श्रीमाताजींना त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याने विचारले, “माताजी, तुमचा चैत्य पुरुष तुमच्या जीवनाचे संपूर्णतया नियमन करत आहे, असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा कधी आला?”

श्रीमाताजी म्हणाल्या, “ही खूप जुनी गोष्ट आहे. मला वाटते ते बहुधा १९०४ साल असावे. एके दिवशी माझ्या भावाच्या मित्रामुळे माझी मार्क थिऑन यांच्याशी भेट झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा, मी जरी थिऑन ह्यांना ओळखत नव्हते तरीही, त्यांनी मात्र मला ओळखले. थिऑन हे गूढवादाचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी मला त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले.

पुढे मग मी गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गावी अल्जेरियामध्ये थ्लेमसेन येथे गेले. तेव्हा मी २७-२८ वर्षांची होते आणि आयुष्यात प्रथमच एकटीने एवढ्या लांबचा प्रवास करत होते. मी तेथे पोहोचले तेव्हा मार्क थिऑन मला न्यायला आले होते.

अॅटलास पर्वतराजींच्या उतरंडीवर त्यांचे घर होते. त्यांची मोठी इस्टेट होती. त्यामध्ये शेकडो वर्षांपूर्वीची ऑलिव्हची, अंजीरांची झाडे होती. त्या सगळ्या वृक्षराजीमधून आम्ही वर वर चाललो होतो. त्यांचे घर खूप दूरवर, उंचावर होते. एका टप्प्यावर आल्यावर दूरवर निर्देश करत त्यांनी मला लाल रंगाचे एक घर दाखविले आणि म्हणाले ते माझे घर ! त्या घराच्या लाल रंगावरून काही गमतीदार किस्सा पण त्यांनी मला ऐकविला.

मी शांतपणेच चालत होते. आणि मध्येच ते एकदम थांबले आणि माझ्याकडे गर्रकन वळून म्हणाले, “आता तू माझ्या ताब्यात आहेस, तुला भीती नाही वाटत?”

आपली तर्जनी उंचावून दाखवीत, मी त्यांना सांगितले की, “माझा चैत्य पुरुष माझे नियमन करतो, मी कोणालाच घाबरत नाही.”

माताजी पुढे सांगू लागल्या, “हे उत्तर ऐकल्यावर, ते थक्कच झाले. खरोखर, थ्लेमसेनला जाण्यापूर्वी मला चैत्य जाणिवेची (Psychic Consciousness) प्राप्ती झालेली होती.” त्यामधूनच ती निर्भयता आलेली होती.

 

आधारित : (Mother’s Agenda vol 13 : April 15,1972 & Mother or The Divine Materialism : Pg 159-160)

साधक : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे कारावयाचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची ?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते. आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. हे पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगावयास सुरुवात करणे हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना आहे, तिची दोन मुख्य केंद्र आहेत. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नाही तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता :
हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास, व्यक्तीला व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे, आत्म्याचे किंवा चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, तिला आणि तिच्या सर्व हालचालींना सत्याच्या दिशेने वळवू लागतो, ईश्वराच्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होते, त्या सर्वोच्चाप्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर शक्ती आणि चेतना, आमच्या ऊर्ध्वस्थित राहून, आमची वाट पाहत असते, तिचे आमच्या प्रकृतीमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी, तो तिला आवाहन करतो.

स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि हृदयातील ईश्वराच्या उपस्थितीची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

मस्तकामध्ये एकाग्रता :
दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करावयाची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते.

पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केलेच पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना वैश्विक आत्म्याच्या, दिव्य शांतीच्या, दिव्य प्रकाशाच्या, दिव्य शक्तीच्या, दिव्य ज्ञानाच्या, दिव्य आनंदाच्या संपर्कात येते व त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून, तेच होऊन जाते.

मनाच्या अचंचलतेची अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि आत्म्याचा आणि ऊर्ध्वस्थित अशा ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये जाणिवेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये, आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये चढून तेथे जीवन जगण्याच्या ऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित सत्याचे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले तर ते अधिक इष्ट असते.

(उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)

चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान पुढीलप्रमाणे :

१) चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान म्हणजे प्रेम आणि भक्ती होय, पण प्राणिक प्रेम नव्हे, अपेक्षा बाळगणारे, अहंकारी प्रेम नव्हे तर, कोणत्याही अटी, दावे नसलेले, स्वयंभू असे प्रेम.

२) अंतरंगातील दिव्य मातेशी संपर्क किंवा दिव्य मातेची उपस्थिती.

३) अंतरंगातून मिळणारे अचूक मार्गदर्शन.

४) चैत्य पुरुषाच्या प्रभावाचे व मार्गदर्शनाचे अनुसरण केल्याने मन, प्राण व शारीर जाणिवेचे शांत होणे व शुद्धीकरण घडून येणे.

५) उच्चतर आध्यात्मिक चेतनेचे, स्वीकारक्षम झालेल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी, कनिष्ठ जाणिवांचे उच्च आध्यात्मिक चेतनेप्रत खुले होणे – चैत्य जाणिवेमुळे प्रत्येक गोष्टीत योग्य विचार, योग्य आकलन, योग्य भावना, योग्य दृष्टिकोन तयार होतो आणि अशा योग्य दृष्टिकोनानिशी, परिपूर्ण ग्रहणक्षमतेने कनिष्ठ चेतना उच्च चेतनेप्रत खुली होते.

एखादी व्यक्ती मन, प्राण यांच्यामधून स्वत:ची चेतना वर उंचावू शकते आणि उच्च स्तरावरील शक्ती, आनंद, प्रकाश, ज्ञान खाली आणू शकते परंतु, हे खूप अवघड असते आणि त्यातही त्याच्या परिणामांची खात्री देता येत नाही. आणि जर जीव त्यासाठी तयार झालेला नसेल, किंवा त्याचे पुरेसे शुद्धीकरण झालेले नसेल तर ते धोकादायक देखील असते. जाणिवपूर्वकतेने चैत्यपुरुषाच्या माध्यमातून आरोहण करणे, हा सर्वात चांगला मार्ग आहे. अशा प्रकारे जर तुम्ही चैत्य केंद्रातून आरोहण करत असाल तर ते अधिक बरे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 339)

श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रांमधून –

दिव्य माता भेटावी म्हणून डोळ्यांत अश्रू येणे हे एक प्रकारचे चैत्य दुःख आहे; परंतु चैत्य अश्रू हे दुःखपूर्ण असण्याची आवश्यकता नाही, भावुकता आणि आनंदाचेदेखील अश्रू असू शकतात.

शांतीच्या आणि स्थिरचित्ततेच्या या स्थितीमध्ये हृदयाच्या मागे असणाऱ्या आंतरिक चैत्य पुरुषाचा स्पर्श झाल्याने कदाचित अश्रू आले असतील. जो आत्मा पृष्ठस्तरावर येऊ पाहत आहे त्या आत्म्याच्या अभीप्सेची आणि भक्तीची ही खूण असते. जर चैत्य पुरुष पृष्ठभागावर येऊ शकला, आणि सर्व प्रकृतीमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊ शकला, सर्व अस्तित्व ईश्वराभिमुख होऊ शकले तर असे अश्रू येणे कालांतराने नाहीसे होईल.

*

तुम्ही ज्याविषयी बोलत आहात त्या भावनेसहित रडू येणे ही चैत्य दुःखाची खूण आहे; त्यामधून चैत्य पुरुषाची अभीप्साच अभिव्यक्त होते. परंतु त्याबरोबर निराशा किंवा हताशपणा येता कामा नये. उलट, तुम्ही श्रद्धेला अधिकच चिकटून राहिले पाहिजे कारण तुमच्यामध्ये खरीखुरी अभीप्सा आहे – आणि त्याविषयी तीळमात्र शंका असू शकत नाही, बाह्य प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही एक ना एक दिवस त्याची परिपूर्ती होणारच. आंतरिक शांती व स्थिरचित्तता या गोष्टी ज्या श्रद्धेमध्ये आहेत ती श्रद्धा तुम्ही पुन्हा प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि त्याबरोबरच, काय करावयास हवे यासंबंधी स्पष्ट जाणीव कायम राखत, आंतरिक व बाह्य परिवर्तनासाठी एक स्थिर अशी अभीप्सा बाळगली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 375-376)

ईश्वराशी एकात्म पावण्याची इच्छा, ईश्वरच हवा ह्या भावनेतील खरीखुरी उत्कटता म्हणजे काय असे एकाने विचारले आहे. आणि त्यालाच स्वत:मधील दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभीप्सांचा स्वत:मध्ये शोध लागलेला आहे, विशेषत: ईश्वरविषयक उत्कटतेबाबत असणाऱ्या दोन प्रकारांचा शोध लागला आहे. तो म्हणतो, त्यातील एका वेळी एक प्रकारची यातना असते, एक हृदयस्पर्शी वेदना असते, आणि दुसऱ्या वेळी, एक प्रकारची आतुरता आणि त्याच वेळी खूप आनंददेखील असतो. हे त्याचे निरीक्षण अगदी अचूक आहे. आणि आता त्याचा प्रश्न असा आहे की, आपल्याला वेदनामिश्रित अशी उत्कटता कधी जाणवते आणि प्रसन्नतायुक्त उत्कटता कधी जाणवते?

मला माहीत नाही, तुमच्यापैकी किती जणांना ह्याचा किंवा अशासारखा अनुभव आलेला आहे पण हा अगदी दुर्मिळ पण सहजस्फूर्त येणारा असा अनुभव आहे आणि त्याचे उत्तरही अगदी साधे आहे. चैत्य जाणिवेची उपस्थिती त्या अभीप्सेबरोबर संयुक्त झाली की लगेचच, त्या उत्कटतेला एक निराळेच रूप प्राप्त होते, जणु काही अवर्णनीय अशा आनंदाच्या अर्काने ती भरून जाते. हा अशा प्रकारचा आनंद असतो की, तो इतर सर्व गोष्टींमध्ये भरलेला असल्याचे जाणवते. ह्या अभीप्सेचे बाह्य रूप कोणते का असेना, मार्गामध्ये त्याला कितीही अडचणी, अडथळे आले तरी, ही प्रसन्नता तिथे असतेच; जणुकाही ती सर्वत्र भरून राहिलेली असते आणि इतर काहीही असले तरी ती तुम्हाला तिच्याबरोबर घेऊन जाते. चैत्य उपस्थितीचे हे एक खात्रीशीर लक्षण आहे.

ह्याचा अर्थ असा की, तुमच्या चैत्य जाणिवेबरोबर तुमचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे, तो कमीअधिक परिपूर्ण असेल, सातत्याच्या दृष्टीने तो अधिक-उणा असेल पण तो संपर्क प्रस्थापित झालेला आहे. त्या क्षणी मात्र त्या चैत्य पुरुषामुळे, चैत्य जाणिवेमुळेच तुमची अभीप्सा भरून जाते की, ज्यामुळे तिला तिचे खरे सत्त्व लाभते. आणि तीच गोष्ट प्रसन्नतेच्या रूपाने अभिव्यक्त झालेली असते. आणि जेव्हा ती चैत्य जाणीव तेथे नसते, तेव्हा मग ती अभीप्सा अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांमधूनसुद्धा उदित होऊ शकते; ती मुख्यत: मनातून उदित होऊ शकते, किंवा मुख्यत्वेकरून प्राणामधून किंवा अगदी शरीरामधूनही उदित होऊ शकते किंवा कधीकधी तर ती तिन्हींमधून एकत्रितपणे उदित होऊ शकते – ती सर्व प्रकारच्या संमिश्रणांमधून उदित होऊ शकते.

पण सर्वसाधारणपणे सांगावयाचे झाले तर, जर उत्कटता असेल तर तेथे प्राण आवश्यकच असतो. प्राणामुळे उत्कटता येते आणि प्राण हे जसे उत्कटतेचे केंद्र आहे तसेच ते अडीअडचणी, अडथळे, विरोधाभास यांचे पण स्थान असते आणि अडचणींची तीव्रता व अभीप्सेची तीव्रता यांच्यामध्येच संघर्ष होऊन, ही व्यथा निर्माण होते. परंतु त्यामुळे व्यक्तीने अभीप्सा बाळगणे सोडून देण्याचे काही कारण नाही. तुम्हाला या व्यथावेदनेचे कारण उमगले की झाले.

आणि मग जर का तुम्ही, तुमच्या अभीप्सेमध्ये अजून एका घटकाचा प्रवेश करून देऊ शकलात तर, हा घटक म्हणजे ईश्वरी कृपेवरील तुमचा विश्वास, ईश्वरी प्रतिसादाविषयीची खात्री, ही जर त्या अभीप्सेमध्ये मिसळली तर व्यथावेदना, दुःख या सगळ्या गोष्टी प्रतिसंतुलित होऊन जातात आणि मग तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना वा भीतिविना अभीप्सा बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 248-250)

व्यक्तित्वातील ज्या भेदांविषयी तुम्ही बोलत आहात, ती योगिक विकासातील आणि अनुभूतीतील एक आवश्यक अशी पायरी आहे.

आपण जणू काही दुपदरी अस्तित्व आहोत असे व्यक्तीला जाणवते, एक आंतरिक चैत्य अस्तित्व की, जे सत्य आहे असे वाटते आणि दुसरे अस्तित्व म्हणजे बाह्यवर्ती जीवनासाठी साधनभूत असणारे असे बाह्यवर्ती मानवी अस्तित्व. आंतरिकरित्या चैत्य अस्तित्वामध्ये जीवन जगणे व ईश्वराशी जोडलेले राहणे आणि त्याच वेळी बाह्य अस्तित्व बाह्यवर्ती कार्यामध्ये गुंतलेले असणे, हे जे काही तुम्हाला जाणवत आहे ती कर्मयोगाची पहिली पायरी आहे.

तुमच्या या अनुभवांमध्ये चुकीचे असे काही नाही; ते अनुभव अटळ आहेत आणि या पायरीवर अगदी स्वाभाविक असे आहेत. तुम्हाला या दोन्हीमधील सेतुबंधाची जाणीव होत नाही कारण, कदाचित या दोहोंना जोडणारे असे काय आहे ह्याविषयाची तुम्हाला अद्यापि जाण नाही. आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर ह्या गोष्टी, चैत्य अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांना जोडणाऱ्या असतात. आणि त्याविषयी तुम्ही आत्ताच काळजी करण्याचे काही कारण नाही.

महत्त्वाची गोष्ट अशी की, जे आत्ता तुमच्याकडे आहे ते जतन करा, त्याला वाढू द्या, सतत चैत्य अस्तित्वात, तुमच्या सत् अस्तित्वात जगा. मग योग्य वेळी चैत्य जागृत होईल आणि प्रकृतीच्या उर्वरित सर्व घटकांना ईश्वराभिमुख करेल, जेणेकरून ह्या बाह्यवर्ती अस्तित्वाला देखील स्वत:हूनच ईश्वराच्या स्पर्शाची जाणीव होईल आणि ईश्वरच आपला कर्ताकरविता आहे ह्याची जाणीव होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 344-345)

प्रश्न : व्यक्तीने अस्तित्वाचे एकीकरण कसे करावे, हे मला जाणून घ्यावयाचे आहे.

श्रीमाताजी : व्यक्तीच्या एकीकरणाच्या ह्या कार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
१) व्यक्तीने स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी सजग होणे.
२) व्यक्तीला एकदा का आपल्या हालचाली, आवेग, विचार, संकल्पपूर्वक कृती यांविषयीची जाणीव झाली की, त्या सगळ्या गोष्टी चैत्य पुरुषासमोर मांडणे. ह्या हालचाली, आवेग, विचार व संकल्पपूर्वक कृती स्वीकारावी वा नाकारावी हे ठरविण्यासाठी, प्रत्येक गोष्ट चैत्य पुरुषाच्या समोर मांडावयाची असते. त्यापैकी ज्यांचा स्वीकार होईल त्या कायम राखल्या जातील व चालू राहतील आणि ज्या नाकारल्या जातील, त्या पुन्हा कधीही परतून येऊ नयेत ह्यासाठी, जाणिवेच्या बाहेर काढून टाकल्या जातील. हे एक दीर्घकालीन आणि काटेकोरपणे, कसून करण्याचे कार्य आहे, ते योग्य प्रकारे करण्यासाठी वर्षानुवर्षे लागू शकतात.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 414)

“पूर्ण योगामध्ये, शक्यतो हृदयामध्ये लक्ष केंद्रित करून, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्या अस्तित्वाला हाती घ्यावे म्हणून त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याच्या योगे जाणिवेमध्ये पालट होणे याखेरीज इतर कोणतीही पद्धत नाही. एखादी व्यक्ती मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकते परंतु पुष्कळ जणांना अशा प्रकारे उन्मुख होणे फारच कठीण जाते.” – श्रीअरविंद (CWSA 29 : 107),

प्रश्न : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?

श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे आहे. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही प्रथम चैत्याच्या संपर्कातच प्रवेश करता. परंतु जर का तुम्ही डोक्यामध्ये चित्त एकाग्र कराल तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, डोक्याकडून हृदयाकडे जावे लागते. आणि तुम्ही तुमच्या शक्ती एकत्र करून चित्ताची एकाग्रता करणार असाल तर, त्या शक्तींचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक बरे; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. डोक्याकडून येणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 389)

चैत्य अस्तित्वाचा श्रीमाताजींना आलेला पहिला अनुभव त्या त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याला सांगत आहेत. तो अनुभव असा – मला तो अनुभव इ.स. १९१२ साली आला. पुढील सर्व वाटचालीसाठी आधारभूत असणारा हा पहिला अनुभव आहे. परंतु ह्या अनुभवापर्यंत पोहोचायला मला संपूर्ण एक वर्ष लागले. मी खाता-पिता, उठता-बसता ‘आंतरिक अस्तित्वाशी एकत्व’ हा एकच ध्यास घेतला होता. मला दुसरे तिसरे काही नको होते. मी सतत त्याचाच विचार करत असे, आणि तेव्हाच एक मजेशीर गोष्ट घडली.

ती नववर्षाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. मी संकल्प केला होता, “येत्या वर्षात हे नक्की घडलेच पाहिजे.” मी आमच्या स्टुडिओमध्ये होते. त्या स्टुडिओतून बाहेर पडल्यावर समोर अंगण होते. मी सहज म्हणून दार उघडून बाहेर आले, समोर पाहते तो मला उल्कापात होताना दिसला. असे म्हणतात की, तारा निखळून पडत असताना, तुम्ही जर मनात कोणतीही इच्छा बाळगलीत तर ती वर्षाच्या आत खरी होते, आणि मी तसेच केले. तो तारा दिसेनासा व्हायच्या आत मी म्हटले, “आंतरिक अस्तित्वाशी एकत्व..”

आणि खरोखरच, डिसेंबर महिन्याच्या आत मी आंतरिक अस्तित्वाशी एकत्व पावू शकले होते. त्या काळी, आंतरिक अस्तित्वाशी एकरूप व्हायचा मी खूप प्रयत्न करत असे. अगदी रस्त्याने चालत असतानासुद्धा तोच ध्यास असे. मी सतत एकाग्र राहण्याचा प्रयत्न करत असे..ते खूप दुःखदायक असे.. खूप त्रास होत असे. जणू काही मी बंद दरवाजापुढे बसलेली असावे असे ते भासायचे…

पण एके दिवशी मात्र, अचानक, दरवाजा उघडला गेला. आणि नंतर, ती अनुभूती काही तासच नव्हे, तर काही दिवस टिकून राहिली होती.. तो चैत्य पुरुष सर्व काही जाणतो, तोच संकल्प करतो, तोच जीवनाचे नियमन करतो…ही जाणीव झाली आणि नंतर ती जाणीव मला कधीच सोडून गेली नाही..

– श्रीमाताजी (Mothers agenda Vo13 : 0ctober 30, 1962)

वैयक्तिक प्रयत्नांवर भर :
योगसाधना करण्याच्या नेहमीच दोन पद्धती असतात – पैकी एक पद्धत म्हणजे जागरुक मनाने व प्राणाने कृती करणे. पाहणे, निरीक्षण करणे, विचार करणे आणि अमुक एक गोष्ट करावयाची किंवा नाही ते ठरविणे, ह्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. अर्थात, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या साहाय्यानेच त्या कृती केल्या जातात, त्या शक्तीला आवाहन केले जाते किंवा ती शक्ती ग्रहण केली जाते – अन्यथा फारसे काही घडू शकत नाही. परंतु तरीसुद्धा येथे वैयक्तिक प्रयत्नांवरच भर असतो आणि त्याद्वारेच ओझ्याचा बराचसा भाग उचलला जातो.

चैत्य पुरुषाचा मार्ग :
दुसरा मार्ग हा ‘चैत्य पुरुषाचा मार्ग’ आहे. यामध्ये चेतना ही ईश्वराप्रत उन्मुख होते आणि केवळ चेतना वा चैत्य पुरुषच उन्मुख होतो व तो पुढे आणण्यात येतो असे नाही तर, मन, प्राण आणि शरीर देखील ईश्वराप्रत खुले होतात आणि ते प्रकाश ग्रहण करू लागतात, त्याचा परिणाम म्हणून, काय केले पाहिजे ह्याचे आकलन होऊ लागते. जे काही करणे आवश्यक आहे, ते स्वत: ईश्वरी शक्तीच करत आहे ह्याची जाणीव होऊ लागते, ते दिसू लागते. आणि तेव्हा मग, जे दिव्य कार्य चालू आहे त्यासाठी, स्वत:च्या दक्ष व जागरुक आरोहणाच्या द्वारे त्याला आवाहन करणे; हा तो दुसरा मार्ग होय.

जोपर्यंत सर्व कृतींच्या ईश्वरी उगमाशी व्यक्ती पूर्णत: समर्पित होत नाही तोवर सहसा, या दोन पद्धतींचे संमिश्रण आढळून येते. तसे समर्पण झाल्यावर मग मात्र सर्व जबाबदारी नाहीशी होते आणि मग साधकाच्या खांद्यावर कोणतेही वैयक्तिक ओझे शिल्लक राहत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82-83)