आपल्या प्रेमाद्वारे सर्वांना स्वतःलाच देऊ करतात अशा व्यक्ती म्हणजे परम परोपकाराचे चालतेबोलते प्रतीकच असतात.

हे माझ्या बांधवांनो, जे जे कोणी परोपकारी होण्याची आस बाळगतात अशा तुम्हा सर्वांना मी निमंत्रित करत आहे, ही सदिच्छा अभिव्यक्त करण्यासाठी माझ्या विचारांमध्ये तुमचे विचार मिसळवा; त्यांच्या उदाहरणाचे अनुसरण करण्यासाठी, आपण दररोज थोडे अधिक प्रयत्न करू. जेणेकरून आपणही त्यांच्यासारखेच या जगामध्ये प्रकाश आणि प्रेमाचे संदेशदूत बनू शकू.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 105-106)

जेव्हा भौतिक परिस्थिती ही काहीशी कठीण असते असते आणि त्यातून काहीशी अस्वस्थता येते अशा वेळी, त्या परमेश्वराच्या इच्छेसमोर पूर्णतः समर्पित कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल, म्हणजे जीवन किंवा मृत्यू, आरोग्य किंवा आजारपण, याच्याविषयी यत्किंचितही काळजी न करता, जर व्यक्ती समर्पित होऊ शकली तर, तिचे समग्र अस्तित्व त्वरेने त्या ईश्वराच्या जीवन आणि प्रेमाच्या कायद्याच्या सुसंवादामध्ये प्रवेश करते आणि सर्व शारीरिक अस्वास्थ्यता नाहीशी होऊन, त्याची जागा एका स्वस्थ, गहन आणि शांतिमय अशा कल्याणाने घेतली जाते.

माझ्या हे पाहण्यात आले आहे की, ज्यामध्ये व्यक्तीला प्रचंड शारीरिक सहनशीलतेची आवश्यकता असते, अशा कार्याला जेव्हा व्यक्ती सुरुवात करते, तेव्हा तिला ज्या अडचणींना सामोरे जावे लागणार असते, त्या कल्पनेनेच व्यक्ती हबकून जाते. त्यापेक्षा प्रत्येक क्षणी वर्तमानातील अडचणींकडे पाहणे हे अधिक शहाणपणाचे असते; त्यामुळे आपले प्रयत्न अधिक सोपे होतात; कारण आपल्या वाट्याला येणारा प्रतिकार हा नेहमीच आपल्या सामर्थ्याच्या प्रमाणात असतो.

वास्तविक, आपले शरीर हे एक अद्भुत साधन आहे; परंतु त्याचा उपयोग कसा करावयाचा हे आपल्या मनाला समजत नाही. शरीराच्या सौष्ठवाचे, त्याच्या लवचीकतेचे पोषण न करता, ते त्याला पूर्वाधारित कल्पना आणि प्रतिकूल सूचनांमधून येणाऱ्या विशिष्ट चौकटीमध्ये बसवते.

परंतु हे प्रभो, तुझ्याशी एकरूप होणे, तुझ्यावरच विश्वास ठेवणे, तुझ्यामध्ये निवास करणे, तूच होऊन राहणे हेच परम विज्ञान आहे; आणि मग असा माणूस जो तुझ्या सर्वसमर्थतेचे आविष्करण करणारा बनतो, तेव्हा त्याला कोणतीच गोष्ट अशक्य असत नाही. हे प्रभो, एखादी मौन आराधना असावी, एक प्रकारचे शांत भजन असावे त्याप्रमाणे माझी अभीप्सा तुझ्याप्रत उदित होत आहे, आणि तुझ्या दिव्य प्रेमाने माझे हृदय उजळून निघत आहे. हे दिव्य स्वामी, मी तुला नतमस्तक होऊन, मी तुला प्रणिपात (प्रणाम) करत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 101)

आजारपणाचे शारीरिक किंवा मानसिक, बाह्य वा आंतरिक, कोणतेही कारण असू दे, परंतु त्याचा परिणाम शारीरिक देहावर होण्यापूर्वी, व्यक्तीभोवती असणाऱ्या आणि तिचे संरक्षण करणाऱ्या अजून एका स्तराला त्या आजाराने स्पर्श करणे आवश्यक असते. या सूक्ष्म स्तराला वेगवेगळ्या शिकवणीमध्ये विविध नावे असतात. कोणी त्याला आकाशदेह म्हणतात तर कोणी त्याला नाडीगत आवरण किंवा प्राणमय कोश (Nervous Envelope) म्हणतात. एखादी खूप गरम आणि उकळती वस्तू असली तर तिच्या भोवती जशी धग जाणवणारी, सूक्ष्म संवेदना असते, तशीच काहीशी त्याची घनता असते, ती त्याच्या शरीरातून बाहेर उत्सर्जित होत असते आणि ती शरीरावर अगदी निकट आवरण घालून असते.

या स्तराच्या माध्यमातूनच बाह्य जगताशी व्यक्तीचे सर्व व्यवहार होत असतात आणि शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होण्यापूर्वी या प्राणमय कोशावर हल्ला होणे आणि त्यातून आत शिरकाव होणे हे प्रथम आवश्यक असते. हे आवरण जर पूर्णपणे बलवान आणि अभेद्य असेल, तर मग प्लेग किंवा कॉलरासारख्या महाभयंकर आजाराने ग्रस्त असलेल्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात, तरी तुम्ही निरोगी राहू शकता. जोपर्यंत हे आवरण पूर्ण आणि समग्र आहे, एकसंध आहे, त्याचे घटक हे निर्दोष समतोल राखून आहेत, तोपर्यंत आजारांच्या सर्व संभाव्य हल्ल्यांपासून हे एक परिपूर्ण संरक्षण असते.

एका बाजूने शरीर हे जडतत्त्वाने बनलेले असते, जडद्रव्याने म्हणण्यापेक्षा भौतिक परिस्थितीने बनलेले आहे, असे म्हटले पाहिजे तर दुसऱ्या बाजूने ते आपल्या मानसिक स्थितीच्या स्पंदनांनी बनलेले असते. शांती, समता, आरोग्याबद्दल खात्री आणि श्रद्धा, स्वस्थ विश्रांती, प्रसन्नता आणि उजळ आनंदीपणा या तत्त्वांपासून हे आवरण बनलेले असते. आणि या आवरणाला ही तत्त्वे बळ आणि द्रव्य पुरवितात. अगदी सूक्ष्म आणि त्वरित प्रतिक्रिया देणारे असे हे संवेदनशील माध्यम असते; ते अगदी त्वरेने सर्व प्रकारच्या सूचनांचा स्वीकार करते आणि स्वतःमध्ये त्वरेने बदल घडवून आणू शकते आणि त्याची परिस्थितीही जवळजवळ पूर्णपणे बदलून टाकू शकते.

वाईट सूचनेचा त्याच्यावर खूपच जोरकसपणे परिणाम होतो; तसेच उलट, तितक्याच जोरदारपणे चांगल्या सूचनेचाही त्याच्यावर परिणाम होतो. नैराश्य आणि नाउमेद यांचा त्याच्यावर खूपच प्रतिकूल परिणाम होतो; या गोष्टी त्या आवरणाला छिद्रे पाडतात, जणू त्याच्या द्रव्यामध्ये छेद करून त्याला कमकुवत, अप्रतिकारक्षम बनवितात आणि विरोधी हल्ल्यांना सुकर असा मार्ग खुला करून देतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 89)

विकृती हा मानवी रोग आहे, विकृती प्राण्यांमध्ये क्वचितच आढळून येते आणि ती सुद्धा त्याच प्राण्यांमध्ये आढळते जे प्राणी माणसाच्या निकट आलेले असतात आणि त्यांना त्या माणसांच्या विकृतीचा संसर्ग झालेला असतो.

उत्तर आफ्रिकेमधील – अल्जेरियातील काही अधिकाऱ्यांची ही गोष्ट आहे. त्यांनी एक माकड दत्तक घेतले होते. ते माकड त्यांच्याबरोबर राहत असे. एके दिवशी रात्री जेवणाच्या वेळी त्या अधिकाऱ्यांच्या मनात एक विचित्र कल्पना आली आणि त्यांनी त्या माकडाला मद्य प्यायला दिले. इतर लोक पित आहेत असे सुरुवातीला त्या माकडाने पाहिले, त्याला ते काहीतरी चांगले असेल असे वाटले आणि मग त्याने आख्खा पेलाभर वाईन प्यायली. आणि नंतर ते आजारी पडले, ते इतके आजारी पडले की, ते टेबलाखाली वेदनेने गडबडा लोळू लागले. शारीरिक प्रकृती ही विकृत झालेली नसते तेव्हा, अल्कोहोलचा शरीरावर कसा त्वरित परिणाम होतो याचे उदाहरण माणसांनी लक्षात घेण्याजोगे आहे. ते माकड त्या विषामुळे जवळजवळ मृतवतच झाले होते पण नंतर त्याची प्रकृती सुधारली.

आणि ते बरे झाल्यामुळे, त्याला परत कालांतराने जेवणाच्या टेबलावर रात्रीच्या वेळी बसविण्यात आले आणि कोणीतरी त्याच्या समोर परत वाईनचा पेला ठेवला. त्याने तो इतक्या प्रचंड रागाने उचलला आणि ज्या माणसाने तो पेला देऊ केला होता त्या माणसाच्या डोक्यावर हाणला. यातून असे दिसून येते की, त्या माणसांपेक्षा ते माकड जास्त शहाणे होते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 101)

प्रश्न : तंबाखू आणि दारू स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती नष्ट का करतात?

श्रीमाताजी : का? कारण त्या गोष्टी तसे करतात. याला काही नैतिक कारण नाहीये. तर ती वस्तुस्थिती आहे. दारुमध्ये विष असते, तंबाखूमध्ये विष असते आणि हे विष पेशींपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यांना इजा पोहोचविते. अल्कोहोल शरीरातून कधीच बाहेर पडत नाही; ते मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये साठत राहते. आणि अशा रीतीने ते तेथे साठत राहिले की, मग मेंदूतील त्या पेशी कार्य करेनाशा होतात – काही जण तर यामुळे वेडेही होतात, (यालाच अतिसेवनामुळे होणारा भ्रम असे म्हणतात.) अतिप्रचंड प्रमाणात दारू प्यायल्यामुळे ती, ज्या पद्धतीने मेंदूमध्ये साठून राहते त्याचा परिणाम वेड लागण्यात होतो. आणि हे इतके तीव्र रूप धारण करते की….

फ्रान्समध्ये असा एक प्रांत आहे, जिथे वाईन तयार केली जाते. या वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते. मला वाटते चार किंवा पाच टक्के, अगदी कमी प्रमाण असते. आणि मग ही लोकं, स्वतःच ती वाईन बनवत असल्यामुळे, ते जणू काही पाणी प्यायल्यासारखी वाईन पितात. ते पद्धतशीरपणे तिचे सेवन करतात पण कालांतराने ते आजारी पडतात. त्यांना मेंदूचे आजार होतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत, त्यांचा मेंदू नीट काम करू शकत नसे.

आणि तंबाखू – निकोटिन हे तर अतिशयच खतरनाक असे विष आहे. पेशी नष्ट करून टाकणारे हे विष असते. मी म्हणाले तसे, हे मंद विष आहे कारण व्यक्तीला त्याचे सेवन केल्यावर लगेचच त्याची जाणीव होत नाही. अपवाद, व्यक्ती पहिल्या वेळी सिगारेट ओढते आणि आजारी पडते, त्याचा !

आणि त्यातूनच तुम्हाला समजायले हवे की, व्यक्तीने त्याचे सेवन करता कामा नये. माणसं इतकी मूर्ख असतात की, त्यांना वाटते की, ही दुर्बलता आहे आणि जोवर त्यांना त्या विषाची सवय होत नाही तोवर ते त्याचे सेवन करतच राहतात. आणि मग त्याचे शरीर हे प्रतिक्रिया देईनासे होते, ते कोणतीही प्रतिक्रिया न देताच, स्वतःच्या नाश पावण्याला संमती देते : तुम्हाला त्या सेवनाचे शरीरावर काही परिणाम दिसेनासे होऊ लागलेले असतात. आणि ही गोष्ट शरीर तसेच नैतिकतेच्या बाबतीतही समानच आहे.

जेव्हा तुम्ही करू नये अशी एखादी गोष्ट करता आणि तुम्हाला तुमचा चैत्य पुरुष अगदी क्षीण आवाजात का होईना सांगत असतो की, तुम्ही हे करता कामा नये आणि तरीसुद्धा ती गोष्ट तुम्ही करता, कालांतराने तो तुम्हाला काही सांगेनासा होतो आणि मग तुमच्या कोणत्याही वाईट कृत्यांना आतून कोणतीच प्रतिक्रिया मिळेनाशी होते कारण जेव्हा तो आवाज काही सांगत होता, तेव्हा तुम्हीच त्याचे म्हणणे ऐकणे नाकारलेले असते. आणि मग तेव्हा तुम्ही साहजिकपणेच, वाईटाकडून अधिक वाईटाकडे जाता आणि एका गर्ततेत जाऊन पडता. तंबाखूच्या बाबतीतही अगदी नेमके असेच आहे : पहिल्यांदा जेव्हा तिचे सेवन केले जाते तेव्हा शरीर जोरदार प्रतिक्रिया देते, ते उलटी करते आणि सांगू पाहते की, “काहीही झाले तरी मला हे अजिबात नकोय.” तुम्ही तुमच्या मानसिक आणि प्राणिक मूर्खपणाच्या जोरावर शरीराला तसे करण्यास भाग पाडता आणि मग ते शरीर प्रतिक्रिया देईनासे होते आणि त्याचे विघटन होत नाही तोपर्यंत ते स्वतःमध्ये हळूहळू विष भिनवू देते. त्याचे कार्य बिघडून जाते; त्याच्या नसांवर परिणाम होतो; त्या इच्छेचे संक्रमण करेनाशा होतात कारण त्यांच्यावर परिणाम झालेला असतो, त्यांच्यामध्ये विष भिनलेले असते. इच्छाशक्तीचे वहन करण्याची ताकदच त्यांच्यात शिल्लक उरलेली नसते. आणि सरतेशेवटी मग अशा माणसांचे हात थरथर कापायला लागतात, मेंदूचा ताबा सुटल्यासारख्या त्यांच्या हालचाली होतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 74-76)

प्रत्येक देशामध्ये असे काही समूह असतात की जे मद्याचा निषेध करतात किंवा पूर्ण वर्ण्य करतात. मदिरेला स्पर्शही करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यातील सदस्य करतात. आणि काही ठरावीक शहरांमध्ये त्यांच्या विक्रीला बंदी असते. पण इतर ठिकाणी, जिथे दारूचे सेवन आधी माहीत नव्हते, तिथेही आता त्याचा प्रभाव वाढत आहे.

उदाहरणार्थ, भारतामध्ये जिथे अनेक शतके दारूबंदीचे साम्राज्य होते, तिथे प्राचीन गोष्टींमध्ये असलेल्या राक्षसांपेक्षाही अधिक भयानक स्वरूपात तिचा शिरकाव झाला आहे. कारण ज्या भयानक राक्षसांविषयी ते बोलत ते राक्षस केवळ शरीरालाच इजा करणारे असत, तर दारूमध्ये मात्र विचार आणि चारित्र्य नष्ट करण्याची ताकद असते. त्यातील पहिली सुरुवात शरीरापासून होते. जे पालक खूप जास्त प्रमाणात तिचे सेवन करतात, त्यांच्या मुलांना त्रास होतो. ती माणसाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करते आणि खरंतर जे मानवतेचे सेवक असायला हवेत त्यांना दारू तिचे गुलाम बनवून टाकते.

आपण प्रत्येकानेच खरंतर मानवतेचे सेवक असले पाहिजे. आणि जर का आपण आपल्या खाण्याने किंवा पिण्याने, आपली मनं व शरीरं कमकुवत करून टाकू, तर जे नोकर, नीटपणे काम करू शकत नाहीत अशा वाईट नोकरांमध्ये आपली गणना होईल.

शस्त्र तुटून गेल्यावर एखाद्या सैनिकाची स्थिती काय होईल ? जहाजाचे शीडच गमावल्यावर खलाशाची काय स्थिती होईल ? घोडा लुळापांगळा झाला तर घोडेस्वाराची स्थिती काय होईल? त्याप्रमाणेच, माणसाला प्राप्त झालेल्या सर्वात मौल्यवान अशा त्याच्या क्षमता त्याने गमावल्या तर माणूस काय करू शकेल ? एखाद्या चांगल्या प्राण्याइतकी सुद्धा त्याची किंमत उरणार नाही. कारण प्राणी निदान त्यांना घातक असणाऱ्या अन्नाचे किंवा द्रव्याचे सेवन तरी वर्ज्य करतात.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 208)